मुशाफिरी

 शहरे, नगरे, महानगरे ही सारी आधुनिकीकरणाची अपत्ये आहेत. त्यापूर्वी सगळीकडे खेडीच होती. भारत हा ‘खेड्यांचा देश' आहे असे अजूनही म्हटले जाते.‘खेड्यांकडे चला' असे महात्मा गांधी म्हणत. 'कृषिप्रधान देश' म्हणून जगात भारताला मान्यता आहे. एकेकाळी हीच खेडी स्वयंपूर्ण होती. बारा बलुतेदार ही खेड्यांमधूनच आलेली संकल्पना. आजही गाव..मामाचे गाव, आजोळचे गाव, मावशीचे गाव, आत्याचे गाव, पितामहांचे गाव, पूर्वजांचे गाव, आपली मुळं असलेले गाव कुणी म्हटलं की मनाचा एक हळवा, संवेदनशील कोपरा कुठेतरी सुखावतो. मात्र याच खेड्यांमध्ये, गावांमध्ये राहणाऱ्यांबद्दल तथाकथित शहरांत/महानगरांत राहणाऱ्यांना प्रत्यक्षात कितपत आस्था उरलेली आहे?

   नवी मुंबई हे आजचे सुनियोजित, अत्याधुनिक, स्वच्छ सर्वेक्षणात देशपातळीवर नाव मिळवलेले व दळणवळणासाठी उत्तमोत्तम सुविधा उपलब्ध असलेले महानगर आहे. पण एकेकाळी इथे निव्वळ खेडीच होती. प्रवासाच्या सोयीही धड नव्हत्या..त्यामुळे येथील वधूपिते दूर गावात मुलगी देत नसत. कारण बैलगाडी जुंपुन चटकन मुलीला भेटता आले पाहिजे, तिचे सुखदुःख जाणून घेता आले पाहिजे, थोडवयात आपल्या पोटचा गोळा असलेली लाडकी कन्या आपल्या रेंजमध्ये पाहिजे अशी त्यावेळची मानसिकता असे. अशा नवी मुंबईने वाशी खाडीवर नवा पुल बनल्यानंतर कात टाकली. १९९२ साली मानखुर्द ते वाशी व हळुहळु पनवेलपर्यंत तर २००४ साली ठाणे ते तुर्भे व पुढे टप्प्याटप्प्याने पनवेलपर्यंत रेल्वे धावू लागली. १९९५ साली नवी मुंबई महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधींचे सभागृह अस्तित्वात आले...आणि नवी मुंबईचे रुपडे वेगात बदलू लागले. आता तर नेरुळ/बेलापूर ते उरण रेल्वेमार्गही सुरु झाला. शिवडी-चिर्ले अटल सेतूही वापरात आला व येत्या काही वर्षात लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विमानांची ये-जा सुरु होताच हा सारा भाग संपूर्ण जगाशी हवाईमार्गानेही जोडला जाईल. एकेकाळी खेडुत, ग्रामीण, गाववाले, मूलनिवासी असणाऱ्या व नंतर नगरवासिय बनलेल्या कितीजणांना खेड्यातील लोकांबद्दल आस्था, जवळीक, आपुलकी, आदर असतो?

