सर्व सुखाचे आगरू । बाप रखुमादेवीवरू

जगातील आसक्ती संपली की दुःख संपते. कारण आसक्ती हेच दुःखाचे मूळ आहे. जगापासून विन्मुख होऊन भगवंताला सन्मुख होता आले की सहजच सुखाचा अनुभव येऊ लागतो. जसेजसे हे अनुसंधान अधिकाधिक टिकू लागते तसेतसे सुखसमाधान वाढत जाते. भगवंताच्या नित्य अनुसंधानात राहणे हेच राघवी वस्ती करणे आहे.

मना पाविजे सर्वही सूख जेथे।
अती आदरे ठेविजे लक्ष तेथे।
विवेके कुडी कल्पना पालटीजे।
मना सज्जना राघवी वस्ती कीजे  श्रीराम

मन अतिशय चंचल आहे, ओढाळ आहे. त्याला परिवर्तनशील जगात सतत भटकण्याची सवय आहे. पण प्रयत्नपूर्वक त्याला स्थिर, अपरिवर्तनीय अशा भगवंतापाशी एकाग्र करावे असे समर्थांनी सांगितले. भगवंतापाशी मनाला एकाग्र का करायचे तर तिथेच सर्व सुखाचा साठा आहे. खरे, संपूर्ण, शाश्वत सुख तिथेच आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, ”सर्व सुखाचे आगरू। बाप रखुमादेवीवरू” भगवंत किंवा सद्‌गुरू, जे साक्षात परब्रम्हच आहेत त्यांच्याजवळ सर्व सुख प्राप्त होते. म्हणून अत्यंत आदरपूर्वक त्यांच्याकडे लक्ष लावले पाहिजे. या श्लोकाच्या निमित्ताने सुख, लक्ष्य, कल्पना, विवेक या शब्दांचा किंवा संकल्पनांचा थोडा विचार करूया. सुख म्हणजे आत्मसुख. ते सुख आपल्या अंतर्यामी असते. कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नसते. आंतरिक सुखाचा शोध लागला की मनुष्य बाह्य परिस्थितीने विचलित होत नाही. हे सुख मिळण्याचे ठिकाण हे आपल्या जीवनाचे लक्ष्य किंवा ध्येय असावे. ते ठिकाण म्हणजे राम, भगवंत, सद्‌गुरु, परब्रह्म ! ब्रह्मतत्वाशी एकरूप झाल्यावर पुन्हा जन्म मृत्यू नाही. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटणे हेच नरदेहाचे सार्थक आहे म्हणून आपले लक्ष्य असले पाहिजे ‘ब्रह्मप्राप्ती अर्थात ब्रह्म स्वरूपाचा किंवा आत्मस्वरूपाचा साक्षात अनुभव.

या अनुभवातला मोठा अडसर असतो आपल्या देहबुद्धीचा. ‘मी देह' ही कल्पनाच ‘कुडी कल्पना म्हणजे वाईट किंवा चुकीची कल्पना'. ती बदलून ‘मी आत्मा' ही कल्पना करणे ही साधना आहे. ह्या प्रपंचात राहून, याच देहाने साधना करायची असते. बाहेर कुठेही न जाता, आहे त्याच ठिकाणी, आहे त्याच परिस्थितीत, दृश्याची, जगाची, देहाची आसक्ती सोडून त्याबद्दल वैराग्य धारण करायचे असते. भस्म लावून, भगवे वस्त्र नेसून, घरादाराचा त्याग करून वैराग्य साध्य होत नाही. ते विवेकाने साध्य होते. विवेक म्हणजे आत्मानात्म विवेक. आत्मवस्तू म्हणजे नित्य, शाश्वत वस्तू. ती एकच आहे. तेच ब्रह्म. इतर सर्व पदार्थ अनात्म आहेत. विनाशी आहेत. यातील विनाशी वस्तूंचा लोभ, आसक्ती सोडणे आणि अविनाशी तत्त्वावर लक्ष लावणे हाच विवेक. या संकल्पना समजून घेऊन साधना केली की आपल्या जुनाट कल्पना बदलता येतात. आता मनाला तर सतत कल्पना करत राहण्याची सवय असते. कल्पनाच असल्यामुळे त्या चांगल्या, वाईट, शुभ, अशुभ, कधी वास्तवाला धरून तर कधी अवास्तव अशा अनंत कल्पना मनात येत जात असतात. कल्पनेशिवाय मनराहू शकत नाही. समर्थ म्हणतात, विवेकपूर्वक वाईट, दुष्ट, अशुभ कल्पना दूर करून त्यांच्या ऐवजी चांगल्या, शुभ कल्पना करण्याचा प्रयत्न करावा. कल्पना नाहीशा करणे अवघड आहे पण त्यांच्यात पालट करणे, बदल करणे प्रयत्नाने, अभ्यासाने, सरावाने शक्य आहे.

