सेवेकरी आजी आजोबा

डायबेटिस, ब्लडप्रेशर, हार्ट, स्पॉन्डेलायटीस अश्या आजारांबरोबर जगणाऱ्या वृद्ध मंडळींची अजूनच पंचाईत असते. पण नातवाचे प्रेम (दुधावरची साय) स्वतःच्या म्हातारपणाची भिती यात सारे झाकून टाकावे लागते. यात काही समस्या यांनीच निर्माण केलेल्या असतात. पाळणाघर चा चांगला पर्याय उपलब्ध असताना आम्ही असताना मुलं पाळणाघरात का असं म्हणून काही वेळा न झेपणारी जबाबदारी अंगावर घेतली जाते किंवा गळ्यात टाकली जाते. काही वेळा तर घरात त्यासाठी बाईसुद्धा शक्य असूनही ठेवली जात नाहीं.
सकाळ चे दहा वाजले होते. मी बाजारात भाजी आणायला निघालो होतो. सोसायटीच्या गेटवर बेडेकर भेटले. नातवाला शाळेत सोडायला आले होते. त्यांना हाय, हॅल्लो करून मी पुढे गेलो. अर्ध्या तासाने परत आलो; तर बेडेकर अजून गेटवर उभेच होते. ‘काय हो, स्कूलबस आली नाही वाटतं?' मी विचारलं. ‘नाही हो नातू गेला मगाशीच शाळेत. आता नात शाळेतून यायची वेळ झाली ना, तिला न्यायला आलोय.'  बेडेकर वरकरणी तरी हसत म्हणाले. पण पुढे त्यांनी पुष्टी जोडली... ‘आता ही घरी जाऊन जेवेल मग तिला क्लासला सोडायची वेळ होईल. तिथून परत नाही येतं तर नातवाला शाळेतून आणवा लागेल. संध्याकाळी त्याचा कराटेचा क्लास आहेच. मग हिचा डान्स क्लास. दिवसभर हेलपाटे घालणं आहेच.'  बेडेकर मला कौतुक सांगत होते की स्वतः ची अडचण, कोंडमारा हे मला शेवटपर्यंत कळले नाही.

         रामधरणेकडून वाचायला आणलेली पुस्तके त्यांना संध्याकाळी परत करायला घरीच गेलो. तेव्हा त्यांच्या घरी माझ्या देखत एक नवंच रामायण घडत होतं. शाळेतून आलेली नात  भूक, भूक करून आजीच्या मागे लागली. पण आजीला बरं वाटत नव्हतं. आजोबांनी डब्यातून शंकरपाळी, वेफर्स असा सुका नाश्ता नाती समोर सादर केला. पण यावर तिने एव्हढा निषेध नोंदवला की बोलता सोय नाही. तिला मॅगी करून हवी होती. आजोबांना तर ते काही करता येत नव्हतं. नात तोंड वाकडं करून सोपयावर बसून राहिली. ती काही खाई ना. खेरीज तिला लगेच क्लासला जायचं होतं याची काळजी तिच्या दसपट यांनाच पडलेली होती. त्या काळजीचा लवलेशही तिला नव्हता. शेवटी आजारी आजी जेमतेम भिंतीच्या आधाराने स्वयंपाक घरात गेली व तिने गॅस पेटवला.

शेजवलकर आमच्या सोसायटीत नेहमी दिसत नाहीत. कधी तरी येतात महिना, पंधरा दिवस झाले की पुन्हा परभणीला दुसऱ्या मुलाकडे जातात. तिकडच्या नातवाची परीक्षा सुरु होणार असते. कधी सोलापूरला मुलीकडे जातात तो जावई कंपनीकडून परदेशात ट्रैनिंगसाठी जाणार असतो. त्याची अडचण संपत नाही तो पुण्यातल्या नातवाला सांभाळणाऱ्या मावशीने काम सोडलेलं असतं. इथली सून बोलवून घेते. मग सत्तरी ओलांडलेले आजी आजोबा इथे डेरेदाखल होतात.  ‘भारी उत्साह हो तुमचा या वयात इकडे तिकडे धावण्याचा. थकायला बरं होत नाही तुम्हाला?' मी कधी तरी त्यांना म्हणतो. ‘दमायला होतं हो, हिचे गुडघे दुखतात. मला ब्लड प्रेशर आहे. पण जावं तर लागतच' रामधरणे हसत..पण काहीशा विषण्णपणे सांगतात.

