चिन्मय मांडलेकरचा निर्णय चुकला का?
चिन्मय हा सेलिब्रिटी असून सेलिब्रिटींचे लग्न, घरी लहानग्यांचे आगमन होण्याची चाहूल, त्यांच्या मुलांची समाजासमोरील पहिली झलक या सर्व बाबी समाजमाध्यमांवर प्रसारित होतात, बातम्यांमध्ये प्रसिद्ध होतात तेंव्हा त्यांच्यावर चाहत्यांसह संपूर्ण समाजाकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जातो. या मंडळींनाही त्याचा कमालीचा आनंदही होतो. त्यावेळी हा आमचा कौटुंबिक भाग आहे त्यामुळे लोकांनी यामध्ये नाक खुपसू नये, असले सल्ले सामाजिक माध्यमातून कधी देताना दिसत नाहीत. मात्र जेव्हा एखाद्या वादग्रस्त निर्णयाबाबत ट्रोल केले जाते तेव्हा यांना कुटुंब, कौटुंबिक निर्णय हे सर्व आठवते. मांडलेकर उभयतांनी आपल्या मुलाचे ठेवलेले नाव ही जरी त्यांची वैयक्तिक बाब असली तरी ते एक सेलिब्रिटी असल्याने समाजात या सर्वांवर उलटसुलट चर्चा होणे स्वाभाविक आहे,
अनेक चित्रपट आणि मालिकांतून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका दमदारपणे साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर याने यापुढे छत्रपती शिवरायांची भूमिका न करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक माध्यमांवर एक ध्वनिचित्रफित प्रसारित करून हा निर्णय घेण्यामागील आपली भूमिका त्याने मांडली आहे. ही ध्वनिचित्रफित पाहणाऱ्यांकडून सामाजिक माध्यमांवर उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. त्याची पत्नी नेहा जोशी-मांडलेकर हिनेही एक ध्वनिचित्रफित सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून आपल्या मुलाचे नाव जहांगीर का ठेवले आणि त्या नावाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्या ध्वनिचित्रफितीवर लोकांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडले आहे. चिन्मय मांडलेकरने आपल्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्याने त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अनेक चित्रपट आणि मालिकांतून छत्रपती शिवरायांची भूमिका साकारुनही लोक आपल्या मुलाच्या नावावरून आपल्याला ट्रोल करत असतील तर यापुढे मी शिवरायांची भूमिका करणार नाही असे त्याने जाहीर केले आहे.
जहांगीर हा पर्शियन शब्द असून जहांगीरचा अर्थ जगज्जेता असा होतो शिवाय त्यांच्या मुलाचा जन्म २१ मार्च म्हणजे ‘जमशेदी नवरोज' या दिवशी झाला असल्याने मुलाचे नाव जहांगीर असे ठेवल्याचे चिन्मयच्या पत्नीने सांगितले आहे. भारतरत्न जमशेदजी टाटा यांचे नावही जहांगीर होते असेही तिने यावेळी म्हटले आहे. तिच्या या उत्तरावरून मांडलेकर उभयता हिंदू असताना मुलाचे नाव ठेवण्यासाठी त्यांना एका पार्शियन दिवसाचा आधार का घ्यावासा वाटला असेही काही ट्रोलर्सचे म्हणणे आहे. २१ मार्च हा जागतिक वन्य दिनसुद्धा आहे. वनामध्ये विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, झाडे, फुले आणि वेली असतात त्यापैकी एखादे सुंदर नाव मांडलेकरांना आपल्या मुलासाठी का बरे सुचले नाही असाही प्रश्न काहींकडून विचारला जात आहे. जहांगीर नावाचा अर्थ विश्वविजेता असा आहे, तर मांडलेकरांनी मुलाचे नाव विश्वजीत ठेवायला हवे होते असा सल्लाही काही मंडळींकडून