मुशाफिरी

ओळख पाळख

अनेकजण आपले जन्मापासूनच नातेवाईक आपोआप बनतात. त्यासाठी विशेष काही करावे लागत नाही. पण ‘ओळख' त्या पलिकडची असते. ती काही वेळ रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असते. प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी नातेवाईक हजर असतीलच असे नाही. पण कुठल्याही वेळी, कुठल्याही ठिकाणी ‘ओळखीचे किंवा एकतर्फी तरी ओळख असणारे' भेटू शकतात आणि तुमच्या आनंदात भर घालू शकतात. मी भाग्यवान! कारण मला वेळोवेळी मदत करणारे नातेवाईक भवकमपणे माझ्या पाठीशी तर उभे राहीलेच; पण मित्रपरिवार, ओळखीचे, परिचित अशा अनेकांनीही विविध प्रसंगी मला संकटातून अलगद तारुन नेले आहे.

 २२ डिसेंबर रोजी वाशीच्या साहित्य मंदिर सभागृहात ‘छावा प्रतिष्ठान, नवी मुंबई' या शिवकालीन युध्दकलांचे जतन, संवर्धन, सराव करणाऱ्या व नव्या पिढीला ती कला शिकवणाऱ्या संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडत होता. आमंत्रणावरुन मीही तिथे माझे नेहमीचे काम आटोपून उशिराने पोहचलो. अनेक परिचितांना तेथे आकर्षक सन्मानचिन्हे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवले जात होते. नवी मुंबईचे वृक्षप्रेमी आणि निसर्गोपचाराच्या माध्यमांतून औषधे सुचवणारे आबा रणवरे हेही तिथे एक सत्कारमूर्ती होते. त्यांचे नाव पुकारताच त्यांचे फोटो काढण्यासाठी मीही विचारमंचाजवळ गेलो. मला पाहून छावा प्रतिष्ठानचे संस्थापक वस्ताद अंकुश गडांकुश यांनी निवेदकाला माझेही नाव पुकारुन विचारमंचावर येण्याची सूचना केली. मी गेलो आणि पुष्पगुच्छ स्विकारून माझ्या जागेवर येऊन बसलो. काही वेळाने कार्यक्रम संपत आला. तेवढ्यात एक साठीची महिला आमच्याजवळ आली आणि म्हणाली, ‘तुम्ही राजेंद्र घरत ना? तुमचे लिखाण मी महाराष्ट्र टाईम्समध्ये नेहमी वाचते. छान वाटते. आज भेटीचा योग आला. मी ठाण्यावरुन आमच्या समुहासोबत आले आहे, आमचे साथीदार बाहेर उभे आहेत, मी निघते...' असे तिने म्हटल्यावर मी प्रतिसादादाखल हात जोडले. ती आली तशी निघूनही गेली. मला नाव विचारण्याचीही संधी मिळाली नाही. माझा तिचा आधीचा परिचय अजिबातच नव्हता.

  त्यानंतर दोनच दिवसांनी २४ तारखेला कल्याणला गेलो होतो. बसमधून उतरुन खांद्यावर वजनदार सॅक आणि हातात एक पिशवी घेऊन कल्याणमधील पत्रीपूल परिसरातील एका टॉवर मध्ये राहणाऱ्या मित्र शरद ननावरे याच्याकडे जात होतो. तो राहात असलेली इमारत तेथून केवळ दोनच मिनिटांच्या अंतरावर होती. तेवढ्यात माझ्या शेजारी एक अनोळखी मध्यमवयीन व्यवती ॲक्टीवा दुचाकीवरुन येत थांबली व विचारले, ‘चला.. कुठे जायचंय?' मी म्हटले..‘हे काय समोरच्याच इमारतीत!' ती व्यवती म्हणाली ‘चला बसा. मीही तेथूनच पुढे जाणार आहे.' मी म्हटले की, ‘अहो.. हे तर किती कमी अंतर आहे. मी जातो की!' ती व्यवती म्हणाली..‘मी तसा एकटाच चाललो आहे की! तुम्ही बसा. तुम्हाला सोडूनच पुढे जाईन.' हा आग्रह आणि त्या व्यवतीची नम्रता, बोलण्यातील अगत्य मला मोडवेना! मी त्या ॲक्टीवावर मागे बसलो. उतरताना त्यांना धन्यवाद दिले. तर ती व्यक्ती म्हणाली की, ‘अहो, धन्यवाद कसले? एकमेकांना मदत केली पाहिजे. उन किती आहे. तुम्ही ओझे घेऊन चालत आहात. तेवढी तर माणूसकी दाखवली पाहिजे....' आणि असे बोलून ती व्यवती ॲवटीवावर निघूनही गेली. इथेही त्या व्यक्तीचे नाव विचारण्याचा अवधी मिळाला नाही.

