आरसा  !

आपल्याला प्रत्येकाला सवय असते, सकाळी उठल्यानंतर आरशात बघायचं किंवा घरी आल्यानंतर, बाहेर जाण्याआधी वगैरे. आरशात बघण्याची खरी वेळ, म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी. कारण दिवसभरात जे काही आपण केलं आहे, काम असो, अभ्यास असो किंवा इतर काही. जर आपल्याशी गप्पा मारायला कोणी नसेल तर आरशाची मारल्या पाहिजेत, कारण तो आपल्याला त्याची बरोबर उत्तर देतो. आपण इतरांशी खोटं बोललेलं असो किंवा आई-वडिलांशी देखील खोटं बोललेलं असो, आरसा आपल्याला सांगतो की, तू आज कोणाकोणाशी खोटं बोलला आहेस आणि त्यापेक्षा स्वतःशी आणि स्वतःच्या मनाशी किती खोटं बोलला आहेस.

स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी! आपुलीच प्रतिमा होते आपलीच वैरी !!
 घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा! उघड दार देवा आता उघड दार देवा!!  
देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा! उघड दार देवा आता उघड दार देवा......

लहानपणापासून सुधीर फडके यांनी गायलेलं हे सुंदर गाणं आपण गात आहोत तसे शाळेमध्ये भक्ती गीतामध्ये किंवा मूल्य शिक्षणाच्या तासांमध्ये हे गाणं गाऊन घ्यायचे आणि त्याचा अर्थ देखील प्रत्येक दिवशी प्रत्येक कडव्याचा सांगितला जायचा. जर तो अर्थ नाही समजला, तर तो घरी गेल्यानंतर आई-बाबांना विचारल्यावर आई-बाबा देखील उत्तमरीत्या समजून सांगायचे. त्याचाच कदाचित आत्ता जीवनामध्ये खूप फायदा झालेला आहे.

या देहाची तिजोरी मधलं सगळ्यात आवडतं कडवं म्हणजे हेच - स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी. प्रत्येकाला आरशामध्ये बघायला खूप आवडते. आपण किती सुंदर दिसतो, कोणते कपडे परिधान केल्यानंतर आपण कसे दिसतो, केशभूषा केल्यानंतर अजून आपण किती सुंदर दिसतो हे सर्वांना बघायला आवडते आणि ते बघण्याचे साधन म्हणजे आरसा. खरंच आरसा आपल्याला आपले प्रतिबिंब उत्तमरीत्या दाखवत असतो. फक्त ते बघत असताना आपले डोळे आणि मन निखळ पाहिजे, स्वच्छ पाहिजे. कारण ज्या नजरेने आपण त्या आरशामध्ये बघू, त्याच नजरेची प्रतिमा आपल्याला त्या आरशामध्ये दिसत असते. हे उत्तमरीत्या लहानपणी आईने समजावून सांगितले. आईने सांगितले तसे आम्ही बहिणींनी उत्तमरित्या पालन करण्याचा प्रयत्न केला आणि करत आहोत.  

 आरसा हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय असतो. कुठे फिरायला गेलो किंवा कोणाच्या घरी गेलो, ट्रेनमध्ये असो, बसमध्ये असो, आपल्याला जर आपलं रूप बघायचं असेल तर आरसा असणे आवश्यक असते. आता आरसा जरी नसेल तरी मोबाईल मध्ये आपले रूप बघितले जाते हे त्याला मिळालेले जोड साधन आहे. पण आरशाचे खरे महत्त्व लहानपणीच शिक्षकांनी उत्तमरीत्या समजावून सांगितले ते म्हणजे मूल्य शिक्षणाच्या तासाला. पहिली ते चौथी, मुलगा असो वा मुलगी, त्याला आरशाचं एवढं आकर्षण नसतं. पण जसजसे मोठे होत जाऊ, समजायला लागते, तसतसे आरसा हवाहवासा वाटतो. मुलगा असो वा मुलगी, आरशा पुढे उभ राहिलं की तासान्‌तास कधी निघून जातात हे त्यांना समजत नाही. ते स्वतःलाच न्याहाळत असतात, स्वतःची स्तुती करत असतात, किंवा मी असे केल्यानंतर कसे दिसेल किंवा मी हे परिधान केल्यानंतर अजून कसे सुंदर दिसेल? लोक कसे माझ्याकडे आकर्षित होतील? याचा ते विचार करत असतात. आणि हा विचार करत असताना ते आरशाशी देखील गप्पा मारत असतात. मला माहित नाही, तुम्ही लोकांनी कधी आरशाशी गप्पा मारल्या आहेत की नाही? पण मी मात्र मारल्या आहेत. कारण, आरसा हा आपल्याला आपलेच प्रतिबिंब दाखवत असतो. आपल्या मनात जे काही चालले आहे, ते आरसा आपल्याला आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्षरीत्या दाखवत असतो. बाबांना आरशासमोर उभा राहिलेलं अजिबात आवडायचं नाही. जे काही आहे, ते पटापट आवरा आणि कामाला लागा. उगीचच आरशासमोर वेळ घालवायचा नाही. किंवा बघायचंच आहे तर आरशाशी गप्पा मारा, असे बाबांनी आणि आईने सांगितले. त्यात खरंच काही शिकण्यासारखं होतं का?

