.....आणि सूर्य अकाली अस्तास गेला
छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव घेताच त्यांचे थोडेसेही कर्तृत्व माहित असणाऱ्याची छाती अभिमानाने फुलून येते आणि आदराने मान खाली झुकते. शूर, महा पराक्रमी, चतुर छत्रपती शिवाजी महाराजांचे तितकेच पराक्रमी, अभ्यासू, हुशार; पण शापित पुत्र म्हणजे संभाजी राजे होय. छत्रपती संभाजी राजांचा छोटासा जीवनपट पाहिल्यास कुणीही माणूस अचंबित होईल. आज १४ मे. छत्रपती संभाजी महाराजांची जयंती!
छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापश्चात त्यांच्या मातोश्री निवर्तल्याने ते मातृसुखास पारखे झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर पत्नींनी आणि दस्तुरखुद्द जिजाऊंनी त्यांच्यावर आईचे प्रेम केले हे खरे असले तरी त्यांना सख्ख्या आईचे प्रेम कधी लाभले नाही. त्यांचे पिताश्री छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेच्या कामात सततच्या योजना, मोहिमांमध्ये गुंतलेले असल्याने ते शंभूराजांच्या वाट्याला कमीच आले. अशा पुरेसे मातृ-पितृप्रेम न लाभलेल्या शंभु राजांचे शस्त्र आणि शास्त्राचे उत्तम शिक्षण मॉसाहेब जिजामाता यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते आणि विशेष म्हणजे बाल शंभु राजांनी शस्त्र शास्त्र आणि राजकारणात प्रावीण्य मिळविले होते. ते युद्धात, वादविवादात कधी हार जात नसत; तसेच राजकीय पेचप्रसंगात त्यांचा गोंधळ होत नसे. वयाच्या मानाने त्यांची प्रत्येक क्षेत्रातील समज अचंबित करणारी होती. इतके करत-शिकत असताना त्यांनी मराठी बरोबरच इतर चार सहा भाषांमध्येही प्रावीण्य मिळविले होते. बालवयातच त्यांनी ब्रीज, संस्कृत भाषांमध्ये ग्रंथही लिहिले, त्या ग्रंथांचे वाचन करून तेव्हाचे काशीचे विद्वान पंडितही अचंबीत झाले. त्या विद्वानांनी शंभु राजांचे कौतुक केले.
औरंगजेबाचे एक सरदार जयसिंग हे प्रचंड फौजफाटा घेऊन छत्रपती शिवाजी राजांना कैद करण्यासाठी दक्षिणेतून महाराष्ट्रात आले. त्यांनी महाराजांचे एक एक गड किल्ले ताब्यात घेण्यास सुरुवात केली, त्यांच्याशी चर्चा करून आणखी हानी टाळावी म्हणून महाराजांनी त्यांची भेट घेतली तेव्हा जयसिंगांनी महाराजांकडे युवराज शंभुराजांना त्यांच्याकडे ओलिस ठेवण्याची विचित्र अट घातली आणि महाराजांना नाइलाजाने ती मान्य करावी लागली. बाल शंभुराजे शत्रुच्या शिबिरात ओलिस असताना वयाने आणि पराक्रमाने कितीतरी मोठे असणारे जयसिंग राजे शंभुराजाशी अनेक विषयांवर चर्चा करीत आणि बाल शंभुराजांची त्या वयातील राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक समज पाहून ते थक्क होत. पुढे पिताश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत आग्रा येथे बाल शंभुराजे क्रुरकर्मा, असूरी औरंगजेबाच्या नजरकदैत पडले त्यावेळी त्यांच्या वाक्चातुर्याने औरंगजेबाचे सरदारही अवाक् होत असत. औरंग्याच्या हातावर तूरी देऊन आग्राहून निसटताना सुरक्षितता म्हणून शिवरायांनी बाल शंभुराजांना आर्ग्याजवळच एका विश्वासू कुटुंबाकडे सोपवून त्यांनी महाराष्ट्राकडे कूच केली. बाल शंभुराजांसाठी किती कठिण प्रसंग होता तो. आपल्या घरापासून साडेतीन चार हजार कि.मी.दूर वेगळ्या प्रदेशात अनोळखी माणसांसोबत ओळख लपवून क्रूरकर्मा औरंग्याची म्हणजे मृत्यूची सतत टांगती तलवार डोक्यावर असताना रहायचे. आपले पिता, आजी, सावत्र आया, भावंडे, आपली माणसे, आपली भूमी परत दिसणार की नाही याची खात्री नसताना त्यांनी तेथे काही महिने कसे काढले असतील? कल्पनाही करवत नाही. यथावकाश तेथून ते सुखरूप महाराष्ट्रात पोहोचले.
