मना सज्जना

मना सज्जना नियमित लेखमाला - आसावरी भोईर

हे सज्जन मना..माझे हीत कर
मूळ परब्रह्म हे निराकार आहे. त्याचे ध्यान करणे सोपे नाही. म्हणून सगुण साकार भगवंताचे, श्रीरामाचे आलंबन समर्थांनी दिले आहे. हनुमंताने जसे सतत श्रीरामाचे स्मरण केले तसेच आपणही करावे हे समर्थांचे सांगणे आहे.


।। श्रीराम ।।
मना सज्जना हीत माझे करावे।
रघुनायका दृढ चित्ती धरावे।
महाराज तो स्वामि वायूसुताचा।
जना उध्दरी नाथ लोकत्रयाचा श्रीराम ।२२।


   समर्थांना आणि एकूणच सर्व संतांना संपूर्ण प्राण्यांच्या हिताची तळमळ लागलेली होती. सर्व प्राणी सुखी असावेत ही त्यांची कळकळ होती. त्यासाठी लोकांनी केलेला अपमान, निंदा, दिलेला त्रास हे सर्व शांतपणे सोसून त्यांनी लोकप्रबोधनाचे, लोककल्याणाचे आपले व्रत जीवनभर पाळले. सर्वच संतांचे म्हणणे असे की मनुष्याचे खरे हित स्वरूपाला ओळखणे, स्वरूपाकार होणे व जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटणे यातच आहे. ते कसे साधावे यासाठीच सर्व उपदेशाचा खटाटोप त्यांनी मांडला. तो उपदेश ऐकणे, समजणे आणि पाळणे हे सर्व मनाचे कार्य.

   म्हणून समर्थ मनाला म्हणतात, ”हे सज्जन मना! माझे हित कर.” हित साधण्यासाठी रघुनायकाची भेट घेऊन त्याला दृढपणे चित्तात धरून ठेवले पाहिजे. भगवंताला मनात जागा द्यायची असेल तर आधी तिथला सर्व कचरा, पसारा काढून टाकला पाहिजे. काम, क्रोध इ. षड्रिपूंचा कचरा, अनेक प्रकारच्या कल्पना, वासना, कामना यांचा पसारा मनात सतत जमा होत असतो. तो नियमितपणे आवरला नाही तर अंतःकरण अगदी मलिन होऊन जाते. जसे गढूळ पाण्यात किंवा धूळ बसलेल्या आरशात स्पष्ट प्रतिबिंब दिसत नाही तसेच मलिन अंतःकरणात भगवंताचा स्पष्ट अनुभव येत नाही. म्हणून समर्थांनी आधीच्या श्लोकांमध्ये चित्तशुद्धीबद्दल मार्गदर्शन केले आहे. आता ज्या भगवंताला चित्तात धरून ठेवायचे आहे तो कसा आहे, त्याचे सामर्थ्य किती आहे याचे वर्णन पुढच्या काही श्लोकांमध्ये केले आहे.

प्रभू रामचंद्र हे समर्थांचे सद्गुरू. तेच त्यांच्यासाठी साक्षात परब्रह्म. श्लोकांमध्ये भगवंताचे वर्णन करताना ते श्रीरामाच्या सगुण रूपाचे वर्णन करतात कारण त्यांच्या ध्यानीमनी चित्ती सतत तेच रूप, तेच नाम आहे. समर्थांचा भगवंत रघुनायक हा वायूपुत्र हनुमंताचा स्वामी आहे. तिन्ही लोकांचा उद्धार करणारा त्रैलोक्यनाथ आहे. श्रीरामांनी वानरसेनेच्या मदतीने रावणाचा वध केला. रामांच्या दृष्टीत कोणत्याही प्राण्यांबद्दल भेदभाव नाही. ते सर्वांकडे समदृष्टीने पाहतात. सर्वांनाच ते आपले वाटतात. असे सर्वत्र सम असलेले परब्रह्मतत्व चित्तात स्थिर करायचे आहे. मूळ परब्रह्म हे निराकार आहे. त्याचे ध्यान करणे सोपे नाही. म्हणून सगुण साकार भगवंताचे, श्रीरामाचे आलंबन समर्थांनी दिले आहे. हनुमंताने जसे सतत श्रीरामाचे स्मरण केले तसेच आपणही करावे हे समर्थांचे सांगणे आहे. रामाने सांगितलेले कार्य चोख करणे, त्यांच्या प्रत्येक आज्ञेसाठी तत्पर असणे आणि सतत त्यांच्या चिंतनात असणे, हे हनुमंताचे गुण आपणही घ्यावेत यासाठी ”वायुसुताचा स्वामी” याचा विशेष उल्लेख या श्लोकात केला आहे. दृश्य जगातील धनदौलत, विद्या, वैभव, नातीगोती यांचा आश्रय मर्यादित असतो. तो नेहमीच कामाला येत नाही. ”मना राघवेवीण आशा नको रे” असे आधीच समर्थांनी सांगून ठेवले आहे. ज्याचा आश्रय घ्यायचा तो सामर्थ्यवान असावा, त्याच्या सामर्थ्याला मर्यादा नसावी. भगवंताचे सामर्थ्य असे असीम आहे. तो या भूतलावरच्या लोकांचेच रक्षण, उध्दार करतो असे नाही तर स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांतील जीवांचे रक्षण करतो आणि उद्धारही करतो. भगवंतांनी श्रीरामांच्या रूपात अवतार घेऊन राक्षसांचा उद्धार केला, देवतांचे रक्षण केले आणि मानवांचेही कल्याण केले. अशा समर्थ श्रीरामाला आपल्या चित्तात दृढ धरून ठेवावे. सर्व वृत्ती एका भगवंतावर स्थिर कराव्यात. इतर कामना-वासनांना तिथे पुन्हा रुजण्यास जागाच राहू नये असे प्रयत्न करावेत. मनाची निर्वासन स्थिती झाली की जन्ममृत्यूपासून सुटका होते. आपल्या मूळ परमात्म स्वरूपात जीवात्मा विलीन होतो. तेच मनुष्य जन्माचे खरे सार्थक आहे. त्यातच मानवाचे खरे हित आहे.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
- आसावरी भोईर. 

 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 मोबाईल