मुशाफिरी
भाषा हे निसर्गाने मनुष्याला दिलेले अनमोल वरदान आहे. मनुष्यप्राणी जात्याच हुशार असल्याने तोंड व कान यापुरत्या मर्यादित असलेल्या भाषेसाठी त्याने लिपी शोधली आणि ही भाषा पुस्तकात छापील स्वरुपात आणली. त्यामुळे आधी केवळ वंश परंपरेनेच पुढच्या पिढीकडे संक्रमित होणारी माहिती, ज्ञान या लिपीमुळे व छापील प्रसारमाध्यमांमुळे तमाम जनतेसाठी खुले झाले. तेवढे करुन तो थांबला नाही. ज्यांना नजरच नाही त्यांच्यासाठी स्पर्शाने वाचायची ब्रेल लिपीही मानवाने शोधून दृष्टीहीनांच्याही शिक्षणाची सोय केली. प्राणी, पक्षी, जलचर यांचीही भाषा असते? असावी. ती आपल्याला समजत नसते हेच काय ते शल्य!
भारतात छापील वृत्तपत्राची सुरुवात २९ जानेवारी १७८० रोजी हिकी या आयरिश व्यवतीने काढलेल्या ‘हिकीज बेंगॉल गॅझेट' या कलकत्यातून निघणाऱ्या साप्ताहिकाच्या माध्यमातून झाली; तर मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण' बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ या दिवशी सुरु केले. पुढचा बराचसा इतिहास तुम्हाला माहित आहे. त्यावेळच्या मराठी वर्तमानपत्रांवर इंग्रजी भाषेचा बऱ्यापैकी प्रभाव असे. कारण इंग्रजी राजवट देशात होती. संपादकीय मंडळातील व्यक्ती या उच्चविद्याविभूषित असत. समाजात त्यांच्या नावाला वलय असे. पुढे मराठीत लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, गोविंद विठ्ठल कुंटे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य प्र. के. अत्रे. बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, पुरुषोत्तम भास्कर भावे या व अशासारख्या नामवंतांनी वृत्तपत्रे चालवली. स्वातंत्र्यानंतर देशात विविध भाषक वर्तमानपत्रे निघू लागली. आकाशवाणी आणि दूरदर्शन सारख्या सकस श्राव्य आणि दृकश्राव्य माध्यमांचाही समावेश मग माध्यमविश्वात झाला आणि या जगताने कात टाकली. १९९७ च्या सुमारास ‘सिक्स डिग्रीज'च्या रुपाने सोशल मिडिया अर्थात समाजमाध्यमांना सुरुवात झाली आणि हळूहळू या समाजमाध्यमांनी अवघे जग व्यापले. आजमितीस नुसत्या भारतात सोशल मिडिया वापरणाऱ्यांची संख्या पाहिली तर अचंबित व्हायला होते. तब्बल ४९.२ कोटी भारतीय फेसबुक वापरतात; तर ४८.७ कोटी भारतीय व्हाट्सअपशी जोडलेले आहेत. आता भारतात लोकसभा निवडणूकांचे वातावरण आहे. वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरचित्रवाणी यांच्यासह फेसबुक, व्हाट्सअप, यु्ट्युब, टि्वटरसारख्या समाजमाध्यमांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवली जात आहे. यापूर्वीच्या काळात एखादी बातमी वर्तमानपत्रात, रेडिओ किंवा टेलिव्हिजनवरील वार्तापत्रात आल्यानंतर तिचा असेल त्याच्या कित्येक पट प्रभाव या समाजमाध्यमांवरील बातमी, पोस्ट यांचा दिसून येत असून काही सनसनाटी, भडकाऊ, वादग्रस्त पोस्टस्मुळे देशात विविध ठिकाणी दंगली पेटल्या आहेत, पोलीसांनी अनेकांना अटक करुन त्यांच्यावर खटले दाखल केले आहेत. ही बाब या समाजमाध्यमांच्या (नकारात्मक) प्रभावाचा अंदाज देण्यास पुरेशी ठरावी.
