वाळवी!
वाळवी हा शब्द आपल्याला खूप काही सांगुन जातो. सहसा हा शब्द कोणी उच्चार करायलापण मागत नाही. सर्वांना नकोसा वाटतो. कारणपण तसेच आहे, ती कीड एखाद्या वस्तूला लागली की त्या वस्तूचा नायनाट करते. मग ती लाकडाला लागो किंवा घराला. वाळवी लाकडाला लागली की लाकूड पोखरून काढते. औषध फवारणी करून तात्पुरती प्रतिबंध करता येतो आणि हीच वाळवी घराला लागली की पेस्ट कंट्रोल करून नायनाट करता येतो. ही वाळवी निर्जीव वस्तू यांनाच लागते असे नाही; तर ती मनुष्यप्राण्याला देखील लागते. म्हणजे आपल्या मनाला.
ही वाळवी घर पोखरून काढते. तशीच ही जर वाळवी मनुष्यरुपी देहाला लागली तर संपूर्ण कुटुंब उध्वस्त करते. या वाळवीचे विविध प्रकार आहेत. ते म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद-मत्सर, संशय, चिंता. हे विषय माणसाचं शरीर पोखरून काढायला खूप मदत करतात आणि त्यांना साथ मिळते ती आपली. काम हा विषय मनुष्य देहाला नको त्या वासनांकडे वळवण्यास प्रवृत्त करत असते. मग ती वासना नको त्या मार्गे जाऊन नको ते काम करून घेते. क्रोधाचं काम तर तोड आणि फोड. मग हा क्रोध लहान मुलांपासून वृद्धावस्थेत असणाऱ्या सर्व मनुष्य प्राण्यांमध्ये ठासून भरलेला आहे. कोणी अरे बोलले की आपण कारे बोललेच पाहिजे. नम्रतेने जे काम होणार असते ते क्रोधाने करून घेतले जाते. मग ते काम होत असताना स्वतःसोबत बाकीच्यांचे पण नुकसान होते, याचा विचार करण्याची सुद्धा क्षमता क्रोध आपल्याला ठेवत नाही. क्रोध आल्यामुळे त्या मनुष्याला आपण चुकत आहोत हे समजत नाही. त्यामुळे क्रोध त्याचे काम उत्तमरीत्या करून घेतो.
मद-मत्सर म्हणजे तिरस्कार. सतत एखाद्याचा तिरस्कार करणे. माझी प्रगती होत नाही तर तुझीदेखील झाली नाही पाहिजे अशी वृत्ती मनात ठेवून सतत एखाद्याला घालूनपाडून बोलणे आणि त्याचा तिरस्कार करणे हे देखील एक मनुष्याला उत्तमरीत्या जमते. सर्वात मोठा विषय म्हणजे संशय. संशययाने माणसाच्या मनामध्ये घर केले तर ते मनुष्यालाच नाही, तर त्याच्या पूर्ण कुटुंबाला उध्वस्त करते. संशयाचे रूप कधी क्रोधात येतं कधी मदमत्सरामध्ये येते हे त्या मनुष्याला समजत नाही. मग संशय घरातल्या कुठल्याही व्यक्तीवर असो त्याचा परिणाम पूर्ण कुटुंबावर होतो, हे मात्र जो संशय घेतो त्या व्यक्तीला व्यक्तीला समजत नाही आणि पूर्ण कुटुंबच उध्वस्त होऊन जाते.
चिंता म्हणजे सतत एखाद्याची चिंता करत राहणे आणि अति चिंतेने स्वतः पण मनमोकळेपणाने न जगणे आणि समोरच्या व्यक्तीला ही मन मोकळेपणाने जगून देणे हे चिंतेचे काम असते. सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून अति चिंता करणे आणि त्याचे रूपांतर मोठ्या मानसिक आजारामध्ये निर्माण करणे हे या चिंतेला जमते.
