घुंघट की आड मे...

मशीन गन, कॉम्प्युटर, पिस्टल, रायफल...चोरांचे आधुनिक चकाकणारे अड्डे, फाटक्या जिन्स....विरुद्ध सिनेमातले तथाकथित बावळट पोलीस... असा जो काही खरा-खोटा पाठलाग वगैरे आधुनिक सिनेमात दाखवला जातो त्या पेक्षा फार-फार वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांचे दोन तास छान मनोरंजन होते, म्हणूनच हिंदी, पूरबी भाषेतला हा चटपटा लापता लेडिज सर्वांनी पाहून एंजॉय करण्याजोगा झाला आहे.

दोन दिवसांपूर्वी एक नवीन हिंदी सिनेमा पाहिला. लालसिंग चढ्ढा नंतर मी पाहिलेला हा हिंदी सिनेमा असावा! ज्याचे नाव लापता लेडीज!  दोन्ही सिनेमे हे मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ज्ञात असलेले आमिर खान यांच्या निर्मितीत तयार झालेले आहेत. हा मात्र योगायोग असावा.

लापता लेडीज या शिर्षकाने मनांत काही वेगळा विचार आला होता. काय असेल बरे या अशा हाफ हिंदी हाफ इंग्लिश टायटल असलेल्या सिनेमात? म्हणजे बिहारी बाबूची टिंगल करणे किंवा तिथल्या अर्धशिक्षित समाजावर ताशेरे ओढणे...वगैरे प्रकार तर नसेल? असा माझा समज होता. पण मराठी दैनिकात या सिनेमा विषयीं समीक्षा छापूनआल्याने लापता लेडीज' या हिंदी सिनेमाविषयीं कुतूहल वाढले. ह्याचे कारण म्हणजे रवी किशन नामक एका नामवंत बिहारी कलाकारा व्यतिरिक्त या सिनेमातील इतर सर्व कलाकार हिंदी सिने इंडस्ट्रीसाठी अगदीच नवीन आहेत. सिनेरसिकांनी त्यांची नावे सुद्धा ऐकली नसावीत!  शिवाय कथेची पार्श्वभूमी उत्तर भारतीय क्षेत्रातली असल्याने माध्यमसुध्दा काहीसे खडी बोलीतले असावे, असा भास झाला! बंबय्या प्रेक्षकांना ते रुचेलच असे नाही. तरीही आमिर खान प्रॉडक्शन हाऊसने तो सिनेमा तयार केलाच! आणि महाराष्ट्र ते दिल्ली पर्यंत तो सिनेमा खूप म्हणजे खूपच गाजला. विशेषतः तरुणाईला जवळचा वाटला असावा.

कथानक एकदम फ्रेश! हिजाब, परदा, घुंघट  हा विषय आजचा आहे. तसा तो गतकाळातील कृष्णधवल सिनेमातही होता. गुरुदत्त यांनी मुस्लिम सोशल विषयावर आधारित एका उर्दू-हिंदी सिनेमाची निर्मिती केली होती. चौदहवी का चांद' हे नाव होते त्या सिनेमाचे. गुरुदत्त, वहिदा रेहमान, जॉनी वाकर, रेहमान इत्यादी तत्कालीन नामवंत कलाकार त्यात होते. हिट संगीत होते. गाणी आजही लोक ऐकतात! कथेतील नायिका आणि तिच्या मैत्रिणीत बुरख्याची अदलाबदल होते अन्‌ गैरसमज झाल्याने कथा एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपली. म्हणूनच त्या सिनेमाचा शेवट नवाब साहबने हिरा चाट लिया... असा होतो. त्यावेळी अशा विषयावर संगीतमय सिनेमा आला आणि रेकॉर्ड ब्रेक चालला. आजच्या पिढीने तो जरूर पहावा असा मेसेज त्या सिनेमातून देण्यांत आला होता.  

तोच मेसेज घेऊन कथा गुंफण्यात आली आहे लापता लेडीज या नवीन सिनेमाची! अर्थातच मांडणी फार वेगळी आहे. दोन नवविवाहित जोडपी घुंघटच्या प्रथेमुळे त्यांची नकळत अदलाबदल झाल्याने जो लोच्या झाला आहे त्याचा चटपटीत सिनेमा म्हणजे लापता लेडीज! अतिशय मनोरंजक!

दिगदर्शक किरण राव यांनी सर्व कलाकार नवे कोरे घेऊन चित्रपट कथा फुलवली आहे. छोट्या बजेटमध्ये राजश्री टच देण्यांत हा सिनेमा पूर्णपणे यशस्वी ठरतो. बंदूक, मर्डर, खुनखराबा, फाईट, मारामारी इत्यादी या सिनेमात काहीच नाही. अधूनमधून मिश्किल, मार्मिक, छोटे-छोटे संवाद संपूर्ण सिनेमाभर या न त्या पात्राच्या मुखी देण्यांत आले असून दिगदर्शिका किरण  राव आपल्या स्क्रिप्टच्या माध्यमातून सामाजिक मेसेज देण्यात यशस्वी झाल्या आहेत. त्यांनी सादर केलेला हा सिनेमा त्याचे मुख्य पात्र आहे पोलिस स्टेशन! होय, जेथे एक हवालदार एक लेडी पोलीस आणि पोलिस ठाणे प्रमुख रवी किशन! कथानकातील पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याची छाप शेवटच्या दृश्यापर्यँत कायम राहते. रवी किशन यांनी उत्तर भारतीय ठाणे प्रमुखाची भूमिका अप्रतिम साकारली आहे. नझीर हुसेन हे गतकाळातील भोजपुरी सिनेसृष्टीचे जनक मानले जातात. त्यानंतर अशी सशक्त भूमिका हिंदी भाषेत निभावणारा कलाकार म्हणजे रवी किशन होय! विविधांगी पात्र रंगवण्यात त्याने यश मिळवले आहे. रवी किशन याची पोलीस निरीक्षक म्हणून केलेली निवड एकदम योग्य वाटली. आजच्या पिढीला हा विषय व सिनेमाची आधुनिक मांडणी आवडली हे विशेष! ज्येष्ठ नागरिकांना तर चक्क दिवाळी फराळ किंवा ईदचा शिरखुरमा मिळाल्याची जाणीव झाली असणार. मला हा सिनेमा पाहताना राजश्री प्रॉडक्शनची आठवण आली. हा सिनेमा क्लासेस आणि मासेस या दोन्ही क्षेत्रातील रसिकांना आवडणारा आहे. यात दुमत नसावे.

श्रेया घोषाल, अरिजीत सिंग हे आजचे गायक आहेत. त्यांची अनेक गाणी आजची पिढी एंजॉय करते. संगीतकार राम संपत यांनी या दोन्हीं कलाकारांकडून दोन सोलो गाणी ध्वनिमुद्रित केली आहेत, ती अतिशय श्रवणीय आहेत. सिनेमा पाहतांना तर ती माहोल तयार करतातच शिवाय युट्युबवर ऐकतांना वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. पार्श्वसंगीत या सिनेमाची जान आहे. अशी अर्थपूर्ण गाणी हिंदी सिनेमा देऊ शकतो हेच सिद्ध होते.

मशीन गन, कॉम्प्युटर, पिस्टल, रायफल...चोरांचे आधुनिक चकाकणारे अड्डे, फाटक्या जिन्स....विरुद्ध सिनेमातले तथाकथित बावळट पोलीस... असा जो काही खरा-खोटा पाठलाग वगैरे आधुनिक सिनेमात दाखवला जातो त्या पेक्षा फार-फार वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांचे दोन तास छान मनोरंजन होते, म्हणूनच हिंदी, पूरबी भाषेतला हा चटपटा सिनेमा लापता लेडिज सर्वांनी पाहून एंजॉय करण्याजोगा झाला आहे असे एक सिनेरसिक म्हणून मला वाटते!  -इकबाल शर्फ मुकादम

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

असे भटकते आत्मे सगळीकडेच!