असे भटकते आत्मे सगळीकडेच!

राजकारणातील अतृप्त आत्म्यांच्या भटकण्याचा विषय पंतप्रशानांनी मांडताना त्यांच्या लक्ष्यावर जरी शरद पवार असले तरी आपल्या आजच्या राजकारणातील हे शब्द कटू सत्य आहे. देशात अतृप्त आत्मे सातत्याने भटकत आहेत. ज्या प्रकारे आणि ज्या गतीने आज हे भटकणे दिसत आहे, ते स्वच्छ आणि सकारात्मक राजकारण करणाऱ्यांसाठी एका दुःखद वेदनेचा विषय झाला आहे. पक्षांतर हा आपल्या राजकारणात आता एक कायमचा मुद्दा झाला आहे. खरी गोष्ट तर अशी आहे की, हा एक असा आजार आहे, ज्याची शिकार प्रत्येक राजकीय पक्ष होत आहे.

सध्या लोकसभेच्या निवडणुकांचा मोसम जोरात सुरुआहे. पक्षाचे नेते आपापल्या परीने एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. एकदम खालच्या पातळीवर जात एक-दुसऱ्याचे उणे-दुणे काढून, एक दुसऱ्याला ‘सत्तेचा लालची' म्हणून संबोधित आहेत. खरं तर सर्वच पक्षांचे नेते सत्तेचे लालची आहेत. प्रत्येकाला खुर्चीचा मोह आहे. खुर्ची आली की, संपदेला काय कमी? पैशाच्या जोरावर व सत्तेच्या जोरावर ते काहीही करु शकतात. अशाच लोकांनी देशाच्या लोकशाहीला कुरुप-विदू्रप बनवले आहे. लोकशाहीत निवडणूक राजकीय नेत्यांचीच नाही. तर जनतेचीही परीक्षा असते. राजकीय नेते तर पराभूत होऊन भटकता आत्मा होऊ शकतात. पण जनतेला तर जिंकायचेच असते. कारण जनतेच्या जिंकण्यानेच देशाची लोकशाही प्रस्थापित होते. कायम राहते. सर्व पक्षांचे नेते आधी तिकिटासाठी आणि नंतर निवडणुका जिंकण्यासाठी भटकणाऱ्या उमेदवारांच्या राजकारणाविषयी नेहमी ऐकत आलेले असतात. पण आता देशाच्या राजकारणातही भटवया आत्म्यांनी प्रवेश केला आहे.

सत्तेचा मोह असणाऱ्यांनी राजनितीचा खेळखंडोबा केला आहे. आपली पापं लपविण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या पायाशी लोटांगण घालून जनतेला भुलवण्यासाठी लांब लांबची फेकत आहेत. मोठमोठी आश्वासने देत आहेत. जी कधीच पूर्ण करता येण्यासारखी नाहीत. सत्ताकाळात जनतेच्या भल्यासाठी काय केले ते बोलत नाहीत; मात्र भविष्यात काय करणार ते जनतेच्या मनात ठसवण्याचा प्रयत्न मात्र इमाने-इतबारे करताना दिसतात. या नेत्यांचे काही खरे नाही, ते आज ज्या पक्षातून निवडून येतील त्या पक्षात ते उद्या असतीलच असे नाही. पूर्वीही पक्षांतरे व्हायची; पण त्यावेळी काही ठोस कारणं असायची, छोट्या-मोठ्या मतभेदांवर पक्ष सोडला जात नसे. आता वारे फिरले आहे. कोण कधीही काय करेल याचा नेम नाही. पक्षांतरासाठी काही नियम होते त्यांनाही धाब्यावर बसवण्याची किमया हे नेते करत आहेत. त्यांच्यासाठी ‘वसीम बरेलवी' याचा एक शेर आहे. त्यात शायर म्हणतात ‘उसीको जीने का हक है, जो इस जमाने में इधरका लगता रहे, और उधरका हो जाये.' माहित नाही, कोणत्या कारणामुळे शाहीराला तो सुचला असावा. पण आजच्या राजकारणाला शंभर % फिट बसतोय. कळतच नाही की कोण केव्हा कुठल्या पक्षात जाईल. तेव्हा जनतेला प्रश्न पडतो की, व्यवितकडे पाहून मतदान करावे की पक्षाकडे पाहून मतदान करावे? राजनितिक पक्ष असा शब्द आहे. त्याच्याप्रती कोणतीही प्रामाणिकता ठेवली जात नाही. कोणीही कधीही सोडून जाऊ शकतो. पक्षाला बरबाद करु शकतो, एवढंच कशाला? त्याला (पक्षाला) शिव्या देऊ शकतो, आपली भडास त्यावर काढू शकतो. पक्षात राहून सत्तेची मलई खाऊन, मलईच्या भांड्याला लाथाडू शकतो. अशा नेत्याचे वर्णन दुसऱ्या एका शायराने केले आहे. ते असे ‘गोया नेता न हुआ, तीन तलाक लेनेवाला पति हो गया.' ज्या पक्षाने त्यांना जमीनीवरुन उचलून तवतावर बसवले, रंकाचे तालेबार बनवले, त्याच पक्षाच्या नायनाटाचे ते कारणही ठरले. कधी कधी ते दुसऱ्या पक्षातून परत घरवापसी करण्यासाठी पुन्हा तोच खेळ करतात. बऱ्याच वेळा पक्षाचे नेतृत्वही त्यांना माफ करते. खरं तर अशा नेत्यांना मुळापासून संपवले पाहिजे. जेणेकरुन त्यांना व त्यांच्यासारख्या इतरांना धडा मिळाला पाहिजे. दुसऱ्यांनी अशा अपराधापासून दूर राहिले पाहिजे; पण तसे होतांना दिसत नाही. त्याचप्रमाणे भारतीय जनतेने, नेत्यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन देणे गरजेचे आहे. त्यांनी केलेल्या कारनाम्याची, लुटीची, घोटाळ्यांची जंत्री बाहेर काढली पाहिजे, पण भारतीय जनता बऱ्याच वेळा नेत्यांच्या अभद्रतेकडे कानाडोळा करुन, परत त्यांनाच निवडून देण्याचे पाप करताना दिसत आहे.

