खबरदार! नाहीतर रायगडी धोंडे वाहण्यास खेचरांसोबत जुंपले जाल!
महाराज आपल्या काळजातल्या माणसांना खूप जपत, काम झालं म्हणजे संपलं असे त्यांनी कधी केले नाही. शिवाजी महाराजांच्या या दूरदृष्टीत सारे काही त्यांच्या यशाचे रहस्य आहे. लहानात लहान, महानात कसा महान बनवता येईल ही दिव्य शक्ती महाराजांकडे होती. म्हणून त्यांना जोखीम घेतांना कधी जखम होईल असे वाटले नाही. शिवप्रभूंचे चिटणीस गोपीनाथ पंत बोकील यांचा अवमान रायाजी देशमुख याने करताच शिवप्रभूंनी देशमुखाला खरमरीत पत्र लिहुन बोकील यांची माफी मागण्याची आज्ञा केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्यासोबत जी माणसं जपली ती सर्व स्तरावरील होती. त्यांनी त्यांच्यासमवेत फक्त सोबत नाही तर संगत केली, सोबती बनून समोरचा वार आपल्यावर घेत, कितीतरी डोकी महाराज यांनी वाचवली आहेत. गोपीनाथ पंत बोकील हे एक खूप मोठी कामगिरी करणारे वकील म्हणून अफजलखान प्रकरणात आपल्यास सामोरे येतात. गोपीनाथ पंत बोकील, यांना सासवड जवळील हिवरे गावची जोशी कुलकर्णीपणाची वृती कायम त्यांच्याकडे पूर्वीपासून चालत आली होती. १६४० मध्ये ते पुण्याचे मुजुमदार देखील होते,. १६५६ पासून ते महाराज यांचे चिटणीस देखील होते. पंत यांना भोसले परिवारात सर्वजण काका म्हणत, ते खूप जवळील होते, त्यांना राजमाता जिजाबाई यांच्यासोबत सोंगट्या खेळण्याइतपत त्यांची उठबस होती.
जसे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे जसे अफजल खानकडून वकिली करत असता डाव, प्रतिडाव टाकत होते, त्या वेळा त्या चालीवर रामबाण उपाय शोधत, तो अपाय न होता कसा आपण अफजलखान हा वाईवरून खेचून आणू शकतो, हे सर्व कौशल्य होते ते या गोपिनाथ पंत बोकील यांचे आहे, किंबहुना अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला गेला तो, गोपीनाथ पंत बोकील यांच्या चाली आणि ढालीमुळे असे म्हणण्यास पुरेपूर वाव आहे.
अफजल खान वध झाल्यानंतर, एक दुर्देवी प्रसंग घडला. तो प्रसंग, घटना महाराज यांच्या कानी आली. १६६२ च्या, पावसाळ्यात गोपीनाथ पंत हे मुक्कामास आंबोड्याला होते. एकदा भर बाजारात रायाजी देशमुख नावाच्या तरणाबांड माणसाचा व गोपीनाथ पंत यांचा काही कारणे वाद झाला, तो रायाजी देशमुख, बोकील पंत यांच्या अंगावर धावून आला, त्यानं गोपीनाथ पंत यांची भर बाजारात बेअदबी केली. हे जेव्हा शिवाजी महाराज यांच्या कानावर गेले तेव्हा ते, दिनांक १३/७/१६६२ च्या पत्रात खरमरीत लिहतात, त्याचा थोडक्यात अर्थ असा,
पंडीत खूप थोर मनुष्य आहेत, शाहजी राजे यांच्यासाठी ते खूप काही आहेत, तुम्ही त्यांचा चार लोकांत अवमान केला, आता दस्तुरखुद्द आपण गोपीनाथ पंत यांची माफी मागावी, तसे न केल्यास तमाम राजपुतांना पायात बेड्या ठोकून, तुम्हांस साखळदंड टाकून रायगडावर धोंडे वाहण्याकामी जुंपले जाईल. कारण गोपीनाथ पंत हे आम्हास थोरल्या महाराज यांच्या समान आणि सन्मानीत आहेत.
यावरून आपणास अंदाज येतो की महाराज आपल्या काळजातल्या माणसांना किती जपत, काम झालं म्हणजे संपलं असे कधी होत नाही. शिवाजी महाराजांच्या या दूरदृष्टीत सारे काही त्यांच्या यशाचे रहस्य आहे. लहानात लहान, महानात कसा महान बनेल, बनवता येईल ही दिव्य शक्ती महाराज यांना प्राप्त होती. म्हणूनच त्यांना जोखीम घेतांना कधी जखम होईल असे वाटले नाही. उलट घेतला तो निर्णय किती सर्वोत्तम आहे, होता, राहील यावर महाराज काम करत असत. एक एक हिरा जपत चिरा चिरा रचत आपण राज्य वाढवू शकतो, हा आत्मविश्वास यातून महाराज आपणास देतात.
म्हणून...चला तर माणसे जपू या, त्यांचा मान सन्मान करू या. योग्य ठिकाणी सज्जड दम देत, कामदेखील रामबाण करता येऊ शकते, हे समजून घेऊ या, शिव छत्रपती विचार हा आचार, सदाचार आणि एक संस्कार वसा करू या! - प्रा. रवींद्र पाटील