जड झाले ओझे

रस्त्याने ओझे वाहून नेणारा माणूस ओझं सोसेना झालं की काय करतो? ओझं क्षणभर बाजूला ठेवायचा प्रयत्न करतो. क्षणभर विश्रांती घेतो. दुसऱ्या कुणाला तरी थोडा वेळ हात लाव रे, म्हणतो. कोणी येणारे असेल तर, ढकलगाडी ढकलताना हाक मारतो. मदत मिळते न मिळते. क्षणभर थांबून परत कामाला लागतो.

हल्ली हल्ली मी बघते, मनावरचं ओझं वाढलं आहे. हे ओझं कोणत आहे? अपेक्षांचं ओझं ! भावनांचे ओझे.


हेवा
इतरांचा हेवा वाटून माणूस आपल्या आनंदाचा ९० % आनंद घालवून बसतो. इतरांचं चांगलं झालं ठीक आहे. ते त्यांचं नशीब आहे. आपलं हे चांगलं नाही झालं; हे आपलं नशीब आहे. इतरांची मुलं चांगली निघाली, ती त्या मुलांची मेहनत आहे. ते यश किंवा तो काळ त्यांचा कष्टाचा भाग आहे. आपल्याला ते नाही जमलं! पण या छोट्या छोट्या मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांचे एकावर एकसाचून साचून ,एक मोठ्या ढिगाऱ्यात रूपांतर होतं. हा ढिगारा पुढे डोंगराएवढा वाढत जातो आणि पुढे त्याचे हिमालयात परिवर्तन होते.


अपेक्षा
त्या निराश करणाऱ्या घटनांचं ओझं सहन होईना होते. हे ओझं कशाचं आहे ? अवास्तव अपेक्षांचे! शारीरिक ओझं वाहून माणूस साध्या ओझ्याने थकतो, नाही असं नाही. पण त्याहून अधिक थकतो तो अवाजवी अपेक्षांच्या ओझ्यामुळे! अवास्तव अपेक्षा कुठल्या ? पैशाच्या, नातेसंबंधाच्या, परस्परसंवाद विसंवादाचा! या तीन गोष्टींनी मुख्यता माणसाला ते भावनांचं ओझं अनावर होतं आणि शक्तिपात झाल्यासारखा तो निराश होतो. अपेक्षा असतात, नाही असं नाही. अपेक्षा आहेत म्हणून जीवन आहे. माणूस परक्याकडून अपेक्षा करत नाही. आपल्याकडूनच करत असतो. पण ह्या आपल्याच व्यक्तीकडून बसणारा टोला जास्त त्रास देत असतो.


१ ह्या निराश करणाऱ्या ओझ्यातलं पहिलं ओझं आहे, इतरांना पटवून सांगणं. तुम्हाला जे पटतं ते तुम्ही करा. तुम्ही ज्या जीवनधारेत वाहत जातात, त्यात वाहत जा. थोडाफार बदल करा, पण पूर्ण प्रवाह बदलू नका. इतरांची मतं जाणून घेऊन त्यांच्या मतानुसार वागून, आपण नाराज होतो. ते त्यांच्या अपेक्षा आपल्यावर लादून आपल्याला नाचवतात आणि तरीही चुकीचे निर्णय जर त्यांनी तुमच्यावर लादले तर त्यांची जबाबदारी घ्यायला ही लोक येणार नाहीत.

२ स्व
स्वतंत्र रहा ! स्वतंत्र रहा म्हणजे काय? आपल्या समाजात फॉरवर्ड कपडे घालून आणि व्यसन करणे याला स्वतंत्र असं मानलं जातं. पण असं नाही. तुमच्या स्वतःच्या भावभावनांचा प्रवाह तुम्हाला सांगतो तसे वागा. नीतिमत्ता ढळू देऊ नका. पण चाकोरीत अडकूसुद्धा नका.

