प्रामाणिक अनुभवाच्या कविता : सांजवात

साहित्यिक, कवी असल्याची जाणिव असतानाही व्यावसायिक, प्रापंचिक अडचणींतून कवी आणि लेखक एवढा मागे पडतो की त्याला आपली संवेदनशीलता बाजूला ठेवावी लागते. असाच कवी अशोक भिंगार्डे यांचा सांजवात' हा कवितासंग्रह ग्रंथाली प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केला आहे. त्यात एकूण ७९ कविता असून, या संग्रहाला चैतन्य आर्ट्‌सच्या नरेश ठाकूर यांचे आशयघन मुखपृष्ठ लाभले आहे.

     कवी अशोक भिंगार्डे मनोगतात म्हणतात.. कातरवेळ झाली असताना मला माझ्या डोळ्यातील भाव आणि कातरवेळ यांची सांगड घालणाऱ्या कवितेची ओळ सुचली आणि त्यातून
कातरवेळ दिसते मला
तुझ्या डोळ्यांत पाहताना
आणि गडे बिंब तुझे
कातरवेळ उसासताना
    या ओळी सुचल्या आणि त्यांची कविता तयार झाली. असेच वेगळ्या भाव-भावना त्यांच्या कवितेत उमटल्या आहेत.

     अशोक भिंगार्डे यांच्या ‘सांजवात' या कवितासंग्रहात  बालपणापासून ते आजतागायत जे अनुभव त्यांच्या मनात मुरले ते काव्यबद्ध झाले आहेत. यातील कविता गाव आणि शहर, शिक्षण आणि नोकरी, संसार आणि समाज यातील अनुभवांतून आलेल्या अनुभूतीची अस्सल कविता आहे. गावातले शालेय आणि मंगलमय जीवन तसेच आजूबाजूस अनुभवलेल्या हालअपेष्टा, शहरात वावरताना आलेले जिकिरीचे जगणे, शिक्षण घ्ोता घ्ोता पळत पळत करायला लागलेली नोकरी आणि त्याचबरोबर सांभाळायला लागलेला संसाराचा गाडा अशा संमिश्र विषयांच्या आणि आशयाच्या या कविता वाचताना त्या काही अंशी आपल्या स्वतःच्याही अनुभवाच्या वाटाव्यात एवढ्या सहजतेने शब्दबध्द झाल्या आहेत.

     आपल्या स्वतःच्या ‘माझी कविता' या कवितेत ते म्हणतात ः
अस्खलितही नसेल
किंवा नसेलही ओठावर स्मितरेषा
सौंदर्य हिचे जरी यथा तथा  
तरी ती माझी कविता आहे
   असे जरी ते म्हणत असले तरी या साध्या सोप्या कविता आपल्याला भावतात त्या त्यांच्या प्रामाणिकपणामुळे.

      बहुआयामी भावनांच्या या कवितांमध्ये नातेसंबंध जपताना आणि समाजात वावरताना आलेले बरेवाईट अनुभव, विविधांगी घटना, अतृप्त-तृप्त प्रेम, निसर्ग, वैयक्तिक, कौटुंबिक,सामाजिक जीवनातील पेचप्रसंग शब्दबध्द झाले आहेत. ते आटलेल्या नदितही जीवनतृषा शोधतायत, मातीच्या गंधात हिरवे स्वप्न पाहतायत, ‘अजब न्याय' या कवितेत तर ते समाजातील हतबलता पाहतायत. तसेच ‘कैवल्यद्वार' आणि ‘थेंब' या कवितांमधून  समाजातील दुखरी नस दर्शवतायत. ‘साकडे वि्ीलाशी' कवितेत भक्तीच्या विविध तऱ्हा अनुभवतायत; तर स्वार्थ्यांच्या प्रश्नातून उत्तरेही शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

      अशोक भिंगार्डे यांच्या ‘सांजवात' संग्रहातील कवितांमध्ये नवखेपणा नाही; तर त्या गोळीबंध कविता झाल्या आहेत. मुक्तछंद, भक्तिगीते, गीते, गझल आणि चारोळ्या या संग्रहात समाविष्ट आहेत. त्यांना छंद, ताल, लय आणि रूपबंधही आहे. अशोक भिंगार्डे यांनी साहित्य समीक्षा आणि संशोधनशास्त्र याचा अभ्यास केला असल्याने त्या परिणामी त्यांच्या कवितांमध्ये काही वेगळे शब्द आणि प्रतिमा आपल्याला आढळतात.तर काही कविता वेगळ्या आकृतीबंधातही आहेत. अशा या सच्चा प्रामाणिक कवीचा सांजवात' कवितासंग्रह वाचनीय आहे. तो वाचकांनी वाचायला हवा.

 पुस्तक :  सांजवात ( कवितासंग्रह ) कवी : अशोक भिंगार्डे   प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन ,मुंबई
मुखपृष्ठ : नरेश ठाकूर पृष्ठे : १२०   मूल्य : २००/-
 -शिवाजी गावडे. 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी