मुशाफिरी

 जो येतोय तो राममंदिर, रामलल्ला, रामाचा आहार याबद्दल बोलतोय..मला काहीच उलगडा होईना! तेवढ्यात धापकन माझ्या छातीवर येऊन काहीतरी आदळले आणि फुटले. माझे कपडे ओले झाले. कुणा वात्रटाने रस्त्यावरुन पाणी-रंगाने भरुन फेकलेला फुगा खिडकीतून माझ्या अंगावर येऊन फुटला होता. माझी निद्रा भंग पावली. माझे डोळे खाडकन उघडले. म्हणजे हे सारे नेते लोक माझ्या स्वप्नात येऊन गप्पा मारुन गेले होते तर!

    माघी पौर्णिमा अर्थात हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होलिकोत्सव-होळी येत्या २४ तारखेस व त्याच्या दुसऱ्या दिवशी धुळवड हे जणू राष्ट्रीय सण असल्यासारखे येऊ घातले आहेत. यंदा निवडणूक आचारसंहितेचा अंमल नेमका याच काळात सुरु झाल्याने राजकीय मंडळी ‘होरी खेले रघुविरा अवध मे' कशी साजरी करतील या कडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. ‘शोेले' तील गब्बरसिंग जसा ‘कब है होली?' असे विचारुन घेतो तसे अनेकांनी या होळीचा अंदाज घेतला आहे.

   लालू यादव ऐन फॉर्मात असताना होळीला ते ढोलक वाजवत रंगबाजी करतानाच्या बातम्या राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरुन त्या काळात हमखास दाखवल्या जात. जोडीला ‘रंग बरसे' या  अमिताभ-रेखा-संजीवकुमार-जया यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्याची जोड असे. अशाच दूरचित्रवाणीवरील बातम्या पाहताना व सोबतीने वर्तमानपत्रांचे मथळे वाचनाना मध्येच डोळा लागला. नि समोर पाहतो तर काय?  समोर चवक ‘एमआयएम' वाले अकबरुद्दीन ओवैसी उभे होते. ते शुध्द मराठीत मला म्हणत होते...‘अहो धर्म बिर्म वगैरे काहीच नसतं. आपण सारेच एकच आहोत. मला होळी खेळायला व पुरणपोळी खायला खूप आवडते. मी रामनवमीचाही उपवास धरतो. त्या दिवशी मी साबुदाणा खिचडीही खात नाही. मोदीजी जसे नवरात्रीत केवळ कोमट पाणी पिऊन राहतात तसे मी केवळ जलपानावर रामनवमी साजरी करतो.  मी मथुरेला आणि द्वारकेला जाऊन श्रीकृष्ण जन्माष्टमीसुध्दा साजरी करणार आहे.'

   हे ऐकून मी चाट पडलो नि सुर्य कोणत्या दिशेला उगवला हे पाहण्यासाठी बाहेर येऊन पूर्वेकडे नजर टाकली तर तो तिथे दिसेना. मग मी पश्चिमेकडे मान फिरवली तर तो तिथेही नव्हता. मग डोक्यावर पाहिले तर तो रागाने माझ्याकडेच पाहात आग ओकत होता. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, जातोय ओवैसी मथुरा-द्वारकेला तर जाऊदे; तेथील बंदोबस्तावरचे सुरक्षाकर्मी काय घ्यायची ती काळजी घेतील म्हणत मी घरात आलो. तर मला खांदे धरुन सुषमा अंधारे गदागदा हलवीत होत्या. मी म्हटले, ‘काय झाले?' तर त्या म्हणाल्या ‘अहो झोपा काय काढताय? होळी आलीय, धुळवड येतेय. चौकाचौकात पताके लावा. मंदिरे सजवा, देवळे धुवुन काढा, महाआरत्या करा.' मी म्हणालो, पण तुम्ही तर ‘आई बसलीय' म्हणत नवरात्रीत देवीचे उपवास धरणाऱ्यांची टिंगलटवाळी करीत होता. पताकेबाजी करायला लावणाऱ्या ठाकरे परिवारावर शेलक्या शब्दात बरसत होता.' तर अंधारे बाई म्हणाल्या ‘अहो, तो इतिहास झाला. राजकारण वेगळं असतं. तिथे कालचं आज नसतं आणि आजचं उद्या नसेल!  आता मी जाते की नाही वेगवेगळ्या देवळांतून पूजाअर्चा करायला? आता मी धरते की नाही महाआरतीचे ताट आणि त्याचे व्हिडिओ करते ना शेअर समाजमाध्यमांवर?' हा खुलासा ऐकून मी चाट पडलो आणि पुन्हा डोळे मिटले.  

