नको भ्रमाचा आचार करा उद्याचा विचार

भारतात पर्यावरण प्रेमींनी अनेक चळवळी केल्या. सुरुवातीला तरुणाईने त्यास चांगला प्रतिसादही दिला. पुढे पुढे या चळवळीही मागे पडल्या. मधल्या काळात या चळवळीबाबत, राजकीय पक्षाच्या जाहिरनाम्यात उल्लेख असायचा, पण गेल्या काही वर्षापासून पर्यावरणाबाबत कोणताही पक्ष बोलायला तयार नाही. सध्या देशात लोकसभेच्या निवडणुकांचा धुमाकुळात सर्व पक्ष अनेक विषयावर बोलतात..पर्यावरणाविषयीचा मुद्दा निवडणुकांतून पूर्णपणे गायब आहे.

गत काही वर्षापासून जागतिक तापमानात आमुलाग्र बदल घडताना दिसून येत आहे. त्यावर उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरु आहेत, पण त्यावर नेमका तोडगा निघालेला नाही. आपल्या देशात सध्या राजनैतिक तापमानाबरोबरच, मौसमी तापमान वाढत आहे. मौसम विभागाकडून जनतेला सुचना देण्याचे कामही सुरु आहे. गेल्या काही दिवसात तर तापमानाचा पारा चढताच आहे. तो खाली येण्याचे नाव घेत नाही.

उत्तर भारतासह अनेक राज्यात व विशेषतः महाराष्ट्राच्या अनेक भागात ‘लू' चे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे अनेकजण उष्माघाताचे बळी ठरत आहेत. बिहारसह अनेक राज्यात उष्ण तापमानाचा पारा ४० डिग्रीच्या वरच स्थिरावला आहे. काही भागात तापमान ४० डिग्रीच्या खाली दाखवले जाते; पण त्याचवेळी असेही सांगितले जाते की, भलेही तापमान कमी दिसत असले तरी, प्रत्यक्ष चार ते  डिग्रीचा जास्त उष्णतेचा अनुभव येईल. म्हणून लोकांनी सावधानता बाळगावी. देशात सध्या लोकसभेच्या निवडणूकांचा काळ असल्याने लोकांना नेत्यांच्या सभा-संमेलनांना जाण्याची, जाणे येणे करण्याच्या वेळा ठरवाव्या लागत आहेत. सभा संमेेलनात लाखांची, हजारांची गर्दी होत असल्याने लोकांना उन्हाच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. केवळ लोकांनाच नव्हे, तर नेत्यांनाही तापमानाचा सामना करावा लागत आहे. नुकतेच एक वृत्त प्रसारित झाले. त्यात म्हटले गेले की, प्रचार सभेला जाताना नितिन गडकरींना तापमान सहन न झाल्याने ते भोवळ येऊन पडले. या वाढलेल्या तापमानाचा प्रभाव सुरु असलेल्या मतदानावरही पडू लागला आहे.

 मतदानाची टक्केवारी कमी होण्यामागचे कारणही, तापमानच असल्याचे बोलले जात आहे. मौसम विभागाच्या अंदाजानुसार ‘मे' महिन्यात तापमानात आणखी वाढ होण्याचीशवयता वर्तवली जात आहे. गत वर्षातील तापमान हे १९०१ च्या नंतरचे सर्वात जास्त तापमान होते. आता २०२४ आहे. तापमानात आणखी भर पडली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार देशाच्या काही भागात पारा ५० डिग्री पार करु शकतो. यासाठी लोकांनी स्वतःला जपावे, असा ईशाराही देण्यात आला आहे.

