मुशाफिरी

ज्याचे त्याचे ‘टायमिंग'

वेळ साधणे, वेळ गाठणे, समयसूचकता, प्रसंगावधान, समयभान, वेळेची जाणीव, वेळेचे औचित्य या साऱ्याला तुमच्या आमच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातही पर्फॉमिंग आर्ट अर्थात ‘मंचीय सादरीकरणा'चा मामला असेल तर या वेळेवर करण्याला आणखीच महत्व प्राप्त होते. युध्दात, खेळांच्या विविध स्पर्धांत वेळेला अर्थात टायमिंगला खूप सांभाळणे गरजेचे असते. कारण तिथे रि-टेक नसतो. थेट जीव जाण्याची किंवा हार होण्याचीच शवयता अधिक असते. आमच्या वृत्तपत्र आणि डिजिटल मिडिया क्षेत्रात तर टायमिंग शिवाय कशालाच महत्व नाही.

   आता हेच बघा ना! सध्या दिवस दिवाळीच्या तोंडावरचे आहेत. थंडीचे हळुवार आगमन होत आहे. पिकली शेते कापणीची वेळ आहे. या वेळेत बाजारात आधिक्याने काय दिसते? तर स्वेटर, मफलरी, आकाश कंदिल, पणत्या, दिवे, फराळाचे सामान, रंगरंगोटीचे सामान, ई. त्याचे प्रसारमाध्यमांतून प्रतिबिंब उमटणारच! या दिवसात छत्र्या, रेनकोट, टोप्या याबद्दलचे वृत्त कुणाला वाचायला आवडेल? ज्या विषयाचे टायमिंग, औचित्य असते. ते साधले पाहिजे. गेले कित्येक महिने रशिया-युक्रेन युध्द सुरु आहे. तिकडे गाझा पट्टीत इस्त्रायलने दणका द्यायला सुरुवात केली आहे. त्या आशयाच्या बातम्या या दिवसांत वारंवार पाहायला, वाचायला मिळणे स्वाभाविक आहे. भारतात काही वर्षांपूर्वी किसान आंदोलन खूप गाजले. त्यावेळी सारी वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांची वार्तापत्रे त्याच बातम्यांनी भरलेली असत. कारण त्यांची ती वेळ होती. अशीच वेळ प्रत्येकाची येते आणि जातेही. ती साधता आली पाहिजे, सत्कारणी लावता आली पाहिजे. भारतीय चित्रपटसृष्टीचा विचार करता एक काळ राज, दिलीप, देव या त्रिकुटाचा होता असे म्हटले जाई. पण त्याही काळात शम्मी कपूरने आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्याच काळात त्यांचेच समकालीन अभिनेता राजकुमार म्हणजेच ‘जानी' अर्थात  बलुचिस्तान येथे जन्मलेले व मुंबईत माहिम पोलीस स्टेशन येथेही पोलीस इन्स्पेक्टर म्हणून प्रत्यक्ष जीवनात वावरलेले कुलभूषण पंडित यांना ‘टायमिंगचा बादशहा' मानले जायचे ते त्यांच्या संवादफेकीच्या अत्यंत वेगळ्या शैलीमुळे. वक्त चित्रपटातील ‘चिनॉयशेठ, जिनके घर शीशेके होते है वो दुसराेंके घरपे पत्थर नही फेका करते' हा संवाद किंवा पाकिजा चित्रपटातील ‘आपके पाव बहोत हसीन है इन्हे जमीन पर मत उतारियेगा, मैले हो जायेंगे' हा संवाद त्यांच्या चाहत्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिला आहे. ३ जुलै १९९६ रोजी राजकुमार यांचे निधन झाले, आज त्यांच्या मृत्युला सुमारे सव्वीस वर्षे पूर्ण झाली तरी आजही कोणत्याही मिमिक्री आर्टीस्टला राजकुमार यांचा आवाज सादर केल्याशिवाय मिमिक्री पूर्ण झाली असे वाटत नाही, हे त्या ‘टायमिंगच्या बादशहा' राजकुमार यांचे यश होय.