...तेवढ्यात माझ्या कुशीत कुणीतरी कोपरानं ढोसलं. मी मान वरुन बघतोय तर पुष्पेंदु कुलश्रेष्ठ आणि संबित पात्रा दोघेही माझ्या जवळ येऊन उभे होते. ‘या देशावर सगळ्यांचा हवक आहे. अन्य देशांतून इथे आलेले पण आपलेच आहेत. त्यांना आपण आपलेच समजून प्रेमानेच वागवणार आहोत. देशाच्या फाळणीनंतरसुध्दा जे लोक हिंदुस्थानातच राहिले त्यांनी या देशाच्या प्रगतीत फार मोठे योगदान दिले आहे.'

   दोघेही एकदमच बोलत होते. मी थोडेसे चाचरतच विचारले, ‘पण तुम्ही तर च्यानेलांवरुन ‘त्या' लोकांच्या विरोधात नुसती आग ओकत असता, त्याचं काय?'  

   ‘ते बोलण्यापुरतंच असतं हो! आम्हाला बोलावं लागतं. बोलणं वेगळं आणि प्रत्यक्ष वागणं वेगळं. तुम्ही गल्लत करु नका. आता हेच पाहाना.. थेट सुनिल दत्तांपासून किशोर कुमारांपर्यंत अनेक मान्यवरांनी ‘त्यांच्या' समाजातील महिला विवाहासाठी निवडल्या. तर संवाद लेखक सलिम खान, अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री वहिदा रहमान, मुमताज, कतरीना कैफ अशा अनेकांनी आयुष्याचे जोडीदार  येथील बहुसंख्यांकांतून निवडून घेतले. आमचे त्यांच्यावर कोणतेही आक्षेप नाहीत. या देशाचे खाऊन पिऊन याच देशाशी नमकहरामी करु नका, पाकडे सामन्यात जिंकल्यावर फटाकेबाजी करु नका. तिरंग्याचा अपमान करु नका एवढाच आमचा खंबीर आग्रह असतो.' त्यांच्या या स्पष्टीकरणावर माझ्याकडे कोणते उत्तर नव्हते. मी त्यांच्या उत्तराने समाधान झाल्यासारखे दाखवीत डोळे मिटले. तेवढ्यात निखिल वागळेंचा आवाज आला. ते म्हणाले ‘अहो, लोकशाहीचा पंचवार्षिक उत्सव जवळ आलाय आणि तुम्ही डोळे मिटून काय इथे बसलात? रामाचे नाव घ्या नि प्रचाराला लागा. कृष्णाकडे आशीर्वाद मागा. तिसऱ्यांदा मोदी जिंकलेच पाहिजेत. नाहीतर कैलासपति शंकर आपला तिसरा डोळा उघडील नि मग सारे भारी पडेल.' अरे बापरे! मी पार गोंधळून गेलो. आयुष्यभर ज्यांनी ज्यांना विरोध केला ती सारी मंडळी आज उलटच काहीतरी बोलत होती. की माझीच समजण्यात काहीतरी चूक होत होती?  मी स्वतःलाच चिमटा काढून पाहिला. तर कळ आली. म्हणजे त्यांचे बरोबर असावे. मी वागळेंना म्हणालो, ‘अहो, तुमच्या निर्भय बनो सभेला उधळण्याचे काम ज्यांनी करायची व्यवस्था केली होती त्यांची भलावण तुम्ही का बरे करता?' तर वागळे म्हणाले, तुम्ही सांगताय त्यात अर्धसत्य आहे. तशा माझ्या सभा तर पूर्वीच्या न फुटलेल्या शिवसेनेनेही उधळल्या आहेत. माझ्यावर त्यांनी हल्लेही केले आहेत. शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात तर मला अटक करुन तुरुंगातही टाकले होते. मी कुठे ते वैर मनात जपून ठेवले?  आता मी त्यांच्या आघाडीसाठी आग्रह धरतो आहेच की नाही? आणि देव धर्म काय या उजव्यांचीच मक्तेदारी आहे की काय? मीही लोकसभा निवडणूकींनंतर रामलल्लाच्या दर्शनाला अयोध्येला जाणार आहे. बोला जय श्रीराम !' हे ऐकून मी चाट पडलो आणि आश्चर्याने माझा उघडलेला जबडा बराच काळ उघडाच राहिला असावा.  

