कवी राम गणेश गडकरी
कवी राम गणेश गडकरी राम गणेश गडकरी यांची जन्मभूमी गुजरात व कर्मभूमी महाराष्ट्र. तिसरी व चौथी या इयत्तांसाठी ते कर्जत जि.रायगड येथील जीवन शिक्षण मंदिर येथे शिकण्यासाठी आले. तेथे त्यांचा मराठी भाषेचा पाया घातला गेला. पाचवीपासून पुणे येथे मराठी वातावरणात दिग्गज साहित्यिकांच्या सहवासात राहिल्यामुळे गडकरी यांना मराठी भाषा व महाराष्ट्राबद्दल आपुलकी वाटू लागली, त्यातूनच महाराष्ट्र गीत जन्माला आले. महाराष्ट्र गीतात राम गणेश गडकरी यांनी महाराष्ट्राबद्दल आदर व्यक्त केला आहे. २६ मे १८८५ रोजी नवसारी (गुजराथ ) येथे जन्म व २३ जानेवारी १९१९ रोजी सावनेर येथे निधन असे अवघे ३३ वर्ष ७ महिने २८ दिवस इतके अल्पायुष्य त्यांना लाभले.
राम गणेश गडकरी म्हणजेच मराठी भाषेचे शेक्सपिअर, प्रेमाचे शाहीर, विनोदी साहित्यातील बिरबल सरस्वतीच्या दरबारातील एक प्रतिभा सम्राट यांचा उल्लेख नाटककार म्हणून होत असला तरी ते खऱ्या अर्थाने ते कवीच होते. त्यांचे नाट्य असो, काव्य असो, अथवा विनोदी लेखन असो, त्यात कवित्व आढळतेच. गडकरी नाटक हे काव्याचे एक अंग आहे़ असे मानत असत. नाटक हे काव्याचे उत्तरस्वरूप आहे़, असे त्यांचे मत होते.
गडकरी यांच्या कवितांचा अभ्यास केल्यास एका अभागी जीवाची कहाणी, दुःखाच्या राशीवरून चालत हा कवी गेला व अल्प आयुष्य जगून स्वतःची कहाणी आपल्या साहित्यातून सांगून गेला असे लक्षात येते. काव्य कराया जित्या जीवाचे जातिवंत करणेच हवे असे गडकरी यांनी काव्याची व्याख्या' या कवितेत म्हटले आहे़. ‘जित्या जीवाचे जातिवंत करणेच' म्हणजे रसरसलेली उत्कट अनुभूती आणि रसरसलेल्या उत्कट अनुभूतींचा तितकाच उत्कट आविष्कार करणे गडकरी यांच्या दृष्टिने काव्याचे सर्वात स्पृहणीय कार्य होय.
गडकरी यांच्या काव्यकलेचे सारे मर्म उत्कृष्ट अनुभुतींच्या या आविष्कारातच साठविलेले आहे़. अतृप्त आकांक्षा, वेड्या आशा, इच्छाचित्रे, निष्काम व उदात्त प्रेमातील पावित्र्य, प्रेम भावनेचा पहिला तरळता साक्षात्कार, प्रेम साफल्याची सोनेरी स्वप्ने, प्रणयाची दारुण वंचना झाल्यामुळे होणाऱ्या तीव्र वेदना, आणि या वेदना सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यामुळे लागलेला मृत्यूचा ध्यास, या साऱ्या विविध सूक्ष्म भावनांचा गडकरी यांच्या कवनांमधून सरस व उत्कट आविष्कार झालेला दिसतो.
गडकरी त्यांच्या स्वप्नांतच रमलेले असत आणि ती भंग पावल्यावर मनोमन निराश होत असत. सुदैवाने ही निराशा त्यांच्या संवेदनशील मनाला प्रोत्साहन देणारी ठरली आणि आपले दुःखद अनुभव त्यांनी कवितेद्वारे व्यक्त केले. त्यांच्या स्वभावाचे दोन पैलू आहेत. एक म्हणजे हिंदू तत्वज्ञान विचारांची बैठक असल्याकारणाने दुःख, वेदना, व्यथा सहन करण्याची शक्ती आणि दुसरा म्हणजे जीवनातील विसंगतींचा ओठांवर हसू ठेवून स्वीकार करण्याची विनोदबुद्धी. जीवनातल्या निराशेला कवितेतून अभिव्यक्ती दिल्याने गडकऱ्यांनी जीवनातला समतोलपणा ढळू दिला नाही.
