आणि आख्या महाराष्ट्रास आठवते फक्त चौथी इतिहासाचे पुस्तक!  

हे लहान पुस्तक पुढे जाऊन महान पोरं घडवत आहे. गोष्ट छोटी मात्र डोंगराएवढी कामगिरी करत अनेक पिढ्या आपल्या जीवनात अफजल, शाहिस्ता, जयसिंग, औरंगजेब, करतलाब खानरुपी संकटांवर गरुड होत, आरूढ कसे व्हावे, यांचे भारुड शिकवत ,आपल्या जीवनाची पंढरी करण्याचं भाग्य हया ग्रंथास लाभलं आहे. सर्व घरात हा अमूल्य ठेवा, असावा, रहावा.

       आठवांचा आठव हा काही आगळा वेगळा असतो, तो दाटून येतो, तसा आटून न जाता, माणसं फाटून जातील इतका हुंदका देऊन आपणास एक आठवणीची सय येऊन जाते आणि मन मग आपले गाणे गात राहते.

    रम्य ते बालपण असे जरी म्हटले तरी मराठी माणूस हा अक्षर निरक्षर अगर साक्षर असला तरी त्यांचा चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात खूप बेधुंद आठवणीचा मोरपिसारा असतो. म्हणूनच ते पुस्तक गीतारहस्य, बायबल आणि कुराण पेक्षाही जीवनाचे रामायण तर संचीतांचं महाभारत वाटते, इतकं त्यात, छत्रपती शिवाजी महाराजरुपी भागवत त्यात ओतप्रोत भरलं आहे.

   मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंत जे काही सर्व सारं सर्वस्व आठवते त्यात चित्र, त्यांचा रंग, नकाशे, सनावळ्या, शाहजी महाराज यांची प्रतिमा, सर्व तत्कालीन संत चित्रं, आईसाहेब जिजाऊ, शिवराय आणि महाराज हे रायरेश्वरवर स्वराज्य स्थापन व्हावे म्हणून शिवपिंडीवर अभिषेक करत असताना, मावळ्यांसोबत असलेला चित्र मेळा, त्यात पुन्हा त्या काळातील शस्त्र, प्रतिमा, फोटो, अफजल खान वध प्रकरण फोटो, शाहिस्तेखान, शनिवार वाडा आणि किल्ले पुरंदर, तह आणि भेट, आग्रा भेट आणि महाराज यांचा राज्याभिषेक, दक्षिण दिग्विजय, महाराज यांचे निर्वाण आणि बाजूस त्यांच्या देहासोबत असणारी समई असे एक ना अनेक चित्र प्रसंग व्यापून सर्व मराठी तरुणांना मोहित, संमोहित आणि प्रभावित करणारं एकमेव पुस्तक म्हणजे चौथी वर्गांचे इतिहासाचं पुस्तक आहे.

    तुम्ही मराठी आहात, मराठी माती आणि नाती सोबत नाळ जोडलेली आहे, तर तुम्हास निदान महाराज, सहयाद्री आणि किल्ले हे आठवण ठेवणे गरजेचे आहे. हे सर्व काही स्फुरण स्फुरण्यासाठी चौथी वर्गाचं इतिहास पुस्तव, हे पुरून उरत असतें. तुम्ही जर हे पुस्तक वाचलं तर मला नाही वाटत तुम्ही चारी धाम, अष्टविनायक, बारा ज्योित्लिंग, जेरुसलेम आणि मक्का मदिनाला गेलं पाहिजे. फक्त रायगड किल्ला बघितला तरी महाराष्ट्रात जन्मास आलात म्हणून स्वतःला भाग्य मिळालं हे समजून मरण जवळ पत्करलं पाहिजे. शिवराय हे घराघरात आणि सर्व मनामनात जाण्यासाठी, ऊर्जा स्त्रोत निर्माण करण्यासाठी शिव चरित्र हे उद्यासाठी जणू काही भारतीय विश्व कोश मधील एक मोरपिस दुमडून ठेवावी असे पुस्तक आहे. अर्थात मराठी माणसास जे काही तीन वेड आहेत, त्यात पुस्तक वेडापर्यंत  नेण्यासाठी महाराष्ट्र शासन पुरस्कृत वरील इतिहास पुस्तक एक परीसस्पर्श ठरला आहे.

   हे ते पुस्तक आहे, जो हे पुस्तक वाचेल, त्यांचं शिकलेले मस्तक कुणाचेच हस्तक होणार नाही, नको त्या ठिकाणी झुकणार नाही, कारण हे पुस्तक मुलांनी झोपून नाहीतर झोकून काम केलं तरच आपले भवितव्य हे भविष्यात राज करू शकेल, त्यासाठी टॉनिक आहे. चौथी म्हणजे एकूण वय फक्त नऊ ते दहा वर्ष, मात्र याच वयात मुलांना मोडता, घडता आणि मढविता येते. या वयात संस्कार हा एक संकर बनून लोकांना संघर्ष करून का असेना, सुखाचे घास खाण्यास मदत करत असतो.

     जी माणसं वेडी असतात, तीच इतिहास घडवतात आणि मग शहाणी माणसे तो इतिहास वाचत असतात. तसेच इतिहास वाचणारे हजारो असतात, लिहणारे शेकडो असतात; मात्र इतिहास घडवणारा हा एकच असतो आणि तो असतो तो शिवाजी महाराज यांच्या रूपात बाल संस्कार करत, सर्वत्र दरवळत असतो. अशी माणसं, अशी मस्तके आणि असेच पवित्र मने घडवण्यासाठी इयत्ता चौथीचे पुस्तक हे फार मोठी भूमिका पार पाडत, एक रहस्य बनून विराजले आहे.

    हे लहान पुस्तक पुढे जाऊन महान पोरं घडवत आहे. गोष्ट छोटी मात्र डोंगराएवढी कामगिरी करत अनेक पिढ्या आपल्या जीवनात अफजल, शाहिस्ता, जयसिंग, औरंगजेब, करतलाब खानरुपी संकटांवर गरुड होत, आरूढ कसे व्हावे, यांचे भारुड शिकवत ,आपल्या जीवनाची पंढरी करण्याचं भाग्य हया ग्रंथास लाभलं आहे. सर्व घरात हा अमूल्य ठेवा, असावा, रहावा आणि पाहुणे आले तेव्हा लोकांना ते  बघण्याची संधी उपलब्ध असावी, म्हणून तुमच्या घरात हे पुस्तक नसलं म्हणजे...तुमचं घर म्हणजे घरघर लागलेलं घर होय. -प्रा रवींद्र पाटील. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पवार-शिंदेंसाठी भाजपचे धडे...!