    वयोवृध्द मातोश्रींच्या प्रकृतीची चौकशी करत मी शरद ननावरेच्या घरी थांबलो. तर तो म्हणे, ‘आता माझ्यासोबत जेवायलाच बस.' त्याची पत्नी, आई आग्रह करु लागले. वाशीहून दुपारचे जेवण करुन निघाल्यावरही मग तेथे मी त्यांच्या आग्रहाखातर साडेतीन वाजता पुन्हा जेवलो...तेथून मग बदलापूरकडे प्रस्थान केले. तिथे आतेभाऊ अनिल पाटील (जो शरद ननावरे एकेकाळी काम करत असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीतच काम करत असे! दोघेही आता सेवानिवृत्त!) याची आमच्या पुतण्याच्या हळदी समारंभात गाठ पडली. इकडचे तिकडचे विषय निघताना अनिल म्हणाला, ‘अरे ते आमच्या कंपनीतले जितेंद्र कांबळे नवी मुंबईतच राहतात. त्यांना तुला भेटायचंय.' मी म्हटले, ‘काही विशेष काम?' तर तो म्हणे..‘काही नाही त्यांना तुझा एक लेख मी व्हाट्‌स अपवर फॉरवर्ड केला होता. तो वाचून ते या लेखकाला काहीही करुन मला भेटायचंच आहे म्हणत होते. त्यांना तुझा नंबर दिला आहे. ते तुला भेटायला येतील.' मी म्हटले, ‘आनंद आहे.'  

   लेखक, पत्रकार, अभिनेता, गायक, संगीतकार, खेळाडू असे कोणत्याही क्षेत्रातील व्यवती असोत आणि त्यांनी कितीही परमोच्च प्रकारचे सादरीकरण करो.. जोवर त्यांना प्रतिसाद, दाद समोरुन येत नाही तोवर त्यांची उमेद वाढणार नाही. मग समोरची व्यवती ओळखीची असो वा नसो. आम्ही पत्रकार मंडळी समाजात वावरत असताना अनेकांशी संबंध येतो, ओळखी होतात, सहवास लाभतो, जनसंपर्क वाढतो, वाचक मिळतात. अनेकदा अनेकांशी समोरासमोर ओळखी होतात; तर अनेकदा आपल्या लेखनाचे कित्येक अज्ञात, अपरिचित वाचक असतात. त्यांच्याशी थेट ओळख, परिचय असतोच असे नाही. हिंदीत एक सुवचन आहे...‘नाम ऐसा करो के काम हो जाए और काम ऐसा करो के नाम हो जाए ।' सार्वजनिक जीवनात व्यस्त असणाऱ्या प्रत्येकाने हृदयाशी जपून ठेवावे असे हे वचन आहे. अनेकदा पैशांच्या राशी ओतूनही जे काम होणार नाही ते काम साधी ओळख चुटकीसरशी करुन टाकते. अनेकजण आपले जन्मापासूनच नातेवाईक आपोआप बनतात. त्यासाठी विशेष काही करावे लागत नाही. पण ओळख त्या पलिकडची असते. ती काही वेळ रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असते. प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी नातेवाईक हजर असतीलच असे नाही. पण कुठल्याही वेळी, कुठल्याही ठिकाणी ओळखीचे किंवा एकतर्फी तरी ओळख असणारे भेटू शकतात आणि तुमच्या आनंदात भर घालू शकतात. मी भाग्यवान! कारण मला वेळोवेळी मदत करणारे नातेवाईक भवकमपणे माझ्या पाठीशी तर उभे राहीलेच! पण माझा मित्रपरिवार, ओळखीचे, परिचित अशा अनेकांनीही अनेक प्रसंगी मला संकटातून अलगद तारुन नेले आहे.

   अगदी शालेय-महाविद्यालयीन जीवनापासूनचे मैत्र जपण्यात मला कायम स्वारस्य वाटत आले आहे. नवी मुंबईत लंडन पिल्सनर सारख्या कंपनीत नोकरी मिळवण्याचा योग मला माझ्या मेव्हण्यांमुळे लाभला. तेथेही ओळखी वाढवत नेल्याने नवी मुंबईत गेल्या चाळीस वर्षात चांगल्या लोकांच्या सतत संपर्कात राहण्याचा योग जुळून आला. १९९५ पासून पत्रकारितेत व्यस्त झाल्यानंतर तर हा ओळखीचा परीघ सतत विस्तारत गेला. तेंव्हापासूनच परिचय झालेल्या मित्राच्या मुलीशी माझ्या मुलाचा २०२१ साली विवाह झाल्याने आम्हा मित्रांच्या ओळखीला आम्ही अलगद सोयरीकीत कसे रुपांतरीत केले ते आमचे आम्हालाही कळले नाही.  आमच्या मुलांची तर एकमेकांशी ओळख अजिबातच नव्हती. ओळख आणि मैत्री या विभिन्न बाबी आहेत. ओळखीचे स्वरुप अनेकदा तांत्रिक असू शकते. मैत्रीला मात्र ‘आपुलकी'चा ओलावा लाभलेला असतो. पण म्हणून ओळखीला कमी लेखता येणार नाही. नव्या, अपरिचित, अनोळखी, परक्या मुलखात तुम्हाला चटकन कुणी मित्र, नातेवाईक लाभेलच असे नाही. तिथे ओळख काम करते, हे मी अनेकदा अनुभवले आहे. नवख्या ठिकाणी वाहतूक पोलीस, तेथील दवाखाने, हॉटेल, वाहन व्यवस्था, रेल्वे-बस प्रवास अशा कोणत्याही बाबतीतला त्रास, समस्या निर्माण होऊ शकते. त्यावेळी एखादी ओळख, तिचा संदर्भ तुम्हाला संकटमुक्त करु शकतो.

   या ओळखीचा योग्य उपयोग झाला तर दोघांनाही समाधान होते. मात्र तिचा गैरवापर करणारे, करु पाहणारे अनेक नमुने निघतात. एका भल्या सकाळी मला एका गृहस्थाने फोन केला. ‘नेरुळ पोलीस ठाण्यात तुमची ओळख आहे का हो?' असे तो विचारत होता. मी म्हटले..‘काय काम आहे? तर म्हणे माझ्या भाच्याने एका मुलीचा विनयभंग केला. तिने व तिच्या पालकांनी तक्रार केली म्हणून त्याला पोलीसांनी आत टाकले आहे. त्याला सोडवायचे आहे. त्यासाठी ओळख हवी आहे.' मी म्हटले, ‘तुमच्या मुलीचा विनयभंग कुणी केला असता तर तुम्ही त्या मुलाशी कसे वागला असता, पोलीसांच्या कामात हस्तक्षेप केला असता का? त्या पेक्षा भाच्याला 'आत'मध्येच राहू द्या. मी ओळख दाखवायला आलो तर आधी तुमच्या त्या दिवट्या भाच्याच्या दोन मुस्काटात लावीन आणि पोलीसांना सांगेन की याला आणखी बेदम चोप द्या, जेणेकरुन आयुष्यात कधी कुठल्या मुलीच्या वाटेला जाणार नाही.' समोरच्याने लगेच फोन कट केला.