   रणांगणावरील युध्द असो, पाण्यातील युध्द असो की हवाई लढाई..तेथेही टायमिंग अनन्यसाधारण महत्वाचे! तेथे ‘नजर हटी दुर्घटना घटी' हे तत्व लागू पडते. याबाबत अवघ्या महाराष्ट्राला ललामभूत व्यक्तीमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय! अवघ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात त्यांनी वेळेला, वेळ गाठण्याला, वेळ साधण्याला अत्यंत महत्व दिल्याने त्यांना अचाट पध्दतीचे पराक्रम करता आले. तेही कोणतेही घड्याळ, टायमर, मोबाईल, बझर, टेलिफोन असे वेळ समजण्याचे, संदेशवहनाचे कसलेही साधन हाती नसताना! कसे साध्य केले असेल महाराजांनी हे सारे? आग्रा येथून सुटका असो, पावनखिंडीतील युध्द असो, अफझलखानाचा कोथळा काढण्याचा प्रसंग असो, शायिस्तेखानाची बोटे छाटण्याची वेळ असो, स्वराज्य स्थापन होण्यापूर्वी व त्यानंतर वेगवेगळे गड किल्ले जिंकणे असो, त्या गडांना यवनी सैन्याने दिलेले वेढे असोत, गनिमी काव्याने बलाढ्य यवनी सैन्याला नामोहरम करण्याचे प्रसंग असोत...या साऱ्या साऱ्या प्रसंगी शिवरायांचे अचूक प्रसंगावधान कामी आले. त्यांनी तेच आपल्या मावळ्यांना, सेनापतींना शिकवले होते. शिवप्रभूंच्या या अचूक समयसूचकतेबद्दल अनेक देशी विदेशी इतिहासकारांनी भरभरुन लिहिले आहे. यावर अनेक ग्रंथ, पुस्तके प्रसिध्द झाली आहेत. ज्यामधून तुम्हा आम्हाला सतत प्रेरणा मिळत राहते. अशावेळी त्यांचे वंशज वगैरे म्हणवणारे जाहीर कार्यक्रमांतून चॅनेलवाले समोर आले की उगाचच कॉलर उडवतात, नवरात्रीच्या कार्यक्रमात कुठल्याशा टुकार गाण्यावर ठुमका लगावू पाहतात तेंव्हा शिवप्रभूंच्या काळातले टायमिंग व त्यांचे हे काही वंशज दाखवत असलेले  टायमिंग यात किती जमिन-आस्मानाचा फरक पडला आहे याची दाहक जाणीव होते.

   कुठल्या घोषणा कधी द्याव्यात याचेही वेळापत्रक अर्थात टायमिंग असते, प्रसंगावधान असते. समयाचे औचित्य असते. मोर्चा असला की कुणाच्या तरी नावाने ‘मुर्दाबाद' करायचे असते. कुणाच्या तरी नावाने ‘शंख' करायचा असतो. गणेशोत्सवाची मिरवणूक असली की ‘गणपती बाप्पा मोरया' चा जयघोष करायचा असतो. शिवजयंती असली की ‘छत्रपती शिवाजी महाराजकी जय' म्हणून आसमंत दुमदुमुन टाकायचा असतो. भारतीय सैन्याची मराठा रेजिमेण्ट शत्रुवर तुटुन पडतेवेळी शिवछत्रपतींच्या नावाचा आणि ‘हर हर महादेव' असा उदघोष करुनच जीवाची बाजी लावते ही गोष्ट प्रत्येक मराठी माणसाला किती अभिमानास्पद आहे! युध्दात वीरगति प्राप्त झालेल्या जवानाच्या अंत्यविधीप्रसगी कसे वागायचे याचे एक वेगळे संकेत असतात. त्यावेळ त्या जवानाचे नाव घेऊन ‘अमर रहे' चा जयघोष करायचा असतो. ...तर सर्वसामान्य माणसाच्या अंत्ययात्रेत ‘जय राम श्रीराम' म्हणत शोकमग्न नातेवाईक, मित्र-सहकारी मंडळी चालत असतात.

   आता तुमच्या आमच्या हाती घड्याळ, मोबाईल, ईमेल, व्हाटस्‌ अप, दूरचित्रवाणी, टेलिफोन अशी अत्याधुनिक साधने आहेत आणि तरीही अनेकदा प्रसंगाचे भान राखले जातेच असे नाही. अनेक लोक कार्यालयात वेळेवर पोहचत नाहीत. अनेक आयोजक कार्यक्रम वेळवर सुरु करीत नाहीत. अनेकांना याबद्दल विचारले तर ‘इंडियन स्टॅण्डर्ड टाईम' असे उत्तर देतात. अनेक ववत्यंाना बोलताना वेळेचे भान सुटते. त्यांच्यामुळे त्रासलेले श्रोते मग मागे शेरे मारतात की ‘यांना घरी बायको बोलू देत नाही म्हणून ते आपल्याला इथे पकवायला उभे आहेत' म्हणून! अनेकजण दुसऱ्याच्या वेळेवर अतिक्रमण करतात. काहीजण दुसऱ्यांकडे नेहमी पैसे मागतात..पण ते ‘वेळे'वर परत करायचे असतात याचे भान त्यांना राहात नाही. (की..त्यांना ते पैसे बुडवायचेच असतात?)   काहीजण इतरांच्या खासगीपणावर वेळी-अवेळी हल्ला करतात. ‘जरा या साईडला आलो होतो, म्हणून तुमच्या कडे अचानक आलो' असे उत्तर देऊन दुसऱ्याच्या घरात घुसतात. स्मशानभूमीच्या आसपास राहणाऱ्या लोकांबद्दल मला नेहमी एक विनोदी प्रश्न पडतो की ‘या साईडला आलो होतो (बॉडी घेऊन?) मग तुमच्याकडेही यावेसे वाटले म्हणून आलो..' असे सांगणारे त्यांना पिडत असावेत का? स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्ताजवळील इमारतीत राहणाऱ्या माझ्या परिचयाच्या एका परिवाराने ‘जरा या साईडला आलो होतो..' या प्रकाराने कंटाळून ते घर सोडण्याचे टायमिंग साधले याची खात्रीलायक माहिती आहे. त्याबद्दल मी त्यांना एकदा विचारले असता ते म्हणाले की, ‘जो मरतो त्याचा किंवा त्याच्या अंत्ययात्रेचा आम्हाला काही उपद्रव नव्हता हो! पण त्याला घेऊन जाणारेच आम्हाला येता जाता पिडायचे!'