आपल्याला प्रत्येकाला सवय असते, सकाळी उठल्यानंतर आरशात बघायचं किंवा घरी आल्यानंतर, बाहेर जाण्याआधी वगैरे. आरशात बघण्याची खरी वेळ, म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी. कारण दिवसभरात जे काही आपण केलंआहे, काम असो, अभ्यास असो किंवा इतर काही. जर आपल्याशी गप्पा मारायला कोणी नसेल तर आरशाची मारल्या पाहिजेत, कारण तो आपल्याला त्याची बरोबर उत्तर देतो. आपण इतरांशी खोटं बोललेलं असो किंवा आई-वडिलांशी देखील खोटं बोललेलं असो, आरसा आपल्याला सांगतो की, तू आज कोणाकोणाशी खोटं बोलला आहेस आणि त्यापेक्षा स्वतःशी आणि स्वतःच्या मनाशी किती खोटं बोलला आहेस.

स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी! आपुलीचा प्रतिमा होते आपलीच वैरी.....कारण, आरसा आपण ज्या नजरेने बघू त्या नजरेने आपल्याशी गप्पा मारत असतो. जर आरशाला आपण म्हटलं की मी आज खूप सुंदर दिसत आहे तर आरसा आपल्याला तेच उत्तर देतो की, खरच तू खूप सुंदर दिसत आहेस. पण तेच जर आपलं मन प्रसन्न नसेल किंवा काही चुकीचं काम केलं आणि आरशासमोर गेलो की  आरसा आपल्याला पटकन सांगतो की, आज तू हे चुकीचं काम केलेलं आहेस. तू इतरांशी जरी खोटं बोलला असशील तरी माझ्याशी खोटं बोलू शकत नाहीस.

आत्ताच्या या काळामध्ये घरामध्ये आरसा लावताना देखील दिशा बघितली जाते. कोणत्या दिशेला आरसा लावला की भरभराट येते? किंवा कोणत्या दिशेला आरसा लावला की कलह-द्वेष घरात निर्माण होतो हे वास्तुशास्त्रानुसार आता बघितले जाते. पण मी लहान असताना जिथे जागा मिळेल तिथे आरसा लावला जायचा किंवा त्या काळात कदाचित आरशाची जागा म्हणजे लोखंडी कपाट. त्यावरच तो आरसा असायचा. पण आत्ताच्या या काळामध्ये वास्तुशास्त्रानुसार आरसा लावला जातो. म्हणजेच आरशाला किती महत्त्व दिले जाते ते बघा.

दोन दिवसांपूर्वीचा ताजा प्रसंग म्हणजेच, पुण्यामध्ये अल्पवयीन मुलाने चार चाकी चालवत असताना, त्याच्या गाडीखाली येऊन एक तरुण आणि तरुणी यांचा मृत्यू झाला. आता यामध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्यांची काही चुक नव्हती, कारण गाडी चालवणारा हा अल्पवयीन असून त्याने दारू प्यायलेली होती. मग मला एक प्रश्न पडतो, हा प्रश्न मलाच नाही तर प्रत्येक सुजाण नागरिकाला, आता जे कोणी ही बातमी वाचत आहेत, टीव्हीवर बघत आहेत, त्यांच्या प्रत्येकाच्या मनात हाच एक प्रश्न आहे की पुढे काय? मुलं बाहेर काय करत आहेत याकडे आई-वडिलांचे लक्ष नव्हतं का? कारण, आम्ही लहान असताना सातच्या आत घरात हे आई-बाबांचं ठरलेलं वाक्य होतं. त्याचा आम्हाला कधीकाळी कंटाळा यायचा किंवा राग देखील यायचा. पण या वयात आल्यानंतर समजत आहे की आई बाबा जे सांगत होते ते बरोबर होते. कारण काळाचा  काही नाही भरोसा.

