मना सज्जना लेखमाला लेखांक ४२
जगात आपल्याला खरे, निःस्वार्थी, निर्हेतुक प्रेम आढळत नाही. कारण आपणही असे प्रेम कुणावर कधी केले नाही. निर्हेतुक प्रेम केवळ सद्गुरुच करू शकतात. म्हणून तर त्यांना ‘माऊली' म्हणतात. ख-या प्रेमात अहंकाराचा त्याग असतो. ‘मी'पणाचे समर्पण असते. जिथे समर्पण असते तिथे दीनता असते. दीनताम्हणजे लीनता, नम्रता. ही अवस्था साधली की तो दीनानाथ परमकृपा करतो.
बहूतांपरी हेचि आता धरावे।
रघूनायका आपुलेसे करावे।
दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे । श्रीराम ४२।
राघवी वस्ती कीजे हे सांगत असताना समर्थांनी सुरुवातीला मनाला एक प्रार्थना केली की रघुनाथाच्या विलक्षण कार्याकडे चकित होऊन पहा. त्याच्या आश्चर्यकारक लीला पहा. सर्व वेद, शास्त्रे, पुराणे त्याच्या लीलांचेच वर्णन करतात. त्यांच्याकडे लक्ष दे. तो परमात्मा हेच सुखाचे एकमेव स्थान आहे. त्याच्याशिवाय इतरत्र कुठेही सुख-समाधान मिळणार नाही. म्हणून व्यर्थ इथे तिथे सुखाच्या शोधात भटकू नकोस. आता एकच लक्षात घे की बाकी सर्व सोडून फक्त रघुनाथाला आपलेसे करून घे. रघुनाथ हा दीनांचा नाथ आहे. नाथ म्हणजे स्वामी, धनी. जे आपला अहंकार सोडून अत्यंत लीन होऊन त्याला शरण जातात त्यांचा सर्व भार तो घ्ोतो. त्यांचे पालन, पोषण, रक्षण सर्व जबाबदारी आता त्याच्यावर असते. त्याच्या पायातील तोडर त्याचे ‘दीनांचे रक्षण हे ब्रीद गर्जून सांगतात. शरणागतांचे रक्षण करण्याचा त्याने शब्द देऊन ठेवला आहे. समर्थ म्हणतात, ”हे मना! त्याच्यावचनावर तू विश्वास ठेव. त्याला आपलासा करून घे.त्याच्यापासून दूर राहू नकोस.” कोणीही आपलासा होतो तो सहवासाने, प्रेमाने, संवादाने.म्हणून रघुनाथाच्या सतत सहवासात राहावे. प्रेमाने त्याच्याशी संवाद करावा. आपले सुखदुःख त्याला सांगावे. त्याचा सल्ला मागावा. त्याच्याकडे तक्रार करावी. त्याच्याशी भांडावे देखील आणि पुन्हा त्याच्याशीच गोडी करावी. कारण एकदा आपले म्हटल्यावर तो कधीही तुमची उपेक्षा करीत नाही.
आपण जगाला आपले मानतो. जगात प्रेम शोधतो. जगावर प्रेमही करतो. पण त्या प्रेमात स्वार्थ असतो. जगाने आपल्यावर प्रेम करावे, आपल्या मनासारखे वागावे ही उघड किंवा सुप्त, पण अपेक्षा असतेच. कारण तेच जग आपल्या मनाविरुद्ध वागले, आपल्या स्वार्थाआड आले, की आपल्याला क्रोध येतो, दुःख होते.जगातील आपण सर्वच लोक असेच वागत असतो. आईचे मुलांवर नितांत प्रेम असते, पण ते निरपेक्ष असेलच असे म्हणता येत नाही. आपल्याला खरे, निःस्वार्थ ,निर्हेतुक प्रेम जगात आढळत नाही कारण आपणही असे प्रेम कुणावर कधी केलेलेनाही. निर्हेतुक प्रेम केवळ सद्गुरूच करू शकतात. म्हणून तर त्यांना ‘माऊली' म्हणतात. खऱ्या प्रेमात अहंकाराचा संपूर्ण त्याग असतो, ‘मी'पणाचे समर्पण असते. जिथे समर्पण येते तिथेच दीनता येते. ही दीनता म्हणजे लीनता, नम्रता. दैन्यता नव्हे. अशा दीन भावाने आपण जगाशी वागलो की जग आपल्याशी प्रेमाने वागेलच याची खात्री नाही. कदाचित त्या नम्रतेचा गैरफायदाही घेतला जाईल. पण हाच दीन भाव सद्गुरूप्रती असेल तर ती माऊली आपल्यावर प्रेमाचा वर्षाव केल्याशिवाय राहत नाही. आईने लहान बाळाचे रक्षण करावे तसे सद्गुरु आपले रक्षण करतात. विशुद्ध प्रेम मागायचेच तर सद्गुरूंकडेचमागावे. प्रेम करायचेच तर सद्गुरूंवर करावे. सुरुवातीला भले ते सकाम असेल; पण त्यांच्या संगतीत राहून, त्यांचे सद्विचार ऐकून आपल्या विचारांमध्ये निश्चित पालट होत जातो. इच्छा, कामना, वासना लय पावतात. जगाकडून, जगातून किती आणि काय मिळवायचे त्याच्या मर्यादा, त्यातील फोलपणा लक्षात येतो. भगवंत जो पूर्णकाम, आनंदस्वरूप आहे त्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू होते. म्हणूनच आपलेसे करायचे ते भगवंताला, सद्गुरूंना. त्यासाठी नित्य त्यांचे स्मरण करावे, त्यांचाच विचार करावा, आपली प्रत्येक कृती त्यांच्यासाठीच आहे या विचाराने अतिशय प्रामाणिकपणे आणि प्रेमाने करावी.
आपल्या इंद्रियांना कार्य करण्याची शक्ती देणारा एक भगवंतच आहे याचा कधीही विसर पडू देऊ नये. आपल्या कोणत्याही क्षमतेचा अहंकार होणार नाही यासाठी दक्ष असावे. आपले संपूर्ण अस्तित्व ही भगवंताची कृपा आहे याची सतत जाणीव असावी. या नरदेहाचे, या मनुष्य जन्माचे सार्थक करायचे असेल तर सतत भगवंताच्या सहवासात राहावे हेच समर्थ आपल्याला मनोबोधातून सांगत आहेत.
जय जय रघुवीर समर्थ - सौ. आसावरी भोईर