मुशाफिरी

तुम्ही आम्ही कधी जन्माला यावे हे जसे आपल्या हाती नसते तसेच आपला कधी मृत्यू यावा याच्याबद्दल आपल्याला कितीही, काहीही वाटत असले तरीही तेही आपल्या हातात नसते. आपलीच ‘एक्सपायरी डेट' आपल्यालाच ठाऊक नसते आणि या जीवनाच्या परवान्याचे ‘नूतनीकरण'ही होत नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस या जगाचा निरोप घ्यायचाच आहे. कुणीही इथे अमरपट्टा घेऊन आलेले नाही.

   मागे अशोक सराफ यांनी काम केलेली एक जाहिरात दूरचित्रवाणीवरुन दाखवली जायची. त्यात ते मृत झाल्यावर फोटोमधून हात बाहेर काढत त्यांच्या मुलाच्या मुस्काटात मारतात आणि सुनावतात की ‘मी जिवंत असताना मला हे खायला का नाही घातलंस..!' त्यावेळी केविलवाणा चेहरा करुन मुलगा गाल चोळत सांगतो की, ‘तुमच्या वेळी हे नव्हतं ना म्हणून!'

   ही जाहिरात एका उत्पादनाची असली तरी त्यात एक अप्रत्यक्ष संदेश दडला होता. मुलांना आपल्या मातपित्यांना त्यांच्या उतारवयात जे काही चांगलं चुंगलं करुन द्यायचं असेल तर ते त्यांच्या हयातीतच आणि तात्काळ द्यावं. ते मेल्यावर त्यांच्या वर्षश्राध्दाला किंवा पितृपक्षात त्यांच्या फोटोसमोर कितीही भारीतले पंचपक्वान्न आणून ताटभर ठेवले तरी त्याचा त्यांना काहीही फायदा नाही. फोटोतून बाहेर येत कुणा स्वर्गस्थ व्यक्तीने साधा पापडही खाल्ल्याचे उदाहरण जगभरात कुठेही नाही. असलेच तर प्रेक्षकांचा बुध्दीगुणांक शून्य समजून ज्या मालिका बनवल्या जातात त्यात असू शकेल..नव्हे, असतेही !

   हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे अलिकडेच अशाच एका गर्भश्रीमंत व्यक्तीच्या मुंबईत पार पडलेल्या कार्याला जाण्याचा प्रसंग आला. तिथे मी पाहिले त्या गृहस्थाच्या दोन मुली, जावई, मुलगा, सून, पत्नी, नातवंडे, भाऊ, भावजया व अन्य सगेसोयरे, नातेवाईक यांनी त्याच्या वर्षश्राध्दाला मिठाई, फळे, अन्य खाद्यपदार्थ सारे त्याच्या मोठ्या फोटोसमोर मांडले होते. फोटोला भारीवाल्या हारांनी सजवले होते. त्यानिमित्त साऱ्यांना भोजन ठेवले होते. माझे मन भूतकाळात गेले...त्या व्यक्तीला शेवटच्या दिवसात कॅन्सरने गाठले होते. उपचारावरील खर्च वाढत चालला होते. खरे तर त्यानेच सारे कमावून ठेवले होते. तरीही त्याची पत्नी, मुलगा, सून त्या खर्चामुळे कातावले होते. ‘सारे पैसे यातच संपले तर आमच्यासाठी काय उरेल' ही चिंता त्यांना सतावत असावी. हे त्या आजारी गृहस्थाच्याही लक्षात आले असावे. त्याने उपचारांना प्रतिसाद न देताच प्राण सोडला...आणि इकडे त्याच्या पत्नी, मुलगा, सून, मुली, जावयांनी रडारड करुन एकच कल्ला केला. ...आणि ‘सुटलो एकदाचे' असे मनाशीच म्हणून घेतले. त्यानंतर आता हा वर्षश्राध्दाचा दिवस आला होता. फळे, मिठाया, पंचपववान्ने सारे त्या मृताच्या फोटोभोवती जणू फेर धरुन नाचत होते.

   जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस या जगाचा निरोप घ्यायचाच आहे. कुणीही इथे अमरपट्टा घेऊन आलेले नाही. तरीही आपले माता-पिता, आजी-आजोबा, काका-मामा, मामा-मावशा, पत्नी, पती, मुले-बाळे खूप खूप जगावेत असे प्रत्येकाला वाटत असते. प्रत्येकाला आपली वेळ आली की संसाराच्या पटावरुन एविझट घ्यायचीच आहे, तुम्हाला ते आवडो, न आवडो तरीही. तरीपण नात्यागोत्यातले, परिचितांतले कुणी गेले की दुःख हे होतेच. करोना काळाने आपल्याला जीवनाचे क्षणभंगुरत्व पटवून दिले आहे. ठाणे येथील  एक माजी नगरसेवक म्हणे दीड हजार कोटींच्या संपत्तीचे मालक होते. पण करोनामुळे आलेल्या त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या घरच्यांनाही त्यांच्या मृतदेहालाही स्पर्श करता आला नाही. स्मशानातील सारेच सोपस्कार महापालिका कर्मचाऱ्यांनीच केले. नुकताच घाटकोपर, पुणे येथे महाकाय होर्डिंग्ज कोसळून त्याखाली अनेक निष्पाप, निरागस आणि या साऱ्याशी कसलाच संबंध नसलेल्यांचा मृत्यू ओढवला. हल्ली उपनगरी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या अनेकांचा डब्यातून खाली पडून मृत्यू होत आहे. समृध्दी महामार्ग असो की साध्या गावातला रस्ता की शहरातला; कुठुन कुठले वाहन भरवेगात येईल आणि तुमचा घास घेईल याचा कोणताच नेम राहिला नाही. सकाळी उठून कामानिमित्त बाहेर गेलेली व्यक्ती हातीपायी धड अवस्थेत घरी परत येईल की तिला कायमचे, अंशतः अपंगत्व येईल, अशा अपघाताला सामोरे जावे लागेल किंवा ती मृतच झाली आहे असा पोलीसांकडून निरोप येईल याचा कोणताच भरवसा राहिलेला नाही अशा भयाण काळात तुम्ही आम्ही जगत आहोत.  

   हल्ली रात्री बारानंतर किंवा पहाटे पाच किंवा त्यापूर्वी कुणी मोबाईलवर कॉल केला तर मला धडकीच भरते. पत्रकार असल्याने मी कधीही मोबाईल ‘स्विच ऑफ' ठेवत नाही. अपवाद मुलाखतींचे शूटिंग! अवेळी आलेले कॉल्स हे साधारणपणे कुणीतरी मृत झाल्याची खबर देणारेच असतात हे मी अनुभवावरुन सांगू शकतो. मी वयाच्या अशा टप्प्यात आहे की माझे आई-वडील, मामा-मामी, मावशी, आत्या आणि त्यांचे यजमान, बहिणींचे यजमान यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. माझी काही आतेभावंडे, काही भावजया यांनी पन्नाशी ते साठीत शेवटचा श्वास घेतला आहे.  अनेक नातेवाईक वयाच्या पंच्याहत्तरी-ऐशीच्या आसपास आहेत. माझ्या अनेक मित्रांचे आई-वडील हेही देवाघरी गेले आहेत. काही मित्र दारुपान, चूकीच्या सवयी, नको ते छंद यापायी झालेल्या विविध विकारांमुळे मधूनच पंगतीवरुन उठून जावे तसे कायमचे जगातून गेले आहेत. त्यामुळे कधी, कुणाचा कशा प्रकारचा निरोप येईल ते सांगता येत नाही.

   मृतदेहावरील अंतिम संस्कार आणि  मृत्यूउपरांत विधी हे वेगवेगळ्या धर्मात आणि वेगवेगळ्या समाजविशेषांत विभिन्न प्रकारे केले जातात. आधीच्या काळात विविध इस्पितळांच्या अभावामुळे शवयतो घरच्या घरीच अनेकजण शेवटचा श्वास घेत असत. अलिकडे ठिकठिकाणी सुसज्ज इस्पितळे उभारली गेली. पालिका, महापालिका, जिल्हा परिषदा यांचीही इस्पितळे असतात..ज्यांना महागड्या इस्पितळांतून उपचार घेता येत नाही त्यांची तिथे व्यवस्था होते. अशा ठिकाणी मृत्यू ओढवल्यास पोस्ट मार्टेम प्रकाराला काही वेळा तोंड द्यावे लागते. महागड्या इस्पितळात मृत्यू आल्यास सर्व प्रकारचे बिल चुकते न केल्यास मृतदेह ताब्यास देण्यात वेळ लावला जातो. काही ठिकाणी अतिरिवत पैशांची मागणी केली जाते. मग मृताच्या नातेवाईकांना कधी स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार अशांच्या ओळखीचा आधार घ्यावा लागतो असेही घडते. आधीच दुःखात असलेल्या त्या परिवाराच्या सदस्यांची मानसिकता अशा प्रसंगी आणखीच खचून जाते. अंत्ययात्रा कशी न्यावी, स्मशानात अंत्यसंस्कार कसे करावेत याबद्दल परिवारात एकमत नसल्यास कधी कधी घोळ वाढतो. माझ्या नात्यातल्या एका ज्येष्ठाच्या अंत्यविधीप्रसंगी मोठ्या मुलाला ‘योग्य तो मान' न दिल्यामुळे त्याची बायको रुसुन बसली होती. काही ठिकाणी मृत व्यवतीने आधीच्या आयुष्यात कबूल केलेले काही देण्यात कमी पडल्यास त्यांच्या अंत्यविधीत गोंधळ घालणारेही महाभाग निघतात. अशाच एका नमुन्याचा सासरा वारला. त्यावेळी तो जावई त्या मृताच्या अंत्यसंस्कारप्रसंगी चारचौघात ओरडून म्हणाला की ‘अहो मामा, तुम्ही असेच कसे मध्येच सोडून गेलात ? तुम्ही माझ्या नावावर नदीजवळची जमिन करणार होतात ना, आता तुमची मुलं ते ऐकतील का?' अशा वेळी हसावे की रडावे की त्या जावयाला धरुन पायाखाली तुडवावे अशीच भावना तिथे उपस्थित अनेकांच्या मनात दाटली असेल.

   काही लोकांच्या नशिबी आयुष्यभर खूप ओढाताण येते. आर्थिक स्थैर्य लाभत नाही. इतरांसाठी, समाजासाठी बरेच काही करुनही लोक, समाज ते सारे विसरतो. कृतघ्नपणे वागतो हेही पाहायला मिळते. माझे पत्रकार मित्र जितुभाई पाढ यांचे यंदा मार्च महिन्यात निधन झाले. ते गुजराती असले तरी सर्वभाषक, विविध धर्माच्या, जातीच्या लोकांसाठी हवी ती मदत करण्यासाठी त्यांनी केलेली धावपळ मी पाहिली आहे. स्वतःच्या खिशातून देणे शवय नसले तरी विविध दानशूर व्यक्ती, संस्था यांच्याकडून त्यांनी अनेकांना विविध प्रकारचे सहकार्य मिळवून दिले होते. मात्र जितुभाईंचे निधन झाल्यानंतर निघालेल्या अंत्ययात्रेत पस्तीस-चाळीस लोकही नव्हते. स्मशानात अंत्यसंस्कार प्रसंगीही तीच स्थिती आणि मृत्युउपरांत त्यांच्या परिवाराने ठेवलेल्या शोकसभेत, भोजन प्रसंगीही फार वेगळे वातावरण नव्हते. अनेकांनी त्यांच्या परिवाराला साधा शोकसंदेशही पाठवण्याचे औचित्य बाळगले नाही,  हे वास्तव मला चटका देऊन गेले.

   तुम्ही आम्ही कधी जन्माला यावे हे जसे आपल्या हाती नसते तसेच आपला कधी मृत्यू यावा याच्याबद्दल आपल्याला कितीही, काहीही वाटत असले तरीही तेही आपल्या हातात नसते. आपलीच ‘एक्सपायरी डेट' आपल्यालाच ठाऊक नसते आणि या जीवनाच्या परवान्याचे ‘नूतनीकरण'ही होत नाही. काही लोकांच्या मृत्युप्रसंगी म्हणे आकाशातल्या  ग्रहगोलांची विशिष्ट स्थिती असली तर ‘पंचक' लागते आणि नजीकच्या काळात त्याच नात्यातल्या पाच लोकांचा मृत्यू होतो. आपल्यापासून लाखो किलोमीटर अंतरावरील ग्रह, तारे त्यांची कामे सोडुन तुमच्या आमच्यासारख्या अतिसामान्य जीवजंतूंच्या आयुष्यात इतकी मोठी लुडबुड करत असतील हे पटण्यासारखे नाही. त्यावरही म्हणे ‘उपाय' आहेत आणि करणारे ते उपाय करवूनही घेतात म्हणे. आता बोला !

  ...त्यापेक्षा हे जे मानवी जीवन आणि सुंदर शरीर आपल्याला लाभले आहे ते देशाच्या, समाजाच्या, मानवतेच्या अधिकाधिक कसे कामी येईल; आपण चांगले, तंदुरुस्त, निर्व्यसनी, निरोगी राहुन शरीराच्या आरोग्यसंपदेस कसे जपता येईल, इतरांनाही व्यसनमुवत करण्यात कसे  योगदान देता येईल, निरक्षरांना साक्षर करण्यात कसा हातभार लावता येईल, नियतीने-निसर्गाने अन्याय केल्याने  दिव्यांगत्व प्राप्त झालेल्यांसाठी कसे काम करता येईल, प्रबोधनाचा मार्ग चोखाळून जनकल्याणासाठी कसे झटता येईल याचे प्रयत्न केल्यास हा जन्म सार्थकी लागल्याचे अतुलनीय समाधान नवकीच लाभेल.  -  राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक : दै. आपलं नवे शहर

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

अपरिचित शिवराय लेखमाला