मुशाफिरी

  ‘गरीब होतो तेच बरे होतो..पैसा आला आणि घरातल्या घरात एकमेकांचे दुश्मन बनलो'असे वातावरण हल्ली अनेक नवश्रीमंतांच्या घरी आढळून येते. वाडवडिलांनी जपलेल्या जमिनी, विविध महाप्रकल्पांतून संपादित केल्या जाणाऱ्या जमिनी, पूर्वजांनी जपून ठेवलेली स्थावर व जंगम मालमत्ता यातून अचानक रेडिमेड श्रीमंतीचा लाभ झालेल्यांमध्ये सुसंस्कारांचा अभाव व पैशाचे नियोजन नेमके कसे करावे हे सांगणारे कुणी नसल्याने आपल्याला अवतीभवती अनेक कुटुंबांतून फाटाफूट, दुरावा, द्वेष, वैर पाहायला मिळतेय का?

   तसा तिचा जन्म निमशहरी भागातला. वडील खाष्ट स्वभावाचे तर आई प्रेमळ..पण तिच्या वडीलांसमोर काही न चालणारी. आईने मोठ्या प्रेमाने तिचे नाव माया ठेवले. पण वडीलांकडून मात्र ‘माया' अशी तिला काही लाभलीच नाही. शेजारपाजारचे, नात्यातले लोक मात्र तिचे लाड करीत. तिला हवे नको ते पाहात असत. वडील खाष्ट असले तरी  खाण्यापिण्यात मायाला त्यांनी काही उणीव भासू दिली नाही. पण खाणेपिणे सोडल्यास मुलाबाळांना आणखीही काही  बापाने द्यायचे असते हे त्यांच्या गावीही नव्हते. तिच्या आधीच्या दोन भावंडांनी आपल्या बापाचा खाष्टपणा नेमका ताडला होता. इथे काही अपेक्षा करणे व्यर्थ आहे, हे ते पुरेपुर जाणून होते. तिच्या मोठ्या बहीणीचे लग्न बापाने नगाला नग बघून देत उरकून टाकले होते. पण तो संसार जेवढ्यास तेवढा कसाबसा चालला होता.

   मायाला शिकायचे होते. अनेक कलांमधून नाव कमवायचे होते. खेळांमध्ये भाग घ्यायचा होता. पण ‘मुलींनी काय करायचेय पुढे शिकून ?' या विचाराने पछाडलेल्या बापाने तिला शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे शिकवायला नकार दिला व स्थळे बघायला सुरुवात केली. मुलाने..म्हणजे मायाच्या भावाने विरोध करुन पाहिला, ‘अजून थांबू या' म्हणून विनवण्या केल्या; पण काहीच उपयोग झाला नाही. ‘पोरगी म्हणजे पराया धन, ते योग्य वेळी दिलेले बरे' म्हणत त्या खाष्ट बापाने कुठल्याशा सोम्यागोम्याने आणलेले कसलेमसले एका खेड्यातले स्थळ फारशी चौकशी न करताच पक्के केले व मायाचेही लग्न असेच उरकून टाकले. मायाचा नवराही यथातथाच होता, तिच्यापेक्षा वयानेही जास्त होता. आर्थिक सुस्थितीतला पण..तब्येतीला किरकोळ, अबोल, दारुड्या, एकटाएकटाच राहणारा हा नवरा पदरी पडला तसा मायाने पवित्र करुन घेतला. नवरा मात्र व्यसनी असला तरी मायाचे लाड करी. बऱ्याचदा तो दारुच्या नशेतच असे. यथावकाश मायाला दोन मुलगे व एक मुलगी झाली. आपल्या बाबतीत झाले ते मुलांच्या बाबतीत होऊ नये म्हणून माया काळजी घेत असे. त्यांच्या शिक्षणात काही अडू नये म्हणून ती लक्ष देई. मायाचा नवरा मुलांना हवे नको ते बघे, त्यांच्यासाठी भरपूर खर्च करत असे. पण मुलांना शिस्त लावणे, संस्कार करणे, धाकात ठेवणे, चांगल्या गोष्टी शिकवणे, त्यांचे छंद जोपासायला पोषक वातावरण लाभू देणे हे बापानेही करायला हवे हे त्याच्या मानसिकतेत जणू बसतच नव्हते. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. गावंड्या प्रदूषित वातावरणात मायाचे मुलगे लहानाचे मोठे होत असल्याने त्यांचे गाव हेच त्यांचे विश्व बनले, जुनाट, कालबाह्य, टाकाऊ, बुरसटलेल्या विचारांना चिकटून राहणे, गावभर हुंदडणे, शाळा बुडवणे, चकाट्या पिटणे हेच त्यांचे उद्योग बनले. इंग्रजी माध्यमाच्या महागड्या शाळांतले शिक्षण त्यांच्या डोवयावरुन जाऊ लागले. त्याही शाळेत काही वाया गेलेली कारटी असतातच. तसल्यांचे व मायाच्या मुलांचे चांगले जमे. यातूनच त्यांना नको नको ते छंद लागले. शाळकरी जीवनातच त्यांच्या दप्तरात बीयरचे कॅन, गुटख्याच्या पुड्या सापडू लागल्या. मायाच्या नवऱ्याच्या कानावर हे गेल्यावर त्याने मुलांना धोपटून काढले खरे! पण त्या मारण्याझोडण्यात काही अर्थ नव्हता. कारण तो स्वतःच अट्टल दारुबाज असल्याने मुलांना काही सांगण्याची नैतिकताच गमावून बसला होता.