समर्थ आपल्याला उपदेश करतानाही खूप काळजीपूर्वक करतात. आपल्याला जे जमू शकेल तेच करायला सांगतात. माणूस चांगल्या बदलापासून परावृत्त होणार नाही, चांगला बदल घडवण्याचा विचार तरी करेल अशा पद्धतीने समर्थांचा बोध आहे. मुळात सुखरूप, आनंदस्वरूप असलेल्या माणसाला सुखाची स्वाभाविक ओढ असते. पण या संसारात आल्यानंतर स्वतःचे आत्मस्वरूप तो विसरतो आणि स्वतःला देह समजून राहूलागतो. तिथूनच त्याच्या दुःखाला सुरुवात होते. तिथेच सुखाचा शोधही सुरू होतो. पण देहबुद्धीचे प्राबल्य असल्यामुळे देहाचे सुख म्हणजेच सुख ही त्याची कल्पना असते. चुकीच्या कल्पनेपासूनच सुखाचा शोध सुरू झाल्यामुळे पुढे सर्व चुकतच जाते. जगातल्या व्यक्तींपासून, वस्तूंपासून, परिस्थितीपासून सुख मिळते असे वाटून मनुष्य अनुकूल व्यक्ती-वस्तूंच्या शोधात राहतो किंवा त्यांना अनुकूल करून घेण्याचा प्रयत्न करीत राहतो. पण अशी अनुकूलता कायमची मिळत नाही. फारच कमी काळ सर्व काही मनासारखे, मनाप्रमाणे घडते. कारण बदल हाच जगाचा स्थायीभाव असल्याने व्यक्ती,वस्तू, परिस्थिती सतत बदलत राहतात. सुखदुःख दोन्हीचा अनुभव येतच राहतो. पण सुख मिळेल का, मिळाले तर टिकेल का, कसे टिकवता येईल, ही सततची विवंचनाच मनुष्याला दुःख देत राहते. खरे तर सुख आणि दुःख या दोन्ही मनाच्या कल्पनाच आहेत. आपण मानले तर सुख आणि मानले तरच दुःख होते. परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारली, पूर्वकर्माचा सिद्धांत मानला, तर दुःखाचा अनुभव कमी होतो.

 समर्थ सांगतात, ”विवेकाने कल्पना पालटा”. आपल्या सुखाच्या कल्पना आपण तपासून घ्याव्यात. कायम टिकणारे सुख नक्की कुठून आणि कशापासून मिळेल याचा विचार करावा. जे नित्य नाही, टिकाऊ नाही त्यापासून शाश्वत सुख मिळवण्याची कल्पनाच चुकीची आहे हे समजून घेतले तर ती कल्पना बदलणे शक्य होईल. मग नित्य आणि टिकाऊ वस्तू कोणती याचा विचार केला तर लक्षात येते की परब्रह्म ही एकच नित्य वस्तू आहे. त्यालाच आपण भगवंत म्हणून ओळखतो. त्याच्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा अभ्यास केला की बाहेरच्या जगाकडे हळूहळू दुर्लक्ष करता येते. त्यापासून अलिप्त होता येते. जगातील आसक्ती संपली की दुःख संपते. कारण आसक्ती हेच दुःखाचे मूळ आहे. जगापासून विन्मुख होऊन भगवंताला सन्मुख होता आले की सहजच सुखाचा अनुभव येऊ लागतो. सतत भगवंताच्या विचारात राहणे म्हणजेच त्याच्या अनुसंधानात राहणे. जसेजसे अनुसंधान अधिकाधिक टिकू लागते तसेतसे सुख समाधान वाढत जाते. भगवंताच्या नित्य अनुसंधानात राहणे हेच राघवी वस्ती करणे आहे.

जय जय रघुवीर समर्थ  
-सौ. आसावरी भोईर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

चिन्मय मांडलेकरचा निर्णय चुकला का?