रसिकराज पंडित जवाहरलाल नेहरू
पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते (१५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४). भारत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोठे योगदान दिले होते. ते राष्ट्रपिता महात्मा गांधींचे राजकीय वारसदार होते. काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते.काश्मीरचा नाजूक प्रश्न पंडितजींमुळेच चिघळत राहिला आहे, असे अनेकजण म्हणतात. होय. नेहरूंच्या हातून जशी महान कृत्ये घडली तशाच मोठ्या चुकाही घडल्या. त्यातलीच हीही एक आहे.
नुकताच स्वतंत्र झालेल्या भारताला आपल्या पायावर उभे राहण्यासाठी पंडितजींनी अटोकाट प्रयत्न केले. अर्थशास्त्रज्ञ महालॉनॉबिस, विज्ञानी आणि संख्याशास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवार्षिक योजना आखण्यास सुरुवात केली. भाकरा नानगल (गोविंदसागर) धरणासारखे प्रकल्प अस्तित्वात आणले. येथून पुढे हीच आपल्या देशाची तीर्थक्षेत्रे असतील असे त्यांनी सांगितले. म्हणूनच त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटले जाते. पंडित जवाहरलाल नेहरू आणि बॅरिस्टर जिना हे पाश्चात्त्य शिक्षण घेतलेली ठळक व्यक्तीमत्वे होती. त्यामुळे इंग्रजांनी जाणीवपूर्वक भारत पाक फाळणीला प्रोत्साहन दिले तरी आपापली राष्ट्रे उभारण्यात पाश्चात्य विचारांचा प्रभाव या राष्ट्रांवर राहावा हा इंग्रजशाहीचा प्रयत्न होता. ते खोटे होते असे म्हणता येणार नाही.
पंडितजींवर हेरॉल्ड लास्की यांच्या समाजवादी विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे पंडितजींमध्ये समानता, निधर्मीवाद, उदारमतवाद ही तत्त्वे आढळत. नेहरू वृत्तीने स्वप्नाळू होते. अशा वेळी वास्तवाचे भान त्यांना राहातं नसे. असा त्यांच्यावर काही लोकांचा आक्षेप आहे. काश्मीरचा नाजूक प्रश्न पंडितजींमुळेच चिघळत राहिला आहे. होय. नेहरूंच्या हातून जशी महान कृत्ये घडली तशाच मोठ्या चुकाही घडल्या. त्यातलीच हीही एक आहे. पंडितजी राजकीय क्षेत्रात गेले नसते तर ते एक उच्च दर्जाचे साहित्यिक झाले असते. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांची निवडक नावे सांगितली तरी यांची खात्री पटेल :
Letters from a Father to His Daughter
An Autobiography
The Discovery of India
Glimpses of World History
A Bunch of Letters (१९२८ ते १९३३ या काळात आपली कन्या इंदिरा हिला लिहिलेल्या पत्रांचा संग्रह)
या ग्रंथांतून पंडितजींचे साहित्यिक आणि रसिकताप्रवण मन पदोपदी जाणवते.
Glimpses of World History हा ग्रंथ इतिहासाधारित आहे. पंडितजी काही इतिहासकार नव्हते. हा ग्रंथ लिहिताना आपल्याला एच.जी.वेल्स यांच्या The Outline of History या ग्रंथाची फार मदत झाली असे म्हटले आहे. मला तर वेल्सच्या Outline पेक्षाही पंडितजींचा Glimpses हा ग्रंथ सरस वाटतो. मला नेहरूंच्या भावनिक रुपाचे नेहमीच आकर्षण वाटत आलेले आहे. मलाच काय, पंडितजींचे कट्टर टीकाकार असणाऱ्या आचार्य अत्रेंसारख्या थोर व्यक्तीमत्वाला, साहित्यिकालाही पंडितजींच्या रसिकतेला अनुसरून सूर्यास्त' नावाची लेखमाला आपल्या मराठा' दैनिकातून लिहावीशी वाटली. तिलाच पुढे १५ ऑगस्ट १९६४ रोजी ग्रंथरूप लाभले! ते चांगलेच गाजलेही.
१५ नोव्हेंबर १८८९ रोजी जन्मलेले पंडित जवाहरलाल नेहरू २७ मे १९६४ रोजी अनंतात विलीन झाले. शेवटी शेवटी चीनच्या हातून आपल्या राष्ट्राला दारुण पराभव पत्करावा लागला याचे पंडिजींना अत्यंत दुःख झाले होते. मी मृत्यू पावल्यावर माझी रक्षा भारतातील सर्व नद्यांत विसर्जित करावी, अशी पंडितजींची इच्छा होती. अर्थातच ती पुरी करण्यात आली. यातून नेहरूंचे या भारतभूमीवरचे अलोट प्रेम आणि भक्तीच प्रकट होत नाही काय? नेहरूंची रसिकताच जाणवत नाही काय? साहित्यिक होण्याआधी ती व्यक्ती रसिक असावीच लागते. यशवंतराव चव्हाण हे जसे राजकीय नेते होते तसेच ते उत्तम साहित्यिकही होते. ते म्हणत, रसिक निर्माण करता येत नाही. तो असावा लागतो. पंडित जवाहरलाल नेहरू तसेच होते. म्हणून रसिकराज पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना माझे शत शत प्रणाम! -नाना ढवळे