   कसेबसे मायाचे दोन्ही मुलगे एकापाठोपाठ एक करत जेमतेम गुणांनी एसएससी झाले. त्यांना कॉलेजात जायचे होते. पण उच्च शिक्षणासाठी नव्हे; तर मौजमस्ती, रंगबाजी करण्यासाठी, कारण त्या गावंड्यातली बाकीची मुलेही तेच करीत असत. मायाच्या सासरच्या त्या गावात कुणीच चांगला खेळाडू, दहावी-बारावीमधील गुणवंत, चांगला अभिनेता, चांगला कलावंत असे काहीच नव्हते. तरी स्थानिक म्हणून त्यांना ऊतमात मात्र खूप होता. गावातील भाडेकरु, शेजारच्या वसाहतीतील उच्चविद्याविभूषीत अन्य मुले-मुली यांच्याकडे ते उगाचच तुच्छतेने पाहात असत. एकदा मायाच्या एका मुलाने वसाहतीतील एका तरुणीची छेड काढली. त्या मालवणी मुलीने लगेच आरडाओरडा करुन आजूबाजूच्यांना जमवले. त्या सर्वांनी मिळून मायाच्या मुलाला धू धू धुतले. त्याचा एक पाय त्या मारझोडीत फ्रॅक्चर करुन टाकला होता. मायाचा भाऊ, बहीण हे सारे पाहात होते, चिंता व्यक्त करीत होते, तिच्या मुलांना ‘हे फालतू चाळे बंद करा' असे लहानपणापासून सांगत होती. मायाचे आई-वडील अन्य माहेरचे नातलग यांनीही वेळोवेळी समजावले; पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. थोडक्यात मायाचे दोन्ही मुलगे वाया गेले  होते.

   मायाची मुलीची काही वेगळी ष्टोरी नव्हती.  गावातल्या अन्य यथातथा मुलींमध्येच तिचा वावर असल्याने मोठी स्वप्ने पाहायची तिला सवयही नव्हती. मायाने परोपरीने तिला समजावले, चांगली उदाहरणे दिली, आपल्या माहेरच्या अन्य गुणी, करियरिस्ट मुलींचे दाखले दिले; पण काऽऽही उपयोग झाला नाही. कशीबशी ती मुलगी बारावी पर्यंत पोहचली आणि कॉलेजातल्या एका बंगाली छपरी मुलाने तिला  गटवले, त्याच्याशी पळून जात तिने लग्न केले. मायाला मेल्याहून मेल्यासारखे झाले. मायाचा नवरा या घटनेने एकदमच खचून गेला, एकलकाेंडा होताच आधीपासून; त्यात आता हे पाहून अनेक दिवस तो कुणालाच तोंड दाखविनासा झाला. मायाची माहेरची माणसं ही या साऱ्या घटनांनी हादरुन गेली. माया मुलांना प्रेम, शिस्त लावण्यात कमी पडत नव्हती, तर ती एकटी पडत होती, तिला नवऱ्याची वा त्याच्या परिवारातील कुणाची योग्य ती साथ मिळत नव्हती. उलट त्या लोकांना मायाच्या कुटुंबाची अशी स्थिती पाहण्यात आसुरी मौज वाटे. त्यांच्या वागणूकीतून याचा प्रत्यय येत राही. कारण मायाच्या लग्नापासून ती पाहात होती की तिच्या नवऱ्याचे दारुचे व्यसन सुटावे म्हणून तिच्या त्या सासरच्या कुणीही कसलेही प्रयत्न केले नव्हते.

   मायाचे वाया गेलेले मुलगे लग्नायोग्य झाले तरी त्यांना पंचक्रोशीतले कुणी जावई करुन घ्यायला तयार नव्हते. कारण त्यांची ‘किर्ती' सर्वदूर पसरली होती. मुलगी घरातून पळून जाऊन लग्न करुन मोकळी झाली होती. तिचे नावही मायाच्या घरी कुणी घेतलेले चालत नसे. शिवाय दारु पिणारा सासरा अलिकडच्या मुलींना चालत नाही हेही एक कारण होतेच. मग अशाच अडल्या नडल्या घरच्या पोरी सुना म्हणून तिला मिळाल्या. मायाच्या स्वभावाप्रमाणे तिने तरी त्याही सूनांना जीव लागला होता, त्यांचं हवं नको ते बघत होती. तशात मायाच्या नवऱ्याला दारुच्या अतिसेवनामुळे टी.बी.ने गाठले व एका सायंकाळी त्याने शेवटचा श्वास घेतला. कसाही असला तरी त्या नवऱ्याने मायाला कधी दुखावले नव्हते. त्याने तिच्या नावावर भरपूर पैसा अडका बँकेत जमा करुन ठेवला होता, दागदगिने. अन्य मालमत्ता, जमिनजुमलाही थोड्या प्रमाणात ठेवला होता.

   आता मायाने साठी गाठली होती. गुडघे, सांधे कुरकुरु लागले होते. नजर क्षीण होऊ लागली होती. पोटाचे दुखणे तिला हैराण करीत होते. पण त्या घरात सारे असूनही तिचे असे कुणीच नव्हते. दोन्ही मुलगे आपापल्या टारगट मित्रांसोबत मौज करण्यात दिवस घालवीत होते. तर दोन्ही सूना गावातली लग्नं, हळदी, साखरपुडे, इतर छोटेमोठे कार्यक्रम अशा वेळी नट्टापट्टा, छानछौकी, नाचकाम यात आनंद घेत होत्या. मायाच्या प्रकृतीकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नव्हता. त्यांचे लक्ष होते बापाच्या बँक बॅलन्स वर, त्याने जमवून ठेवलेल्या दागिने, जमिनजुमल्याच्या वाटणीवर. ते वेळीअवेळी मायाला ऐकवू लागले की, ‘या साऱ्याची तू काही एकटी मालकीण नाहीस, आम्हीही वाटेकरी आहोत, तुझ्या हयातीतच त्याचे वाटे करुन आमच्या नावावर करुन टाक, नंतर वाद नको' म्हणून! ‘बापाच्या संपत्तीत मुलीला वाटा' म्हणून अशा अवघड प्रसंगीही मायाची ती पळून गेलेली मुलगी आपल्या छपरी नवऱ्याला सोबत आणून आपल्या दिवट्या भावांच्या ‘हो ला हो' करीत मायाशी वाद घालत बसे. माया समजून चुकली की आपले म्हातारपण काही सुरक्षित हातांमध्ये राहिलेले नाही म्हणून! मायाच्या त्या गावात असे सर्रास प्रकार होत असल्याचे ती पाहात होती. अनेकांनी बापाच्या पश्चात आपल्या आईच्या नावावरील मालमत्ता स्वतःच्या नावावर करीत आईला हाकलून दिले होते. तर काहींनी आईची रवानगी थेट गोठ्यातही केल्याचे प्रकार तिच्या पाहण्यात होते. माया दिवसभर याच विचारांत दंग असे. ज्या नवऱ्याकडे पाहून दिवस काढले तो आता या जगात नाही आणि ज्या मुला-सूनांवर भरवसा ठेवून उरलेले आयुष्य जगायचे.. त्यांना आपल्याशी काहीच देणेघेणे नाही, यातून तिला पराकोटीचे नैराश्य आले. एका घातकी क्षणी तिच्या मनाने निर्णय घेतला.

   रात्रीची झोप येत नाही म्हणून माया डॉक्टरांच्या सल्ल्याने झोपेच्या गोळ्या घेत असे. अशाच अनेक दिवसांच्या गोळ्या साठवून तिने एका  रात्री भरपूर गोळ्या घेतल्या व जी झोपली ती कायमचीच. ती तिची चिरनिद्रा ठरली. तिचा निष्प्राण देह पाहुन आतून आनंदलेल्या.. पण वरकरणी, लोकलज्जेस्तव दाखवण्यासाठी मायाच्या मुलांनी, सूनांनी, मुलीने मोठा शोक झाल्याचा देखावा करुन छात्या पिटत रडायला सुरुवात केली. ज्यांनी त्या लोकांची मायाशी असलेली वागणूक पाहिली होती, ते लोक ही सारी नाटकं असल्याचे ओळखून होते. त्यातील अनेकांच्या घरी याहुन काही वेगळी स्थिती नव्हती...!

   तुमच्याही अवतीभवती असे चित्र पाहायला मिळते काय? संगोपन, पालनपोषण, संस्कार यात मागील पिढी कमी पडतेय..की नवीन पिढीतील अनेकांमध्ये मागील पिढीबाबत बेफिकिरी वाढीस लागलीय? - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक : दै. आपलं नवे शहर.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

जालियन वाला बाग : एका रक्तरंजित हत्याकांडाची आठवण - १३ एप्रिल १९१९