निष्ठा, सेवा, माणुसकीचा वसा

आनंदवन नि हेमलकसा

महामानव बाबांचे आनंदवन आणि महात्मा डॉ.प्रकाशजींचे ठलोक बिरादारी प्रकल्प येथे प्रत्येक माणसाने निदान एकदातरी भेट द्यायला हवी. म्हणजे आपल्यासारख्याच माणसाने एखादे कार्य श्रद्धेने, निष्ठेने, निस्वार्थीपणे आणि दुसऱ्याच्या कल्याणासाठी करायचे ठरवले तर तो माणूस काय चमत्कार करू शकतो हे कळून येईल. हे माझे, ते माझे, हे मी केले, ते मी केले असे प्रौढीने बोलणारे आपण या आभाळाच्या उंचीच्या माणसांकडे बघताना आपल्याला आपल्या खुजेपणाची जाणीव होते.

        मोठ्या वृक्षाखाली छोटी रोपटी वाढत नाहीत, झाडे तयार होत नाहीत तसेच एखाद्या महान, विख्यात, महामानवाचे पुत्र (वारस) त्यांनी केलेले कार्य तितक्याच समर्थपणे पुढे नेऊ शकत नाहीत वा दुसऱ्या कोणत्या क्षेत्रातही तितके यशस्वी होत नाहीत असे म्हणतात; परंतू हा समज डॉ. प्रकाशजी आमटे यांनी साफ खोटा ठरवला. त्यांनी निवडलेल्या कार्यक्षेत्रात उत्तुंग कार्य केले आणि करताहेत.

 स्वर्गीय बाबा आमटे हे महामानव. जे काम कोणीही करणार नाही असे काम त्यांनी केले. कुष्ठरोगासारख्या असाध्य आजाराने त्रस्त असलेल्यांना त्यांनी प्रेम दिले, त्यांची सेवा केली. त्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी, त्यांच्या सन्मानासाठी आपले आयुष्य वेचले. वास्तविक बाबा आमटे सुखी, श्रीमंत कुटुंबात जन्मलेले, स्वतः व्यवसायाने वकील; तरी कुष्ठरोगींचे हाल, यातना पाहून त्यांचे मन दुःखी झाले. त्यांना लौकिक सुखे नकोशी वाटू लागली.  कुष्ठरोगींना सन्मानाने जीवन जगता यावे म्हणून त्यांनी आपले जीवन त्यांच्यासाठी समर्पित केले. ज्यांना रक्ताच्या नात्याची माणसे घराबाहेर काढीत, स्पर्श करणेही टाळत अशा कुष्ठरोगींना बाबांनी जवळ घेतले, रोगमुक्त करून सन्मानाचे जीवन दिले हे किती जगावेगळे महान कार्य आहे याची कल्पनाच केलेली बरी. बाबांना या जगावेगळ्या धाडसी कामात त्यांच्या काही निवडक साथींची मदत लाभली तर त्यांच्या पत्नी साधना सावलीसारख्या आयुष्यभर त्यांच्या सोबत राहिल्या. त्याचप्रमाणे त्यांची दोन्ही मुले विकास आणि प्रकाश त्यांना मदत करू लागली.

  डॉ. प्रकाशजींनी आपल्या कामाची सुरुवात बाबांच्या कामात पूर्णवेळ मदत करून केली. कुष्ठरोगींसाठी भरीव कार्य करतानाच तेथील आदिवासी, वनवासींचे जनावरांसारखे जीवन बघून बाबा खूप व्यथित होत असत. खरेतर आपण माणूस आहोत याचीच वनवासींना जाणीव नव्हती. रानात जनावरांसारखे जीवन जगणारी माणसे शिक्षण, आरोग्य सेवा, स्वच्छता ते इतर सुविधांपासून वंचित असल्याने त्यांचा बाहेरच्या जगाशी संबंध येत नव्हता. त्यात त्यांच्या स्थानिक भाषा वेगळ्या. शहरी माणसांच्या ते सावलीलाही उभे रहात नसत. जंगलातील फळे, भाज्यांसोबतच जंगलातील ससे, वानरांसारख्या प्राण्यांबरोबरच अगदी उंदीर मारूनही खात असत. त्यांना समजावणे, आपलेसे करणे, चांगल्या-वाईटाची जाणीव करून देणे, माणसात आणणे कर्मकठीण होते. कुष्ठरोगींसाठी आनंदवन तयार झाले तसे या वनवासींचे जीवन सुखी होण्यासाठी, अंधारात चाचपडत जगणाऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणण्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे त्यांनी ठरवले. त्यांनी त्यांचा मनोदय आपल्या चिरंजीवांकडे व्यक्त केला आणि ते आव्हान आपण स्विकारायचे असा निश्चय शांत, संयमी, कामाची चिकाटी असलेल्या डॉ.प्रकाश यांनी घेतला.

           डॉक्टर प्रकाश आमटे यांचा जन्म २६ डिसेंबर १९४८ रोजी झाला त्यांचे शिक्षण एमबीबीएस एम एस इतके झालेले असून ते त्यांच्या पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे आणि काही साथीदारांसह बाबांनी ठरवलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील जंगलात २३ डिसेंबर १९७३ या दिवसापासून आदिवासी, वनवासींची सेवा करण्यासाठी, त्यांनी माणूस म्हणून माणसासारखे जगावे म्हणून राहू लागले. जंगलात कसल्या सोयी सुविधा नसताना झोपडी बांधून त्यांनी त्यांचा म्हणजे वनवासींसाठीचा संसार सुरू केला. जंगली जनावरे, सरपटणारे प्राणी, मोठमोठे कीटक, डास यांच्या भयंकर त्रासाला त्यांना तोंड द्यावे लागले. त्यातच शहरासारखे जेवण खाणे तेथे मिळणे अशक्य होते. दोनवेळा फक्त डाळ भात मिळाला तेच खूप झाले असे त्यांना वाटे. कारण तेथील वनवासींना तर तेही मिळत नव्हते हळूहळू डॉक्टर प्रकाश यांची टीम आजूबाजूच्या जंगलांमध्ये जाऊन आदिवासी, वनवासी यांना भेटून त्यांना स्वच्छता, शिक्षण, आरोग्य यांचे महत्व पटवून सांगण्याचा प्रयत्न करू लागली. रूग्णांनी डॉक्टर प्रकाश यांच्याकडे उपचारासाठी येण्याचे आवाहन करत. त्यांना काही वस्तू पदार्थ देत त्यात भाषेची मोठी अडचण येत असे.  वनवासींचा सुरुवातीला डॉक्टर, औषधे, शिक्षण यावर विश्वास नव्हता; पण हळूहळू जसे रूग्ण बरे होऊ लागले तसे अधिक रूग्ण डॉक्टर प्रकाश व मंदाकिनी डॉक्टर मंदाकिनी यांच्याकडे येऊ लागले. त्यांना त्या डॉक्टरांचा आधार वाटू लागला, विश्वास वाटू लागला. फक्त त्यांच्यावर असे उपचार करून आणि त्यांना मदत करून उपयोगाचे नाही तर त्या वनवासींच्या मुलांना शिकवले पाहिजे शिक्षणाने पुढच्या पिढ्या घडतील आणि बाबांनी जे स्वप्न पाहिले ते खरे होईल हे डॉक्टर प्रकाश यांनी ओळखले आणि त्यांनी तसे प्रयत्न सुरू केले; पण प्रतिसाद मिळत नव्हता आपली मुले शिकली तर ते आपल्यापासून लांब जातील आपल्याला विसरतील ती बिघडतील असे आदिवासींना वाटत असल्याने ते आपल्या मुलांना डॉक्टर प्रकाश यांच्याकडे हेमलकसाला पाठवायला तयार नव्हते तरी शिक्षणाचे जाऊ द्या पण आपली मुले तिकडे राहिली तर त्यांना दोन वेळ पोटभर जेवण तरी मिळेल म्हणून मग आदिवासी मुलांना स्वतःहून डॉक्टर प्रकाश यांच्याकडे पाठवू लागले आणि हेमलकसा येथे आदिवासींच्या कल्याणाकरिता लोक बिरादारी प्रकल्प उभा राहू लागला.

