मूल समजून घेताना....

घर, कुटुंब हीच मुलाची पाहिली शाळा असते. कुटुंबातील व्यक्ती हेच त्याचे पहिलेवहिले आयडॉल असतात. ‘मी बाबांसारखाच मोठा होणार. फाईल घेऊन हापीसात जाणार.' असं मूल नकळत बोलून जातं. जेव्हा एखाद्या घरात मुलाला पाटावर जेवायला आणि मुलीला जमिनीवर जेवायला बसवतात. तिथे स्त्री पुरूष समानतेचे मूल्य मुलांमध्ये कसे रुजून येणार ? आपल्या मुलाच्या हातात पुस्तक द्यायचं की स्मार्टफोन हे कुटुंबातील सदस्यांनीच ठरवायचे असते. ‘जसे दिसे तसेच मनी ठसे' या उक्तीने मुलं वागतात. तुमच्या हातात पुस्तक दिसलं तर ते पुस्तकच मागणार.

 प्रत्येक लहान मूल म्हणजे खळाळणारा अवखळ झराच. त्याचं हसणं, बोलणं, वागणं...सारंच  निखळ, निर्मळ.. कुठलाही आडपडदा नसलेलं. हेच मूल जसजसं मोठं होतं जातं तसतसं ते मोठ्यांचं अनुकरण करतं. मोठ्यांचे गुणदोष अंगीकारत ते मोठं होत असतं. भोवतालच्या वातावरणाचा प्रभाव त्याच्यावर पडतो. त्या वातावरणाचा अनुकूल प्रतिकूल परिणाम त्याच्या मनावरही होत असतो. त्यातूनच त्यांचा स्वभाव विशेष घडत जातो. मग ही मुलं कधी उत्साही, प्रयत्नशील, हसरी, प्रेमळ तर कधी रागीट किरकिरी, रडकी, चिडखोर होत जातात. जसा भाव तसा स्वभाव.

    मी पाहिलंय, अनुभवलंय..मुलांना गोष्ट सांगितल्यानंतर त्यांचे डोळे कसे अधिक बोलके होतात. लगेच प्रतिक्रिया द्यायला ते कसे उतावीळ होतात. अशावेेळी ते बिचकत,चाचरत नाहीत. उत्स्फूर्तपणे बोलतात. ‘सर भारी होती आजची गोष्ट. एकदम सॉलिड. खूप मज्जा आली. उद्यासुद्धा सांगा बरं नक्की अशीच एक बेस्ट गोष्ट.'  मुलं अधिकारवाणीने गळ घालतात. आणखी मनातलं बरंच काही अगदी घरातलं, दारातलं हक्काने बोलून मोकळी होतात. जर मुलांना आपण सांगितलेली गोष्ट फसली तर इथही मुलं न थांबता, न थकता, ‘सर आजच्या गोष्टीत काहीच मजा नाही आली.  फुसकी होती आजची गोष्ट. असं बिनदिक्कतपणे बोलतात. मला इथं मुलांना गोष्टीत काय आवडतं, काय आवडत नाही याचा खरा अंदाज त्यांच्या मोकळ्या बोलण्यामुळेच बांधता येतो. पण मुलं एवढं स्पष्ट, मनमोकळे बोलतात. कारण त्यांना पुरते ठाऊक असते की, आपले मनमोकळेपणाचे बोलणे सर समजून घेतील. खरंतर,  आपले म्हणणे छानपणे आणि ठामपणे मांडणे अशा मोकळ्या वातावरणातूनच तर मुलं शिकतात आणि घडतातही. मुलांवर असलेला आपला विश्वासच मुलांना आत्मविश्वासाने या जगात वावरायला आधिक बळकटी देतो. पालकांनी मुलांना असा मोकळेपणा दिला की मुलंही मनाने खुली होतात. मग पालकांपासून काहीही न दडवता मनातले भाव सांगून टाकतात. मात्र घरातल्या ताणतणावाने, धाक धपटशाने मुलं मनाचं दार बंद करुन घेतात, हे वेगळं सांगायला नको.