प्रश्न केवळ प्रभावाचा नाही. जी भाषा घरात, रस्त्यात, चौकात, भर बाजारात, दारुच्या गुत्त्यांवर, जुगारी अड्ड्यांवर बोलली जाते ती भाषा माध्यमांमध्ये आणावी का? की दृकश्राव्य माध्यमांतील किंवा पु्स्तके, ग्रंथ, चरित्रपर ग्रंथ, मासिके, साप्ताहिके, दैनिके यातील भाषा वेगळी असावी, प्रमाण भाषा असावी? हा प्रश्न आहे. ग्रंथनिर्मिती हा एक वेगळा समाजमान्य, प्रतिष्ठीत, लोकमान्यता-राजमान्यताप्राप्त प्रकार आहे. त्यामुळे अपेक्षा अशी असते की त्यातील भाषा ही समाजसंमत, संयमित, प्रमाण स्वरुपाची असावी. वर्तमानपत्रांचेही तेच आहे. ते घरात सर्व कुटुंबियांकडून वाचले जात असते. त्यातील भाषा ही योग्य, वाचनीय, व्याकरणशुध्द असायला हवी. ही झाली अपेक्षा. पण प्रत्यक्ष व्यवहारात काय दिसते? अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठी वर्तमानपत्रांचा जरी विचार केला तरी त्या काळच्या मराठी वृत्तपत्रांच्या काही चालक-मालक-संपादकीय मंडळातील सदस्यांनी विरोधकांना व प्रतिस्पर्धी वर्तमानपत्रांमधील समव्यावसायिकांना झोडपून काढण्यासाठी, नामोहरम करण्यासाठी मनमुरादपणे रस्त्यावरची भाषाही वर्तमानपत्रात आणली होती. यात विख्यात साहित्यिक आचार्य प्र.के.अत्रे यांचे नाव अग्रक्रमावर जाऊ शकेल. तत्कालिन ‘आदेश' वर्तमानपत्राचे संपादक पु.भा.भावे, साहित्यिक ना.सी.फडके, स्वा.विनायक दामोदर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे वाद होत राहिले. त्यांच्याविरोधात अत्रे यांनी शेलवया विशेषणांनी युवत भाषा त्यांच्या ‘नवयुग', ‘मराठा' या वृत्तपत्रांतून वापरली. ‘वासुनाका' कादंबरी लिहीणाऱ्या भाऊ पाध्ये, नवशक्तीकार प्रभाकर पाध्ये यांच्याबद्दलही त्यांनी खालच्या स्तरावरील भाषेचा प्रयोग केला होता. बाळासाहेब ठाकरे यांनी अत्रे यांची ‘वरळीचा डुक्कर' म्हणून संभावना केली होती. पु.भा.भावे यांनी ‘आदेश' मधून अत्रे यांचा समाचार घेतल्याचे दिसून येईल. याबद्दल अत्रे यांना मग न्यायालयीन लढ्यातही मोठा काळ घालवावा लागला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात (१९५५ ते १९६०) मात्र अत्रे यांची अशीच रस्त्यावरची भाषा मराठीप्रेमींसाठी मोठी उपयोगाची ठरली. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याला आधी विरोध करणाऱ्या यशवंतराव चव्हाण, स.का.पाटील, मोरारजी देसाई, पं.जवाहरलाल नेहरु यांच्यावर अत्रे वर्तमानपत्रातून व जाहीर सभांमधून प्रचंड स्वरुपात बरसले होते, महाराष्ट्रद्वेष्ट्यांना त्यावेळी त्यांनी सळो की पळो करुन सोडले होते. त्या मानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मात्र आपली ‘मूकनायक', 'बहिष्कृत भारत', ‘प्रबुध्द भारत', ‘जनता' ही वर्तमानपत्रे चालवताना, टिका करतानाही संयत भाषा वापरुन त्यातूनही योग्य तो प्रभाव साधला. त्यांच्याशी न जमणाऱ्या बाळ गंगाधर टिळक, मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी संबंधित वृत्तांना ते फारशी प्रसिध्दी देत नसत. यांच्या निधनाचे वृत्तही ‘बाळ गंगाधर टिळक यांचे निधन', ‘मो.क.गांधी यांची हत्या' असे त्यांनी संक्षेपातच दिले होते. अर्थात बाबासाहेब हे बाबासाहेबच होते. प्रचंड विद्वत्ताधारक, विविध कलांत पारंगत, निष्णात वकील, चांगले ववते, विविध ग्रंथांचे लेखक असल्याने त्यांना ते शोभले.
