मुखवटे

एकटा कसलेला नट जसे वाईट नाटकही तोलून  धरतो, तशी घरातील ‘आई' नावाचा मुखवटा चढवून ही स्त्री संसाराचा गाडा सांभाळत असते. जवळपास प्रत्येक घरातील नुकतेच लग्न झालेला मुलगा, जवळपास हीच भुमिका नवरदेव, जावई, भाऊ, वडिल वगैरे भुमिकेत कसलेल्या नटासारखा वेगवेगळे मुखवटे धारण करत असतो. पण नववधुला जरा जास्तच भुमिका अनेक मुखवट्यांनी सजवावी लागते हे मात्र खरे !

खरं पाहिलं तर आपण सर्वच वेळोवेळी वेगवेगळे मुखवटे धारण करत असतो. भले मुखवटे तात्पुरती, क्षणैक वा कायम स्वरूपी, अथवा नाईलाजस्तव, धारण करावी लागत असतात वा केलेली असतात.

बघाना! लहान मुलं -मुली लहान असताना हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी कधी रडण्याचे, तर कधी हट्ट पुरा करून घेण्यासाठी, लहान-मोठ्या भावंडाची खोटी नाटी तक्रार आई वडिलांकडे  करून, खरे वाटेल असा अविर्भाव चेहऱ्यावर आणून आपले इप्सित साध्य करून घेत असतात. तो त्यांचा वेगळा अविर्भाव म्हणजे एक क्षणैक घेतलेला मुखवटाच असतो.

मुलं शाळेत जातात तेंव्हा अभ्यासासाठी, होमवर्क न करण्याच्या अनंत सबबी सांगण्यासाठी, ऊशिरा शाळेत येण्याची कारणे सांगणाऱ्या सगळ्या सबबी, अगदी चेहरा मोहरा रडकुंडीला आणून वेळोवेळी सांगत असतात ते काय असते? तर तात्पुरता मुखवटाच असतो नां !

तर आपण बालपणा पासून, शिकतांना, नोकरीत असतांना, समाजात वावरतांना, नातेवाईकांत आपली इमेज अघिक ऊजळ करण्यासाठी अनेकदा अनेक मुखवटे धारण करत असतो नाही कां? त्यातल्या त्यात  समाजात वा नातेवाईकांमधे वावरतांना आपण एक आपली काल्पनिक इमेज निर्माण करून ती जपण्याचा आटोकाट प्रयत्न वेगवेगळ्या मुखवट्यांवाटे करत असतोच.

नाटक, सिनेमा ,भुमिकेच्या मागणी नुसार बदलावा लागणारा मुखवटा, आप्तजन, मित्रमैत्रिणी, सगे, शेजारी, यांच्याशी  घडणाऱ्या घटना व आलेल्या अनुभवाने व प्रसंगानुरुप आपल्या वागणूकीतील बदल म्हणजे चढवावा लागणारा खऱ्याखोट्याचा मुखवटाच ! असे मला तरी वाटते.

लोकसभा निवडणूका आता संपत आल्यात.. पण तरीही काही ठिकाणी निवडणूकीचे वातावरण आहे. अनेकदा राजकीय पुढारी सुध्दा मुखवट्यांचा वेळोवेळी ऊपयोग करत असतात ! पण या...जगातल्या सर्व मुद्रा अभिनयात अग्रणी असतो तो मात्र नववधूचा मुखवटा.

माहेरच्या अगदी विरूद्ध वातावरण, वेगवेगळ्या स्वभावाची माणसे, नवीन परिसरातील लोक, सासरच्या लोकांच्या अपेक्षा, अल्लडपणातून पोक्त व समंजसपणे वागण्यासाठीची कसरत, अशा सर्वांना तोंड देण्यासाठी  तिच्या नकळत वेगवेगळे मुखवटे तिला  धारण करावे लागतात.

 नववधूचे बोलणे वागणे हसणे याकडे अनेकांच्या नजरा असतात. माहेरला नावे ठेवू नयेत म्हणून तिला या सर्वाचा तोल सांभाळण्याची कसरत करावी लागते. त्यामुळे प्रत्येक क्षणाला वेगवेगळा मुखवटा तिला चढवावा लागतो. कधी कधी तिला एका दिवसात अनेक मुखवटेही धारण करावे लागतात. लग्न झाल्यावर माहेर सुटलं की अल्लड मुखवटा टाकून सून, पत्नी, वहिनी,  काकू, मामी अशा जबाबदारीच्या मुखवट्यात परावर्तीत व्हावे लागते.