हवामान खात्याचा अंदाज नेहमीच खरा होतो असे नाही, तर अनेकवेळा चुकतोही. पण निसर्गाचा खरा अंदाज कोणालाच अचूक सांगता येणार नाही. पण निसर्ग आपला इंगा दाखवल्याशिवाय रहात नाही. अवकाळी पावसाचेच घ्या ना! या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकासह अनेकांचे फार मोठे नुकसान केल्याचे आपण नुकतेच ऐकले आहे. आता येणाऱ्या मोसमात पावसाचे प्रमाण सामान्यापेक्षा जास्त होण्याची शवयताही वर्तवली जात आहे. सध्या प्रशांत महासागरात मध्यम अल-निनोची शवयता बनलेली आहे. त्यामुळे ३१% जास्तीच्या पावसाचा अंदाज आहे, तर ८%  कमी पाऊस पडण्याचीही शवयता सांगितली जात आहे. खरं तर आपल्यासाठी जास्त गर्मीही ठीक नाही आणि जास्त पाऊसही ठीक नाही. पण आपल्याला दोन्ही संकटाना तोंड देण्याची तयारी ठेवावी लागेल हे सत्य आहे. सामान्य माणसे यातून मार्गही काढतील पण त्या गरीबांचे काय? जे कडावयाच्या उन्हात व भर पावसातही कामे करतात. या बाबत राजकीय नेते कसलाही विचार करताना दिसत नाहीत. आता निवडणूकीचा मौसम आहे. मतासाठी नेते मंडळी सर्वांच्या दारी मतांची भीक मागताना दिसतात; पण हीच मंडळी निवडून गेल्यावर या मतदारांकडे कानाडोळा करताना दिसतील. म्हणजेच मोसमाप्रमाणे बदलताना दिसतील. दरवर्षी उष्ण तापमानाने काहीजणांचा बळी जातो, तर काहींचा, अति पावसामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पूरामुळे बळी जातो. यावर राजकारणी व त्यातल्यात्यात सत्ताधारी मूग गिळून गप्प बसतात. त्यावर मार्ग काढण्याची साधी चर्चाही करत नाहीत.

सरकारातील लोक म्हणतात की, ‘लू' काही राष्ट्रीय संकट नाही, पण याच ‘लू' मुळे मरणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. पण त्यांचा नेमका आकडा दिला जात नाही. सरकारतर्फे किंवा हवामान खात्यातर्फे सध्या अनेक सुचना लोकांना दिल्या जात आहेत, त्यावरुन वाढत्या तापमानाचा अंदाज येत आहे. सध्या लोकांना त्याची जाणीव होउ लागली आहे. परंतु अशी जाणीव आत्ताच येत आहे असे नाही. पर्यावरणातील बदल लक्षात घेऊन तत्कालीन पर्यावरण प्रेमीनी एक मोठे आंदोलन उभे केले होते. त्यात मागणी केली होती की, शेतकऱ्यांनी व सरकारने उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर कमी करावा. त्यावर रासायनिक खत उत्पादकांनी, त्या मागणीला कडाडून विरोध केला होता व आंदोलनकर्त्या नेत्यावर जीव घेणा हमलाही केला होता. आंदोलनकर्त्यांनी भविष्याचे आकलन करुन म्हटले होते की, जेव्हा कधी उष्णतामान जास्त वाढेल तेव्हा नैसर्गिक वसंत  ऋतू नसेल, तर तो ‘सायलेन्ट स्प्रिंग' म्हणजे मौन वसंतऋतू असेल. तेव्हा पक्षांचा किलकिलाट नसेल नाही ते सामान्य जीवन जगू शकतील किंवा कदाचित ते नसतीलही. कारण पिकांना वाचवण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी ज्या ‘डीडीटी' सारख्या किटकनाशकांचा वापर होतोय तो भूतलावरील सर्वांनाच धोवयाचे आहे. त्याचे परिणाम आज आपण पहात आहोत. पिकांचे उत्पादन तर वाढले, पण धान्यात, भाज्यांत, फळात तो कस व स्वाद राहिलेला नाही. रासायनिक खतयुवत आहाराने लोकांच्या प्रवृÀतीवर अनेक दुष्परिणाम होताना दिसत आहेत. लोक नवनवीन आजारांचे शिकार होत आहे.

त्यावेळच्या पर्यावरण प्रेमींनी उभे केलेले आंदोलन थांबले नाही, तर आजही काही पर्यावरणप्रेमी त्यावर लक्ष ठेवून आहेत. त्यासाठी भारतातही, ‘झाडे लावा, झाडे जगवा' ‘चिपको' सारखे वा ‘पाणी वाचवा, पाणी जिरवा' सारख्या योजना कार्यरत आहेत, पण सरकार किंवा लोक त्याकडे लक्ष देताना दिसत नाहीत. जगात उर्जेचा वापर अधिक वाढला आहे. त्यामुळे व हवेतील प्रदुषणामुळे जागतिक तापमानात वाढ झाल्याने,समुद्राच्या पाण्याची वाफ व हिमशिखरे वितळणे यामुळे पर्यावरणीय बदल झाल्याने आपला धोका अधिक वाढला आहे. त्यामुळेच अवकाळी गारपिटी, वादळी पाऊस यामुळे फार नुकसान होताना दिसत आहे. एकीकडे पृथ्वीवरील वातावरणात बदल होत आहेत, तसेच सध्याच्या तरुणाईतही बदल होत आहेत. तरुणाईतील बदल हे मानवकृत आहेत. सध्याचे तरुण महागाईने व बेकारीने त्रस्त आहेत. शिकुन सवरुनही त्यांना त्यांच्या योग्यतेचे काम मिळत नाही व मिळालेल्या इतर कामातून त्यांना त्यांचा योग्य तो मोबदलाही मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यातील उर्जा संपत चालली आहे. त्यांना भविष्याची चिंता वाटू लागली आहे. ते आपल्या जगण्याचा मार्ग बदलू लागले आहेत आणि हिच चिंतेची बाब आहे.