        आजचे बहुतांश पालक आपल्या पाल्यानं घडावं, कशात ना कशात तरी नाव कमवावं, चमकावं म्हणून सतत धडपडत असतात. कुठल्या ना कुठल्या क्लासमध्ये गडगंज फी भरून मुलांची रवानगी करतात. पण अनेकदा पालकांची ही धडपड एकांगी असते. ज्या मुलांकडून ते आपल्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात, त्यात त्या मुलांचा मनापासून सहभाग किती, याचा पुसटसा विचारही पालकांच्या मनाला शिवलेला नसतो. त्यांनी मुलांना गृहीतच धरलेले असते. मुलांना काय हवे, काय नको हे त्यांना कुठले ठाऊक! अशावेळी त्यांच्या धडपडीला यश तरी कसे मिळेल. अनेकदा पालकांनी ठरवलेल्या गोष्टीत मुलांना रस असतोच असे नाही. रसच नाही, मग मेहनत घेऊन यश मिळविण्याचे प्रयत्नही नाही. आवड असेल तर सवड आपोआप निघते.

      मला इथे एक छोटा पण तितकाच आपल्याला अंतर्मुख करणारा प्रसंग सांगावासा वाटतो, रवींद्रनाथ टागोर यांची शांतिनिकेतन शाळा झाडाखाली भरत असे. एकदा टागोरांची शाळा नेहमीसारखी  झाडाखाली सुरु होती. चार पाच मुलं पुस्तकात डोकं खुपसून बसली होती. तर काही मुलं झाडावर चढली होती. काही फुलपाखराच्या मागे हाताचे पंख करुन बागडत होती. जणू ती फुलपाखरंच झाली होती. तेवढ्यात तिथे दोन पालक आले. खेळणाऱ्या मुलांकडे त्यांनी रागाने पाहिले. आणि कपाळाला आठ्या घालत, तार स्वरातच त्यातील एका पालकाने टांगोरांना विचारले, ‘अभ्यास टाळून उनाडक्या करणाऱ्या या मुलांच्या भविष्याची चिंता वाटत नाही का आपल्याला ?'  टागोर म्हणाले,  ‘हो, चिंता वाटतेय ना मला ..! पण या नाचणाऱ्या, बागडणा-या मुलांची नव्हे. तर मला चिंता वाटतेय ते गेला तासभर कसल्याशा अनामिक भीतीने पुस्तकात डोकं खुपसून वाचण्याचं नाटक करणाऱ्या या मुलांची. कारण खेळण्या बागडण्याच्या वयात ती मोठ्या माणसांसारखी वागत आहेत. प्रौढ तर मीसुद्धा अजून झालेलो नाही. मलाही झाडावर चढावंसं वाटतं. भरपूर खेळावसं वाटतं. पाखरांशी बोलावंसं वाटतं.'  मला वाटतं, प्रत्येक जागरुक पालक टागोरांच्या या विचारांशी सहमत होईल.

हल्ली पालक मुलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध वेगवेगळ्या शिकवण्यांध्ये गुंतवून त्यांचं स्वातंत्र्यच जणू हिरावूनच घेतात. त्यांना ती भविष्याची गुंतवणूक वाटते. पण यातूनच रेस सुरु होते आणि जगायचं राहून जातं. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद दिसेनासा होतो . एका मुलाला सुट्टीत आई वही आणून देते. कारण तेवढेच पैसे असतात तिच्याकडे. ती मुलाला, ‘लिही तुला त्यात काय आवडेल ते,' असे स्वातंत्र्यही देते. मग काय जादू घडते, ते माझ्या एका कवितेतून सांगावेसे वाटते,

आईने आणली, मला वही
म्हणाली यात, हवं ते लिही.
 

मग आईवरच लिहिली, एक कविता

वाचतो ती मी, येता जाता


नंतर लिहिली, सशाची कहाणी
आणखी दोन, पावसाची गाणी

कुणाला सुटेना, अवघड गणित
मीच सोडवले, अचूक वहीत

हवेच्या दाबाचा, प्रयोगही लिहिला
ज्यात आला होता, नंबर पहिला

भरपूर विषय, एकाच वहीत
सुचेल तसे, बसलो लिहीत

आई म्हणाली, सारेच यात
वहीचे जणू, अनेक हात

शेवटी घेतली, आईची सही
अहो, सजून गेली, माझी वही.
.....आईच्या एका सहीने मुलाला त्याची वही सजून गेल्यासारखी वाटते. इथेच आई मुलाच्या नात्यातलं निखळ सौंदर्य अधोरेखित होतं.

