भारतात घटस्फोटांचे वाढते प्रमाण चिंताजनक !  

 भारताला लाभलेली प्राचीन हिंदू संस्कृती हे भारताचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. या संस्कृतीचा भाग असलेली विवाहसंस्था जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नाही. विवाह पृथ्वीतलावर होत असले, तरी जोडीदाराच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात अशी समजूत भारतीयांत पूर्वापार चालत आली आहे. त्यामुळे घटस्फोट हा शब्द भारतीय शब्दकोशात कुठेही सापडत नाही. विवाह करताना प्रत्येक मुलामुलीने आपल्या भावी आयुष्याबद्दल अनेक स्वप्ने रंगवलेली असतात या स्वप्नांचा चुराडा करणारा घटस्फोट कुणालाही नको असतो; मात्र तो आयुष्यात येण्यामागे कारणेही तितकी गंभीर असू शकतात.  

विवाह संस्काराच्या माध्यमातून सात जन्माची गाठ बांधली जाते, या संस्कारात देवाब्राह्मणांच्या साक्षीने जन्मभर एकमेकांशी प्रामाणिक राहण्याचे, एकमेकांची काळजी घेण्याचे वचन दिले आणि घेतले जाते. या पवित्र संस्काराने बद्ध झालेले उभयता आयुष्यात येणाऱ्या सुखदुःखाच्या प्रसंगांना नेटाने सामोरे जातात. जीवनाच्या प्रत्येक टप्यावर एकमेकांना साथ देत संसाराचे गाडे हाकतात.

गेल्या काही वर्षांत भारतीय तरुणांवर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. भारतात वाढत जाणारे घटस्फोटांचे प्रमाणही याचीच फलश्रुती आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, २०२१ साली देशाच्या कौटुंबिक न्यायालयांत घटस्फोटांचे ५ लाख खटले प्रलंबित होते. २०२३ साली हीच संख्या ८ लाखांपर्यंत पोहोचल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. घटस्फोटाच्या खटल्यांत वर्षागणिक होत जाणारी वाढ भविष्यांत पश्चिमी देशांना मागे टाकू शकते अशी भीती निर्माण झाली आहे. दरवर्षी घटस्फोटांची  जेव्हढी प्रकरणे न्यायालयात निकाली काढली जातात, तेव्हढीच किंबहुना त्याहून अधिक नवीन प्रकरणे  न्यायालयांत नव्याने प्रविष्ट केली जातात. त्यामुळे येणाऱ्या काळात देशाची कुटुंबव्यवस्था संकटात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तरुण पत्नी पत्नी विभक्त झाल्याने सव्रााधिक परिणाम त्यांच्या अपत्यांवर होतात. अशा अपत्यांमध्ये एकलकोंडेपणा, द्वेष, चिडचिड करणे, सूडभावनेने वागणे यांसारखे दोष प्रकर्षाने दिसून येतात. घटस्फोटित पालकांची मुले नकळतपणे गुन्हेगारीकडे वळत असल्याचे निरीक्षणही अहवालात नोंदवण्यात आले आहे. पश्चिमी देशांच्या तुलनेने भारतात होणाऱ्या घटस्फोटांची टक्केवारी कमी असली, तरी आज या प्रकारांवर नियंत्रण आणले नाही, तर भविष्यात ती भीषण स्वरूप धारण करू शकते, ज्याचा परिणाम सामाजिक व्यवस्थेवर होऊ शकतो. विवाह करताना प्रत्येक मुलामुलीने आपल्या भावी आयुष्याबद्दल अनेक स्वप्ने रंगवलेली असतात या स्वप्नांचा चुराडा करणारा घटस्फोट कुणालाही नको असतो; मात्र तो आयुष्यात येण्यामागे कारणेही तितकी गंभीर असू शकतात.