दिला जात आहे. जहांगीर हे नाव पर्शियन असले, तरी जहांगीर मोगल सम्राट अकबराच्या मुलाचे नाव होते हे साऱ्या भारतविश्वाला माहित आहे. सत्तेच्या लालसेपोटी भारतात येऊन मोगलांनी या देशाचे सारे वैभव लुटले. एकेकाळी ज्या देशात सोन्याचा धूर निघत असे त्या देशाला मोघलांनी कंगाल बनवले. तलवारीच्या बळावर येथे प्रचंड लूटमार करवली, बाया बापड्यांच्या अब्रूवर घाला घालून त्यांना आपल्या जनानखान्यात डांबले. येथील नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले, अनेकांची धर्मांतरने घडवून आणली, धर्मांतरीत न होणाऱ्या कित्येकांच्या कत्तली केल्या, हिंदूंचे प्रेरणास्त्रोत असलेली कितीतरी प्राचीन मंदिरे त्यांनी उध्वस्त केली. अशा मोघलांच्या वंशातील अकबराचा मुलगा सलीम अर्थात जहांगीर हासुद्धा अत्यंत क्रूर होता. स्त्रियांचा आणि मद्यपानाचा तो शौकीन होता. दिवसभर मद्याच्या नशेत तो झिंगत असे. जहांगीरच्या मुलाने त्याच्याशी बगावत केली म्हणून त्याने मुलाचे डोळे फोडले. नागरिकांना तो अत्यंत क्रूरपणे शिक्षा देत असे. आपल्याविरोधात बगावत करणाऱ्या मुलाला साहाय्य केले म्हणून शिखांचे पाचवे गुरु अर्जन देव यांना अटक करून त्यांना त्याने फासावर लटकवले. अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या चिन्मयला मोगल बादशहा जहांगीरचा हा सर्व इतिहास तर नक्कीच ठाऊक असावा.
...असे असताना त्याने आपल्या मुलाचे नाव जहांगीर ठेवण्याचे धाडस केले म्हणजे भविष्यात त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागेल हे ज्ञात असावे. असेही काहींचे म्हणणे आहे. भारताचा पौराणिक इतिहास पाहिल्यास रावण, कंस, शिशुपाल, दुर्योधन, दुःशासन यांसारखे कितीतरी महापराक्रमी राजे महाराजे भारतभूमीत होऊन गेले; मात्र ही समस्त मंडळी अधर्माने वागल्याने यांची नावे कोणीही हिंदू आपल्या मुलांना देत नाहीत. मुंबईतील परकीय आक्रमकांची, अधिकाऱ्यांची नावे ज्या रेल्वे स्थानकांना दिली गेली आहेत ती बदलण्याची प्रक्रिया सध्या शासन करत आहे. असे असताना आक्रमकांच्या वंशावळीतील जुलमी राजाच्या नावाने आपल्या मुलाचे नाव असणे चिन्मयला रुचते का ? सैफ अली खान आणि करीना यांनी आपल्या एका मुलाचे नाव तैमूर आणि दुसऱ्याचे जेह म्हणजेच जहांगीर असे ठेवले तेव्हा त्यांनाही देशभरातून ट्रोल करण्यात आले होते. त्यांनीही आपल्या मुलांच्या नावांचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न त्यावेळी केला होता, तरी आजही त्यांना या नावांवरून ट्रोल केले जात आहे. जनमानसांत प्रसिद्ध असणाऱ्या प्रत्येकाच्या बारीक सारीक हालचालींची, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगांची, त्यांच्या विधानांची आणि निर्णयांची प्रसिद्धी माध्यमांत बातमी होत असते, त्यामुळे या सर्वांतून आपली प्रतिमा समाजापुढे चुकीच्या पद्धतीने जाणार नाही. याबाबतची काळजी या मंडळींनी घेणे आवश्यक आहे. ती न घेतल्यास सध्या सामाजिक माध्यमांचे युग असल्याने ट्रोलिंगचा सामना हा करावाच लागणार आहे. सेलिब्रिटींचे लग्न, त्यांच्या घरात लहानग्यांचे आगमन होण्याची चाहूल लागणे, त्यांच्या मुलांची समाजासमोरील पहिली झलक या सर्व बाबी समाजमाध्यमांवर प्रसारित होतात, बातम्यांमध्ये