आरसा म्हणजे आपले आई-बाबा असतात. आपला जन्म झाल्यानंतर नातेवाईक, मित्रमंडळी म्हणतात, अहो! तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा आईवर गेलाय किंवा बाबांवर गेलाय. म्हणजेच आपण त्यांची सावली म्हणून जन्माला आलेलो असतो. म्हणजेच आपलं प्रत्येक पाऊल हे त्यांना सुख देणारं असावं की दुःख देणारं असावं, हे प्रत्येकाने आपापल्या वागण्यानुसार ठरवावं. लग्न झाल्यानंतर सासरकडचे मुलीला म्हणतात की तू तुझ्या आईची प्रतिमा आहेस. मुलाला म्हटलं जातं की तू देखील तुझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहेस. म्हणजेच आपण आरशामध्ये न बघता आपल्या आई-बाबांच्या डोळ्यात पाहिलं पाहिजे. त्यांनी आपल्यासाठी जी काही स्वप्ने बघितलेली आहेत किंवा त्यांच्या काही अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी त्यांचं ऐकलं तर त्यात काही वावगं नाही. पण हल्लीच्या पिढीला आई बाबा जे सांगतात किंवा घरातले इतर मोठी माणसं, आजी-आजोबा जे काही महत्त्वाच्या सूचना देत असतात, त्यांने ही मुलं त्यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर इरिटेट होत असतात. पण स्वतःच्या हातून काही चूक झाली की, ती निस्तरायला मात्र आई-बाबा, आजी-आजोबा लागतात. लागतात ना? मग त्यांचं जर आधी ऐकलं तर अशा चुका कशाला होतील? आणि चुका झाल्याच तर त्या सुधारण्यासाठी आई-बाबा, आजी-आजोबा आपल्या पाठीशी समर्थपणे उभे असतात. कारण त्यांना माहीत असतं, माझ्या मुलाकडून किंवा मुलीकडनं कोणतीही चूक जर घडत असेल तर त्याची शिक्षाही मलाच होणार असते आणि नकळत जर झाली असेल तर ती चूक तो नक्कीच सुधारेल आणि सगळ्यात पहिले घरी येऊन मला सांगेल.

आधीच्या काळी लहान मुलांच्या हातामध्ये कोणी पाहुणे आले की एक-दोन रुपये ठेवले जायचे. त्यातच ते मुलं खूप आनंदी व्हायचे आणि ते पैसे लगेच आई-बाबांकडे दिले जायचे. आई-बाबा पण ते पैसे न वापरता त्यांचा गल्ला बनवायचे त्या गल्ल्यांमध्ये ते पैसे साठवायचे. आता काय होत आहे? मुलाने एक रुपया मागितला तर त्याच्या हातात दहा रुपयाची नोट ठेवली  जाते. दहा रुपये मागितले की हजाराची,  हजार मागितले की दहा हजार. पैशांची गठ्ठि ठेवली जाते, त्यामुळे हल्लीच्या पिढीला पैशाचे महत्व समजत नाही. ते कमवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात हे उमंगत नाही. त्याचा परिणाम असा झाला आहे की आजकालची पिढी व्यसनाधीन होऊ लागली आहे. आपल्या खिशात भरपूर पैसा आहे तर तो आपण कसाही वापरू शकतो. मग त्याचा उपयोग होऊ द्या वा दुरुपयोग. आपल्या वर्तणुकीने इतरांना त्रास होतो किंवा एखाद्याचा जीव जावो हे त्यांना समजत नाही. आणि जेव्हा समजते, तेव्हा एखाद्याचे कुटुंब उध्वस्त झालेलं असतं आणि वेळ निघून गेलेली असते.

तेच जर घराबाहेर पडत असताना आपण जसे आरशामध्ये बघतो तसेच देवाच्या पाया पडून जा. आई बाबांच्या पाया पडून जा. आणि मी काही काम करायला बाहेर चाललो आहे, खेळायला बाहेर चाललो आहे, किंवा इतर काही कारणास्तव बाहेर चाललो आहे, ते कारण सांगून जा आणि किती वाजता घरी येणार आहे हेही सांगून जा. म्हणजे आल्यानंतर जेव्हा आपण आरशासमोर उभे राहू तेव्हा आरसा आपल्याशी खोटं बोलणार नाही, तर जे काही घडलं आहे तेच तो आपल्याला अभिमानाने सांगेल. -सौ निवेदिता सचिन बनकर-नेवसे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुखवटे