गुरुंचे मार्गदर्शन
जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर गुरूचे मार्गदर्शन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मग तो कोणत्या ही क्षेत्रातील गुरू असो. शास्त्रीय पध्दतीने विविध क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करून विज्ञानाच्या कसोटीवर तपासून घेणे आवश्यक आहे. तरच देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो आणि तो झालेला आपण पहातो आहे. पुढेदेखील होतो आहे. गुरुला संशोधनाशिवाय दुसरा पर्याय नाही.
काळ्या आईची सेवा करताना.योग्य त्या अनुषंगाने संशोधनं केलेल्या अनुभवी किंवा तपस्वी गुरूच्या मार्गदर्शनाखाली मातीशी एकरूप होऊन श्रमाचा घाम गाळावा लागतो. काळ्या आईची सेवा करताना योग्य त्या अनुषंगाने संशोधन केलेल्या अनुभवी किंवा तपस्वी गुरूच्या मार्गदर्शनाखाली मातीशी एकरूप होऊन श्रमाचा घाम गाळावा लागतो. काळ्या आईच्या मातीची सेवा करताना ऊन, वारा, वादळ पाऊस कशाचीही पर्वा न बाळगता कर्तव्याशी प्रामाणिकपणे झुंज द्यावी लागते. काळ्या आईच्या मातीवर अंतःकरणापासून प्रेम जिव्हाळा अर्पण करावा लागतो. योग्य पध्दतीने मशागत करून काळ्या आईच्या गर्भाशयात विविध प्रकारच्या बियाणांची योग्य त्या वेळी निसर्गातील ऋतूप्रमाणे पेरणी करावी लागते. मातीत बिजांकुरण झाल्यानंतर त्याचं मुलांप्रमाणे संगोपन केले पाहिजे.जमिनीत बियाणांचा एक दाणा स्वतःला मातीत गाडून घेतो. म्हणून आपणास अनेक हजारो धान्याचे कणीस निर्माण करून निसर्ग देतो. म्हणूनच जगाचा अन्नदाता किंवा पोशिंदा सर्व प्राणीमात्राच्या पोटाची भूक शेतकरी बांधव भागवू शकतो.
योग्य पद्धतीने केली तर शेती.
तरच मातीतून पिकतात धान्याचे मोती.
नाही तर शेतकऱ्यांच्या कष्टाची होते माती.
म्हणून अनुभवी शास्त्रीय दृष्टीकोन असलेल्या विज्ञानवादी गुरुंची आवश्यकता आहे. कोणत्याही जातीच्या प्राण्यांचे योग्य पद्धतीने संगोपन करण्यासाठी अनेक वर्षे प्राण्यांचे संगोपन केलेल्या अनुभवी शास्त्रीयदृष्ट्या गुरुच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. राजकीय क्षेत्रात गुरू हेच जातीयवाद, धर्मवाद, दैववादी प्रवृतीना जाणीवपूर्वक खतपाणी घालून देशात अराजकता माजवत आहे. यामुळे देशाची विकासाच्या दृष्टीने वाटचाल होण्याऐवजी अधोगती होत चालली आहे. धर्माच्या आणि जातीच्या नावावर दंगली घडवून किड्यामुंग्याप्रमाणे माणसं मारली जाऊन दिवसाढवळ्या अत्याचाराच्या रक्ताचे पाट वाहताहेत. राज्यकर्ते नेहमी विज्ञानाचा उपयोग गरजेनुसार करीत असतात. सत्ता मिळविण्यासाठी नेहमी जातीच्या, धर्माच्या विषारी विषाणूंची समाजात फवारणी करुन सर्वसामान्य माणसांची डोकी भडकवून सत्ता मिळवितात. सध्याचे राजकारण विज्ञानावर आधारित नसून धर्मावर, मंदिरावर, जातीपातीवर अवलंबून आहे. देवळांचा विकास, विद्येची मंदिर भकास. यासाठी राज्यकर्त्यांचा प्रमुख गुरू हा मानवतावादी, विवेकवादी, विज्ञानवादी, ध्येयवादी विचाराने प्रेरित होऊन करणारा पाहिजे. देशाची तिजोरी लुटून राजकारणाचा व्यवसाय करणारा नको. राजकारण करुन लोकांनी लोकांसाठी चालवलेली लोकशाही मार्गाने चालविणारे लोकप्रतिनिधींची खरी देशाला गरज आहे. देशाचा सर्वांगीण विकासासाठी रात्रंदिवस अहोरात्र मेहनत घेऊन. विविध शास्त्रज्ञांनी शेतीची, प्राण्यांची, बी बियाणांची, वैद्यकीय क्षेत्राची, अवकाशातील उपग्रहाची, शैक्षणिकदृष्ट्या, टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक, यशस्वीरीत्या यांत्रिकी करणात प्रगती केलेली आहे.
