एक नूर आदमी..दस नूर कपडा
तुम्ही चारचौघात कसे वावरता, काय परिधान करता यावर तुमचे एकवेळ नसले तरी समाजाचे व्यवस्थित लक्ष असते. कपडे हा तुमच्या आमच्या जीवनात जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंडपणे साथ करणारा अपरिहार्य घटक आहे. कोणत्या वेळी कोणते कपडे घालावेत याचे काही सामाजिक संकेत असतात, किंवा ज्याने त्याने समजून उमजून कपड्यांची प्रसंगानुरुप निवड करावी अशी अपेक्षा असते. सैन्य दले, सुरक्षा दले, पोलीस दल, एनसीसी या व अशा ठिकाणी कर्तव्यावर असताना गणवेश परिधान करावा लागतो. तिथे कसलेमसले चटेरीपटेरी कपडे चालत नाहीत.
वर्षातल्या सर्वात कडक समजल्या जाणाऱ्या मे महिन्यात तसेच वैशाख वणव्यात आपण प्रवेश केला आहे. अंगाची लाही लाही करणारं उन आणि तितकेच उष्म वारे अवतीभवती वाहताहेत. यंदा या उष्म्याने तर कहरच केला असून अजूनतरी बऱ्यापैकी वृक्षराजी शिल्लक असणाऱ्या नवी मुंबईतही त्यामुळे भरदुपारी वावरणे अवघड होऊन बसते. बरे पत्रकार म्हणून घरी बसून काम करता येत नसते. बाहेर पडावेच लागते. ‘११ ते ४ दरम्यान आवश्यकता नसेल तर घराबाहेर निघूच नका' ही शासकीय सूचना डावलून! अशा वेळी अंगात सैलसर, ढिलाढाला असणारा सदरा अर्थात कुर्ता बरा म्हणून तो घालून वावरु लागलो तर ‘दुल्हेराजा' अशी कमेंट ऐकायला येते. तर कधी कधी ‘आज काय मुलाखतीचे शूटिंग, रेकॉर्डींग वाटते ?' अशा प्रकारचीही पृच्छा होते.
या कपड्याचा शोध नेमका कधी लागला याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधनात केलेल्या एका अभ्यासाचा असा निष्कर्ष आहे की या कपड्यांना १ लाख ७० हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. नवीन हवामानात स्थलांतरीत होताना उन, वारा, पाऊस, थंडी यापासून बचाव करण्यासाठी कपड्यांचा शोध लागला तो ‘गरज ही शोधाची जननी असते' या सूत्राला धरुन! मध्ययुगात यंत्रमागाचा शोध लागला. अंबाडीचे कापड, आगीत भाजलेले कापड, वाफेवर शिजवलेले कापड हे सारे त्यानंतर येत गेले. तागाचे कापड इसापूर्व ३२०० वर्षांपूर्वीपासूनचे आहे. दक्षिण अमेरिकेत वनस्पती आधारीत कापड पेरुमधील गिटारेरा गुहेत सापडले. प्राण्यांच्या चामडीचाही कपडे बनवण्याकामी उपयोग केला जात असे. रामायणात सीतामाईला दिसलेल्या हरणाच्या त्वचेची चोळी शिवण्याचा मोह झाल्यामुळे तिने रामचंद्रांना शिकारीसाठी पाठवले आणि पुढचे सारे रामायण तुम्हाला ठाऊक आहेच! त्याच काळी वल्कले नेसण्याचीही प्रथा होती. तर असे हे कपडे. यात त्याकाळी फॅशन म्हणून कपड्यांचा मुळीच वापर केला जात नसे; तर हवा, पाणी, उन, वारा या पासून संरक्षण हेच कपड्यांमागचे मुख्य योजकत्व असे. यंत्रमाग मध्ययुगात सुरु झाले. त्यात मग रंग, पोत, लांबी, रुंदी, जाडी हे घटक आले आणि कपड्यांनी व ते परिधान करणाऱ्यांनी वेगळेच रंग दाखवायला सुरुवात केली.
