मद्यविक्रीतील स्त्रियांचा सहभाग कितपत योग्य ?

दारूच्या व्यवसायात स्त्रियांना अधिक रुची का ? दारूचा व्यवसाय हा अल्प श्रमात अधिक उत्पन्न मिळवून देणारा असला, तरी दारूमुळे होणारी अपरिमित हानी स्त्रिया केव्हा लक्षात घेणार? दारूच्या व्यवसायात रुची दाखवण्यामध्ये आज लखनौच्या स्त्रिया आघाडीवर आहेत उद्या हेच लोण राज्यात आणि देशात अन्यत्रही पसरू लागेल. दारूच्या व्यवसायातील स्त्रियांचे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाणे मनाला न पटणारे आहे.  

 नुकताच जागतिक महिला दिन पार पडला. आपल्या कर्तृत्वाने उत्तुंग भरारी घेणाऱ्या स्त्रियांचा या दिवशी गौरव करण्यात आला. यानिमित्ताने भरवण्यात आलेल्या कार्यक्रमांतून आजची स्त्री कशी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशाची विविध शिखरे पादाक्रांत करत आहे याबाबतचा उहापोह करण्यात आला. भारतीय संस्कृतीने स्त्रीला सदैव आदराचे स्थान दिले आहे. स्त्रीला शक्तीस्वरूप मानणारा हिंदू धर्म दुर्जनांचा कर्दनकाळ ठरणाऱ्या कालीमातेच्या उपासनेचे महत्वही तितक्याच प्रखरतेने बिंबवतो. स्त्री आणि पुरुष या दोहोंची शारीरिक रचना आणि क्षमता भिन्न असल्याने विधात्याने दोहोंचे कार्य निश्चित केले आहे  त्यामुळे स्त्री आणि पुरुषांमध्ये श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण हा वाद केवळ निरर्थक आहे. इतिहासात स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टीही कधीही केल्या गेल्या नाहीत. पौराणिक ग्रंथांचा अभ्यास केला असता आपल्या लक्षात येईल की काळाची गरज म्हणून पुरुषानेही प्रसंगी स्वयंपाक्याचे काम केले आहे आणि स्त्रीनेही प्रसंगी तलवार हाती घेऊन युद्धात सहभाग घेतला आहे. त्यामुळे प्रकृतीच्या नियमनामध्ये स्त्री आणि पुरुष दोहोंचे महत्व तितकेच अबाधित आहे.

दारूच्या व्यसनाने आजतागायत अनेकांचे संसार उध्वस्त केले आहेत, अनेकांना कर्जबाजारी केले आहे, तर अनेकांना रस्त्यावर आणले आहे. व्यसनाच्या अधीन झालेल्यांना पत्नी-लेकरे तुच्छ मानायला लावणारी दारू सुखी संसारात विष पेरण्याचे कार्य करते. दारू केवळ तिचे सेवन करणाऱ्याचाच ऱ्हास करत नाही, तर त्या घरातील कुटुंबियांना त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागतो, घरातील लहान मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. दारू पिणाऱ्याकडून नशेत अनेकदा धिंगाणा घातला जात असल्याने त्याचा त्रास शेजारपाजाऱ्यांनाही सहन करावा लागतो. मद्यविक्रीतून दरवर्षी राज्यांना मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असल्याने कोणतेही राज्य सरकार आपल्या राज्यात दारूबंदी करण्यास अनुकूल नसते. तरीही दारूमुळे होणारी सामाजिक हानी लक्षात घेऊन बिहार, गुजरात, मिझोराम, नागालँड, मणिपूर आदी  राज्यांत तर काही राज्यांतील गावांत आणि तालुक्यांत संपूर्ण दारूबंदी करण्यात आली आहे. ही दारूबंदी लागू करण्यात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. आजही अनेक गावांत दारूबंदी करण्यासाठी स्त्रियांनी मोर्चे काढल्याच्या, आंदोलने केल्याच्या बातम्या वाचनात येतात.

 उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये मात्र परिस्थिती अगदी उलट आहे. लखनौ शहरात दारूविक्रीचे व्यवसाय चालवण्यात स्त्रिया अग्रेसर आहेत. नवीन आर्थिक वर्षांमध्ये शहरातील १०४६ दारूच्या दुकानांपैकी ३७० दुकाने महिलांना चालवण्यासाठी देण्यात आली आहेत. येत्या १ एप्रिलपासून शहरातील एक तुतीयांश दारूच्या दुकानांवर दारू विकण्यासाठी महिला दिसून येतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत स्त्रियांनी दारूची दुकाने चालवण्यास घेण्यामध्ये यंदा ७ टाक्यांनी वाढ झाली आहे, पुढील आर्थिक वर्षासाठी सरकारने उपलब्ध केलेल्या मध्यविक्रीच्या एकूण परवान्यांपैकी ३५ टक्के परवाने स्त्रियांनी मिळवले आहेत. कोणतीही विशेष सवलत दिली गेली नसताना गेल्या ५ वर्षांत दारूच्या दुकानांचे परवाने मिळवण्यात स्त्रिया अग्रेसर बनल्या आहेत. सरकारने स्टार्ट अप इंडिया'च्या माध्यमातून तरुणांना व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या संधीचा लाभ घेत अनेकांनी आपल्या गलेलठ्ठ वेतनाच्या नोकऱ्या सोडून नवीनतम व्यवसायात जम बसवला आहे. असे असताना दारूच्या व्यवसायात स्त्रियांना अधिक रुची का ? दारूचा व्यवसाय हा अल्प श्रमात अधिक उत्पन्न मिळवून देणारा असला, तरी दारूमुळे होणारी अपरिमित हानी लखनौ मधील स्त्रिया केव्हा लक्षात घेणार ? दारूच्या व्यवसायात रुची दाखवण्यामध्ये आज लखनौच्या स्त्रिया आघाडीवर आहेत उद्या हेच लोण राज्यात आणि देशात अन्यत्रही पसरू लागेल. दारूच्या व्यवसायातील स्त्रियांचे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाणे मनाला न पटणारे आहे. अर्थात महिलांनी दारूविक्रीचे परवाने नाही घेतले तर पुरुष व्यावसायिक ते घेणारच आहेत; त्यामुळे दारूविक्रीच्या व्यवसायात वाढ व्हायची ती होणारच आहे, हे जरी सत्य असले तरी दारूचे दुष्परिणाम लक्षात घेऊन सरकारला दारूबंदी करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे सामर्थ्य केवळ महिलांमध्ये आहे हेही महिलांनी लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे स्त्रियांनी केवळ व्यावसायिक लाभासाठी दारूविक्रीच्या व्यवसायात उतरण्याऐवजी अन्य व्यवसायांत कौशल्य सिद्ध करून अनेकांच्या संसाराची राखरांगोळी करणाऱ्या दारूवर राज्यात बंदी घालण्यासाठी सक्रिय प्रयत्न करावेत.  - जगन घाणेकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पंचनामा