राष्ट्रीय थोर समाजसुधारकांच्या विचारांची पूजा केली पाहिजे. गुरू हा समाजाला किंवा विद्यार्थ्यांना नवीन काही देत नाही .जे आहे तेच प्रकटीकरण करीत असतो. कोंडलेल्या मनातील विचारांच्या सुगंधाला बाहेर काढून बंदिस्त असलेल्या विचारांना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत असतो. उपजत सुप्तावस्थेतेतील कलागुणांना वाव देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहून त्यांच्या कलागुणांची गुणवत्ता वाढविणे गरजेचे आहे. आजकाल गुरूच अंधश्रद्धेंच्या, कर्मकांडाच्या महापुरात वाहून जात असलेले सर्रास पहावयास मिळताहेत. उच्च विज्ञानाच्या किंवा सर्वोच्च विद्येच्या पदव्या प्राप्त केलेले गुरू गाड्यांना दर अमावस्येला लिंबू, मिरच्या, बिंबा, चप्पल बांधत आहेत. सत्यनारायण पूजा आजकाल शासकीय कार्यालयात असंविधानीक पध्दतीने चालू असलेली दिसून येते. शासकिय कार्यालय सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी शासकीय तिजोरीतून बांधलेली असतात. पूजापाठ करण्यासाठी नसतात. त्याच्यासाठी कर्मचारी म्हणून शासकीय तिजोरीतून दरमहा पगार देऊन तुमची नेमणूक करण्यात आलेली नाही.किमान याची तरी जाणीव असावी. जे कांहीं करायचे असेल ते तुमच्या व्यक्तिगत घरी ताईत, गंडेदोरे, कर्मकांड मंत्राचा जप, यज्ञ, होम, हवन करीत असताना आपण सर्रास पाहतो आहे. दिवसेंदिवस अंधश्रद्धेच्या विषारी विषाणूंचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढविण्यासाठी गुरू या अवैज्ञानिक गोष्टीना खतपाणी घालण्याचे सातत्याने प्रयत्न करीत असल्याने दिवसेंदिवस मनुवादी व्यवस्थेच्या जहरी सर्पाच्या विळख्यात समाज घट्ट अडकत चालेली परिस्थिती पाहून.यांना सुरक्षित म्हणायचे का? हा खरा प्रश्न पडतो आहे. अनुभवाच्या पुस्तकांतून विज्ञानवादी विचाराने सुसंस्कृत मस्तक घडणे आवश्यक होते. पण तेच मस्तक विज्ञान युगात अंधश्रद्धेंच्या विषाणूंने विज्ञानवादी मेंदू निकामी करण्याचे काम सातत्याने दिसून येत आहे.
माणसाचे राहणीमान सुधारले.
गाड्या बंगले वाढले,
खाणेपिण्याचे प्रमाण वाढले.
विज्ञानवादी विचारांना गाढले.
विद्या मंदिरातही अत्याचार घडले.
हे सर्वजण संपत्तीच्या राशीत बुडाले.
समाजातील सर्व गणितच बिघडले.
असे कसे हे सुशिक्षितानी घडविले.