असे म्हणतात की, ‘खाली दिमाग सैतान का घर' तशीच काहीशी अवस्था सध्या सुरु आहे. बेरोजगारांना रोजगार देण्याऐवजी सध्याचे सरकार त्यांच्या मनात धार्मिक तेढीचे भूत घुसवत आहे. हे भूत दिवसेंदिवस आपले आक्राळ-विक्राळ रुप धारण करत आहे व काही वर्षापूर्वीचा समंजसपणा आता लुप्त होत चालला आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तर तो अधिकच दिसून येत आहे. तरुणाईचे डोके आधीच तापमानाने तापलेले असताना त्यात धार्मिक तेढीची शिग घुसवली गेल्याने तरुणाईचे पर्यावरणही बिघडत चालले आहे. त्यावर वेळीच इलाज करणे फार गरजेचे आहे.

यावर पश्चिमी देशासह अनेक देशानी ग्रीन पार्टीची स्थापना करुन तरुणाईला त्यात हिरिरीने भाग घेतला व ती मोहिम जगभर पसरली व त्याचे चांगले परिणामही पहायला मिळाले. त्या त्या देशातील निवडणुकातही त्याचा परिणाम दिसला. काही राजकारण्यांनी त्या मोहिमेच्या माध्यमातून निवडणुकाही जिंकल्या. सुज्ञ राजकारण्यांनी ही मोहिम गंभीरतेने घेऊन त्याचा फायदा घेतला, पण राजनितीचा रस्ता एवढा साधा आणि सोपा नसतो हे सगळ्यांच्या लक्षात आहे. त्यामुळे ग्रीन पार्टी हळूहळू आपली ओळख गमावून बसली. भारतातही पर्यावरण प्रेमींनी अनेक चळवळी केल्या. सुरुवातीला तरुणाईने त्यास चांगला प्रतिसादही दिला. पुढे पुढे या चळवळीही मागे पडल्या. मधल्या काळात या चळवळी बाबत, राजकीय पक्षाच्या जाहिरनाम्यात उल्लेख असायचा, पण गत काही वर्षापासून पर्यावरणाबाबत कोणताही पक्ष बोलायला तयार नाही. सध्या देशात लोकसभेच्या निवडणुकांचा धुमाकुळ सुरु आहे. पण सर्व पक्ष अनेक विषयावर बोलतात, महागाई, बेरोजगारी, मुलांच्या शिक्षणाच्या व इतर अनेक विषयासंबंधी धमासान सुरु असताना पर्यावरणाविषयीचा मुद्दा निवडणुकांतून पूर्णपणे गायब आहे. पर्यावरण बदलाचा परिणाम मानवी जीवनावर पडत असतो हे राजकारणी विसरले आहेत. त्याचबरोबर चळवळकर्तेही आपल्या मुख्य प्रवाहापासून दूर चालले आहेत. कारण कोणत्याही कामासाठी, लोकांसह राज्यकर्त्याचेही सहकार्य मिळताना दिसत नसल्याचे चित्र आहे.

म्हणूनच एक शायर म्हणतो की
‘जीने को एक भ्रम की छाया काफी होती हैं
वरना दुःख तो हमने पाया काफी है
दुनिया का हर दर्द समेटे इस दिले में
मृत सपनो का बोझ उठाया काफी है.'

म्हणून भविष्यातील मौसमी तापमानाचा विचार करुन आतापासूनच त्यासाठी उपाययोजना करण्याच्या प्रयत्नाची गरज आहे. अन्यथा भविष्यात सर्वांनाच जगणे अवघड होणार आहे. -भिमराव गांधले 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

केवळ सुशिक्षित नव्हे, तर सुसंस्कृत असणे आवश्यक