           अनेक घरात ही समस्या उभी राहिलेली दिसते. स्वतःची नोकरीं, उद्योग संपवून शांततेत उरलेले दिवस काढायच्या तयारीत असलेली ही मंडळी दुसऱ्या संसारात स्वतःच्याही नकळत अडकलेली दिसतात. यातल्या अनेक समस्या पारंपरिक कुटुंब व्यवस्था व नवी समाज रचना यांच्या अंतराने निर्माण झाल्या आहेत. अर्थात यातील अनेक जेष्ठ मंडळींना आपण समस्या ग्रस्त आहोत याचीच कल्पना नसते किंवा ते तसं मान्य करत नाहीत.

          अजूनही मर्यादेच्या पलीकडे जपलेले कौटुंबिक नाते संबंध, पाळणाघार, वृद्धाश्रम यांच्याबद्दलचे पसरवलेले ग्रह, आजी आजोबा त्यांचे प्रेम, संस्कार, नात किंवा नातवा द्वारे जपला जाणारा आपला वंश याच्या कल्पना यात साऱ्याचं म्हातारपण तर पिचलेलं दिसतंच; पण जीवघेणा शारीरिक, मानसिक कोंडमारा ही त्यांना सहन करावा लागतो. अजून गंभीर म्हणजे पति पत्नी पैकी एकाचं निधन झाल्यावर उरलेल्याला अनेक वेळा एकट्याने हे सारं. पार पडावं लागतं. तेव्हा अधिकच गंभीर परिस्थिती निर्माण होते.

            शीलाला संगीताची खूप आवड. पण नोकरीं घर संसाराच्या धबडग्यात जमले नाही. निवृत्तीनंतर हा छंद जोपासायचं तिने नक्की केलं. पण तिच्या निवृत्तीच्या आदल्या वर्षीचं मुलाला जुळी मुलं झाली. त्यामुळे छंद जोपासायचं स्वप्नं मनातच ठेवावं लागलं.सुभाष सोनार खरं तर रिटायर्ड आयुष्याचा आनंद तीन वर्ष घेत होते. पण अचानक सुमतीचं निधन झालं आणि त्यांना जळगावचं घर बंद करून पुण्यात मुलाकडे यावं लागलं. इथे पाच सात वर्ष्याची दोन नातवंड होतीच. सांगायला त्याचं करायला बाई आहे पण त्यांना शाळा क्लास ला नेणं आणणं, बागेत फिरवण दुखलं खुपलं बघणं अनेक जबाबदाऱ्या डोक्यावर येतातच.स्कूलबस, रिक्षा यांच्या पर्यायाचा विषय निघाल्यावर मुलगा म्हणतो  ‘दारात कार आहे नं; मग आपली मुलं रिक्षाने कशाला जाणार? तुम्ही आहात ना घरात न्या त्यांना. त्याला काय एव्हढे कष्ट पडतात?' यात आर्थिक दृष्ट्या मुलांवर थोडे फार विसबून असणाऱ्यांची स्थती अजून गंभीर असते. पहाटे लवकर नळाला येणारे पाणी, कामवाली, दूधवाले, कुरिअर, कचरा वाले यांच्या वेळा सांभाळतच त्यांना आपले कार्यक्रम ठरवावे लागतात.

             डायबेटिस, ब्लडप्रेशर, हार्ट, स्पॉन्डेलायटीस अश्या आजारां बरोबर जगणाऱ्या वृद्ध मंडळींची अजूनच पंचाईत असते. पण नातवाचे प्रेम (दुधावरची साय) स्वतःच्या म्हातारंपणाची भिती यात सारे झाकून टाकावे लागते. यात काही समस्या यांनीच निर्माण केलेल्या असतात. पाळणाघर चा चांगला पर्याय उपलब्ध असताना आम्ही असताना मुलं पाळणाघरात का असं म्हणून काही वेळा न झेपणारी जबाबदारी अंगावर घेतली जाते किंवा गळ्यात टाकली जाते. काही वेळा तर घरात त्यासाठी बाई सुद्धा शक्य असूनही ठेवली जात नाहीं. त्यात आता संस्कार वगैरे शब्दही आता वापरले जात आहेत.

यात नातवंड मुलगा अर्थात कुलदीपक असेल किंवा मुलीं मागे बऱ्याच नवस सायासाने जन्मला असेल तर त्याच्या सेवेत सारीच जणं विशेषता आजी आजोबा स्वतः ला धन्यता म्हणतात. अर्थात या सेवेकरी पणाचा उद्वेग कधी तरी बाहेर येतोच. -श्रीनिवास गडकरी, रोहा. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

‘इतिहास छत्रपतींचा वाचण्यासाठी वाचला पाहिजे!'