त्यागमूर्ती सिद्धार्थ गौतम बुद्ध
वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व परिनिर्वाण ह्या तीन्ही घटना याच दिवशी घडल्या. त्यांना या दिनी विनम्र अभिवादन!!!
प्राचीन भारतीय उपखंडात शाक्य व कोलिय हे दोन राजे राज्य करीत होते. या दोन्ही राज्यात फार सुपिक भुभाग होता. रोहिणी नदी त्या दोन्ही राज्यातून जात होती. या नदीचे पाणी दोन्ही राज्यातील शेतीसाठी वापरले जात असे. शाक्य संघाचे सिद्धार्थगौतम हे सभासद होते. आपला प्रपंच सांभाळत ते शाक्य संघाचे काम उत्तमरीत्या पाहत होते. या त्यांच्या स्वभावामुळे ते शाक्य संघात सर्वांचे लाडके होते. माता गौतमी आणिपिता शुद्धोधन यांचा ते मोठा पुत्र होते. त्यांचे लग्न यशोधरा या अत्यंत सुंदर युवतीशी झाले होते. शिवाय त्यांना राहुल छोटा मुलगा होता.
एकदा कोलिय व शाक्य यांच्या शेतकऱ्यांमध्ये रोहिणी नदीचे पाणी शेतीसाठी अगोदर कोणी घ्यावे यावरून वाद झाला.या वादातून काही शेतकऱ्यांना दुखापती झाल्या. हा वाद शाक्य राज्यातील सेनापतीने फारच मनावर घेतला. त्याने सर्व शाक्य राज्यातील सदस्यांची सभा बोलावली व यासभेत कोलिय राज्याविरूद्ध बंड म्हणून युद्ध करण्याची कल्पना मांडली व कोणाला काही या बाबतीत बोलायचे आहे का? हे अपिल केले. हा निर्णय सिद्धार्थ गौतम यांनाआवडला नव्हता. कारण युद्ध करणे हा एकच पर्याय नव्हता. म्हणून ते भर सभेत उभे राहिले व मला हे युद्ध मान्य नाही, हे ठामपणे सेनापतीला सांगितले. यावर सेनापतीने युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म असल्याची त्यांना आठवण करून दिली. हे युद्ध ज्यांना ज्यांना मान्य नाही यासाठी मतदान घेण्याचे ठरवले. तसेच सिद्धार्थ गौतम यांच्या विरोधात मतदान झाले तर सेनापती देतील ती शिक्षा सिद्धार्थ गौतमांना भोगावी लागेल तरच हे युद्ध थांबेल.
सिद्धार्थ गौतम यांचा निर्णय बऱ्याच लोकांना आवडला असतांनाही त्यांच्या विरोधात मतदान झाले. हीच घटना सिद्धार्थ गौतम यांच्या आयुष्यातील मोठी होती. सिद्धार्थ गौतम यांना शिक्षा म्हणून त्यांच्या वडीलांची जमीन जप्त करण्याची शिक्षा सेनापतींनी सुनावली. पण ही शिक्षा सिद्धार्थ गौतमाला मान्य नव्हती. कारण माझ्यासाठी माता-पित्याला शिक्षा का? त्याऐवजी त्यांनी हे राज्य सोडून जाण्याची शिक्षा द्यावी ही विनंती केली. पण सेनापती यासाठी तयार होत नव्हता. कारण एवढ्याशा कारणाने सिद्धार्थ गौतमाला ही शिक्षा दिली आहे हे जर शेजारील राज्यांना कळले तर आपली व आपल्या राज्याची बदनामी होईल ही भिती त्यांना वाटत होती.शिद्धार्थ गौतम यांनी मग आणखी एक पर्याय दिला की ते परिव्रज्या घेऊन हे राज्य सोडून जातील, म्हणजे कोणाला याची शंका येणार नाही. तात्पर्य मानवजातीच्या कल्याणासाठी, प्रजाजनांचा जीव युद्धात जावू नये म्हणून त्यांनी स्वतः परिव्रज्या जीवन स्विकारले. सारे वैभव, मातापिता, पत्नी व मुलगा या सर्वांचा त्यांनी त्याग केला. पुढे तपश्चर्येने त्यांना ज्ञानप्राप्ती झाली व ते बुद्ध झाले. यातून जगाला विज्ञानाच्या कसोटीवर आधारलेला बौद्ध धर्म दिला. अत्त दिप भव चा मार्ग दाखवला. - प्रा. डॉ.श्रीकृष्ण दिगंबर तुपारे