कारखान्यातील भीषण स्फोट आणि निवासी विभाग!
डोंबिवली पूर्व एम आय डी सी फेज-१ येथे निवासी विभाग तर फेज -२ येथे औद्योगिक वसाहत जेथे अनेक लहान मोठे असे छोटे रासायनिक, रंग, टेक्सटाइल, इंजिनीरिंग, इ. अनेक प्रकारचे कारखाने आहे. काही दिवसांपूर्वी येथे भीषण अशा स्फोटाची पुनरावृत्ती झाली. याआधीही असाच प्रकारचा मोठा स्फोट झाला होता.
अधून मधून येथे किरकोळ अशा दुर्घटना घडत असतात, तर हवेतील प्रदूषणाचा त्रास तर येथे वारंवार होत असतो. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जवळपास शंभर एक अशा कारखान्यांना नोटीस सुध्दा बजावल्या होत्या.त्याचे पुढे काय झाले हे सारे गुलदस्त्यातच आहे. प्रदूषण,भीषण स्फोट या दुर्घटनांवर ताबडतोब कारखाने स्थलांतरित करणे हे जरी शक्य नसले तरी औद्योगिक महामंडळ याबाबत उदासीनच दिसून येत आहे.
एक तर फेज-२ औद्योगिक परिसराच्या आजूबाजूला ३/४ की.मी परिसरात निवासी विभाग क्षेत्र असून,वाढत्या शहरीकरणामुळे आज येथे अनेक मोठे अनेक गृहप्रकल्प साकारले तर येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर साकारणार आहेत. आज निवासी विभागाची लोकसंख्या जवळपास दोन/तीन लाखांचा घरात गेली आहे. अशा वेळी नागरिकांचे आरोग्य, सुरक्षा हा मोठा प्रश्न आहे. कोणतीही दुर्घटना ही निष्काळजीपणाने होत असते. ही जरी वस्तुस्थिती असली तरी त्याची आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागते.असे अनुभव आपल्याला असताना आपण कधी शहाणे होणार ?
याबाबत एम आय डी सी आणि राज्य शासन,पर्यावरण विभाग या सर्वांनी एकत्र येऊन युद्धपातळीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक ती पावले तात्काळ उचलणे अत्यंत गरजेचे आहे.तसेच औद्योगिक क्षेत्र आणि निवासी विभाग यांच्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार होणे अत्यंत जरुरीचे आहे कारण निवासी विभागातील इमारती ह्या जवळपास तीस/चाळी वर्षापूर्वीच्या झाल्या असून तेथे आता तर खऱ्या अर्थाने पुनर्विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. पण एमआयडीसीचा निवासी भूखंड हा लीजवर असल्यामुळे आणि त्यांचे क्लिष्ट नियम आणि कागदी घोडे नाचवावे लागत असल्यामुळे येथे पुनर्विकास प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत निदान सध्या जे नागरिक राहतात त्यांना सुरक्षा व आरोग्य देणे ही सर्वस्वी जबाबदारी राज्य शासनाची असून प्रदूषण आणि दुर्घटना उद्भवणार नाही याची पुर्ण खबरदारी ही औद्योगिक महामंडळाने घ्यावी.ही अपेक्षा ! -पुरुषोत्तम कृ आठलेकर, डोंबिवली. ( निवासी विभाग रहिवासी)