ट्रामा केअर सेंटर्सप्रतिची उदासिनता अपघातग्रस्तांसाठी जीवघेणी

अपघातामुळे मृत पावणाऱ्यांच्या संख्येवर आळा बसावा यासाठी राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर ११५ ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले असून या युनिटमध्ये न्यूरोसर्जन, इंटेन्सिव्हिस्ट, जनरल सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, ॲनेस्थेसिस्ट, निवासी वैद्यकीय अधिकारी आणि कुशल परिचारिका उपस्थित असतात. तसेच शस्त्रक्रिया कक्ष आणि अतिदक्षता विभागात सर्व प्रकारची अत्याधुनिक उपकरणे, सोयीसुविधा उपलब्ध असतात. आपत्कालीन यंत्रणेसाठी लागणारी साधनसामग्री येथे उपलब्ध असते. सद्यस्थितीत मात्र यांतील ४० ट्रॅामा केअर सेंटर बंद असल्याचे माहिती अधिकाराच्या अंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीमधून समोर आले आहे.

    रस्त्यावर घडणाऱ्या कोणत्याही अपघात अथवा दुर्घटनेनंतर पहिल्या तासाभरात मिळणारे उपचार अत्यंत महत्वाचे मानले जातात. यालाच इंग्रजीत गोल्डन अवर असेही म्हणतात. गोल्डन अवरमध्ये एक-एक सेकंद महत्त्वाचा असतो. या एका तासात अपघातग्रस्ताला योग्य उपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. वाढत्या लोकसंख्येसोबत राज्यात रस्त्यांचे जाळे तयार होऊ लागले आहे. प्रमुख महामार्ग अधिकाधिक गुळगुळीत आणि खड्डेविरहित होऊ लागले आहेत, परिणामी त्यावरून प्रतिदिन जाणाऱ्या गाड्यांचा वेगही वाढला आहे. ज्याचा परिणाम अपघातांच्या वाढतंय संख्येवर होऊ लागला आहे.  याशिवाय चालकाने व्यसन केलेले असणे, चालकाची पुरेशी झोप झालेली नसणे, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटणे, वाहनात बिघाड असणे यांसारखी अनेक कारणे गंभीर अपघातास कारणीभूत ठरू लागली आहेत. वर्ष २०२१ मध्ये राज्यात २१ सहस्त्र २३३ अपघात झाले होते. ज्यामध्ये ९ सहसत्र ८७७ जणांचा मृत्यू झाला होता.  वर्ष २०२२ मध्ये महाराष्ट्रात एकूण २४ सहस्र ५७६ अपघात झाले. त्यांमध्ये ११ सहस्र ३७२ जणांचा मृत्यू झाला.  वर्ष २०२३ मध्ये एकूण २५ सहस्र १३९ अपघात झाले. यांमध्ये ११ सहस्त्र १४५ जणांचा मृत्यू झाला. वर्षागणिक अपघातांची संख्या वाढत आहे तशी अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे.  

           रस्त्यावर घडणाऱ्या अपघातांच्या प्रसंगी अपघातग्रस्तांना लवकरात लवकर उपचार मिळावेत यासाठी अनेकदा जवळच्या रुग्णालयांत भरती केले जाते. ही रुग्णालये खासगी असल्यास अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना लाखो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो. ग्रामीण भागांतील खासगी रुग्णालयांतही  अद्ययावत सुविधा उपलब्ध नसल्याने ही रुग्णालये लाखोंची देयके करून पुढील उपचारासाठी अपघातग्रस्ताला शहरातील रुग्णालयात नेण्याचा सल्ला देतात परिणामी अपघातग्रस्तांची अनाठायी हेळसांड होते. अपघातग्रस्तांना वेळेत आणि अद्यावत  उपचार विनामूल्य अथवा कमीतकमी खर्चात मिळावेत तसेच अपघातामुळे मृत पावणाऱ्यांच्या संख्येवर आळा बसावा यासाठी राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर ११५ ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. प्रथम दर्जाच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये सगळ्या प्रकारच्या अपघातांवर एकाच छताखाली सर्व उपचार अपघातग्रस्तांना मिळतात. या युनिटमध्ये न्यूरोसर्जन, इंटेन्सिव्हिस्ट, जनरल सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, ॲनेस्थेसिस्ट, निवासी वैद्यकीय अधिकारी आणि कुशल परिचारिका उपस्थित असतात. तसेच शस्त्रक्रिया कक्ष आणि अतिदक्षता विभागात सर्व प्रकारची अत्याधुनिक उपकरणे, सोयीसुविधा उपलब्ध असतात. आपत्कालीन यंत्रणेसाठी लागणारी साधनसामग्री येथे उपलब्ध असते. रुग्ण दाखल झाल्यापासून त्याची प्रकृती स्थिर होईपर्यंतची सगळी काळजी या सेंटरमध्ये घेतली जाते. सद्यःस्थितीत मात्र यांतील ४० ट्रॅामा केअर सेंटर बंद असल्याचे माहिती अधिकाराच्या अंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीमधून समोर आले आहे. हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाचे समन्वयक श्री.अभिषेक मुरुकटे यांना माहिती अधिकाराच्या अंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीमधून राज्यातील ट्रॉमा केअर सेंटरची ही केविलवाणी स्थिती उघड झाली आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, रायगड, नंदुरबार, बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील प्रत्येकी १ ट्रॉमा केअर सेंटर बंद आहे. अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, धाराशिव, अहिल्यानगर, धुळे या जिल्ह्यांतील प्रत्येकी २ ट्रॉमा केअर सेंटर बंद आहेत. या व्यतिरिक्त पालघर, पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यांतील प्रत्येकी ३ आणि नाशिक येथील ५ ट्रॉमा केअर सेंटर आज बंद आहेत.

एकीकडे रस्त्यावरील अपघातांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे तर दुसरीकडे राज्याचा आरोग्य विभाग अपघातग्रस्तांचे प्राण वाचवण्याबाबत उदासीन होत असल्याचे या माहितीतून समोर आले आहे. आरोग्य विभागाच्या उदासीनतेमुळे खासगी रुग्णालयांचे फावते आहे. १९९७ साली राज्यात १०८ ट्रामा केअर सेंटर्स उभारण्याची मान्यता देण्यात  आली होती.  प्रत्यक्षात ट्रामा केअर सेंटर बांधण्याचे काम १६ वर्षानंतर म्हणजे २०१३ मध्ये सुरु करण्यात आले. आज ११ वर्षानंतर ११५ पैकी केवळ ७५ ट्रामा केअर सेंटर्स काय्रान्वित आहेत, यावरून आरोग्य विभागाचे टा्रमा केअर सेंटर प्रतीचे गांभीर्य लक्षात येते. राज्यातील महामार्गांलगत सुरु करण्यात आलेल्या ट्रामा केअर सेंटर्सने आजतागायत हजारो अपघातग्रस्तांचे प्राण वाचवले आहेत. ट्रामा सेंटर्सचे महत्व लक्षात घेऊन बंद  पडलेल्या ट्रामा केअर सेंटर्सना संजीवनी देण्याचे काम  येणाऱ्या काळात सरकार करणार आहे का ? - जगन घाणेकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी