नास्तिकांकडून सणवारांना केवळ हिंदूंनाच फुकाचे सल्ले कशापायी?
होळी सण जवळ आला की ‘होळी लहान करा, पोळी दान करा', ‘झाडे वाचवण्यासाठी लाकडांऐवजी कचऱ्याची होळी करा'. गणेशोत्सव काळात ‘गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याऐवजी तिचे दान करा' यासारखे सल्ले देणारे लोक कागदाच्या निर्मितीसाठी दरवर्षी कितीतरी झाडांची कत्तल केली जाते, शहरीकरणाच्या नावाखाली हल्ली सर्रास वृक्षतोड केली जाते यासंदर्भात कधी साधे अवाक्षरही काढत नाहीत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी ही मंडळी दरवर्षी किती वृक्ष लावतात यांची आकडेवारी सांगत नाहीत. हिंदूंच्या सण उत्सवातील प्रथा परंपरांना आणि धर्मशास्त्रीय विधींना अंधश्रद्धेचे लेबल चिकटवून त्यावर आपली बुद्धी पाजळणारी मंडळी अन्यधर्मियांच्या सणांच्या वेळी मात्र मूग गिळून गप्प असतात.
भारताला प्राचीन सनातन संस्कृतीचा वारसा लाभल्याने आणि या संस्कृतीच्या खुणा आजही देशाच्या अनेक भागांत पाहायला मिळत असल्याने ही संस्कृती जवळून पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी विदेशातून हजारो पर्यटक दरवर्षी भारतात येत असतात. भारत ही देवतांच्या अवतारांची आणि अध्यात्माची शिकवण देणाऱ्या साधुसंतांची भूमी असल्याने येथे सश्रद्ध समाज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. हिंदू धर्मात येणारे विविध सण आणि धार्मिक उत्सव यांच्या निमित्ताने सश्रद्ध समाज आपापसांतील मतभेद विसरून ते एकदिलाने साजरे करतो. भगवंताच्या प्रेमाची पाखरण करणारे हे सण आणि उत्सव कसे साजरे करावेत याविषयी आपल्या ऋषी मुनींनी सविस्तरपणे लिखाण केले आहे. सणांमागे जशी पौराणिक कथेची पार्श्वभूमी आहे, तसा मानवाच्या संर्वांगीण विकासाचा व्यापक दृष्टिकोनही आहे. त्यामुळे आजही ते साजरे करताना हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. समाजात जसा सश्रद्ध वर्ग मोठ्या प्रमाणात आहे तसा स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारा नास्तिक वर्गही आहे. हा वर्ग सश्रद्ध वर्गाचा बुद्धीभेद करण्याची, त्यांना धार्मिक गोष्टींपासून परावृत्त करण्याची नेहमीच संधी शोधत असतो.
होळी सण जवळ आला की ‘होळी लहान करा, पोळी दान करा', ‘झाडे वाचवण्यासाठी लाकडांऐवजी कचऱ्याची होळी करा'. गणेशोत्सव काळात ‘गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याऐवजी तिचे दान करा', यासारखे सल्ले या मंडळींकडून वृत्तपत्रांतून, चर्चासत्रांतून आणि मुलाखतींतून दिले जातात. मुळात होळीकरीता जाळावयाची लाकडे ही सुकी असावीत असे शास्त्रातही नमूद केलेले आहे त्यामुळे त्यातून पर्यावरणाला कोणताही धोका संभवत नाही. कागदाच्या निर्मितीसाठी दरवर्षी कितीतरी झाडांची कत्तल केली जाते, शहरीकरणाच्या नावाखाली हल्ली सर्रास वृक्षतोड केली जाते यासंदर्भात ही मंडळी कधी साधे अवाक्षरही काढत नाहीत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी ही मंडळी दरवर्षी किती वृक्ष लावतात यांची आकडेवारी कधी सांगत नाहीत. त्यामुळे केवळ होळीच्या निमित्ताने यांना येणारा पर्यावरणाचा पुळका संशयास्पद आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. होळी हा एक धार्मिक सण आहे. होलिका नावाच्या राक्षसीणीला भस्मसात करणाऱ्या अग्निदेवतेचे यावेळी पूजन केले जाते. त्यासाठी कचरा जाळण्याचा सल्ला देणाऱ्यांच्या बुद्धीची किव करावी तेव्हढी थोडीच आहे. कचरा जाळण्याचा सल्ला देणारी ही मंडळी रस्त्यावर कचरा होऊ नये किंवा गोळा होणाऱ्या कचऱ्याची वेळच्या वेळी विल्हेवाट लावली जावी यासाठी कधी काही प्रयत्न करतात का? कचरा गोळा होताच क्षणी जाळावा त्यासाठी होळीची कशाला वाट पाहावी ?
मुळात नास्तिक प्रवृत्तीची ही मंडळी श्री गणेशमूर्ती विसर्जननाने प्रदूषण होते सांगून गणेश मूर्तींचे दान घेतात आणि याच मुर्त्या खाणी बुजवण्यासाठी वापरतात याबाबतच्या बातम्याही मध्यंतरी प्रसिद्ध झाल्या होत्या. ज्या देवतेला वाजतगाजत आपण आपल्या घरी आणतो. गणेश उत्सव काळात तिचे मनोभावे पूजन करतो, त्याच मूर्तीची होणारी अवहेलना आपण कशी काय पाहू शकतो ? महाशिवरात्री जवळ आली की ‘दूध शिवपिंडीवर वाहून वाया घालवण्यापेक्षा एखाद्या गरिबाला द्या' अशा आशयाचे संदेश या मंडळींकडून सामाजिक माध्यमांमध्ये पसरवले जातात. व्याख्यानांतून सुद्धा हेच विषय मांडले जातात. खरेतर शिवलिंगावर अर्पण केलेले दूध कोणत्याही शिव मंदिरात असेच वाया न घालवता ते भाविकांना तीर्थ स्वरूपात वाटले जाते. शिवलिंगावर अर्पण केलेल्या दुधाचे तीर्थात रूपांतर झाल्यावर शिवलिंगाच्या चैतन्यामुळे त्याच्या चवीत होणारा आमूलाग्र बदल प्रत्येक शिवभक्ताने अनुभवलेला असतो. नास्तिक मंडळीना मात्र हे सहन होत नसल्याने सामान्य शिवभक्तांचा बुद्धिभेद करण्यासाठी या दरम्यान दूध दान करण्याचे संदेश बनवून सामाजिक प्रसारमाध्यमांतून पाठवले जातात. हिंदूंच्या सण उत्सवातील प्रथा परंपरांना आणि धर्मशास्त्रीय विधींना अंधश्रद्धेचे लेबल चिकटवून त्यावर आपली बुद्धी पाजळणारी ही मंडळी अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी मात्र मूग गिळून गप्प असतात. दूध दराच्या मागणीसाठी राज्यभर उभारण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांकडून लक्षावधी लिटर दूध ओतून वाया घालवले जाते तेव्हा मात्र यांच्यापैकी कुणीच त्यांना सल्ले देताना आढळत नाही. त्यामुळे या मंडळींनी केवळ हिंदूंचे सण-उत्सव जवळ आले की असले फुकाचे सल्ले देऊ नयेत. - जगन घाणेकर