भाविक आणि पर्यटकांना खुणावणारे श्री क्षेत्र जेजुरी

महाराष्ट्रातील लाखो श्रद्धावानांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडोबा देवस्थानच्या जेजुरी नगरीस भेट देण्याचा योग आला. यंदाच्या महाशिवरात्रीनिमित्त जेजुरी गडावर जाण्याचा बेत महिनाभरापूर्वीच आखला होता. गडावरील ऐतिहासिक व पुरातन असलेले शिवमंदिर वर्षातून केवळ महाशिवरात्रीनिमित्त भाविकांसाठी खुले केले जाते. हेच निमित्त साधून यंदाच्या शिवरात्रीला श्री खंडोबाचे देशन घेतले.

यावेळी प्रथमच गर्भगृहातील शिवपिंडीचे दर्शनदेखील घेता आले. जेजुरीच्या खंडेरायाची महती आज सर्वदूर पसरलेली आहे. जेजुरी हे वीरांचे दैवत व महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. आमच्या कुटुंबाचेदेखील कुलदैवत खंडोबा असल्याने दरवर्षी श्री क्षेत्र जेजुरी येथे कुटुंबासह जाण्याचा योग येतो. मात्र गेल्या चार पाच वर्षांपासून कोविड कालखंडानंतर दर्शनासाठी जाता आले नाही. यंदा महाशिवरात्रीच्या दिवशी शुक्रवारी सकाळी ठाण्यावरून मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस पकडून सहकुटुंब जेजुरीला दुपारी दोनच्या सुमारास पोहोचलो. जेजुरी स्थानक आता पूर्वीपेक्षा अत्यंत सुंदर व जेजुरगडाची छबी असलेले बनवण्यात आले आहे. पूर्वी येथून येण्याजाण्यासाठी एकच फलाट होता. त्यामुळे एकावेळी दोन ट्रेन आल्यास दुसऱ्या बाजूच्या गाडीतील प्रवाशांना सरळ रेल्वेपटरीवरच उतरावे लागायचे. मी व इतर अनेक प्रवाशांनी दर वेळेस अनेकदा या ठिकाणी आल्यानंतर जेजुरीच्या रेल्वे स्टेशन मास्तरकडे याबाबत तक्रार केलेली आहे. मात्र आता दोन्ही बाजूला फलाट, त्यावर शेड, बसायला बाकडे व फलाटाची लांबीदेखील वाढवण्यात आली आहे. जेजुरगडाला असलेल्या प्रवेशद्वारासारखे हुबेहूब मुख्य द्वार स्थानकाला बनवण्यात आल्याने रेल्वे स्थानकापासूनच खंडेरायाच्या नगरीत आल्याचा फील येतो.

