३१ डिसेंबर हे आपल्यातील वैचारिक गुलामगिरीचेच लक्षण

मद्यपींसाठी सरकारच्या पायघड्या !

ख्रिस्ती नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २४, २५ आणि ३१ डिसेंबर या तीन दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत मद्याची दुकाने, बिअर बार्स, पब्स आणि परमिट रूम्स चालू ठेवण्याची परवानगी दिल्यामुळे मद्यपींमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी सामान्य जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. अनेकांच्या घरात दार्रिद्य आले आहे. दारूमुळे होणारी हानी लक्षात घेऊन अनेक राज्य सरकारांनी आपल्या राज्यात कायमस्वरूपी दारूबंदी केली आहे, असे असताना राज्याच्या सरकारने मद्यपींसाठी तीन दिवस करून दिलेली मोकळीक महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी आहे.

एरव्ही केवळ ३१ डिसेंबरला केवळ एक रात्रीसाठी दिली जाणारी ही सवलत आता २४ आणि २५ डिसेंबरलाही दिली गेली  असल्याने सरकारला मद्यपींची अधिक काळजी असल्याचे लक्षात येत आहे. १ जानेवारी हा खरेतर ख्रिस्ती नववर्षांरंभ. भारतात इंग्रजांनी अनेक प्रांतांत शेकडो वर्षे राज्य केल्याने आज इंग्रज जाऊन ७६ वर्षे उलटली तरी इंग्रजांच्या वैचारिक आणि सांस्कृतिक गुलामगिरीतून आपण अद्याप मुक्त झालेलो नाहीत. तरुण वर्गामध्ये साजरे केलेले जाणारे विविध ‘डेज' आणि त्यानिमित्ताने चालणारा स्वैराचार ही त्याचीच विषारी फळे आहेत. भारतात दरवर्षी उत्साहात साजरा केला जाणारा ३१ डिसेंबर हे सुद्धा आपल्यातील वैचारिक गुलामगिरीचेच लक्षण आहे. ३१ डिसेंबरच्या एका रात्रीत लाखो लिटर दारू रिचवली जाते. अति मद्यसेवनामुळे या दिवशी कितीतरी ठिकाणी अपघात घडतात. या अपघातात कितीतरी निरपराधांचे बळी जातात तर कितीतरी आयुष्यभरासाठी जायबंदी होतात. या रात्री अनेक ठिकाणी मारामारीचे प्रसंग घडतात.. त्यामध्ये कित्येकांची डोकी फुटतात. शहरी भागांत ३१ डिसेंबरच्या पार्ट्यांमध्ये वर्षागणिक तरुणींचे प्रमाणही वाढू लागले आहे. सध्याच्या तरुण पिढीवर सिनेकलाकारांचा प्रभाव अधिक असल्याने अशा पार्ट्यांमध्ये कित्येक तरुणी तोकड्या कपड्यांमध्ये वावरताना दिसतात. ३१ डिसेंबरच्या रात्री विनयभंगाचे आणि छेडछाडीचे प्रसंगही मोठ्या प्रमाणात घडतात. ३१ डिसेंबरच्या निमित्ताने शेकडो तरुण अन्य मित्रांच्या हट्टामुळे पहिल्यांदा दारूचा ग्लास ओठाला लावतात आणि त्यातील कितीतरी जण पुढच्या वर्षीच्या ३१ डिसेंबरपर्यंत अट्टल मद्यपी झालेले असतात, अनेक बार आणि पब्समध्ये मद्याच्या नावाखाली अमली पदार्थांचीही विक्री केली जाते. पहाटे पाच वाजेपर्यंत परमिट रूम्स चालू ठेवण्याची शासनाने परवानगी दिल्यामुळे अनैतिक कृत्यांसाठी मोकळे रानच उपलब्ध झाले आहे. दरवर्षी हे केवळ ३१ डिसेंबरच्या रात्री घडते. आताच्या सरकारने त्यामध्ये आणखी दोन दिवसांची भर घातल्याने या सर्व गैरप्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ निश्चित आहे. या सर्वांचा सव्रााधिक ताण पोलीस प्रशासनावर पडतो. कुणी मद्यपान करून वाहन चालवत नाहीत ना, वाहनांचे वेग मर्यादेत आहेत ना, कुठे अमली पदार्थांची खरेदी-विक्री तर होत नाही ना, हे सर्व पाहण्यासाठी पोलिसांना शहरासारख्या ठिकाणी अधिक कुमक मागवावी लागते. एरव्ही रात्रीच्या वेळी कोणी दारू पिऊन झिंगताना दिसल्यास पोलीस त्याला हटकतात; मात्र आता सरकारनेच पहाटे ५ वाजेपर्यंत झिंगण्याची परवानगी दिल्याने पोलिसांना रात्रीची गस्त वाढवून मद्यपींची भांडणे सोडवण्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागणार आहे.

या देशात बहुसंख्य हिंदू असून हिंदूंचे नववर्ष हे गुढीपाडव्याला साजरे होते. गुढीपाडवा हा सृष्टीचाही आरंभ दिन आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्षाचे स्वागत आपण दारी तोरण आणि दाराजवळ गुढी उभारून करतो. पारंपरिक वेशभूषा करून जेष्ठांचे आशीर्वाद घ्ोतो अन्‌ समवयस्कांना शुभेच्छा देतो. घरी गोडधोड केले जाते. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी नववर्ष स्वागतयात्रा काढल्या जातात. निसर्गही या दिवसांत बहरलेला असतो. ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान करून नववर्ष साजरे करणे ही खरेतर पाश्चात्यांची कुप्रथा. ही कुप्रथा जोपासून आपणच आपला ऱ्हास करून घेत आहोत. आपल्या राज्यातील जनतेला सर्व प्रकारच्या हानिकारक गोष्टींपासून दूर ठेवणे, कुप्रथांना प्रोत्साहन देणाऱ्यांना शासन करणे आणि राज्याच्या संस्कृतीचा पुरस्कार करणे हे राजाचे आद्य कर्तव्य आहे; मात्र सध्याचे सरकार हा ‘राजधर्म' विसरले आहेत कि काय अशी शंका येते. मद्यविक्रीतून राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या निमित्ताने यामध्ये दरवर्षी विक्रमी वाढ झालेली असते. या महसुलात आणखी वाढ व्हावी यासाठी सरकारने यावर्षी २ दिवस अधिक वाढवून दिले आहेत. सरकारमधील दोन्ही पक्ष हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे संस्कृतीप्रिय पक्ष आहेत. त्यामुळे पाश्च्यात्य संस्कृतीच्या या अवडंबराला विद्यमान सरकारकडून देण्यात येत असलेले प्रोत्साहन मनाला खटकणारे आहे. त्यामुळे रात्रभर दारूमध्ये झिंगणारा हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे का ? असे कोणी विचारल्यास त्यावर सरकारचे काय उत्तर असेल ? - जगन घाणेकर, घाटकोपर. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

आयुष्यभर ज्या गोष्टीचा आपण ध्यास घेतो, त्याचे फलित आयुष्याच्या संध्याकाळी मिळते