 हे मुखवटे अद्दश्य असतात. त्या मुलीलाही आपण कसे मुखवटे बदलतो किंवा बदलले जातात  हे समजतपण नाही. ही कला शिकवावी लागत नाही. बहुतेक प्रत्येक मनुष्याला जन्माला आल्यापासूनच ही कला अवगत असते ! तरीही दर क्षणाला मुखवटे  बदलणे नववधु इतके कुणाच्या वाट्याला येत असेल असे वाटत नाही. सासर माहेर जोडणे आणि आपलं मन मोडणे ही कसरत सतत करावी लागते.

लग्नात नवऱ्याचे खांद्यावरील उपरणे व नवरीच्या पदराची गाठ बांधली जात असते. नवरा उपरणे खांद्यावरून उतरून आपल्याच घरात टाकत असतो; पण नववधूला गाठी सकट पदर सांभाळून, जबाबदारीचे ओझं वागवावे लागते. ती संसारामध्ये मुखवटे बदलत इतरांच्या स्वभावाशी जुळवून घेत असते. माणसे दुखावणार नाहीत म्हणून आपल्या स्वभावात बदल करत असते. अशाप्रकारे तिचा माहेरचा मुखवटा गळून पडतो. आणि  वाद न घालता अलिप्ततेचा,सामंजस्याचा,तडजोडीचा मुखवटा ती चढवत असते.

सौख्याची किंमत स्वस्तात नसते  हेच खरे. संसाराची तप्तपदी होऊ नये म्हणून ती शक्यतो जपत असते. काही वेळा मात्र असह्य झाल्यावर, तोही चांगुलपणाचा मुखवटा तिला फेकावा लागत असतो.  अल्लड मुलीचा मुखवटा कधी बदलला जातो ते तिच तिलाही कळत नाही. जेव्हा  सिंहावलोकन होते तेंव्हा मात्र खरंच आपण  इतक्या कशा बदललो ? हा विचार तिचा तिलाच संभ्रमात टाकत असतो आणि हे सारे करतांना ‘मुखवट्या' मागचा खरा चेहरा तिला स्पष्टपणे दिसत असतो.

‘नववधू ते कर्ती स्त्री' या प्रवासात आई, आजी, सासू या मुखवट्यांची कालानुरूप भर तिच्यात पडत असते. हे संसारातील मुखवटे  मात्र तिला कायम वागवावे लागतात. नाटक सिनेमा  या वेळेचे मुखवटे भूमिका संपली की फेकून देता येतात; पण ही संसारातील भूमिका मात्र आयुष्याच्या शेवटपर्यंत निभवावी लागते.

 तडजोड हा एकप्रकारची मेकअप असतो. तर समाधान व आनंदी चेहरा हा अभिनय असतो. त्यातील सराव, व सहजता  हा महत्त्वाचा  कळीचा मुद्दा असतो. खरं तर अभिनयाची कमाल उंची जेव्हा आपण गाठतो, त्यावरच आपली चांगली किंवा वाईट ही ईमेज ठरवली जात असते. काहींना ती जमते काहींना अजिबात नाही !

थोडक्यात काय तर विदुषकासारख्या, मनातील  अनेक भावना लपवून, इतरांच्या सुखासाठी, आनंदासाठी आपणांस ‘मुखवटा' चढवावा लागतो. त्यामुळेच काही माणसे आपापला स्वार्थ साधून घेत असतात. पण त्या मुखवट्यामागील व्यथा ज्याची त्यालाच माहित असते.

एकटा कसलेला नट जसे वाईट नाटकही तोलून  धरतो, तशी घरातील  ‘आई' नावाचा मुखवटा चढवून ही स्त्री संसाराचा गाडा सांभाळत असते. जवळपास प्रत्येक घरातील नुकतेच लग्न झालेला मुलगा, जवळपास हीच भुमिका नवरदेव, जावई, भाऊ, वडिल वगैरे भुमिकेत कसलेल्या नटासारखा वेगवेगळे मुखवटे धारण करत असतो. पण नववधुला जरा जास्तच भुमिका अनेक मुखवट्यांनी सजवावी लागते हे मात्र खरे !

 मुखवट्याचा सर्वात मोठा तोटा हा की, त्याची इतरांना फारशी किंमत नसते  आणि धारणकर्ता या मुखवट्यांच्या जगात स्वतःसाठी जगण्याचे वा आपला असली चेहरा पाहण्याचे जवळपास विसरूनच गेलेले असतात. - अनिल देशपांडे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

हिमाचल देवभूमी