लोभ म्हणजे प्रत्येक गोष्ट मलाच हवी. मग लोभासाठी सख्खा भाऊ असो, सख्खी बहीण असो, की आई-वडील असो यांना देखील जुमानले जात नाही. सर्व मलाच हवे हे लोभाचे काम असते. श्री समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटले आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूची शोधूनी पाहे.
खरंच आपण आपल्या मनाला विचारलं आहे का, की या जगामध्ये सगळ्यात सुखी कोण आहे तर म्हणे एक उत्तर देईल की ज्याला पडल्या पडल्या झोप लागते, तो या जगात सगळ्यात सुखी. मग यामध्ये आपण आहोत का? तर नाही. आपल्याकडे सर्व कारण तयार आहेत ती कारण म्हणजे माझ्याकडे काम, क्रोध, लोभ , मद-मत्सर , संशय, चिंता खूप ठासून भरलेला आहे . तर हे सहा विषय सर्वांकडेच असतात. पाच वर्षानंतर लहान मुलांमध्ये हे विषय हळूहळू यायला निर्माण होतात मग प्रत्येक विषयाचा उपयोग कसा करायचा हे आपण हळूहळू शिकतो. आणि मग हे विषय रोजच्या जीवनात सहजरीत्या वापरतो. पण योग्य रीतीने आपण जगत असताना नकळतपणे आपल्या मनावर हे विषय ताबा मिळवायला सुरुवात करतात. आणि आपल्या मनाप्रमाणे न वागता हे विषय स्वतःच्या म्हणण्यानुसार आपल्याला वागवायला सुरुवात करतात आणि आपण देखील त्यामध्ये सहज वाहत जातो. आपल्याकडून एखादी झालेली चूक, आपल्याला ती करायची नसते पण ती होऊन जाते, तेव्हा आपल्याला समजते की, या विषयांनी माझ्या मनावर ताबा मिळवला आहे. मग या सहा विषयांना ताब्यात ठेवण्यासाठी लहान मुलांना बालसंस्कार केंद्र आहेत. शिबिरे आहेत. मोठ्या व्यक्तींसाठी उपासनेची जोड आहे नामस्मरण आहे. नामस्मरणासारखं या जगामध्ये दुसरं औषधच नाही. नामस्मरणामुळे मन एकाग्र होतं आणि नको ते विषय मनाला सतावत नाही. जर नको त्या विषयांनी मनाला सतावलच नाही तर ही वाळवीरूपी कीड आपल्याला का लागेल? ते आपल्याकडे फिरणारच नाही. त्यासाठी सर्वांनी स्वतःच्या या सहा विषयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आध्यात्मिकतेचा तसेच चांगल्या संगतीचा स्वीकार करावा म्हणजे ही वाळवी आपल्या कुटुंबाला लागणार नाही. तसेच आपल्या देशाला लागणार नाही आणि सर्वजण या विषयांचा वापर करून सुख समृद्धीने जगतील. वाळवी आपल्या शरीरातून पूर्णपणे निघून गेली हे केव्हा समजेल, जेव्हा आपल्याला पडल्या जागी शांत झोप लागेल.
याचे खुप सुंदर उदाहरण म्हणजे नुकताच प्रदर्शित होऊन गेलेला चित्रपट वाळवी. या चित्रपटांमध्ये खूप मार्मिकरित्या वाळवीचे उदाहरण दिलेलं आहे. माणसाच्या मनामध्ये आलेला संशय कसं आपलं मन खातो आणि संसार उध्वस्त करतो. तो संसार उध्वस्त करत असताना आपलं घर देखील उध्वस्त होतं हे खूप सुंदररित्या त्या चित्रपटांमध्ये दाखवले आहे. खरंच किती उत्कृष्टरित्या मनुष्याच्या मनाचा विचार करून हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटाच्या शेवटी दुसऱ्याचा शेवट करत असताना त्यासोबत आपल्या देखील शेवट होतो हे उत्तमरीत्या दाखविले आहे. - सौ. निवेदिता सचिन बनकर-नेवसे