अधिकाधिक कपडे घालायला आवडणे, वेगवेगळ्या रंगांचे कपडे परिधान करणे, निरनिराळ्या प्रसंगानुरुप कपडे घालणे, विभिन्न त्रतुंनुसार वस्त्रे निवडून ती वापरणे यात गैर काहीच नाही. जो तो किंवा जी ती आपापल्या ऐपतीप्रमाणे कपडे खरेदून ते वापरीत असते. मला आठवते.. माझ्या लहानपणी तर मी माझ्या शेजारच्या मित्राचे, मामेभावाचेही नवे कपडे घालायचो. काही ठिकाणी तर काही महिला स्वतःची नवी कोरी साडी दुसऱ्या महिलेला ‘घडी मोडण्यासाठी' खुषीने देत असत. डॉ. रविंद्र कोल्हे, स्मिता कोल्हे ते चालवत असलेल्या समाजसेवी संस्थेच्या कामात खूप व्यस्त असतात. त्यांच्या एका लेखनात मी वाचलंय की स्मिताजींनी दुसऱ्या महिलांनी वापरलेल्या साड्याही परिधान केल्या आहेत. ज्येष्ठ समाजसेवक मा. बाबा आमटे यांच्या पत्नी मा.साधना आमटे यांनीही तसे केले आहे. शालेय-महाविद्यालयीन जीवनात आपण आई-वडिलांवर अवलंबून असताना त्यांच्यावर कपडे खरेदीसाठी फार भार टाकू शकत नाही. पण स्व-कमाईदार झाल्यावर ही कपड्यांची हौस पुरेपुर भागवता येते. मला स्वतःला भरपूर आणि वेगवेगळ्या फॅशनचे कपडे खरेदी करुन किंवा शिवून घालायला खूप आवडते. घरातील वॉर्ड रोब कसा नुसता भरलेला पाहिजे. मला वेगवेगळ्या पध्दतीचे कपडे परिधान करण्यात तसेच इतरांना भेटीदाखल कपडे देण्यातही समाधान लाभते. माझी ही कपड्यांची आवड लक्षात घेऊन माझी पत्नी, मुलगा, बहिणी, सून, पत्नीकडील नातेवाईक, विविध भावंडे, भावजया, त्यांची मुले, त्यांच्या सूना, माझे मित्र, मैत्रीणी ही सारी मंडळी वर्षभराच्या विविध प्रसंगांना माझ्यासाठी इतके कपडे घेत असतात, की मला स्वतःला कपडे खरीदण्यासाठी जायची फारशी वेळच येत नाही. या कपड्यांप्रमाणेच विविध सन्मान, सत्कार, पुरस्कार वितरणप्रसंगी मिळालेल्या शालींचेही प्रमाण भरपूर असते. माझी पुस्तके ब्रेल लिपीमध्ये प्रकाशित करणाऱ्या स्नेह ज्योती अंध निवासी विद्यालयात असलेल्या विविध बिगरशिक्षक कर्मचारी, शिक्षक व अन्य कर्मचारी यांना ‘चांगल्या अवस्थेतील वापरलेले कपडेही भेटीदाखल चालतील' असे समजल्यावर त्यांना तसेच तशा प्रकारचे कपडे स्विकारणाऱ्या सेवाभावी संस्थांना असे कपडे देण्यातले समाधान काही वेगळेच! ‘मानवतेची भिंत' म्हणून जागोजागी लिहून ठेवलेल्या ठिकाणी आपण नेऊन ठेवलेले कपडे मात्र अशा कपड्यांचा धंदा करणारे पळवतात असे माझे निरीक्षण आहे.
हिंदी, मराठी चित्रपटसृष्टी विविध श्रीमंत कलावंत असले तरी माझ्या माहितीप्रमाणे हिंदी सिनेमात खलनायक व अन्य प्रकारची कामे केलेला भोजपूरी अभिनेता सुजीतकुमार हा म्हणे कपड्यांचा खूप शौकिन, श्रीमंत होता. कोणत्या वेळी कोणते कपडे घालावेत याचे काही सामाजिक संकेत असतात, किंवा ज्याने त्याने समजून उमजून कपड्यांची प्रसंगानुरुप निवड करावी अशी अपेक्षा असते. सैन्य दले, सुरक्षा दले, पोलीस दल, एनसीसी या व अशा ठिकाणी कर्तव्यावर असताना गणवेश परिधान करावा लागतो. तिथे कसलेमसले चटेरीपटेरी कपडे चालत नाहीत. एखाद्या ठिकाणी अंत्यविधीसाठी किंवा मृत्युउपरान्त सांत्वनासाठी जातानाही साध्या कपड्यात जायचे असते. तिथे महागडे, नवेकोरे, भपकेबाज, भडक स्वरुपाचे कपडे अंगावर असू नयेत याचे भान तेथे जाणाऱ्याने स्वतःहुन बाळगले पाहिजे. शासकीय स्वरुपाचा