   हीच बाबत उलट दिशेनेही पाहता येईल. शहरात राहणारेही आपलेच आहेत, येथूनच गेले आहेत, घड्याळाच्या काट्यावर आणि लोकलला लोंबकळणारे जीवन जगून ते शहरात आपला संघर्ष करत आहेत, आपली स्वप्नं साकारत आहेत. आणि त्यातूनही कधी मधी गावाला येत आहेत, गावच्या देवळासाठी, शाळेसाठी, समाजमंदिरासाठी देणग्या देत आहेत. गणपती, होळी, दिवाळीला शहरात भरपूर मौज असूनही ते गावाला येत आहेत, आपल्या नातेवाईकांत गावकऱ्यांत रमत आहेत या वास्तवाकडे अनेकदा दुर्लक्ष होते व शहरी लोकांना टिकेचे लक्ष केले जाते. शहरात राहणारे लोक म्हणजे पैसाच पैसा. शहरातले झाड हलवले की पैशाच्या राशी पडतात, त्या कशा खर्च करायच्या हाच काय तो प्रश्न असेही समजणाऱ्यांची संख्या कमी नाही. करोना काळात तर असे दिसले की  महाराष्ट्राच्या अनेक खेड्यांमध्ये याच खेड्यांतून शहरात जाऊन राहणाऱ्या घरच्या नातेवाईकांनाही प्रवेश नव्हता. त्यांनी गावी येऊच नये अशा पाट्या झळकल्या होत्या. एकूण काय? तर खेड्यात, शहरात राहणारे एकमेकांचे सख्खे नातेवाईक असले तरी या दोन्ही गटांत दरवेळी तेवढे सख्य असतेच असे नाही. ‘गाव हमारा शहर तुम्हारा' अशी मानसिक फाळणी फार पूर्वीच झाली आहे. याचे प्रतिबिंब सिनेसृष्टीत पडले नसते तरच नवल! आजपासून सुमारे ५३ वर्षांपूर्वी हिंदी रजतपटावर झळकलेल्या ‘पहचान' या चित्रपटात मनोजकुमार हा असाच खेडुत दाखवला आहे. त्याची शहरात आल्यावर टवाळी केली जाते. ‘वो परी कहॉसे लाऊ तेरी दुल्हन जिसे बनाऊ के गोरी कोई पसंद ना आये तुझको' अशा ओळींचे एक गाणे धोतरछाप गंगाराम बनलेला मनोजवुÀमार व मुंबईच्या तारांकित हॉटेलातील सुंदर ललनांवर चित्रित झाले आहे. ‘गाव हमारा शहर तुम्हारा' हा राजेंद्रकुमार, रेखा अभिनित चित्रपट १९७२ साली येऊन गेला होता, त्यातही असाच विषय होता. बैराग, रामपूरका लक्ष्मण अशा सिनेमांतही हे गावरान नायकांचे चित्रण व त्यांच्या प्रेमात पडलेल्या शहरी छोऱ्या दाखवण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात असे ववचितच दिसते की शहरी चकाचौंध जिंदगीला सरावलेली, गाड्या उडवणारी, उंची हॉटेलांतील वलब्ज, किटी पाटर्या यांना सोकावलेली आधुनिक मुलगी खेड्यातील कमी शिकलेल्या, शेतकरी, साधे, खेडवळ राहणीमान असलेल्या मुलाला जीवनसाथी म्हणून स्विकारते किंवा त्याला जवळचे मानते म्हणून! सिनेमात काय, काहीही दाखवता येते किंवा त्यात दाखवले जाते ती सारी सिनेमॅटीक लिबर्टी असते, तसे प्रत्यक्ष जीवनात घडते असे कुणी समजू नये असे मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तरीही लोक सिनेमे चवीने पाहतात, आता बोला!