गडकऱ्यांच्या प्रेमकविता या वेगवेगळ्या मनःस्थितीत त्यांनी लिहिल्या. त्यांनी कवितेतून प्रेमाची उत्कटता आणि वेदना यांचे छान वर्णन केले आहे़. ‘मुरली' या कवितेतून त्यांनी प्रेमाच्या उत्कटतेचे वर्णन केले आहे़. या कवितेतून गडकऱ्यांनी राधेची कृष्णाप्रति असलेली प्रीती आणि भक्ती या दोन्ही भावनांचे छान मिश्रण केले आहे़. गडकऱ्यांच्या प्रेमकवितांत ‘गुलाबी कोडे' या कवितेत शृंगारिक कल्पनेचे यथायोग्य वर्णन केले आहे़. ‘गोफ' या कवितेत प्रेमी एकमेकांत प्रेमाच्या धाग्याने कसे गुंफले जातात याचे वर्णन केले आहे़. गडकरी यांच्या मते कवी हा प्रेमदेवतांच्या पायातील शृंखला आहे़. ‘प्रेम आणि मरण' या कवितेत प्रेमिकांच्या हृदयातील प्रेमाची वेदना आणि त्याची पूर्ती याचे रूपकात्मक वर्णन केले आहे़, आणि तेही पुढे केवळ एका क्षणात जेव्हा प्रेमाची परस्पर कबुली देऊन पूर्ती होते आणि त्याच क्षणी मरण येते.
फणसाचे पान' या कवितेत प्रेमाचाच सतत विचार करणाऱ्या कवीला त्याची प्रेरणा आजूबाजूच्या छोट्या छोट्या गोष्टींत सापडते. फणसाच्या पानाने कवीला प्रेमात असतानाच्या आनंददायी क्षणांची आठवण करून दिली, त्या क्षणांची आठवणींनी पुन्हा एकदा तेवढ्याच प्रखरपणे त्या प्रेमाचा अनुभव तो घेऊ शकला.
कृष्णाकाठी ‘कुंडल' ही सुध्दा एक शृंगारिक कविता आहे़. तिची पार्श्वभूमी ऐतिहासिक आणि शेवट दुखान्त आहे़. गडकऱ्यांनी जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात लिहिलेल्या कवितांत खिन्नतेचा, दुःखाचा सूर आळवला आहे़. ‘शेवटचे प्रेमगीत' ही कवितासुध्दा या नैराश्याच्या भावनेची परिसीमा आहे़. कवीला वाटते की आयुष्य निष्फळ आहे़ आणि अपेक्षा करतात की मृत्यूमुळेच या यातनांतून सुटका होईल.
जिचे मूल तिच्यापासून मृत्यूने हिराउन घेतले आहे़ अशा विधवेचे दुःख व्यक्त करणारी ‘राजहंस माझा निजला' ही हृदयस्पर्शी कविता जेव्हा ‘मनोरंजन' मासिकात प्रसिद्ध झाली त्यावेळी त्यातील तीव्र दुःखाची जी शब्दचित्रे गडकऱ्यांनी रेखाटली त्याने वाचकांची हृदये हेलवली.गडकरी हे धार्मिक वृत्तीचे होते.त्यांनी ‘अनामिकेचे अभंग' लिहिले त्यातून ज्याप्रमाणे त्यांची भक्ती व्यक्त होते. त्याचप्रमाणे या अभंगातून उत्कट आणि चित्तवेधक कल्पनाही व्यक्त होतात. गडकऱ्यांनी त्यांच्या ‘विरामचिन्हे' या कवितेत स्वतःच्याच आयुष्यातील टप्प्यांचे वर्णन केले आहे़. ते म्हणतात माझी बाल्यावस्थेतील भावना ओसरल्यानंतर आयुष्यात अनेक ठिकाणी क्षणभर का होईना, थांबायचेय हे दर्शवणारी विरामचिन्हे माझ्या आयुष्यात आली. देव आहे़ का? आणि आयुष्याचा अर्थ काय? हे विचारतच आयुष्याची सुरुवात झाली आणि मग आयुष्यात प्रश्नचिन्हांची मालिकाच सुरू झाली. लग्नानंतर पत्नीमुळे मला आयुष्यातील प्रेम आणि आनंद याची जाणीव झाली. हा माझ्या आयुष्यातील अर्धविराम होता; आणि आयुष्य पुढे सरकूच नये असं वाटत होतं. परंतु अनेक प्रसंगामुळे मी गोंधळात पडलो आणि माझ्या मनात ‘उदगारचिन्ह' सुरू झालं. त्यानंतर मला कशाचाच मोह राहिला नाही आणि तेव्हा मात्र मी देवाला विनंती केली की देवा मला तुझ्या पायाशी घेऊन जा आणि माझ्या आयुष्याला पूर्ण विराम मिळू दे. ही कविता वरवर, बाह्यतः साधी वाटली तरी कवीने आयुष्याचे ज्या अस्सलपणे वर्णन केले आहे़ त्यामुळे वाचकांना त्या कवितेने भुरळ घातली.