   नवी मुंबईत मी राहतो म्हणून सिडकोत ओळख आहे का, आमदार गणेश नाईक, मंदाताई म्हात्रे यांच्याकडे काम होते, त्यांच्याकडे न्याल का? म्हणून विचारणा करणारे अनेकजण फोन करुन चाचपणी करत असतात. बरं आहे ओळख! काम काय आहे? तर या लोकांची कामे उलटसुलट प्रकारची  असतात. साडेबारा टववयांच्या प्लॉटच्या भानगडी, जीवंत नातेवाईक मृत दाखवून केलेले जमिनीचे घोटाळे, विवाहितेचा छळ, कौटुंबिक हिंसाचार, पात्रता नसलेल्या उमेदवाराला ओळखीच्या-वशिल्याच्या जोरावर नोकरीत चिकटवणे, भ्रष्टाचारात सामील असलेल्याला फाईलमध्ये स्वच्छ चारित्र्याचा दाखवणे वगैरे वगैरे प्रकारची. या असल्या भानगडीत कोण पडणार? अनेकांना असा गैरसमज असतो की नवी मुंबईतले पत्रकार म्हणजे रोज सिडकोच्या एमडींसोबत चहा घेत असतील, नवी मुंबईच्या आमदारांसोबत न्याहरी घेत असतील! वगैरे वगैरे. या लोकांचे काम तरी व्यवस्थित, शिफारसयोग्य, कायद्याच्या चौकटीत बसणारे असले तर ते करण्यासाठी ओळख वापरु द्यायला काही हरकत नाही. मी स्वतः माझ्या कोणत्याच वैयक्तीक कामांसाठी या मंडळींची ओळख, परिचय, वशिला उपयोगात आणायच्या भानगडीत पडलो नाही. तिथे बाकीच्यांच्या उलटसुलट कामांसाठी मी माझी ओळख का बरे पणाला लावावी?

‘ओळखी'चे अनेकजण असतात, पण ते सगळेच आपले मित्र किंवा मैत्रीणी होत नाहीत. कार्यालय, आस्थापना, कंपनी, शेजार-पाजार, बाजार अशा अनेक निमित्ताने अनेकजणांशी आपल्या आपसुकच ओळखी होतात. त्यातील फारच निवडक लोक आपले ‘मित्र' बनू शकतात. मित्रांबाबत एक सुवचन माझ्या वाचनात आले.. त्याचा भावार्थ असा की ‘मित्र किंवा मैत्रिण म्हणजे दुसऱ्या आईच्या पोटी जन्मलेला आपलाच जीव असतो.' मैत्रीबाबत अनेक सिध्दहस्त लेखकांनी, प्रतिभावंतांनी भाष्य केलं आहे. पण हा भावार्थ मनाला फारच स्पर्शून जाणारा वाटतो. शालेय-महाविद्यालयीन जीवनात आपल्या वर्गात ५०-५५ सोबती असतातच; ते सारे आपले सहपाठी असतात. त्या सगळ्यांशी आपली चांगली ओळख कायम राहते. मात्र त्यातले काहीजणच आपले ‘चांगले मित्र-मैत्रीणी' बनतात आणि आयुष्यभर ते ‘मैत्र' हृदयापासून जपतात. अशा तमाम चांगल्या मित्र-मैत्रीणींना, परिचितांना, सहपाठींना, शेजार-पाजारच्यांना, तमाम नातेवाईकांना आणि देशवासियांना येत्या १ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या इंग्रजी वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

 - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

३१ डिसेंबर हे आपल्यातील वैचारिक गुलामगिरीचेच लक्षण