शहरासारख्या ठिकाणी राहणाऱ्या जोडप्यांमध्ये ग्रामीण भागाच्या तुलनेत घटस्फोटांचे प्रमाण अधिक आहे. शहरी भागात राहणारे बहुतांश तरुण पती पत्नी दोघ्ोही नोकरी किंवा व्यवसाय करणारे आणि बऱ्यापैकी धन कमावणारे असतात. कार्यालयात उच्च पदावर असताना इतरांकडून मिळणारा मानसन्मान, सुधारित राहणीमान यामुळे राहणीमानाचा आणि पदाचा काही प्रमाणात अहंकार निर्माण होऊ लागतो. घरी जोडीदाराकडूनही अशाच सन्मानाची अपेक्षा केली जाते. तो तितक्या प्रमाणात न मिळाल्यास लहान सहान  प्रसंगांतून खटके उडू लागतात. खटक्यांचे रूपांतर वादात होते. कधी कधी हे वाद विकोपाला पोहोचतात. सातत्याने असे प्रसंग घडू लागल्यास जोडीदारासोबत राहणे नकोसे वाटू लागते. माघार घेण्याची सवय नसल्याने वितुष्ट वाढत जाऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचते. नोकरीच्या निमित्ताने कार्यालयातील सहकारी तसेच कार्यालयाशी संबंधित व्यक्ती यांच्याशी सातत्याने संपर्क येत असल्याने काही वेळा पती किंवा पत्नीचे विवाहबाह्य संबंध निर्माण होतात ज्यामुळे जोडीदारांत वाद  होऊन नात्यात भेग निर्माण होते. काहीवेळा विवाहाआधी घडलेले प्रसंग, आजार किंवा जीवनातील एखादी गंभीर घटना याविषयी समोरच्यांशी मोकळेपणाने बोलले जात नाही. या गोष्टी विवाहानंतर लक्षात आल्यावर विश्वासघाताची भावना मनात निर्माण होऊन नात्यातील जवळीकता लोप पावू लागते. ज्याचे पर्यावसान पुढे वादांत आणि भांडणांत होऊन प्रकरण न्यायालयापर्यंत जाते. आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहांना सरकाकडून प्रोत्साहन आणि संरक्षण दिले जात असले, तरी विवाहानंतर अचानक बदललेले राहणीमान, तेथील चालीरीती, खाण्या पिण्याच्या सवयी यांचा स्वीकार करताना संघर्ष होतो. आंतरधर्मीय विवाह करताना काहीवेळा जोडीदारावर धर्मपरिवर्तन करण्यास सक्ती केली जाते. असे विवाहही फार काळ टिकत नाहीत. याखेरीज पती पत्नींची मानसिक स्थिती, त्यांच्या सवयी, वागण्या बोलण्याच्या पद्धती, परस्परांच्या नातेवाईकांशी असलेली वर्तणूक यासुद्धा काही प्रमाणात घटस्फोटास कारणीभूत ठरू लागल्या आहेत. जोडीदाराला असलेली व्यसने  त्याचा मित्रवर्ग यागोष्टीही लग्नाआधी ज्ञात नसल्यास गंभीर वादास कारणीभूत ठरतात.

पतिपत्नीचे नाते बहरण्यासाठी एकमेकांना समजून घेणे, एकमेकांना गुणदोषांसह स्वीकारणे, परस्परांशी मनमोकळेपणाने बोलणे, एकमेकांना प्रोत्साहन देणे, आवश्यक तिथे तडजोड करणे, माघार घेणे, परस्परांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करणे या गोष्टी प्राथमिक टप्यावर अत्यंत आवश्यक असतात. आपला अहंकार जपत राहिल्यास लहान सहान प्रकरणात विनाकारण मनात क्लेश निर्माण होऊन नात्यातील प्रेम लोप पावू लागते. आताच्या पिढीवर अनैतिकता पसरवणारे चित्रपट, कुटुंबव्यवस्थेला छेद देणाऱ्या मालिका, वासनांधतेने भरलेल्या वेब सिरीज यांचा प्रभाव अधिक आहे. विवाहसंस्था आणि कुटुंबव्यवस्था यांना तुच्छ लेखनाऱ्या या चित्रपट-मालिकांमध्ये विवाहबाह्य संबंध, गृहकलह, घटस्फोट यांसारखे विषय चवीने चघळले जातात. लिव्ह इन रिलेशिनशिपसारख्या पाश्चिमात्य विकृतीला देशात कायद्याचे संरक्षण असल्याने घटस्फोट घेणे किंवा एक जोडीदार असताना दुसऱ्यासोबत राहणे आजच्या आधुनिक म्हणवणाऱ्या पिढीला तितकेसे चुकीचेही वाटत नाही. भारतीय कुटुंब व्यवस्था टिकवायची असेल, तर या व्यवस्थेचे लाभ महाविद्यालयीन शिक्षणातून शिकवले जायला हवेत त्यासोबतच चित्रपट, मालिका, वेब सीरिज यांतुन भारतीय संस्कृतीला छेद देणारे प्रसंग, कथानक, संवाद यांवर निर्बंध आणणे आज आवश्यक बनू लागले आहे.   - जगन घाणेकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पलक्कड किल्ला किंवा टिपूचा किल्ला