मा. एन डी.पाटील साहेबांनी एका कार्यक्रमात आपली प्रतिक्रिया दिलेली होती की मी जर एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरू असतो.तर झ्.प्.. किंवा विद्यावाचस्पती पदवीधर माणसांने त्याच्या जीवनात सत्यनारायण पूजा घातली तर त्यांची पदवीच काढून घेतली असती. शिकलेल्या व्यक्तीनं विज्ञानाच्या कसोटीवर आपले विचार चिकित्सा करून शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जे सत्य आहे ते समाजात रुजविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे. गुरू जर विज्ञानवादी, विवेकवादी, चिकित्सक बनून सत्य शोधून विज्ञानवादी शिल्पकार घडविण्यासाठी कार्य करु लागला. तरच देशाचे भावी पिढी विज्ञानवादी आधारस्तंभ घडून देशाला महासत्ता बनवतील यात काही शंकाच नाही. पूर्वीपासून गुरूला समाजामध्ये एक आदरयुक्त मानाचं स्थान असून समाज सुसंस्कृत घडविण्याची सर्वस्वी जबाबदारी आदर्श गुरूवर अवलंबून असते. गूरुने एखादी मातीची मूर्ती किंवा दगडाची मूर्ती घडवताना फेल गेली तर देशाचे किंवा समाजाचे फारसं नुकसान होणार नाही. एखादा इंजिनिअर फेल गेला तर एखादी इमारत किंवा धरण, पूल ढासळले जाऊन किरकोळ प्रमाणात मानवहानी होईल. एखादा डॉक्टर फेल गेला तर एकादा पेशंट फेल जाईल. पण एखादा गुरू फेल गेला तर मात्र देशाच्या भावी पिढीचे जीवन उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. इतर क्षेत्रातील गुरु हे निर्जीव वस्तूवर संशोधनातून कार्य करीत असतात. परंतु विद्या मंदिरातील सजीव मूर्ती किंवा उत्कृष्ट नागरिक घडवण्याची ताकद ही गुरूमध्येच असते. ती जबाबदारी पार पाडत असताना थोडीशी जरी कुचराई झाली तर पुर्णपणे देशाची एकादी पिढी उध्वस्त होते. त्याकरीता गुरू हा परिपूर्ण असला पाहिजे. विद्या मंदिरांचे सद्सदविवेक बुध्दीने पावित्र्य राखण्यासाठी प्रथम आपण विज्ञानवादी, विवेकवादी बनवून देशाच्या भावी पिढीला मनुप्रवृतीच्या विळख्यातून वाचविण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण विज्ञानवादी वादी होणे गरजेचे आहे.
जिजाऊ माऊली ही परिपुर्ण विवेकवादी, विज्ञानवादी विचाराने प्रेरित झालेली होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली आदर्श माता आणि शिक्षिका म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना. वैज्ञानिक आणि विवेकवादी विचारांचे बालपणापासून बाळकडू पाजून वाढविले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून डोळस बनवून सर्वधर्मसमभाव याची शिकवण दिली होती. माणूस हीच जात आहे. दुसऱ्या जाती धर्माचे विष बालमनावर बिंबविलेले नव्हते. सर्व अठरापगड जाती धर्मातील लोकांच्या बद्दल समतेची, बंधुतेची, समानतेची शिकवण दिली. म्हणून शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मातील मावळ्यांना एकवटून हिन्दवी स्वराज्याची स्थापना केली. आदर्श नागरिक घडवायचा असेल तर गुरु हा विज्ञानवादी, विवेकवादी विचारांना चालना देणारा असला पाहिजे.
प्रसन्नजीत राजांना भेटायला गौतम बुद्ध निघाले. ही बातमी राजांना समजल्यानंतर राजानी गौतम बुद्धांचे जंगी स्वागत करण्यासाठी हत्ती एकत्रित केलेले होते. राजाच्या राजवाड्यात एक भला मोठा बलाढ्य हत्ती होता. हत्ती हा शौैर्याचे प्रतीक मानला जातो. राजांनी गौतम बुद्धांची वाद्यांच्या गजरात मिरवणूकीला सुरुवात केली. सर्व सर्व हत्तीचे गुरू (माहूत) हत्तीना घेऊन रस्त्याने चालत होते. गौतम बुध्दांनी एक हत्ती लंगडत चालत होता. हे दृश्य त्यांनी पाहिले. हत्ती चालतांना लंगडत का चालत आहे.याचं निरीक्षण केले. तर जो हत्तीला प्रशिक्षण देणारा माहूत गुरू हत्तीचा दोरखंड धरुन चलला होता. तोच गुरू (माहूत) अपंग असल्याने चालतांना लंगडत असे. ते पाहून हत्तीही लंगडत चालत होता. हे गौतम बुद्धांच्या लक्षात आले आणि त्यानंतर बुध्दांनी माहूत गुरूच्या हातातील दोरखंड आपल्या हातात घेऊन चालायला सुरुवात केल्यानंतर हत्ती न लंगडता सरळ चालू लागला. हे राजांनी पाहिल्यावर राजांचा आंनद गगनात मावेनासा झाला. राजा भरपूर आनंदी होऊन गौतम बुद्धांना प्रश्न विचारला.की नेहमी लंगडत चालणाऱ्या हत्तीवर आपण कोणता उपचार केला आहे. हत्ती सरळ चालू लागलेला आहे.
गौतम बुद्धांनी राजांना सांगितलें की (माहूत) हत्तीला प्रशिक्षण देणारा जो गुरु (माहूत) होता, तोच मुळात लंगडत चाललेला होता. त्यामुळे हत्ती त्या गुरुचेच अनुकरण करीत होता. जसा गुरु तसा शिष्य घडतो. गुरुचेचं संस्कार हत्तीवर झाले होते. जीवनामध्ये गुरूचे संस्कार हे अतिशय महत्त्वाचे असतात. सुसंस्कृत संस्कारानेच माणसातला माणूस घडतो. देवळातील मूर्तीच्या पोटी आजपर्यंत कोणाचाच जन्म झालेला नाही. माणसातील माणूसपण घडलेला नाही. ज्ञानमंदिरातच माणसातील माणूस घडविण्याची प्रक्रिया गुरूंनेच चालवलेली असते. आपण माणूस म्हणून माणसांच्या पोटी जन्माला आलो आहोत. माणूस म्हणूनच शेवटी जाणार आहोत. सर्व क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुरुंनी अंधश्रद्धेच्या गुलामगिरीच्या बंदिखान्यातून बाहेर पडण्यासाठी विवेकवादी विचारांचे सुरुंग लावून बंदिखान्यातून मुक्त व्हावें आणि चौफेर विज्ञानाचे दीप प्रज्वलित करून विज्ञानाच्या प्रखर प्रकाशात न्हाऊन जावे आणि प्रत्येक क्षेत्रातील गुरूंनी विज्ञानाच्या मार्ग स्वीकारून विवेकवादी व्हावे. आजच्या काळात अनेक गुरू अंधश्रद्धा आणि कर्मकांडात अडकले आहेत. विज्ञानाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी गुरूने विवेकवादी दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. विद्या मंदिरातील गुरू विद्यार्थ्यांना सुसंस्कृत बनवण्याचे कार्य करतात. त्यांनी आपल्या विचारांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी आणि त्यांना विज्ञानवादी दृष्टिकोनातून मार्गदर्शन करावे. सर्व क्षेत्रातील गुरूंनी अंधश्रद्धेच्या गुलामीतून मुक्त होऊन विवेकवादी बनावे. भावी पिढीला विज्ञानाचे ज्ञान देऊन त्यांना सुसंस्कृत नागरिक बनवावे. जिजाऊ माऊलींनी छत्रपती शिवाजी महाराजांना जसे विज्ञानवादी विचार दिले, तसेच आजच्या गुरूंनी भावी पिढीला विज्ञानवादी आणि विवेकवादी बनवून देशाच्या प्रगतीसाठी कार्य करावे. -आर पी. देशमुख