शहा, आधी देशावरचं ओझं खाली करा..

अमित शहा यांनी स्वतःकडे जरा पाहिलं पाहिजे. आपल्यासारखं तडीपारीचं बालंट पवारांवर कधीच आलं नाही, याची जाण तरी शहांना आहे काय? समाजासमाजात तेढ निर्माण करणं, धर्माधर्मात वाद वाढवणं, यातून आपलं राजकीय इप्सित साध्य करू पाहणाऱ्या अमित शहांची आणि पवारांची बरोबरी कधीच होऊ शकत नाही.

जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशी प्रचारातील रंगत वाढत जाणार. प्रचार म्हटला की नेत्यांच्या तोंडाला आवर घालणं अवघड. त्यात भारतीय निवडणूक आयोग सत्ताधारी भाजपला विकला गेल्याने सत्ताधाऱ्यांवर त्याचा काहीही अंकुश नाही. यामुळे भाजपसाठी वक्रप्रचाराची संधीच संधी आहे. वायफळ टीका टिपण्णी करणाऱ्या सत्ताधारी भाजप नेत्यांना हात न लावणारा हा आयोग विरोधकांसाठी मात्र गले हड्डी बनला आहे. आयोगाच्या आंधळेपणामुळे निवडणूक जाहीर होण्याआधीच भाजपच्या नेत्यांनी ओकाऱ्या करायला सुरुवात केली आहे. अबकी बार ४०० पारचा नारा लावणाऱ्या भाजपसाठी महाराष्ट्रातली परिस्थिती अनुकूल नाही. मतांची आणि उमेदवारांची विस्कटलेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आलेले अमित शहा हे भाजपचे तारणहार, देशाचे गृहमंत्री. विरोधी पक्षांना अडकवण्यासाठीच्या सर्वोत्तम पदावरचे मंत्री म्हणून साऱ्या मर्यादा पार करत शहा यांनी यंत्रणेला कामाला लावलं. तसं राज्य कारभार करताना शहा यांना मर्यादा या कधीच आल्या नव्हत्या. त्यामुळे ते दिल्लीपासून गल्लीपर्यंत काहीही बोलू शकतात. त्यांच्याविषयी तक्रार करायचं धाडस कोणी करत नाही. ही त्यांच्याकडील गृहखात्याची कमाल आहे. हे खातं कसं चालवायचं आणि नको त्या कारणासाठी ते कसं वाकवायचं याची सारी जाण असल्याने शहा हेच या देशावरचे भार ठरले आहेत.

शहा हे गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. एका जाहीर सभेतील भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्यांनी दुगाण्या डागल्या. पवार म्हणजे महाराष्ट्रावरचं ५० वर्षांपासूनचं ओझं असल्याचं शहा म्हणाले. पवारांच्या एकूणच राजकारणाविषयी अनेक मतांतरं असू शकतात. राजकारणातले त्यांचे अनेक निर्णय धक्कादायक होते. ते त्यांच्या सहकाऱ्यांनाही पटले नाहीत. पुलोदच्या काळात सहकाऱ्यांना अडचणीत आणणारे म्हणून पवारांना ती माणसं आजही दोष देतात. वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसताना पवारांनी कशाचीच बाळगली नाही, असंही त्यांचे टीकाकार म्हणू शकतील. राजकारणातील हे गुण-दोष असेच पुढे येतात म्हणून ती व्यक्ती नालायक ठरू शकत नाही. पवार यांनी केलेल्या या गोष्टी नावडत्या असू शकतील. म्हणून पवारांना सर्वतोपरी दोष देण्याचा अधिकार कोणालाच नाही. अमित शहा यांचा तर महाराष्ट्राशी काडीचा संबंध नाही. पवारांविषयी बोलावं असा अधिकारही त्यांना नाही. देशाचा गृहमंत्री असं जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्या अकलेचे दिवाळेच निघाले असं समजावं. पवार याचं राजकारण आणि अमित शहा यांची एकूण राजकीय कारकीर्द लक्षात घेतली तर ते आणि किरीट सोमय्या यांना एकाच तराजूत मोजावं लागेल. यामुळेच शहा हे किरीटप्रमाणे बकबक करू लागले आहेत.

शरद पवार हे महाराष्ट्रावरील ओझं असल्याचं राज्यातल्या जनतेला वाटलं असतं तर पवार यांच्या पक्षाला आणि नेत्यांना सत्तेची संधी या राज्याने आणि राज्यातल्या जनतेने दिली नसती. पवारांची राजकीय कारकिर्द आणि अमित शहा यांचं वय याची तुलनाही केली जाऊ शकत नाही. गोवा मुक्ती संग्रामावेळच्या प्रवरानगर येथे निषेध मोर्चाचे आयोजन करणारे ते पहिले विद्यार्थी होते. तेव्हा अमित शहा जन्मलेही नव्हते. वीस वर्षांचे असताना युवक काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन पवार यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश घेतला. २७ वर्षांचे असताना त्यांना बारामती मतदार संघातून काँग्रेस पक्षाने सहयोगी सदस्य म्हणून विधानसभेवर पाठवलं. प्रगल्भ महाराष्ट्राचे तीनवेळा मुख्यमंत्री झालेले, देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात असंख्य चढ-उतार पाहिलेले पवार हे विरळेच. याचं आकलन मय्रादित शिक्षणामुळे अमित शहा यांना असण्याचं कारण नाही. भारतीय राजकारणाच्या जाज्वल्यपूर्ण इतिहासाकडे न पाहाताच अमित शहा वायफळ बोलत असतात. अशा उटपटांग व्यक्तीकडून पवारांविषयी स्तुतीसुमनांची अपेक्षा नाही. पण वयाचा मान ठेवून लहानांनी आपली जीभ चालवावी या भारतीय संस्कृतीलाही शहा पारखे झाले आहेत. पवार हे जर महाराष्ट्राला ओझं वाटत असतील तर त्यांचं काय करायचं ते महाराष्ट्र ठरवेल, गुजरातहून राज्यात आलेल्या बनियाने याविषयी बोलावं आणि ते महाराष्ट्रातल्या नेत्यांनी ऐकावं हे जरा अतीच झालं. देवेंद्र फडणवीस, अशिष शेलार यांच्यासारख्या नेत्यांना पवारांचं काही पडलं नाही. पण सारा महाराष्ट्र पवारांचं महाराष्ट्राप्रति असलेलं योगदान जाणतो. अमित शहांविषयी असं कोणी गुजरातमध्ये जाऊन बोलला तर त्याचं काय होईल?

टीका सहन करण्याचा वकूब नसलेले असे नेते स्वतः मात्र टीका करताना कोणतीच मर्यादा पाळत नाहीत. अमित शहा असेच अमय्राादित नेते आहेत. महाराष्ट्र हे देशातील प्रगतशील राज्य निर्माण करण्यात ज्या मान्यवरांचा हात लागला त्यात सव्रााधिक काळ हा पवारांचा होता, हे शहांना कळणार नाही. स्वतःच्या बारामतीत राज्यातील पहिला साखर कारखाना उभारत त्यांनी आपल्यातली धमक दाखवून दिली. राज्यात सहकार चळवळ उभी करत राज्यात ३५ टक्के रोजगार उभा करणाऱ्या पवारांनी १९७० मध्ये दुष्काळाचं प्रचंड सावट निर्माण झालेल्या महाराष्ट्रात पाझर तलावांची कल्पना पुढे आणली. शक्य होईल, तिथे पाझर तलाव खोदले गेले. अशा असंख्य कामांची जंत्री पवारांच्या नावावर जमा आहे. किल्लारीच्या भूकंपात या माणसाचे पाय भिंगरीच्या गतीने चालत होते. कच्छ आणि अंजारमध्ये भूकंपाने गुजरात पुरता उध्वस्त झाला होता. तेव्हाही याच पवारांनी मदतीचा हात पुढे केला होता. केशुभाई पटेल यांच्या सरकारला या प्रसंगातून बाहेर पडणं अशक्य असल्याचं लक्षात येताच अटलबिहारी वाजपेयी यांनी भूकंपाला सामोरं जाण्यासाठी याच पवारांच्या खांद्यावर जबाबदारी दिली होती, हेही अमित शहांना ठाऊक नसेल. कारण तेव्हा ते आणि नरेंद्र मोदी कुठेच नव्हते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी तेव्हा विलासराव देशमुख सांभाळत असताना गुजरात उभा राहावा म्हणून घेतलेली मेहनत आणि सरकार म्हणून घेतलेल्या निर्णयाची जंत्री एकदा शहांनी नजरेखालून घातली तरी महाराष्ट्र ही काय चीज आहे, हे त्यांच्या लक्षात येईल. सारा गुजरात अंधारात चाचपडत होता तेव्हा याच पवार आणि देशमुखांनी अधोईसारखी गावं कच्छमध्ये उभी केली. या अफाट कामगिरीच्या जोरावर पवारांना देशाचा दुसऱ्या क्रमांकाचा पद्मभूषण सन्मान देऊन मोदींच्या म्हणजे ज्या सरकारमध्ये अमित शहा गृहमंत्री आहेत त्या सरकारने गौरवलं. तेच शहा पवारांना महाराष्ट्रावरचं ओझं वाटत असतील तर शहा यांच्या अक्कलेची काढावी तितकी लाज कमीच.

अमित शहा यांनी स्वतःकडे जरा पाहिलं पाहिजे. आपल्यासारखं तडीपारीचं बालंट पवारांवर कधीच आलं नाही, याची जाण तरी शहांना आहे काय? समाजासमाजात तेढ निर्माण करणं, धर्माधर्मात वाद वाढवणं, यातून आपलं राजकीय इप्सित साध्य करू पाहणाऱ्या अमित शहांची आणि पवारांची बरोबरी कधीच होऊ शकत नाही. आपण शहाण्यासारखं वागावं इतकंही शहा यांना वाटत नाही. काँग्रेसच्या ७० वर्षांच्या काळात उभा राहिलेला महाराष्ट्र हा केवळ आणि केवळ इथे राहणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या घामाचं फलित आहे. या वर्गाला योग्य दिशा आणि मार्गदर्शन केलं नसतं तर महाराष्ट्र हा गुतरातप्रमाणेच दुसऱ्यावर विसंबून राहणारा पिपासू ठरला असता. ज्यांना आपण ओझं संबोधतो त्यांच्याच बारामतीत जाऊन त्यांनी उभ्या केलेल्या वैभवाचं दर्शन घेणाऱ्या मोदींनी पवार यांची कोणत्या शब्दात स्तुती केली होती, हे तरी अमित शहांना ठावूक आहे की नाही? ७० वर्षात या राज्याने केलेली प्रगती शहांसारख्या व्यक्तींना पहावत नाही. यामुळेच महाराष्ट्रात पवारांनी उभ्या केलेल्या संस्था शहा पळवत आहेत. पवारांनी सुरू केलेल्या सहकारी बँकांना टाळं ठोकत आहेत. शहा यांच्या नेतृत्वातल्या भाजपच्या १२ वर्षांच्या सत्तेत महाराष्ट्रात एकही एमआयडीसी उभी राहू शकली नाही की उद्योग उभारले जाऊ शकले नाहीत. यावरून शहा यांचं नेतृत्व काय तोडीचं आहे, हे लक्षात येतं. दुर्देवं वाटतं ते आपल्या राज्यातल्या भाजपच्या नेत्यांचं. यातला एकही नेता अमित शहा यांच्या नजरेला नजर भिडवू शकत नाही. यामुळेच शहांसारखे नेते राज्यात येतात आणि कोणविषयी काहीही बोलून जातात. शेतीचा बादशहा म्हणून ज्यांचा आवर्जून उल्लेख होतो त्या पवारांना जसं आहे तसं महाराष्ट्र स्वीकारेल, याची चिंता अमित शहा त्यांच्या पिळावळीने करू नये, महाराष्ट्र त्यासाठी सक्षम आहे... -प्रविण पुरो. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 भारतात घटस्फोटांचे वाढते प्रमाण चिंताजनक !