गुलजार-ए-ज्ञानपीठ

गुलजार हा माणूस कोणत्याही साच्यात न बसता स्वतःचा काही मानदंड स्थापित करणार आहे. जन्माने पंजाबी, वृत्तीने बंगाली, लिहितो उर्दू व हिंदीतून..चमत्कृतीपूर्ण शब्दरचना करताना तो सहज लिहून जातो....हमने देखी है इन आंखो की महकती खुशबूअलौकिकांचे ध्यास घेणारे रविन्द्रनाथ तथा गालिब हे त्यांचे आदर्श..हे सारे जसे त्यांच्या कवितेत आहे तसेच जगण्यातही..कलाकार म्हणून स्वच्छंद जगणारा!

उर्दू काव्यात शारीर प्रेमाचे वर्णन न करण्याचा संकेत आहे. त्या मर्यादा जाणून गुलजार व्यक्त होतात..
जिस्म सौ बार जले फिर भी मिट्टी का ढेला
रुह एक बार जलेगी तो कुंदन होगी
(रुहःजीवन..कुंदनःसुंदर)

आत्म्याचे हे बावनकशी सोनेपण व्यक्त करताना ते सांगतात..मृत्यू ही शोक करण्याची वृत्तीच नव्हे, त्याचा बाऊ न करता अस्तित्वाच्या खाणाखुणा अशा पुसा की जीवनाची एक सुरकुतीही मृत्यूच्या स्वच्छ पवित्र चेहऱ्यासोबत जाऊ नये.

खयाल रखना कहीं कोई जिंदगी की सिलवट
न मौत के पाक साफ़ चेहरे के साथ जाएं
(सिलवटःसुरकुती)

त्यांच्या अंतर्मनात टागोरांची प्रार्थना गीते, गालिबचे शेर, मीरेच्या विरह व्याकुळ पदासोबत पंचमच्या हास्याचे काही तुकडे विखुरलेले दिसतात. अतिशय संयमी शैलीत अंगारासारखा दाहक किंवा प्राजक्तासारखा कोमल आशय रसिकापर्यंत पोहोचवणं ही त्यांची खासियत म्हणायला हवी.

या खासियतीला सरताज चढवला तो त्यांच्या त्रिवेणी ह्या भाषालंकाराने. कवितेचा हा विशिष्ट आकृतीबंध..तीन ओळीची कविता..त्रिवेणी! इथे पहिल्या दोन काव्यपंक्तीचाच गंगा यमुने प्रमाणे संगम होतो अन्‌ एक संपूर्ण कविता तयार होते, पण या दोन प्रवाहाखालून आणखी एक नदी वाहते..तिचे नाव सरस्वती.. पण ती गुप्त आहे. सरस्वती म्हणजे तिसरी काव्यपंक्ती, ती पहिल्या दोन पंक्तीत कुठेतरी लपली आहे, अंतर्भूत झाली आहे. सत्तरच्या दशकात तिला सारिका मासिकातून प्रसिद्धी मिळाली. कवयित्री शांताबाई शेळके यांनी त्याचा अनुवादही केलाय..पाहूया..

जिंदगी क्या है जानने के लिए
जिंदा रहना बहुत जरुरी है
आज तक कोई रहा तो नहीं..
शांताबाईचा अनुवाद..
जिंदगी काय आहे ते जाणण्यासाठी
जिवंत राहणे आवश्यक आहे
पण आजवर जगलाच नाही ना कोणी!
एक त्रिवेणी ममतेवर..
माँ ने जिस चाँदसी दुल्हन की दुवा दी थी मुझे
आज की रात वह फुटपाथ से देखा मैने
रातभर रोटी नजर आया है चाँद मुझे
एक त्रिवेणी दोस्ती वर
वह मेरे साथ ही था दूर तक मगर इक दिन
जो मुड के देखा तो वह मेरे साथ न था
फटी हो जेब तो कुछ सिक्के खो भी जाते है
एक वास्तव...
क्या पता कब कहाँ से मारेगी
बस की मै जिंदगी से डरता हूँ,
मौत का क्या है..मौत एक बार मारेगी!
ते प्रभूला तरी कसे विसरतील..
जमीं भी उसकी, जमी की ये नियामते उसकी
ये सब उसी का है, घर भी,ये घर के बंदे भी
खुदा से कहीए, कभी वो भी अपने घर आये
काही आपुलकी विषयी..
उडून जाताना पाखराने फक्त इतकेच पाहिले
कितीतरी वेळ फांदी हात हलवत होती
निरोप घेण्यासाठी? की पुन्हा बोलवण्यासाठी!
पुनश्च वास्तव..
पूर्वी जंगलातून जायचं तर क्वचित माणसांची वस्ती भेटायची,
आता वस्तीत एखादं झाड दिसलं तर भरुन येतं हृदय,
भिंतीवरचे सब्जाचे रोप बघताना आठवते, इथे पूर्वी जंगल होतं!
आणि थोडं मनातलं..
रांगेत ठेवलेल्या पुस्तकाची पाने फडफडू लागली अचानक
हवा दार ढकलून थेट घरात घुसली
हवेसारखी तूही कधीतरी इथे ये जा कर ना!

हा प्रकार कवयित्री शिरीष पै यांनी मराठीत हायकू म्हणून नावारुपास आणला आहे. तीन ओळचीच असते हायकू. शेवटी काय..कूस मायबोलीचे असेल तर माया, ममता, आपलेपणा आत्मानंद मिळवून देतोच की!

त्रिवेणी फक्त वेणी न राहता सुगंधित गजऱ्याप्रमाणे सदैव बहरत व दरवळत राहो..बस्स!
-गुंफण : दिलीप जांभळे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 हळदविधी की उधळपट्टी ?