रेल्वे स्टेशनवरून जेजूरी गावाचे अंतर एक ते दीड किलोमीटर असून नाममात्र भाड्यात प्रवाशी रिक्षांची चांगली सोय त्यासाठी उपलब्ध आहे. गावात जेजुरी गडाच्या पायथ्याशी मुक्काम करायचा असल्यास अनेक छोटी हॉटेल्स उपलब्ध असून माफक दरात येथे निवासाची सोय उपलब्ध आहे. संस्थानचे भक्त निवासदेखील उपलब्ध आहे. आम्हीदेखील एका पायथ्याशी एका हॉटेलमध्ये रूम घेतली. दुपारचे जेवण वगैरे उरकल्यावर थोडी विश्रांती घेतली व साडेपाचच्या सुमारास गड चढायला लागलो. जेजुरीचा गड चढण्यासाठी मोठमोठ्या दगडाच्या पायऱ्या थोडया धोकादायक असल्या तरी त्यांना पौराणिक पार्श्वभूमी असल्याने व अनेक भक्तगण सोबत प्रवास करत असल्याने काही अडचण जाणवत नाही. गड चढताना काही ठिकाणी बसायलादेखील जागा असल्याने दमल्यावर थोडे बसता येते. माझी चार वर्षाची मुलगीदेखील उत्साहात एका दमात पायऱ्यांवरून आमच्यासोबत गड चढली. वयोवृद्ध, दिव्यांग, शारीरिकदृष्ट्या असमर्थ असलेल्यांसाठी या ठिकाणी सशुल्क डोलीची व्यवस्थादेखील आहे. साधारणतः २०-२५ मिनिटांत आम्ही गडावर पोहोचलो. महाशिवरात्री असल्याने गडावर उत्सवाचे वातावरण होते. तिथे पोहोचल्यावर जेजुरी संस्थांनचे विश्वस्त व आमचे परिचित प्रा डॉ राजेंद्र खेडेकर यांची भेट झाली. त्यांनी आमचे स्वागत करत विश्वस्त अनिल सौंदाळे, ॲड. पांडुरंग थोरवे व इतर विश्वस्त मंडळाची ओळख करून दिली. डॉ खेडेकर हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून टीव्ही मालिकांतील सुप्रसिद्ध कलावंतदेखील आहेत. त्यांची दोन्ही मुलेदेखील टीव्ही मालिकांमध्ये कलाकार म्हणून काम करत असून त्यातून मिळणारा मोबदला हे कुटुंब धार्मिक व सामाजिक कार्यासाठी वापरत आहेत. जेजुरी संस्थानचे विश्वस्त म्हणून ते सध्या काम पाहत आहेत. यावेळी त्यांनी श्री खंडेरायाची सुरेख प्रतिमा आणि संस्थानची दिनदर्शिका भेट दिली. सायंकाळच्या वेळी फारशी गर्दी नसल्याने श्री खंडेरायाचे आणि गर्भगृहातील शिवलिंगाचे व्यवस्थित दर्शन झाले.

जेजुरगड ८ व्या शतकात बांधल्याचे पुरावे सापडले आहेत. सन १५५३ ते १७७८ या कालावधीत गोविंद कुलकर्णी, अहिल्यादेवी होळकर यांसह अनेक मराठा सरदारांनी या गडाच्या तटबंदि, मुख्य गाभारा, दीपमाळा, वेशीचे काम पूर्ण केले. गडावरील भंडाऱ्यामुळे सर्वत्र पसरलेले पिवळे आच्छादन, खंडोबा, म्हाळसा तसेच विविध देवतांची मंदिरे, धुनी, मोठमोठे दगडी खांब यांमुळे वातावरण अगदी भक्तिमय वाटते. त्यातच भर म्हणून ‘येळकोट येळकोट जय मल्हार' ‘सदानंदाचा येळकोट' चा जयघोष सातत्याने सुरूच असतो. जेजुरगडाचे सर्व व्यवस्थापन आता श्री मार्तंड संस्थांनच्या माध्यमातून शासकीय झाल्याने पूर्वी पूजा, अर्चा, विधींसाठी प्रकर्षाने जाणवणारा पंडीतांचा त्रास जाणवत नाही. यामुळे भाविकांची होणारी लूट थांबलेली असून यासाठी श्री मार्तंड संस्थानला धन्यवादच दयायला हवेत. त्याचबरोबर संस्थांनच्या माध्यमातून भक्तांसाठी अनेक सुविधा व लोकोपयोगी कामेदेखील करण्यात येत आहेत. ज्यात भव्य सभामंडप व प्रसादालाय, २४ तास रुग्णवाहिका, संपूर्ण परिसरात सिसिटीव्ही कॅमेरे, जेजुरगड ते कडेपठार रोपवे, गडाला एलईडी लाईट, नागरी सुविधा केंद्र, पायरी मार्गावर माहितीफलक व विश्रांतीसाठी जागा, शुद्ध थंड पाण्याची सोय तसेच दर्शन पास व व्यवस्था संपूर्ण संगणीकृत ऑनलाईन करणे इत्यादी कामे संस्थांनच्या वतीने पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या यातील बरीचशी कामे सुरू असल्याची माहिती विश्वस्तांनी याप्रसंगी दिली. दगडांना गेलेले तडे विशिष्ट प्रकारच्या मिश्रणाने बुजवणे तटबंदीची डागडुजी मूळ ढाच्याला धक्का न लावता करण्यात येत असल्याचे विश्वस्तांनी सांगितले. युद्धपातळीवर सुरू असलेल्या या कामामुळेच कळसाजवळ असलेले व प्रत्येक शिवरात्रीला उघडणारे शिवमंदिर यंदा बंद ठेवण्यात आले होते. प्रत्येक महाशिवरात्रीला सायंकाळी जेजुरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने गडावर दर्शनासाठी येत असतात. यासाठीच मुख्य बाजारपेठेतुन देवाची भलीमोठी मिरवणूक ग्रामस्थांनी काढल्याचे गडावरून खाली आल्यावर दिसले. खंडोबा, म्हाळसा व बानुबाई यांच्या चरित्राभोवती फिरणारा या गडाचा इतिहास असून गडावरील विविध पौराणिक वस्तू व देवळे त्याची साक्ष देतात. आता तर हवाई मार्गे जेजुरगड व परिसर न्याहाळण्यासाठी सशुल्क पॅराग्लायडिंग सुविधा जेजुरीत उपलब्ध करण्यात अली आहे.

