अपरिचित शिवराय लेखमाला

  खरं तर इतिहास वाचणारे हजारो असतात, लिहणारे शेकडो, मात्र इतिहास घडवणारा एकमेव असतो, तो म्हणजे शिवराय यांच्यासारखा! आज आपण इतिहास एका इतिहास निर्माण करणाऱ्या सिध्दहस्त लेखकाचा,बघणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत बऱ्याच विचारवंत लोकांनी लिखाण केलेय मात्र, गुरुवर्य श्री. कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांनी उपलब्ध सर्व साधनांचा साक्षेपाने अभ्यास करून आधुनिक कालखंडातील मराठीतील पहिले शिव चरित्र १९०६ साली लिहले.

त्या काळी आणि नंतर देखील अनेक शिवचरीत्र लिहली गेलीत, मात्र केळुस्कर यांनी लिहलेले शिवचरित्र हे सखोल, विस्तृत, वस्तुनिष्ठ व एकमेव असे असून, हे चरित्र म्हणून इतिहासाचा एकमेव अक्षय ठेवा आहे, असे म्हणावे लागेल. १९२१ साली प्रोफेसर एन.एस.ताकाखाव, विल्सन कॉलेज, मुंबई यांनी या ग्रंथाचे, The Life Of Shivaji Maharaj  या नावाने सदर ग्रंथाचे भाषांतर केले. इंदूरच्या श्रीमंत सवाई तुकोजीराव होळकर महाराजांनी इंग्रजी चारित्र्य ग्रंथाच्या ४००० प्रती विकत घेऊन, जगभरातील इंग्रजी ग्रंथालयांना मोफत वाटल्या. त्यामुळे जगभरातील प्रमुख ग्रंथालयात त्या प्रती आजही  उपलब्ध आहेत.

केळूस या कोकणातील वेंगुर्ले तालुक्यातील गावात श्री. कृष्णराव केळुस्कर यांचा जन्म २० ऑगस्ट १८६० रोजी झाला. ते मॅट्रिक,१८८१ मध्ये, विल्सन हायस्कूलमधून पास झाले. शाळेचे मुख्याध्यापक कृष्णशास्त्री गोडबोले यांचा त्यांच्या जीवनावर खूप मोठा परिणाम असल्याचे स्वतः त्यांनी नमूद केले आहे. श्री. कृष्णराव केळुसकर त्यांनीच, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मॅट्रिक पास झाले तेव्हा त्यांचा सत्कार घडवून आणला आणि त्यांना बुद्ध चरित्र भेट म्हणून दिले, हे सुविख्यात आहे. त्यांनी विपुल लेखन केले, मात्र मधल्या काळात तथाकथित विद्वान यांनी छत्रपती शिवाजी महाराज या महाप्रतापी वीराबद्दल, मर्द अश्या राजाबद्दल का, लेखन आळस केला, हा प्रश्न त्यांनी स्वतः विचारला आहे. स्वतः केळुसकर यांनी प्रॉव्हीडंट फंडातून दरमहा वीस रुपये कर्ज काढून हा ग्रंथ लिहला, त्यासाठी त्यांनी तीन चार वर्ष सतत, साधन सामुग्री जमवली, त्यासाठी त्यांनी सभासदाची बखर, चिटणीसांची बखर, शेडगावकरांची बखर, ग्रांट डफ कृत, मराठ्यांचा इतिहास, वि.का.राजवाडे यांचे ग्रंथ, मि. किंकेड यांचा इतिहास, मोडकांचा आदिलशाही इतिहास, ईस्ट इंडिया कंपनी कागदपत्रे आणि इतर काही ग्रंथ यांचा अभ्यास करून त्यांनी एकूण पावणे सातशे पानाचा उपरोक्त ग्रंथ निर्माण केला.

अतिशय चिकित्सक नजरेनं शोध घेऊन, प्रथमच शिवाजी महाराज यांच्या जीवनात संत रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांची शून्य भूमिका होती, हे सिद्ध केले. तसेच जे न्यायमूर्ती रानडे यांनी या पूर्वी म्हटले होते की, शिवाजी महाराज यांचा राज्य स्थापन करण्याचा उद्देश फक्त महाराष्ट्र पुरताच होता, हा दावा त्यांनी प्रथम खोडून काढला आणि महाराज यांचे स्वराज्य स्थापन स्वप्न हे राष्ट्रव्यापी होते, हे सिद्ध केले. एकूणच, ‘छत्रपती शिवाजी महाराज' हा ग्रंथ शिवराय यांचा एक अभ्यास करणाऱ्यांना खूप मोठा दस्ताऐवज आहे, असेच म्हणता येईल. सर्व घरादारात खरे शिवचरित्र वाचले जावे आणि मग त्यातूनच पुन्हा एकदा आपणास शिवराय हे घरादारात दिसतील. सत्य इतिहास सत्याने, सातत्याने सात्विक भावनेनं मांडला जावा, ही रास्त अपेक्षा आहे. - प्रा. रवींद्र पाटील 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

कारखान्यातील भीषण स्फोट आणि निवासी विभाग!