आता बोला!

   प्रेमात या टायमिंगचे अचूक औचित्य बाळगावेच लागते. दोघांनी एकमेकांना दिलेली ‘वेळ' पाळावीच लागते. नाहीतर युध्दाचा भडका उडणार हे नक्कीच! मला यापूर्वीच्या पिढ्यांतील प्रेमीजनांचे नेहमी कौतुक वाटते. मोबाईल नव्हते, फोन नव्हते, ईमेल नव्हते, एवस नव्हते. हाती महागडी वाहने नव्हती आणि तरीही प्रेमातुर मंडळी प्रेम करीत, कूटुंबियांच्या नजरा चुकवीत वेळेवर भेटत, भेटून परत येत, योग्य त्या थापा मारण्याचे टायमिंग साधत, छोटा भाऊ-छोटी बहीण यांना वश करुन त्यांचा ‘निरोप्या' म्हणून वापर करण्याचे औचित्य दाखवीत. एकमेकांना पाठवायच्या चिठ्ठ्या ऐऱ्यागैऱ्यांच्या हाती न लागण्याची समयसूचकता बाळगीत. ..आणि तरीही कुठे फसगत झालीच तर ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार' या न्यायाने जन्मदात्यांकडून बेदम चोप सहन करण्याचे प्रसंगावधान दाखवीत..पण प्रेम करणे अजिबातच सोडत नसत. त्याचप्रमाणे कुठे, किती, काय बोलावं याचंही प्रसंगावधान, समयसूचकता बाळगणे जरुरीचे असते. तिथेही टायमिंगचे भान हवेच! बारशाला वेगळं बोलावं लागतं. वाढदिवसाला वेगळं, निरोप समारंभ, सत्कार समारंभ आणि अंत्यविधी या साऱ्या ठिकाणी बोलायची वेळ आली तर बोलण्याबोलण्यात फरक असावा लागतो. माझ्या ओळखीचे एक स्वयंघोषित पुढारी आहेत, जे कुठेही गेले तरी  गेट मिटींग मध्ये जसे युनियन लिडर कामगारांसमोर बोलतात, त्याच टोनमध्ये हे पुढारी सगळीकडे बोलत असतात. काही जण बोलताना किती फुटेज खावं याचं भान न बाळगता वाट्टेल तितका टाईम खातात. मग सूत्रसंचालक/निवेदक मागून जाऊन त्यांचा सदरा/शर्ट खेचतो, ‘आवरा आता' म्हणून चिठ्ठी पुढे सरकवतो, तेंव्हाच ही मंडळी थांबतात. स्वतःला ‘ज्येष्ठ साहित्यिक' वगैरे म्हणवून घेणारा वसई मधील एक नमुना माझ्या पाहण्यात आहे. त्याचा कॉल आला की तो बोलताना मोठमोठाले पॉज घेतो. असे पॉज नाटक, सिनेमा, मालिका, जाहिर सभेतील भाषणात ऐकायला ठिक वाटतात. ते पॉज घेणारी व्यक्तीही त्या तोलामोलाची हवी. अटलबिहारी वाजपेयी यांची ती खासियत होती व ती त्यांनाच ती शोभून दिसत असे. आता ते यापुढे काय बोलतील याची उत्सुकता शिगेला पोहचे. मात्र हा ज्येष्ठ साहित्यिक मोबाईलवर कॉल करुन बोलताना असा मोठा पॉज घ्यायला लागला की तो तिकडे आहे की खपला, असा हिंस्त्र प्रश्न माझ्या मनात येऊन जातो. एकवेळ बोलून टाईम खा..पण असला खतरनाक पॉज घेऊन आमचा बीपी वाढवू नका असा मला इशारा द्यावासा वाटतो. तुमच्याही वाट्याला असे नमुने येत असतीलच अधूनमधून ! काय करायचे हो अशा लोकांचे?

राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

सेवेकरी आजी आजोबा