आपल्या मृत्यूनंतर आपल्याला मानसन्मान मिळेल अथवा साहित्याचा उदो उदो होईल अशी राम गणेश गडकरी यांची अपेक्षा नव्हती. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांजवळ बोलतांना इच्छा व्यक्त केली की माझ्या मृत्युनंतर जमल्यास माझा अर्धकृती पुतळा उभारा व तो पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात अशा ठिकाणी ठेवा की तेथून जाणाऱ्या विद्वानांची पायधूळ माझ्या मस्तकावर पडेल. त्यांना मृत्युची चाहूल लागली होती.मृत्यूपूर्वी नऊ महिने आधी म्हणजे १-४-१९१८ रोजी ‘माझा मृत्युलेख' हया कवितेत ते म्हणतात.....
यावज्जीवही ‘काय मी' न कळले आप्ताप्रती नीटसे ।
मित्रांतेही कळे न गूढ - न कळे माझे मलाही तसे ।।
अज्ञाता ! मरणोत्तर प्रकट ते होईल होईल तूंते कसे ।
कोठे आणि कधीतरी जगति मी होऊन गेलो असे ।। १।।
राम गणेश गडकरी यांची जन्मभूमी गुजरात व कर्मभूमी महाराष्ट्र. गडकरी दुसऱ्या इयत्तेपर्यंत गुजराती भाषेत शिकले व वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी लालजी या नावाने ‘गुणसुंदरी' हे गुजराती नाटक लिहिले. सुरुवातीला त्यांचा गुजराती भाषेकडे ओढा जास्त होता. परंतु तिसरी व चौथी या इयत्तासाठी ते कर्जत जि.रायगड येथील जीवन शिक्षण मंदिर येथे शिकण्यासाठी आले. तेथे त्यांचा मराठी भाषेचा पाया घातला गेला. पाचवीपासून पुणे येथे मराठी वातावरणात दिग्गज साहित्यिकांच्या सहवासात राहिल्यामुळे गडकरी यांना मराठी भाषा व महाराष्ट्राबद्दल आपुलकी वाटू लागली. या आपुलकीतून महाराष्ट्र गीत जन्माला आले. महाराष्ट्र गीतात राम गणेश गडकरी यांनी महाराष्ट्राबद्दल आदर व्यक्त केला आहे. वंदे मातरम् व जनगणमन या राष्ट्रगीता इतकेच महत्व गडकरी यांच्या गीतास आहे. राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राबद्दल किती आदर होता तो त्यांनी महाराष्ट्र गीतांतून व्यक्त केला. खरं म्हणजे राम गणेश गडकरी यांना त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला पाहिजे होता; परंतु महाराष्ट्र सरकारने अद्याप त्याबाबत निर्णय घेतला नाही.
राम गणेश गडकरी यांच्या १३९ व्या जयंती निमित्त सर्व चाहत्यांच्या वतीने वंदन! - दिलीप प्रभाकर गडकरी, कर्जत, रायगड