मराठी वृत्तपत्रसृष्टीने गेल्या साठ सत्तर वर्षात चांगल्या संपादक, साहित्यिक-पत्रकार-वक्त्यांची चांगली फळी पाहिली आहे. ह.रा.महाजनी, द्वारकानाथ कर्णिक, विद्याधर गोखले, गोविंद तळवळकर, निळकंठ खाडीलकर, माधव गडकरी, प्रमोद नवलकर, डॉ. अरुण टिकेकर, डॉ.विद्या बाळ, पुष्पा त्रिलोकेकर तसेच उत्तम कांबळे, ज्ञानेश महाराव, कुमार केतकर, भारतकुमार राऊत, दिनकर गांगल, संजीव लाटकर यांच्यासह अनेकांची नावे या संदर्भात घेता येतील. या सर्वांची बोलण्याची, लेखनाची भाषा संयमी, प्रमाण, समाजमान्य राहिली आहे. त्यामुळे त्यांना वाढता वाचकवर्ग लाभला. चॅनेलबाजीचा जसा सुळसुळाट झाला, समाजमाध्यमांचा प्रभाव जसा वाढत गेला, आपण टीव्हीच्या, मोबाईलच्या पडद्यावर राजरोस झळकतोय आणि पिटातल्या प्रेक्षकांना तेही आवडतेय हे जसे काही लोकांच्या लक्षात येऊ लागले तसा त्यांच्या भाषेत फरक पडू लागला. मग ‘काय डोंगार काय झाडी'ला प्रसिध्दी मिळाली तर तेवढ्याच जोरावर त्या संवादकर्त्याला चर्चा, गप्पागोष्टीसाठी चॅनेलवर बोलावणे येऊ लागले. काहीजण भर सभेत, भर माईकवर किंवा प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोरच आपल्या विरोधकाला च्युत्या, हरामखोर, भिकारचोट, उठ दुपारी घे सुपारी असल्या शब्दात हिणवू लागले. मागे तर एका अनुभवी, वयस्कर नेत्याने त्याच्याच आघाडीतील मित्रपक्षाच्या मुख्यमंत्र्याला उद्देशून ‘आमच्या फायलींवर सही करताना तुमच्या हाताला लकवा मारतो काय?' अशीही भाषा वापरली होती आणि ते सारे जबाबदार प्रसारमाध्यमांनी प्रसिध्दही केले होते. फेब्रुवारी २००९ पासून ब्रायन ॲवटॉन व जान कोऊम यांनी सुरु केलेल्या व्हाट्स अप या समाजमाध्यमाने हल्ली सगळ्यावर कडी केल्याचे दिसते. त्यावर दिसणाऱ्या काही पोस्ट्समध्ये समाजमान्य संकेत, भाषेचे पावित्र्य पार पायदळी तुडवल्याचे पाहायला मिळते. परस्परांच्या श्रध्दास्थानांचा, देवतांचा, धार्मिक रीती परंपरांचा अपमान करणं, कुठल्यातरी जुन्या ध्वनिचित्रफितीतील तुकडे उचलून भलत्याच ध्वनीचित्रफितीला जोडायचे व तिसरेच काहीतरी वादग्रस्त, सवंग, सनसनाटी निर्माण करुन लोकांमध्ये गैरसमज पसरवायचे या प्रकारांना आता ऊत आला आहे. हे सारे समाजमाध्यमांवर घडते आहे. याला कारण? याला कारण एकच! तिथे हे सारे तपासायला, संकलित करायला संपादकीय मंडळ नसते. कुणीही रेम्याडोवया उठतो आणि काहीही व्हायरल करतो. तो त्याची भाषा पाहात नाही, परिणाम पाहात नाही, इतिहास बघत नाही, संदर्भ लक्षात घेत नाही...आणि व्हाटस्अप, फेसबुक, यु्ट्युब यांच्याकडे ते तपासून बघण्याची यंत्रणाच नाही, त्यामुळे इकडून आले..तिकडे ढकलले हे प्रकार होत राहतात.
त्यामुळेच मग छापील प्रसारमाध्यमांचे स्थान हे अधिक जबाबदारीचे, संयत, संयमी, संवेदनशील भाषेचे तसेच लोकांच्या वाढत्या अपेक्षेचे राहिले आहे. राहिलही. ‘आपलं नवे शहर' या दैनिकाच्या माध्यमातूनही समाजमाध्यमांवर वृत्त, माहिती, मुलाखती, लेखमाला प्रसारित केल्या जात असतात. पण जबाबदारी, परिणाम, भाषेची योग्य पातळी यांचे भान राखूनच! आमच्या आणि तुमच्या या दैनिकाचा तिसावा वर्धापनदिन १ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त आणि महाराष्ट्र दिन - कामगार दिनानिमित्त सर्व वाचक, दर्शक, जाहिरातदार, शुभचिंतकांना हार्दिक शुभेच्छा! - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर