ईश्वराशी एकनिष्ठ असलेल्यांचा योगक्षेम ईश्वरच चालवतो
बाहेर दिसणाऱ्या जगावर आहे तेवढाच दृढ विश्वास भगवंताच्या अस्तित्वावर असला पाहिजे. हा विश्वास असेल तेव्हाच भगवंताच्या वचनावर विश्वास बसेल. पुराणांमध्ये भगवंताने सांगून ठेवले आहे की मी माझ्या अनन्य भक्तांचा सर्व भार माझ्या डोक्यावर घेईन. भक्तांनी फक्त निरंतर माझे स्मरण ठेवून त्यांची कर्तव्यकर्मे प्रामाणिकपणे करावीत. पण मनुष्याचा स्वतःचा कर्तृत्वावर जास्त विश्वास असतो. त्याला वाटते की फक्त त्याचे प्रयत्न सर्व यशाला कारणीभूत आहेत.
श्रीराम
उपेक्षा कदा रामरूपी असेना।
जिवा मानवा निश्चयो तो वसेना।
शिरी भार वाहेन बोले पुराणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी । श्रीराम ।
रामरूपी म्हणजे भगवंताच्या ठिकाणी किंवा सद्गुरूंच्या ठिकाणी उपेक्षा हा शब्दच नसतो. भगवंत आपल्या भक्ताचा कधीही त्याग करत नाही. त्याच्या बाबतीत हयगय, दुर्लक्ष करीत नाही. त्याला कधीही फसवत नाही. मात्र मनुष्यालाच भगवंतावर पूर्ण विश्वास नसतो. संस्कारांनी, सवयीने तो देव आहे असे मानतो. देवाची पूजा करतो. देवाला नमस्कार करतो. तीर्थयात्रा करतो. वाऱ्या करतो. तरीही ”देव आहेच” आणि तो सतत माझ्यासोबत आहे, माझ्याकडे पाहतो आहे, माझे रक्षण करीत आहे, अशी निःसंशय खात्री त्याला वाटत नाही. किंबहुना असा विचारही माणसाच्या मनात येत नाही. कारण त्याला खरा देव कळलेलाच नसतो. तो मूर्ती आणि प्रतिमा यांनाच देव मानतो. प्रत्येक देवाच्या क्षमता वेगळ्या मानतो. आपल्या मय्रादित बुद्धीप्रमाणे देवालाही मय्राादित समजतो. प्रत्येक देवाकडे भेदभावाने पाहतो. तुमचा देव-आमचा देव, जागृत देव, नवसाला पावणारा देव, कोपणारा देव, अशी देवांना लेबले लावतो. सर्वसामान्य मनुष्य देवाला प्रार्थना करतो, आळवतो ते मुख्यतः प्रापंचिक अडचणी निवारण्यासाठी. आयुष्यातील संकटांना, प्रतिकूल घटनांना घाबरून तो देवाचे अस्तित्व मानत असतो. ‘भवभय हे मुख्य भयच विविध रूपाने माणसासमोर उभे ठाकत असते. आरोग्याची चिंता, धनाची चिंता, मुलाबाळांची चिंता तर कधी नोकरी व्यवसायाची चिंता, शिक्षणातल्या अडचणी, लग्नातल्या अडचणी, नात्यागोत्यातल्या अडचणी, मालमत्तेतल्या अडचणी इ.इ. प्रपंच म्हटला की तो अनंत अडचणी, संकटे, प्रश्न यांनी ग्रासलेलाच असतो. त्या प्रतिकूलतेपासून सुटका हवीशी वाटते. आपले प्रयत्न पुरे पडत नाहीत. यश मिळत नाही. तेव्हा देवाची आठवण होते.
आपल्याला मिळालेला सुदृढ नरदेह हे आपले भाग्य आहे, आपल्याला डोळ्यांनी दिसते,कानांनी ऐकू येते, आपले हात-पाय-बुद्धी धडधाकट आहेत, कार्यक्षम आहेत ही भगवंताची आपल्यावर केवढी कृपा आहे, आपल्याला अन्न-वस्त्र-निवारा प्राप्त आहे ही भगवंताची कृपा आहे, असा विचार सहसा मनात येत नाही. ते गृहीत धरले जाते. पण आयुष्याची घडी जरा विस्कटली की असे कसे झाले, का झाले, मी देवाचे एवढे करूनही देवाने मला का फसवले, वगैरे विचार भराभर मनात गर्दी करतात. अनेक देवांची अनेक स्तोत्रे, प्रार्थना माणसाला पाठ असतात. रोज त्यांचे पठणही तो करत असतो. पण बरेचदा ते यांत्रिक असते. त्यात भाव नसतो. स्तोत्रात म्हटल्याप्रमाणे भगवंत खरोखरच आपल्या मदतीसाठी तत्पर आहे यावर श्रद्धा नसते. त्याचप्रमाणे भगवंताने आपल्या मनाप्रमाणेच सर्व घडवावे, आपल्या मनातील इच्छा लगेच पूर्ण कराव्यात असा आग्रह असतो. त्याप्रमाणे झाले तरच ”देव आहे.” आपली प्रार्थना ऐकली नाही, मनाविरुद्ध घडले तर ”देव नाही”,अशी आपली धारणा होते. ही खरी आस्तिकता नव्हे. ”त्वमेव केवलं कर्ताऽसि। त्वमेव केवलं धर्ताऽसि। त्वमेव केवलं हर्ताऽसि”। असे म्हणताना देवच एक कर्ता-करविता, पालनकर्ता, संहारकर्ता आहे ही दृढ निष्ठा हवी. ”तूच घडविसी, तूच फोडिसी। कुरवाळीसी तू, तूच ताडीसी” जे काही बरे वाईट घडते ते सर्व भगवंत घडवतो ही आढळ श्रद्धा हवी. भगवंतावर प्रेम हवे. आपला जेवढा विश्वास आपल्या स्वतःच्या अस्तित्वावर आहे, बाहेर दिसणाऱ्या जगावर आहे तेवढाच दृढ विश्वास भगवंताच्या अस्तित्वावर असला पाहिजे. हा विश्वास असेल तेव्हाच भगवंताच्या वचनावर विश्वास बसेल. पुराणांमध्ये भगवंताने सांगून ठेवले आहे की मी माझ्या अनन्य भक्तांचा सर्व भार माझ्या डोक्यावर घेईन. भक्तांनी फक्त निरंतर माझे स्मरण ठेवून त्यांची कर्तव्यकर्मे प्रामाणिकपणे करावीत. पण मनुष्याचा स्वतःचा कर्तृत्वावर जास्त विश्वास असतो. त्याला वाटते की फक्त त्याचे प्रयत्न सर्व यशाला कारणीभूत आहेत. पण जीवनातील यश अपयश सुखदुःख हे प्रारब्ध, प्रयत्न आणि परमेश्वराची कृपा यांच्यावर अवलंबून असते. म्हणून तर प्रत्येकाचे आयुष्य वेगळे असते. दिसायला सर्वांकडची साधनसामग्री सारखीच असते; पण प्रत्येकाचे सुखदुःख, यश अपयश, समाधान वेगळे असते. भगवंत दासाभिमानी आहे. त्याला शरण आलेल्या भक्ताची तो कधीही अपेक्षा करत नाही. त्याने वचनच देऊन ठेवले आहे.
अनन्यार्श्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते
तेषां नित्याभियुक्ताना योगक्षेमं वहाम्यहम् (भ.गी. ९-२२)
जे अनन्यभावाने माझे चिंतन करीत मला भजतात त्या मला एकनिष्ठ अशा पुरुषांचा योगक्षेम मी चालवतो. जे अप्राप्त आहे ते प्राप्त करून देतो. जे प्राप्त आहे त्याचे रक्षण करतो. जो कोणी खरोखरच भगवंताला सत्य मानतो, सर्व सत्ताधीश मानतो तो प्रत्येक वस्तूत, प्रत्येक घटनेत भगवंतालाच पाहतो. भगवंताचे देणे किंवा न देणे हे आपल्या कल्याणासाठीच आहे असा भक्ताचा निश्चय असतो. सर्वत्र भगवंताचा अनुभव येत असल्यामुळे तो सर्व भगवंताची मर्जी असे मानून नित्य समाधानात राहतो. कोणाचा द्वेष करीत नाही, कसलेही दुःख मानत नाही. भगवंतानेच सांगितल्याप्रमाणे आपला सर्व भार भगवंतावर सोपवून निश्चिंत, निःशंक होऊन आपली विहित कर्मे करीत राहतो. अशा भक्ताला ”नुपेक्षी कदा राम दासाभिमानी” या वचनाचा साक्षात अनुभव येतो.
। जय जय रघुवीर समर्थ ।
-आसावरी भोईर