गडावरूनच साधारणतः ३ ते ४ किलोमीटर दूर कडेपठार हादेखील ऐतिहासिक परिसर असून बानुबाईचा बानुगड किंवा जुनागड किंवा मल्हारगड म्हणूनदेखील प्रचलित आहे. जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला आलेले बहुतेक भक्त कडेपठारला भेट देतातच. शुक्रवारी सायंकाळी तेथून जवळच अष्टविनायक स्थानांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र मोरगाव येथील श्री मयुरेश्वर मंदिरास भेट देऊन आम्ही दर्शन घेतले. त्या दिवशी आम्ही जेजुरीतच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी आठच्या सुमारास कडेपठारकडे मी कूच केली. सुरुवातीचा वन विभागाने विकसित केलेला थोडा भाग सोडला तर कडेपठारचा पुढील रास्ता काहीसा अवघड व धोकादायक आहे. दगड, धोंडे, पायवाट, उंच चढाव, मध्येच दगडी पायऱ्या अशा पद्धतीचा हा रस्ता डोंगराच्या दोनही बाजूस कोणतेही संरक्षण नसल्याने काहीसा धोकादायक वाटतो. असे असले तरी अनेक आबालवृद्ध, नवदाम्पत्ये या प्रवासात मोठ्या श्रद्धेने चालत असल्याचे दिसून येते. कडेपठारला पोहोचायच्या आधी बाणाई मंदिर रस्त्यात आपले लक्ष वेधून घेते व नंतर शिवमल्हार मंदिर. कडेपठार देवस्थानमध्ये खंडेरायाच्या सुंदर प्रतिमा स्थापित असून ३ ते ४ किलोमीटर चालण्याचा थकवा या दर्शनाने पूर्ण होतो. या ठिकाणी असलेल्या दीपमाळा ज्योतीला तेल वाहून मन कृतार्थ झाले व पाय परतीच्या मार्गाला लागले. साधारणतः बाराच्या सुमारास पुन्हा जेजुरीत पोहोचलो व दुपारचे जेवण उरकून परतीची दुपारी २.१० वाजताची कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस पकडून परतीचा प्रवास सुरू केला. श्री खंडोबाची कार्य, कीर्ती व चरित्र अनुभवायचे असेल तर एकदा तरी जेजुरीला यावेच लागेल. खंडोबाची महती व जीवनचरित्र चलपटाच्या माध्यमातून मांडणारी जय मल्हार' हि मालिका झी मराठी या दुरचित्रवाहिनीवर मध्यंतरी खूपच लोकप्रिय झाली होती. त्यामुळेच उत्सुकतेपोटी जेजुरी नगरीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्यादेखील प्रचंड वाढलेली आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले व साक्षात श्री खंडोबाचे गडाचे स्थान असलेल्या जेजुरीला भक्तगणांबरोबरच निसर्गप्रेमी व गडप्रेमी देखील आवर्जून भेट देतात. त्यामुळे आपणदेखील श्री खंडोबा, म्हाळसा व बाणाईच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या जेजुरी नगरीस भेट देवून एक अदभूत तीर्थक्षेत्र भेटीचा अनुभव घ्याल याची खात्री आहे. -वैभव मोहन पाटील, घणसोली. 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पेर्ते व्हा ! पेरते व्हा!!