   भारताची आर्थिक राजधानी, राज्याची राजधानी, अनेकांच्या स्वप्नातील महानगरी मुंबई ही सुध्दा एकेकाळच्या खेड्यांचीच होय. आगरी, कोळी, भंडारी, पाठारे प्रभू आदि समाजविशेष या मुंबापुरीचे मूलनिवासी. शिवडी,कुलाबा,  वडाळा, शीव, दादर, परळ, माहिम, चुनाभट्टी, भोईवाडा, वरळी, मांडवी इत्यादी गावेच होती. आजही माहुल, नाहुर, वाडवली, वाशी, घाटले, देवनार, तुर्भे, गोवंडी, भांडुप ही गावे मुंबईत आहेत. या मुंबई महानगराने अनेकांचे भविष्य घडवले; मात्र वाईट याचे वाटते की ज्या मूलनिवासींच्या जमिनींवर या चकाकत्या मुंबईचे वैभव उभे राहिले त्यापैकी अनेक मूलनिवासींच्या गाफीलपणामुळे त्यांनी शिक्षणाच्या योग्य त्या संधी घेतल्या नाहीत, जमिनी विकल्या, स्वतः संस्थांची निर्मिती-स्थापना मोठ्या प्रमाणावर केली नाही आणि मग त्यामुळे येथे बिगरमराठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर हातपाय रोवले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणसेही मुंबई महानगरीत राहायला आली. १९५६ ते १९६० दरम्यान येथे संयुवत महाराष्ट्राचे आंदोलन उभे राहिले, त्यावेळी महाराष्ट्र नव्हे, तर मुंबई हे महाराष्ट्रातल्या मराठी लोकांचे व गुजरातच्या मोठ्या भागाचे  एक द्विभाषिक राज्य स्थापन करण्यात आले होते. त्या काळात तर म्हणे त्या मुंबईत मराठी माणसाला दोनच नावांनी ओळखले जात असे. बऱ्यापैकी रुबाबदार, चांगले चुंगले कपडे घालणारा असला तर त्याला बिगरमराठी पैसेवाले लोक ‘पाटील' म्हणून हाक मारीत आणि खेडवळ, ग्रामीण तोंडावळ्याचा, गरीब दिसणाऱ्या मराठी माणसाला ते ‘घाटी' म्हणून हिणवत असत. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये असा गरीब मराठी माणूस सिटवर बसलेला असला तर त्याला हे बिगरमराठी शेटजी लोक तिथून उठवत आणि तिथे स्वतः बसत. म्हणजे गरीब, खेडवळ तोंडावळ्याच्या मराठी माणसाने त्याहीवेळी शहरी मराठी माणूस आणि शहरातील बिगरमराठी माणूस यांच्याकडून पक्षपाती वागणूक एकत्रच सोसली आहे. याला काही प्रमाणात दणका दिला स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर. त्यावेळी मग मराठी माणसाचा एक निराळाच दरारा निर्माण झाला आणि परप्रांतीयांकडून हिणवल्या जाणाऱ्या मराठी भाषकांना दिलासा मिळाला. तरीही काही महिन्यांपूर्वीच मुलुंडमध्ये ॲड. तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेला गुजराती लोकांच्या शिवसदन सोसायटीत कार्यालय भाड्याने घ्यायला गेली असता मारहाण झाली व अपमानित करुन हाकलून लावण्यात आले होते, त्यावर ‘मनसे' दणका दिल्यावर मग माज आलेल्या त्या लोकांनी कॅमेऱ्यासमोर हात जोडून माफी मागितली.  

   आजही मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवर ६ डिसेंबरला महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून, खेड्यापाड्यातून आंबेडकरी समाज संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येत असतो. त्यांचीही हेटाळणी, टिंगल टवाळी करणारी अनेक परप्रांतिय मंडळी दादरमधील आलिशान पलॅट्‌स मधून राहात आहेत. हे लोक त्यांच्या सणांना, घरगुती कार्यक्रमांना रोषणाई, फटाकेबाजी, रस्ते-सोसायटीचे आवार अडवून नाचकाम करतात, ध्वनी व हवाई प्रदूषण करतात. त्यांचा त्रास मूळ मुंबईकर सहन करीत असतात. शहरी व ग्रामीण अशा मानसिक फाळणीच्या सोबतीला शाब्दिक फोडणीही अनेकदा महत्वाची भूमिका पार पाडीत असते. अनेक ‘आधुनिक' म्हणवून घेणारे महानगरीय रहिवासी आपल्याच खेड्यातील लोकांना पायजमाछाप, धोतरोजी तसेच गंगुबाई, नऊवारी, काष्टेवाली असल्या शेलवया विशेषणांनी खिजवू पाहतात. तर त्यांना उत्तर देताना खेड्यातील लोक आली मुंबईची डिलीव्हरी, इंग्लिश लोकांचे गुलाम तसेच चिकनी चमेली, ब्रॉयलर काेंबडी असे म्हणायला मागेपुढे बघत नाहीत. आज परिस्थिती अशी आहे की ग्रामीण भागातून आलेल्यांना कितीही नाही म्हटले तरीही शहरी जीवनाचे सुप्त आकर्षण असतेच; फवत ते उघडपणे अनेकदा बोलून दाखवीत नाहीत किंवा कबूल करीत नाही एवढेच! ...आणि शहरी धकाधकीच्या, धावपळीच्या, गळेकापू स्पर्धेच्या आयुष्याला  कंटाळलेले लोक ‘सेकंड होम' म्हणून पुन्हा दूरस्थ खेड्यात जमिन घेऊन फार्म हाऊस बनवत आहेत, तिथे विहीर बांधत आहेत. जवळच्या नदीवर पोहण्याचा आनंद घेत आहेत. जमल्यास तिथे जेवण रांधत आहेत आणि तेही नाही मिळाले तर ‘चुलीवरचे जेवण' म्हणून पाट्या लावलेल्या एखाद्या हॉटेलात जेवायला मिळते का, याचा शोध घेत आहेत. - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

गुलजार-ए-ज्ञानपीठ