   तेवढ्यात कुणीतरी माझ्या खांद्यांना धरुन हलवले. तेंव्हा कुठे माझे उघडलेले तोंड मिटले. पाहतो तर काय? जितेंद्र आव्हाड येऊन पोहचले होते. तेही मला म्हणाले, ‘जय श्रीराम!' मी ते ऐकून चकित झालो आणि काही क्षण गेल्यावर मीही उत्तरादाखल म्हणालो, ‘जय श्रीराम!' मग काहीतरी विचारायला हवे म्हणून मी विचारले, ‘काय हो आव्हाडजी, तुमचा राम म्हणे मांसाहारी होता. कोणत्या प्रकारचे मासे रामलल्लाच्या सेवनात येत ते काही सांगू शकता काय?' तर यावर आव्हाडच मला उलट विचारते झाले..‘प्रभू राम कळवा नावयावर राहात होते काय? ते कशा प्रकारचे मांसाहारी होते ते मला माहित नाही; पण ते मांसाहारी होते एवढे मी ठामपणे सांगू शकतो.' मी म्हटले, तुम्ही काहीच ठामपणे सांगत नाही आहात. पण एवढे तरी सांगा की पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यावर तुम्हीही अजित पवारांसोबत जाणार होता अशा चर्चा होत्या. तुमच्या ठाणेकर मुख्यमंत्र्यांचे सरकार या महिन्यात पडेल, त्या महिन्यात पडेल अशा तारखा तुमचे आघाडीवाले सारखे देत होते, त्याचे काय झाले? आता तर निवडणूकांचा कार्यक्रमच जाहीर झाला आहे. आता दोन महिने तरी काही विशेष होणार  नाही. यावर काय म्हणाल?' त्यावर त्यांनी आकाशाकडे हात जोडले. मग कानाच्या पाळीला हात लावले आणि म्हणाले,  ‘जय श्रीराम!' मला काहीच समजेना, मी अजागळासारखा त्यांच्याकडे पाहात राहिलो. तेवढ्यात कविता ऐकू आली..

खाली पिली खाली पिली मुझे रोकनेका नय

मेरा सिट मुजसे छिननेका नय

सरकार किस्का भी हो मेरा पद कायम हय

सामाजिक न्याय राज्यमंत्री पद मेराच.. दुसरा किस्का नय

मय सोनिया राहुल मोदी सबपे कविता करता हय

राम मंदिर बन गया बोलो रामलल्ला की जय

   जो येतोय तो राममंदिर, रामलल्ला, रामाचा आहार याबद्दल बोलतोय..मला काहीच उलगडा होईना! तेवढ्यात धापकन माझ्या छातीवर येऊन काहीतरी आदळले आणि फुटले. माझे कपडे ओले झाले. कुणा तरी वात्रटाने रस्त्यावरुन पाणी-रंगाने भरुन फेकलेला फुगा खिडकीतून थेट माझ्या अंगावर येऊन फुटला होता. माझी निद्रा भंग पावली. माझे डोळे  खाडकन उघडले. म्हणजे हे सारे नेते लोक माझ्या स्वप्नात येऊन गप्पा मारुन गेले होते तर! ‘होरी खेले रघुविरा'वाल्या रामाप्रमाणेच कृष्णाच्या ‘खेळताना रंग बाई होळीचा'  अशी ख्याती असलेल्या होळी-धुळवडीची ही वातावरणनिर्मिती  होती तर.. !  ‘बुरा न मानो होली है' म्हणत मीही मग रंगाने माखलेले कपडे बदलण्यासाठी बाथरुमकडे धाव घेतली.

- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर,

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

नास्तिकांकडून सणवारांना केवळ हिंदूंनाच फुकाचे सल्ले कशापायी?