पेर्ते व्हा ! पेरते व्हा!!

शेतात राबलेल्या, कष्ट केलेल्या निसर्गाचे संकेत ओळखणाऱ्या व्यवितला त्यावाचून करमणार नाही. नवी पिढी आपल्यापुरते पाहणारी, त्याच्या पुढची पिढी मोबाईलमध्ये रमलेली यांच्याशी जुळवून घेणे सच्चा शेतकऱ्याला तसे जडच जाते असते. अशाच एका अण्णांची ही कहाणी..

         राखडी अंगाचा, शेपटीवर पांढरे पट्टे असलेला ‘पावशा पक्षी' आपल्या बंगल्या समोरील इलेक्ट्रिक पोलाच्या तारांवर ‘पेरते व्हा ! पेरते व्हा!!' ही शिळ ऐकताच हरी काका सकाळीच खडबडून जागे झाले. या शिळेमुळे आनंद होण्याऐवजी त्यांना दुःख होत होते. आपल्या उत्तर आयुष्यातील काळात काहीतरी चुकल्यासारखे वाटल्यामुळे ते अस्वस्थ झाले. जून महिन्याच्या एक तारखेपासून त्यांची झालेली ही अवस्था नातवंडांना, सुनांना समजत नव्हती.

 ‘अण्णा तुम्हाला बरं नाही का? अस्वस्थ वाटतं का ? बीपीची गोळी घेतली नाही का? शुगर चेक केली का?' यासारख्या प्रश्नांवर अण्णा काही बोलत नव्हते. सत्तरी ओलांडलेल्या अण्णाची ही अवस्था मे-जून महिन्यात गेल्या दहा वर्षापासून होत होती. अण्णा आर्थिकदृष्ट्या संपन्न, सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठित म्हणून ओळखलं जात होते. सालस, नम्र, दुसऱ्यांच्या मदतीला नेहमी धावून जाणाऱ्या ह्या व्यक्तीला काय होत आहे हे मात्र कुणाच्याही लक्षात येत नव्हतं..शरीराने धडधाकट, उंचेपुरे, कष्टाने कमावलेली शरीर असे असताना मे-जून महिन्यात त्यांचा आहार कमी होऊन एक प्रकारे झुरणी लागल्यासारखे ते दिसत असत. त्यावर आजूबाजूचे बंगल्यात राहणारी लोक अण्णांना पावसाळा मानत नाही असा आपला प्राथमिक अंदाज व्यक्त करून मोकळे होत. पावसाळ्यात जुन्या माणसांनी, वयस्क माणसांनी आहारावर नियंत्रण ठेवावे. कांदा, लसूण, नॉनव्हेज खाऊ नये असा  फुकटचा सल्लाही आपापल्या परीने  देत असत. अण्णा ज्या आर्णी गावात राहत ते गाव आग्नेय वऱ्हाडातील कपाशीचे मार्केट म्हणून अनेक वर्षापासून प्रसिद्ध होते. दहा वर्षापूर्वी अण्णाची शेती प्रकल्पात गेल्यामुळे त्यांच्या गावाचे पुनर्वसन केले होते. तलावात गेलेल्या शेतीच्या मोबदल्यात त्यांना करोडो रुपयेही मिळाले होते. अण्णाची मुले कर्तबगार निघाल्यामुळे त्यांनी त्या पैशाचे सोने करून आपला रियल इस्टेटचा मोठा व्यवसाय सुरू केला होता. अनेक वाहतीची शेतं शहरालगत घेऊन त्याचे प्लॉटिंगमध्ये रूपांतर करून बक्कळ पैसा कमविला होता. अशाच एका उच्चभ्रू व श्रीमंत म्हणून ओळख निर्माण केलेल्या लोकांच्या वस्तीत अण्णाचा टुमदार बंगला होता. हा बंगला ज्या ठिकाणी होता ते ठिकाणी पूर्वी उत्कृष्ट वाहातीची जमीन म्हणून ओळखला जायचा.

      सात जूनला अण्णा बंगल्याच्या व्हरांड्यात वेताच्या खुर्चीवर ऐसपैस बसले असताना त्यांची नजर समोरच्या इलेक्ट्रिक पोल वरील त्या राखाडी पांढुरकी शेपटी असलेल्या, शिळा घालणाऱ्या पावश्या पक्षांकडे गेले. तो सतत ‘पेरते व्हा, पेरते व्हा' असा मागील आठ दिवसापासून  संदेश देत होता. अण्णाने मधेच लहान नातवंडांना ‘ह्यो बगा बाळांनो पावश्या!' म्हटले. लहान मुलांना काही समजले नाही.  पोल वरील शिळा घालणाऱ्या पावस्याकडे पाहून हा पक्षी यापूर्वी कधीच पाहिला नाही असे आजोबांना सांगत होती. हा कुठला पक्षी आहे असे विचारताच.