शाळेत मास्तर आपल्या ‘ढ' विद्यार्थ्याला वारंवार सांगूनही ऐकत नसेल तेव्हा ‘छडीचा' वापर करुन ताळ्यावर आणत असत, तद्‌वतच जनतेनेही छडीधारी मास्तर बनले पाहिजे. निवडणूक प्रचारात खुद्द पंतप्रधानांनी कहर करत विरोधकांवर हल्ला करत म्हटले की, ४५ वर्षापूर्वी महाराष्ट्रात कोणत्या आत्म्याने या देखाव्याची सुरुवात केली होती. त्यावेळी महाराष्ट्रात तेव्हाचे तरुण नेते शरद पवार यांनी राज्याच्या कांँग्रेस सरकारमध्ये बंड घडविले होते. त्यानंतर ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले होते. तेव्हापासून आजपर्यंत अनेक पक्षांची निर्मिती झाली आणि ते नाहीसेही झाले. यावेळी ही गोष्ट समोर आली आहे की, शरद पवार स्वतः पंतप्रधान होण्याचे स्वप्न बाळगून आहेत. त्यांची ही इच्छा कधीच पूर्ण झाली नाही आणि आता याची काही शवयताही नाही. मोदींनी याच गोष्टीवर लक्ष साधत आपल्या राजकारणातील अतृप्त आत्म्यांच्या भटकण्याचा विषय मांडला.

 पंतप्रधानाच्या लक्ष्यावर जरी शरद पवार असले तरी आपल्या आजच्या राजकारणातील हे शब्द कटू सत्य आहे. देशात अतृप्त आत्मे सातत्याने भटकत आहेत. ज्या प्रकारेआणि ज्या गतीने आज हे भटकणे दिसत आहे. ते स्वच्छ आणि सकारात्मक राजकारण करणाऱ्यासाठी एका दुःखद वेदनेचा विषय झाला आहे. पक्षांतर हा आपल्या राजकारणात आता एक कायमचा मुद्दा झाला आहे. खरी गोष्ट तर अशी आहे की, हा एक असा आजार आहे, ज्याची शिकार प्रत्येक राजकीय पक्ष होत आहे. पूर्वी आपल्या देशाच्या राजकारणात पक्षांतर करणे हे खूप निकृष्ट दर्जाचे मानले जात असे. पण आता तसे राहिलेले नाही. आता  पक्ष बदलणाऱ्याला लाज वाटत नाही, आणि कोणत्या राजकीय पक्षाला त्याची चिंता आहे? आपल्या राजकारणातील या भटकत्या आत्म्यांचे ताजे उदाहरण सुरत आणि इंदोरमध्ये पहायला मिळाले. त्याची सुरुवात चंदीगडपासून सुरु झाली. पिठासिन अधिकाऱ्यानेच वैध मते खाडाखोड करुन अवैध ठरवून आपल्या पक्षाच्या नेत्याला गादीवर (मेअर) पदावर बसवले. तोच प्रकार सुरतमध्ये काँग्रेसच्या एका उमेदवारावर जाणून बुजून आपले नामनिर्देशनपत्र रद्द करण्याचा आरोप लागला आहे आणि इंदोरमध्ये असेच एका उमेदवाराने आपले नामनिर्देशन परत घेतले आहे. एवढंच कशला? वाराणसी या पंतप्रधान मोदीच्या विरोधात उभे राहण्यासाठी आलेल्या उमेदवारांना अर्जच उपलब्ध करुन दिले नाहीत. मात्र त्याच वेळी पंतप्रधानांनी आपले त्रूटीयुवत नामनिर्देशनपत्र निवडणूक आयोगाला सादर केले व निवडणूक आयोगाने ते सहर्ष स्विकारले आहे. त्यावर आक्षेप घेणारी याचिकाही दाखल झाल्याची खबर पसरली आहे.