कार्यक्रम असेल तर अशा काही ठिकाणी वस्त्र संहिता असते. गोव्याला बीचवर गेल्यावर घालतो तसे किंवा स्विमिंग पूलमध्ये जसे कपडे घालून उतरतो तसले कपडे येथे चालत नसतात. लग्न, साखरपुडे, पूजा, बारसे, दिवाळी पहाट, संस्थांचा वर्धापन दिन, वाढ दिवस या व अशा कार्यक्रमांना समाजमान्य पध्दतीचे कपडे घालून जायला हवे. ‘झिंगालाला फुर्र' टाईपची जंगली-आदिवासीटाईप वस्त्रे घालून तिथे कुणी पोहचले तर टिंगलटवाळीशिवाय दुसरे काही हाती लागणार नाही. उर्फी जावेद नावाची ललना कुठे, कसल्या प्रकारचे कपडे घालून अवतरेल याचा काहीच नेम नसतो. त्यामुळे तसल्या लोकांसाठी तर सार्वजनिक ठिकाणी वावरण्याबाबत कडक वस्त्रसंहिता जारी केली पाहिजे. राजशिष्टाचारानुसार कार्यक्रम सुरु झाल्यावर मंचावरील अध्यक्ष सोडून अन्य व्यवतीच्या डोवयावर कॅप, टोपी, फेटा, पगडी तसेच डोळ्यावर काळा गॉगल असले काही नसावे, तसेच अध्यक्षांच्या परवानगीविना कुणी मध्येच विचारमंच सोडुन जाऊ नये असेही संकेत आहेत. पण ते पाळले जातातच याचा कसलाही नेम राहिलेला नाही. वेगवेगळ्या काळात त्या त्या वातावरणाला अनुसरुन कपडे निवडले गेले आहेत. शिवकाळात तेथील परिस्थिती, घोडेस्वारीत सोपे जावे यासाठी विशिष्ट प्रकारचे कपडे होते. महिलांसाठी नऊवारी साड्यांचा प्रघात होता. केशवपन केलेल्या महिलांसाठी आलवणाने माथे झाकणे अनिवार्य असे.
आता प्रचंड उष्मा आपण अनुभवत आहोत. अशा वेळी सर्वसाधारणपणे सैलसर, पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे कपडे अंगावर असावेत जेणेकरुन घामाने अंग चिकचिकणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते. पण तरीही अशाही वातावरणात अनेकजण, अनेकजणी बेधडकपणे घट्ट कपडे, जाकिट, थ्री पिस सूट, भरजरी-वजनदार, जरीकाठी साड्या अशा अवतारात वावरत असतात. चांगले असलेले कपडे फाडून घालण्याची किंवा आधीच फाडून ठेवलेले कपडे निवडण्याची एक टूम आली आहे. भारीतले जिन्सचे कपडे गुडघ्यावर, पोटावर, खांद्यावर भोके पाडून ठेवलेले असतात, ते कपडे भरपूर पैसे देऊन खरेदी करत या पोराटोरांनी घातलेले पाहण्याचे विचित्र दिवस आले आहेत. आपली परिस्थिती चांगली असेल तर शक्यतो फाटके कपडे घालू नयेत, अगदीच परिस्थिती बेताची असेल तर फाटलेले कपडे व्यवस्थित शिवून, दुरुस्त करुन मगच घालावेत. फाटलेपणा हा सोबत दारिद्रय घेऊन येतो किंवा तसे वागणाऱ्याचे विचारदारिद्रय त्यातून झळकते असे म्हणतात. पण याचे कसलेच भान नसलेल्यांना त्याच्याशी काहीच देणेघेणे नसावे. बोचरी थंडी किंवा वातानुकुलित घर-कार्यालय, केबिन असतानाही अंगदाखवेगिरी करीत शरीर अर्धउघडे टाकणाऱ्या विद्वान महिला काही कमी नाहीत. या वस्त्रांमुळे रामायण घडले आणि रावण संपला, द्रौपदीच्या वस्त्रांना हात घालणाऱ्या कौरवांचा पार निःपात झाला असे आपली पुराणे सांगतात. वस्त्रे व त्यांची निवड अति महत्वाची आहे. तसे पाहिले तर आपल्या आयुष्याची सुरुवात साध्या सुती दुपट्याने होते आणि शेवट हा अत्यंत स्वस्त दराच्या कफनरूपी कपड्यांत होतो. म्हणूनच मधले सारे जे जीवन आहे ते तरी चांगल्या प्रकारच्या वस्त्रांनिशी जावे ही अपेक्षा अगदीच गैर ठरु नये. - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक :दै. आपलं नवे शहर