प्रसिद्ध होतात त्यावेळी त्यांच्यावर चाहत्यांसह संपूर्ण समाजाकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जातो. तेव्हा या मंडळींना कमालीचा आनंदही होतो, तेव्हा हे सर्वजण हा आमचा कौटुंबिक भाग आहे त्यामुळे लोकांनी यामध्ये नाक खुपसू नये, असले सल्ले सामाजिक माध्यमातून कधी देताना दिसत नाहीत. मात्र जेव्हा तुमच्या एखाद्या वादग्रस्त निर्णयाबाबत तुम्हाला ट्रोल केले जाते तेव्हा तुम्हाला तुमचे कुटुंब, तुमचा कौटुंबिक निर्णय हे सर्व आठवते. मांडलेकर उभयतांनी आपल्या मुलाचे ठेवलेले नाव ही जरी त्यांची वैयक्तिक बाब असली तरी ते एक सेलिब्रिटी असल्याने समाजात या सर्वांवर उलटसुलट चर्चा होणे स्वाभाविक आहे. चिन्मयने आपल्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्याचे माहित असूनही त्यानंतर त्याने केलेल्या छत्रपती शिवरायांच्या भूमिकेचे प्रेक्षकांकडून आजतागायत स्वागतच करण्यात आले आहे. मुलाचे नाव जहांगीर ठेवले म्हणून प्रेक्षकांनी त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार घातलेला नाही. काश्मीर फाईल्स चित्रपटातील त्याच्या नकारात्मक भूमिकेलाही प्रेक्षकांनी उचलून धरले होते.
मुलाच्या नावावरून कुटुंबाला ट्रोल केले जात आहे म्हणून यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न करण्याचा चिन्मयने घेतलेल्या निर्णयाने मराठी चित्रपट सृष्टीचे काही नुकसान होणार आहे का? तर अजिबात नाही. शिवरायांची भूमिका दमदारपणे साकारणारे अनेक कलाकार आज मराठी चित्रपटसृष्टीत आहेत; तर अनेक नवोदित कलाकार अशा अजरामर भूमिका साकारण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आज चिन्मयने शिवाजी महाराजांची भूमिका नाकारली तर उद्या ती भूमिका या नवोदितांना मिळेल. त्यांनी या संधीचे सोने केले, तर भविष्यात चिन्मयला महाराजांची भूमिका करण्याबाबत कोणी विचारणार आहे का? चिन्मयने घेतलेल्या निर्णयातून हानी चिन्मयचीच होणार आहे हे त्याने लक्षात घ्यायला हवे ! छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणे सोडण्याऐवजी काही दिवस चित्रपटसृष्टीपासून अथवा सामाजिक माध्यमापासून दूर राहण्याचा निर्णय चिन्मयने घेतला असता, तर एकवेळ चिन्मयला लोकांकडून सहानुभूती तरी मिळाली असती; मात्र त्याने केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचीच भूमिका करणार नसल्याचे सांगितल्याने ‘दैव देते आणी कर्म नेते', 'चिन्मयचा दुसरा निर्णयही चुकला' अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया सामाजिक माध्यमांतून व्यक्त केल्या जात आहे. चिन्मय मांडलेकर हा गुणी आणि कसदार अभिनयासाठी नावाजलेला कलाकार आहे. आपले विचार तो परखडपणे व्यक्त करत असतो. दि काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या वेळी चित्रपटाला विरोध करणाऱ्यांची तोंडे त्याने बंद केली होती. सध्या ज्या विवंचनतेतून तो जात आहे असे प्रसंग अनेक सेलिब्रिटी मंडळींवर येत असतात. अशा वेळी स्थिर राहून कोणाचे ऐकायचे कोणाचे नाही, समाजासमोर कसे व्यक्त व्हायचे, कोणते निर्णय घ्यायचे याबाबतची कसोटी लागते. चिन्मयसुद्धा योग्य निर्णय घेऊन यातून लवकरच बाहेर पडेल याबाबत शंका नाही !
-जगन घाणेकर