शंभुराजे मोठे होत होते. स्वराज्याच्या कामी मोहीमा आखून जिंकत होते. पराक्रमी आणि तरूण असल्याने काही धाडसी निर्णय घेत होते. त्यामुळे काहीवेळा मंत्रिमंडळातील वरीष्ठांशी मतभेद होत होते. त्यामुळे जुने सरदार शंभुराजांना युवराजपद मिळू नये म्हणून त्यांची बदनामी करत होते; तसेच त्यांना मोहिमांमध्ये यश मिळू नये यासाठीही प्रयत्न करीत होते. शंभुराजांचा पराक्रमाचा वारू वेगाने दौडत होता त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पराक्रमावर खुश होते. सततची धावपळ, लढाया, मोहीमांनी महाराज थकत होते. शंभुराजे महाराजांपासून दूर रहावेत यासाठी नाराज वरीष्ठ कारभारी आणि शंभु राजांचे काही आप्त सतत प्रयत्न करीत आणि त्यात त्यांना यशसुद्धा मिळत होते. त्यांच्याच षडयंत्राचा भाग म्हणून छत्रपती शिवराय आणि शंभुराजे या पितापुत्रांमध्ये गैरसमजुतीने थोडा दुरावाही आला. याचाच फायदा शंभुराजांच्या विरोधकांनी घेण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूची बातमीही त्या कपटी कारस्थानी लोकांनी शंभुराजांना कळू दिली नाही. उशीरा जेव्हा त्यांना समजली तेव्हा ते अत्यंत दुःखी आणि संतापाने क्रुद्ध झाले व त्यांनी कटातील काहींना कठोर शिक्षा दिली आणि स्वराज्य रक्षणाचे काम सुरू ठेवले. महाराजांच्या मृत्यूचा फायदा औरंग्याने घेतला नसता तरच नवल. त्याने मराठी मुलुख ताब्यात घेण्यासाठी मोठा फौजफाटा पाठवला.
इकडे मराठी सैन्यात दुही माजली होती. छत्रपती संभाजी महाराज शत्रूला अथक टक्कर देत होते; पण पैसा आणि पदासाठी मराठी सेनानी औरंग्याला फितूर होत होते. कोण कधी दगा देईल, फितूर होईल हे सांगता येत नव्हते. कुणावर विश्वास ठेवावा ? कोण निष्ठावान यांचा अंदाज लागत नव्हता. त्यात छत्रपती संभाजी राजांविरोधी आप्त स्वकीय आणि सेनापतींची कारस्थाने वाढली होती. शंभुराजे चारही बाजुने त्रस्त झाले होते. ते भूमीगत राहून सैन्याची जमवाजमव करून शत्रूला टक्कर द्यायचा प्रयत्न करत होते आणि कोकणात एके ठिकाणी ते दुपारच्या वेळी थांबले असताना अचानक शत्रूसैन्याने त्यांना घेरून बंदी केले. छत्रपती संभाजी महाराज नेमके कोठे सापडतील ते ठिकाण शत्रूंना कुणी परक्याने नव्हे; तर त्यांचा सख्खा मेहुणा गणोजी शिर्के याने पैसा आणि पदाच्या आशेने सांगितले होते. स्वार्थापुढे नाती गौण ठरली होती.
पुढे शंभुराजांना औरंग्यासमोर हजर केल्यावर त्याने त्यांचा अमानुष छळ केला. त्यांनी मुस्लिम धर्म स्विकारावा, सल्तनतचे वफादार सरदार बनावे (स्वराज्या विरोधी काम करावे) म्हणून औरंग्याने त्यांना नाना आमिषे दाखवली, भय घातले पण राजांनी त्याला जुमानले नाही. साखळदंडात जखडून ठेवलेला शूर शिवबांचा तो सिंह प्रत्येक वेळी औरंग्याच्या नजरेला नजर भिडवून बाणेदारपणे त्याला निरूत्तर करत असे. शेवटी त्या क्रूर सैतानाच्या आदेशाने तप्त सळ्या डोळ्यात घुसवून शंभुराजांचे डोळे फोडले गेले, हातापायाची नखे उपटून काढली, रोज थोडी थोडी त्वचा सोलणे सुरू केले पण धिरोदत्त शंभुराजांनी औरंग्याच्या कोणत्याच अटी मान्य केल्या नाहीत. चाळीस दिवस कमालीचे अत्याचार सहन करून धर्मासाठी, स्वराज्यासाठी हौतात्म्य पत्करले. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि शंभुराजांच्या द्वेषाने पछाडलेल्या नीच लोकांनी मोठ्या भाग्याने लाभलेला महापराक्रमी, धाडसी, कर्तृत्ववान, विद्वान, सुसंस्कृत, आणि धर्मप्रेमी राजा गमावला आणि मराठी साम्राज्याचे कधी न भरून येणारे नुकसान केले. इतिहासात असा छळ कुणाचा झाला नाही, कुणी सहनही करू शकला नसता. म्हणूनच म्हणतात जगावे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आणि वेळ आली तर मरावे शंभुराजांसारखे. धन्य ते शंभुराजे! प्रचंड शक्ती, अफाट बुद्धिमत्ता, शस्त्र, शास्त्र आणि राजकीय मुत्सद्दीगिरीत वाकबगार, पराक्रमी, धर्म आणि मातीशी कमालीचे इमान, सुसंस्कृत, थोरा मोठ्यांचा आदर, शत्रूशी कठोर व्यवहार हे आणि असे राजाला लागणारे सारे गुण अंगी असतानाही केवळ स्वार्थ, कट-षडयंत्रे, फंद फितुरीचे ग्रहण लागल्याने मराठी साम्राज्याचा हा सूर्य अकाली अस्ताला गेला. - मनमोहन रो. रोगे, ठाणे