    आजही अनेक पालकांना शिक्षण म्हणजे केवळ वही, पेन, क्लास, टक्के एवढंच वाटतं. पण शिक्षण म्हणजे केवळ वही, पेन नव्हे तर शिक्षण म्हणजे बुद्धीला सत्याकडे , मनाला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा राजमार्ग आहे, हे एव्हाना लक्षात यायला हवे. शिक्षणातून मुलांचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक समतोल राखला गेला पाहिजे.
   

 मुलांना नेहमीच सतत प्रश्न पडत असतात. कारण मुलांचं जग हे कुतूहलाने व्यापलेले असते. ते प्रश्न विचारून समोरच्याला भंडावून सोडत असतात. अशावेळी अनेक पालकांना मुलांनी प्रश्न विचारणे हीसुद्धा एक डोकेदुखी वाटते. एक तर मुलांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला त्यांच्याकडे वेळ नसतो आणि मुलांच्या प्रश्नांत त्यांना फारसा इंटरेस्टही नसतो. डॉ. अब्दुल कलामांना मुलं जेव्हा नानात-हेची प्रश्न विचारायची तेव्हा ते मुलांचं समाधान होईपर्यंत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे उत्साहाने द्यायचे. कारण ते म्हणायचे प्रत्येक मूल हे संशोधक आहे. कारण संशोधकासारखे मुलांनाच जास्त प्रश्न पडत असतात. हे असेच का ?  ते तसेच का? मला वाटते, आपल्या मुलांकडे बघण्याची आणि त्यांना समजून घेण्याची अशी सकारात्मक दृष्टी आणि वृत्ती असली पुढल्या गोष्टी आणखी सोप्या होऊन जातात.

   घर, कुटुंब हीच मुलाची पाहिली शाळा असते. कुटुंबातील व्यक्ती हेच त्याचे पहिलेवहिले आयडॉल असतात. ‘मी बाबांसारखाच मोठा होणार. फाईल घेऊन हापीसात जाणार...'  असं मूल नकळत बोलून जातं. जेव्हा एखाद्या घरात मुलाला पाटावर जेवायला आणि मुलीला जमिनीवर जेवायला बसवतात. तिथे स्त्री पुरूष समानतेचे मूल्य मुलांमध्ये कसे रुजून येणार ?

      आपल्या मुलाच्या हातात पुस्तक द्यायचं की स्मार्टफोन हे कुटुंबातील सदस्यांनीच ठरवायचे असते. ‘जसे दिसे तसेच मनी ठसे' या उक्तीने मुलं वागतात. तुमच्या हातात पुस्तक दिसलं तर ते पुस्तकच मागणार. तुमच्या हातात स्मार्टफोन दिसला तर ते तुमच्या फोनमध्येच डोकावणार. इतकी साधी गोष्ट आहे ही.

    मला इथे साने गुरुजी आपल्या आईबद्दल जे बोलतात ते फार महत्त्वाचे वाटते. ते म्हणतात, ‘गड्यांनो,माझ्यात जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे. तिने मला काय दिले नाही ?  सारे काही दिले !  प्रेमळपणे बघावयास, प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकविले. मनुष्यावरच नव्हे, तर गाईगुरांवर, फुलापाखरांवर, झाडामाडांवर प्रेम करावयास तिनेच शिकविले. अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे, हे मला तिनेच शिकविले. कोंड्याचा मांडा करुन कसा खावा व दारिद्रयातही स्वत्त्व आणि सत्त्व न गमविता कसे राहावे, हे तिनेच मला शिकविले.' गुरुजींच्या आईच्या या  सहज शिकवणूकीतूनच छोटा श्याम  घडत गेला. पुढे ते साने गुरुजी झाले. ज्यांनी पुढे इतिहास घडवला.


पालक पालक नाते हे अधिक घट्ट, सुदृढ, निकोप आणि तितकेच निरागस राहण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवा. प्रत्येक मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घेऊन जन्माला आले आहे हा विचार मुलांना वाढवताना सतत जागा ठेवायला हवा आणि मुलांची आनंदाची बाग फुलविण्यासाठी आपणही निमित्त व्हायला हवे.
- एकनाथ आव्हाड 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

ट्रामा केअर सेंटर्सप्रतिची उदासिनता अपघातग्रस्तांसाठी जीवघेणी