आठल्येंच्या आठ कथा

एका बैठकीत वाचून होणारा हा कथासंग्रह असून या आठ कथा सन १९९३ ते २०१७ या २४ वर्षाच्या कालावधीत लिहिल्या गेलेल्या असल्या तरी यातील पहिल्या चार कथा नव्वदच्या दशकात लिहिल्या गेलेल्या आहेत. मात्र यातील  कथानक हे सुमारे पन्नास वर्षांपूर्वीच्या मध्यमवर्गीय कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेलं आहे.

 डॉ.श्रीनिवास मेघःश्याम आठल्ये यांचे शिक्षण एम. ए., एम. लिब., (सेट), पीएच. डी असून स्वामी विवेकानंद कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय, डोंबिवली येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत.

लिखाणाची त्यांना पहिल्यापासून आवड. कथा, कविता, विनोदी कथा, एकांकिका इ. प्रकार हाताळले आहेत. अनेक कथा मासिके व दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झाले असून ब-याच कथा पारितोषिकप्राप्त आहेत. गरजवंती' हा कथासंग्रह प्रसिद्ध. काव्य वाचनाच्या कार्यक्रमातून सक्रिय सहभाग. सैलावलेलं आत्मभान, स्वामी विवेकानंद चरित्र आख्यान, गीत शनिमाहात्म्य हे काव्यसंग्रह प्रकाशित. आवाज या दिवाळी अंकात त्यांच्या विनोदी कथांना सलग तीन वर्षे प्रसिद्धी मिळून हॅट्रिक साधली आहे.

स्वलिखित गीतांचे दोन कार्यक्रम ते  सादर करतात. भक्तिगीतगंध व निवडक गीत शनिमाहात्म्य. साई तुझे वंदितो चरण ही कॅसेट व श्री विठ्ठल चालिसा, संत गजानन चालिसा या सीडी प्रसिद्ध. चालिसा हा प्रकार मराठीत त्यांनी सर्वप्रथम आणला. ग्रंथालय आणि माहिती शास्त्र या विषयावर विद्यार्थ्यांसाठी एकूण पाच पुस्तके लिहिली आहेत. नियतकालिकांतून संशोधनात्मक लेखन केलं आहे.

अशाच सन १९९३ ते २०१७ या  २४ वर्षाच्या कालावधीत अनेक नामांकित मराठी नियतकालिकांत पुरस्कारप्राप्त आठ कथा या आठल्येंच्या आठ कथा नामक कथासंग्रहरुपाने नुकतेच प्रथितयश कवयित्री सौ. मुग्धा कुंटे यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आल्या. एका बैठकीत वाचून होणारा हा कथासंग्रह असून या आठ कथा सन १९९३ ते २०१७ या २४ वर्षाच्या कालावधीत लिहिल्या गेलेल्या असल्या तरी यातील पहिल्या चार कथा नव्वदच्या दशकात लिहिल्या गेलेल्या आहेत. मात्र यातील  कथानक हे सुमारे पन्नास वर्षांपूर्वीच्या मध्यमवर्गीय कुटुंबाला केंद्रस्थानी  ठेवून लिहिलेलं आहे. यातील पहिली  व दुसरी कथा भूकेवर आधारित आहे. पोटाची भूक मग ती माणसाची असो वा जनावराची ती भागविण्यासाठी ज्या आशानिराशेचा खेळ जीवनात चालतो तो  नव्या दंगलीकडे....या पहिल्या कथेत पहावयास मिळतो. यात एका वृध्द गिधाडांची भूक व आपल्या गटातील इतर गिधाडांच्या भूकेची काळजी व भविष्य  या कथेत लेखकाने उत्तमरीत्या मांडलेले आहे. दुसरी कथा दोन्ही घरचा पाहुणा या कथेत वडिलांचे छत्र हरपलेल्या श्यामला पोटाची भूक भागविण्यासाठी वार लावून धनिकाघरी जेवण्याची वेळ येते; पण लहान वयात खरं बोला म्हणून शिकवलं जातं.. तिथे खरं बोलून दोन्ही घरचे जेवण त्याला बंद होते.  हा कथेचा शेवट वाचताना डोळ्यांच्या कडा पाणावल्याशिवाय राहत नाही. या कथा संग्रहातील पाचवा महिना व पंधरावी विद्या या दोन कथा अलिकडच्या काळातील आहेत. यात पाचवा महिना पैशाच्या गरजेकरिता सोरोगेट मदर होणाऱ्या शुभाची आहे. ज्या कुटुंबाकरिता ती सोरोगेट मदर होते ते विमान अपघातात मरण पावते. तर पंधरावी विद्या  आजच्या काळात कमावत्या आईबापांच्या पैशावर निर्धास्त राहणाऱ्या मुलांना या कथेतून  बरंच काही शिकण्यासारखं आहे. एकंदरीत यातील इतर कथा  या मध्यमवर्गीय कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या आहेत.  यातून वाचकांना बोधही देण्याचा प्रयत्न डॉ. आठल्यें सरांनी केला आहे.

काचेच्या लोलकावर प्रकाशकिरण पडताच तो सप्तरंगांनी परावर्तित होतो, त्याचप्रमाणे पाहिलेली कुठलीही घटना मनात परावर्तित हाते. शक्यतेच्या शतकल्पनांनी ती उमलून येते. अनुभवाचे वलय त्यांना प्राप्त होते.घटनेच्या पातळीवर अनुभव हे क्षणजीवी असतात. शब्दांत मांडल्यावर ते अमर होतात. कल्पनांचे असे आठ पक्षी अनुभवाच्या पाणवठ्यावर उतरले आहेत,  असे डॉ. आठल्ये सरांनी आपल्या पुस्तकाच्या मनोगतात म्हटले आहे.

लेखक : डॉ. श्रीनिवास आठल्ये मुग्धा प्रकाशन, डोंबिवली
मुखपृष्ठ : श्रद्धा आठल्ये-ठाकूर मूल्य : २००/-
-सौ. मनिषा राजन कडव 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 मद्यविक्रीतील स्त्रियांचा सहभाग कितपत योग्य ?