सत्य हे सुध्दा आहे की, या भटकत्या आत्म्यांना संरक्षण देणाऱ्या पक्षांनासुध्दा आपल्या या कृत्याची लाज वाटत नाही. नवलाची गोष्ट ही आहे की, मागील दहा वर्षात पूर्ण बहुमताचे सरकार चालविणाऱ्या आणि ‘अबकी बार चार सौ पार' ची घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पार्टीला अशा अतृप्त आत्म्यांची गरज वाटत आहे. भारताचे गृहमंत्री अमित शहांनी गर्जना केली आहे की, आतापर्यंत पार पडलेल्या मतदानाने सिध्द केले आहे की, मोदी सरकारला आत्ताच बहुमत मिळाले असून, मोदीच सरकार बनवणार आहेत. मात्र देशाच्या विकासासाठी व बदलासाठी चारशेचा आकडा महत्त्वाचा आहे. आज आपले राजकारण सत्तेचे भुकेले झाले आहे. सेवेसाठी राजकारण हे केवळ कल्पनेतच राहिले आहे. आपले राजकीय नेते नवनवीन पूर्ण न होणारी आश्वासने नियमितपणे देत असतात. राजकीय पक्ष मोठमोठे जाहीरनामे प्रसिध्द करत आहेत. नवनवीन नावे देऊन, हे जाहीरनामे विश्वासार्ह असल्याचे दावे करीत आहेत. त्रासदायक बाब ही आहे की, जिथे दहा वर्षे राज्य करुनही सत्ताधारी पार्टी आपण केलेल्या कामाचा उल्लेख करण्याऐवजी विरोधी पक्षाच्या कमकुवतपणावर मते मागत आहे. तर विरोधी पक्ष काही पर्यायी कार्यक्रम देत नाहीत. एकुण पाहता आपला विरोधी पक्ष, ‘सत्तारुढ पक्षाच्या आरोपांना उत्तर देणे किंवा मग स्वतःला अधिक चांगले ठरविण्यापर्यंतच मर्यादित राहिला आहे. दोन्ही पक्ष म्हणतात की, आम्ही जनतेच्या हिताच्या राजकारणावर विश्वास ठेवतो. पण दुर्देवाने ते जनतेला हा विश्वास देऊ शकत नाहीत की, त्यांचे सत्तेपेक्षा वेगळे दुसरे काही लक्ष्य आहे. भटकता आत्मा असे शब्दप्रयोग करुन टाळ्या मिळविता येतात. पण जनतेचे हित साधणाऱ्या राजकारणाचा अभावच दिसून येत आहे. हिंदू-मुस्लिम, मंदिर-मशीद, स्मशान-कब्रस्थान व जात-पात यांच्याभोवती ते फिरत आहेत. ते भविष्यात कोणतीही आशा दाखविणारे  दाखविणारे नाही.


काँग्रेसच्या एका नेत्याने राजा-महाराजांनी केलेल्या अत्याचाराचा मुद्दा काढला. त्यावर मोदीजींनी पलटवार करत सांगितले की, कॉंग्रेस राजा-महाराजाबद्दल बोलतात. पण नवाब आणि बादशहाचे नाव का घेत नाही? आपल्या राजकारणाचा हा घसरता स्तर जनतेला निराश करणारा आहे. नवलाची गोष्ट म्हणजे सद्यस्थितीत, राजे-महाराजे किंवा नवाब-बादशहांवर न बोलता खरं तर शिक्षण, लोकांचे आरोग्य, पर्यावरण, वाढती महागाई व घसरती कमाई, तरुणाईची गगनाला भिडणारी बेरोजगारी, शेतकऱ्यांचे हाल, त्यांच्या शेतमालाला मिळणारी अपूरी किंमत यावर गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज आहे.आजच्या घडीला संपूर्ण देशभरात जवळपास ७० कोटी, बेरोजगारांची संख्या आहे. तर ८० कोटी लोक सरकारच्या माणसी महिन्याला ५ किलो धान्याच्या भिकेवर जगत आहेत. बरं या ५ किलोने पोट भरते का? त्यासाठी इतरही गोष्टी आहेत त्यासाठी लागणाऱ्या पैशाची तरतूद कशी करायची? याच विंवचनेत लोक ‘रोज मर्रा'ची जिंदगी जगत आहेत. आज प्रत्येक भारतीयांवर दरडोई जवळपास दीड लाखाचे कर्ज आहे. तरीही आपण म्हणतो आमची अर्थव्यवस्था जगाच्या तुलनेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ही किती लाजीरवाणी बाब आहे!

आजचे राजकारणी जनतेला पुढील २०-२५ वर्षानंतर काय-काय बदल होणार आहेत त्यावर बोलतात, पण तेवढ्या कालावधीपर्यंत कोण-कोण जगणार हे कोणालाच माहित नाही, आश्वासने देणारे तरी जगतील का? आणि लाभार्थी तरी जगतील का? यासाठी आता जनतेनेच या बोलघेवड्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. -भिमराव गांधले 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

सुस्त व्यवस्थेचे बळी