‘आरं बाळांनु हा आपला पावश्या, परंतु नातवंडाच्या लक्षात काहीच येत नव्हते. तेव्हा अण्णांनी आपली चूक सुधारून हा पावश्या पक्षी आहे, तो दरवर्षी पावसापूर्वी शेतकऱ्यांना पाऊस पाणी सुरू होत आहे असा संदेश देतो..' असे आपल्या परीने समजावून सांगितले. लहान मुलांचे अण्णाच्या त्या सांगण्यावर मुळीच लक्ष नव्हते, ती मोबाईलवर खेळण्यात व्यस्त होती. आजकालच्या मुलांना पक्षी, निसर्ग, शेतीवाडी याविषयी काहीच ज्ञान नाही याची त्यांना खंत होती व आपण लहानपणी निसर्ग वाचनात किती तरबेज होतो हे आठवून अण्णांना बरे वाटले. लहान असताना मे जून महिन्यात शेतकऱ्यांची  कशी धावाधाव होत होती, शेतकऱ्याचे आख्खे कुटुंब शेतीच्या नियोजनात कसे व्यस्त असायचे याची जाणीवही त्यांना झाली. आपल्या नातवंडांना मे जून महिन्यात पुस्तके, वह्या आणण्याकरिता कशी धावपळ होते हे पाहून अण्णांना आपले जुने दिवस आठवले. त्यावेळेस मात्र पुस्तकांची नाही तर विविध वाणांची बियाणे जमा करतांना आपली कशी धावपळ होत होती हे अण्णांना आठवले.

      आपले वडील आज असते तर आपल्याला दोन रपाटे मारून खुर्चीवरून उठवून वाण आणण्याकरिता दवडले असते. शाळेच्या पुस्तकाची यादी दिली असती तर आपली पाठ लाल केली असती व नंतर म्हटले असते की, बेट्या.. आपली साळा म्हणजे आपलं वावरं, गध्या पुस्कत कुट पयून जाते. मिरुग गेला तर सारं बिगडल्लं! पावश्या किती वरडतो, पेरते व्हा! पेरते व्हा!! म्हणूनसिन्या!

   वडीलांचे हे शब्द आठवून अण्णा एकटेच स्मित हास्य करीत होते. ज्या वर्षी सतत आठ दहा दिवस पावश्या पक्षी सारखा ‘पेरते व्हा' चा संदेश आपल्या शिळेच्या माध्यमातून देतो, त्या वर्षी पीक फार जोमाने येते, हा वडिलांचा उपदेश त्यांनी शेती करताना अक्षरशः गुरुमंत्र म्हणून पाळला होता. यावर्षीसुद्धा पावश्या आठ दहा दिवसापासून सतत संदेश येतो आहे हे पाहून अण्णाचे मन परत अस्वस्थ झाले. अचानक त्यांना आपल्याकडे सर्व काही असताना काहीच नाही अशी जाणीव व्हायला लागली. चांगला कपडालत्ता, पैसाअडका, उच्च दर्जाचे खाणेपिणे, पंखा, एसीची रूम, सेवा करण्याकरिता सेवेकरी राहण्यासाठी बंगला असताना त्यांना हे वैभव खाण्यासाठी उठते की काय असा भास होत होता. आपल्या ऐसपैस रूममधील भिंतीवर टांगलेल्या आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहून त्यांना नेहमी भरून येत असे.

 ‘तू असती तर आपण खेड्यावरच राहिलो असतो आणि मोठ्या आनंदाने शेती केली असती,' असे ते मनोमन म्हणत. ‘पावश्या पक्ष्याचे निमंत्रण तुला समजले असते, यावर्षी उत्तम पाऊस आहे, शेतात चांगली पिक येतील, शिवार हिरवीगार होतील, अन्नधान्याने घरदार भरतील, दुःख दूर पळून जाईल हा संदेश तुलाही कळला असता' असे वारंवार अण्णांंना फोटोकडे पाहून वाटत होते. भूतकाळातील आठवणींना उजाळा देत अण्णांना रात्री उशिरापर्यंत झोप आली नाही. ते मनातल्या मनात २७ नक्षत्रांची उजळणी करू लागले. रोहिणी नक्षत्र मे महिन्याच्या २४ तारखेला येते. त्या दिवशी हमखास पाऊस येतोच. हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असते त्याकरिता हवामान खात्याची गरज नाही असेही अण्णा आठवू लागले. मृगातील पिकं रोगराई  जुमानत नाहीत. ती जोमाने वाढतात म्हणून जून महिन्याच्या सात तारखेला पेरणी व्हायलाच पाहिजे हेसुद्धा अण्णांना आठवले. आठवणींना उजाळा देताना कधी झोप आली ते जाणवले नाही.

    जून महिन्याच्या सात तारखेला अण्णांची मोठी सून सकाळी साडेसहा वाजता अण्णांच्या रूममध्ये चहा घेऊन आल्यावर तिला अण्णा दिसले नाही. एवढ्या सकाळी मामंजी कुठे गेले असतील? असा प्रश्न तिच्या मनात आला .आजूबाजूला पाहिले अण्णा कुठेच दिसत नव्हते. घरात एकच गडबड उडाली. दोन्ही मुले अण्णाला शोधू लागली. दोन तीन तासानंतर अण्णा एकदाचे दिसले ते बंगल्यापासून चार पाच किलोमीटर दूर असलेल्या एका शेतात ! एका नवख्या शेतकऱ्याला तिफन जुंपण्यात मदत करताना, सरत्यावर पेरणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवताना.
         प्रा. डॉ. ज्ञानेश्वर वारंगे, अमरावती 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

सद्‌गुरु कधीही भक्ताची उपेक्षा करत नाहीत