      डॉक्टर प्रकाश यांनी आपल्याला मरणातून वाचवले म्हणून तर कोण आपल्या मुलांना ते शिकवतात, सांभाळतात म्हणून त्यांना प्रेमाने जंगलातील वस्तू तर काही प्राणी भेट म्हणून देऊ लागले तर कधी कोणी जंगलातील जखमी अवस्थेत सापडलेले प्राणी त्यांच्याकडे उपचारार्थ आणून देत, असे करता करता लवकरच लोक बिरादरीमध्ये काही जंगली प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राण्यांची संख्या वाढली. त्यांना डॉक्टर प्रकाश यांचा लळा लागला. जे वनवासी जंगली प्राण्यांची शिकार करून खात असत ते आता त्या प्राण्यांना डॉक्टर प्रकाश यांच्याकडे आणून देत असत जे आपल्या मुलाने शिक्षण घेऊन बिघडू नये म्हणून त्यांना आपल्यापासून दूर करत नव्हते ते आता आपल्या मुलांनी शिकावे शहाणे व्हावे म्हणून स्वतःहून लोक बिरादरीमध्ये आणून सोडू लागले. असे बदल त्यांच्यात झाले हळूहळू वनवासींची जी मुले शिकली.. ती बऱ्याच जागी नोकरी धंदा करू लागली तर कोणी उच्चपदस्थ झाले आणि त्यांचे जीवनमान बदलले. आता डॉक्टर प्रकाश, डॉक्टर मंदाकिनी आमटे या त्यांच्यासाठी देव झालेत.

            डॉक्टर प्रकाश आणि मंदाकिनी आमटे दाम्पत्यांना दिगंत, अनिकेत, आणि आरती अशी तीन अपत्ये आहेत. आज त्यांचे दोन्ही चिरंजीव लोकबिरादरी प्रकल्पाचे काम समर्थपणे सांभाळत आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांची नातवंडे येथील जंगली प्राण्यांशी अगदी मित्रांशी खेळल्यागत खेळतात. डॉक्टर प्रकाश यांना आपल्या देशातील अनेक पुरस्कारांबरोबरच २००२ साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेत. त्यात नामांकित मॅगिसेसे हा पुरस्कार २००८ साली प्राप्त झालेला आहे. १९९५ साली आमटे दाम्पत्याच्या सन्मानार्थ भारत सरकारने टपाल तिकिटही काढलेले आहे. डॉक्टर आमटे यांनी प्रकाश वाटा आणि रानमित्र अशी पुस्तके लिहिली. प्रकाश वाटा या पुस्तकाच्या आतापर्यंत २५हून जास्त आवृत्ती निघालेल्या आहेत तर त्यांच्या कार्यावर डॉक्टर प्रकाश आमटे दि रियल हिरो नावाचा २०१४ साली चित्रपटसुद्धा प्रदर्शित झालेला आहे.


       महामानव बाबांचे आनंदवन आणि महात्मा डॉ.प्रकाशजींचे ठलोक बिरादारी प्रकल्प येथे प्रत्येक माणसाने निदान एकदातरी भेट द्यायला हवी. म्हणजे आपल्यासारख्याच माणसाने एखादे कार्य श्रद्धेने, निष्ठेने, निस्वार्थीपणे आणि दुसऱ्याच्या कल्याणासाठी करायचे ठरवले तर तो माणूस काय चमत्कार करू शकतो हे कळून येईल. हे माझे, ते माझे, हे मी केले, ते मी केले असे प्रौढीने बोलणारे आपण या आभाळाच्या उंचीच्या माणसांकडे बघताना आपल्याला आपल्या खुजेपणाची जाणीव होते. आपण दरी डोंगर, सागर किनारे, तिर्थस्थळांना नेहमी जात असतो. पण मी स्वानुभवाने सांगतो आनंदवन आणि लोक बिरादारी प्रकल्प ही दोन स्थळे कोणत्याही तिर्थक्षेत्राहून कमी नाहीत, नक्की जाऊन बघा.
          - मनमोहन रो. रोगे, ठाणे. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मना सज्जना