३ तुलना
माणूस नेहमी दुसऱ्याशी तुलना करून अधिक दुःखी होतो. शेजाऱ्यांनी मोठं घर घेतलं, शेजाऱ्याचा हा फ्लॅट पटकन विकला गेला आणि त्याला दुसरीकडे जायला मिळालं. ती घटना त्याचं नशीब होतं. तुमचं कदाचित वेगळं आहे.

४ अपेक्षा
लोकांनी आदर करावा ही अपेक्षा सोडून द्या. तुम्ही काहीही फेसबुक वर टाकलं की लाईकची अपेक्षा करता. तुमची लोकांनी स्तुती करावी अशी अपेक्षा करता. कौतुक नाही केलं तर नको करू दे. तुम्ही काय आहात ते तुम्हाला माहित आहे. ईतराना तुमचे कौतुक करवत नाही. दुर्लक्ष केले की वाईट वाटतं. मान्य!कुणालाही वाईट वाटतं, की लोक अशी पार्शल आहेत.

५ मागणी
प्रेमाची मागणी करू नका. लोकांनी आपल्याकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा करू नका. तुम्ही तुमचं तुमच्या जगात,जगत राहा. मै अकेला ही अपनी धून मे मगन चला जा रहा हू ! तसं जगायला हवं.

६ आरसा
सगळ्यात माणसाचा चांगला मित्र आरसा असतो. आरशासमोर बोला.आरशा बरोबर बोला आणि म्हणा.. मी तुझा आदर करतो आणि आदर करत राहणार आहे. इतरांची चांगले वागणं आवश्यकच आहे, पण स्वतःशी चांगलं वागणं अधिक आवश्यक आहे.

७ स्वतःसाठी
महिला घरात खूप थकतात सगळ्यांना चांगलं चुंगलं करून खायला देतात आणि स्वतः उरलेलं जेवण संपवतात. तुम्ही स्वतःच्या शरीराचा, स्वतःच्या आरोग्याचा सन्मान करा.

८ मित्र
तुम्ही स्वतःचा सदिच्छा पूर्ण चांगला मित्र बना. इतरांचा चांगला मित्र बनणं, चांगला कुटुंबाचा घटक बनणं  हे आवश्यक आहे. पण अती आवश्यक नाही. तुमचा स्वतःचा तंत्र बिघडवून स्वतःचं अस्तित्व घालवून तुम्हाला इतरांमध्ये विरघळून जायची गरज नाही. दुधात केशर वितळल्यावर, पण केशराच्या काड्या शिल्लक राहतात. तसं तुम्ही स्वतःची अस्मिता बॅकबोन शिल्लक ठेवा.

९ लोकप्रिय
सगळ्यांची मी लोकप्रिय व्हावी, पण होवु शकत नाही. हिंदी सिनेमातील नट आणि नट्या ह्याच फक्त सगळ्यांच्या लोकप्रिय असतात. बाकी प्रत्येक व्यक्तीला हेवेदावे, मत्सर, राग सोसावा लागत असतोच.

१० निंदा
निंदक बपुया जनई मरे, पर उपकार होवे किंवा निंदकाचे घर शेजारी असू द्यावे. त्यांच्या उद्धटपणाकडे दुर्लक्ष करा. जे तुमचा सन्मान करतात त्यांच्यासाठी हा वेळ राखून ठेवा. निंदकांनी टीका केली म्हणून दुःखी होण्यात वेळ घालवू नका.

११ तुम्हीच युद्ध
तुमचे युद्ध हे तुम्हाला माहिती आहे. इतरांना ते माहित नाही तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात म्हणूनही तुम्हाला नावे ठेवली जातील. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी असते आणि तुम्ही अधिक वेगळे आहात. म्हणून तुम्हाला टीका सोसावी लागते. तुमच्या विचारांशी, ह्या लोकांचे विचार जुळणं सुतराम शक्य नाही. तुमचे वेगळे विचार आहेत, ठीक आहे. प्रत्येकाच्या वेगळेपणाचा आदर सत्कार करा. तुमची विचारधारा इतरांना पटेलच असं नाही.

१२ आदर्श
आदर्श वाटणारी लोक भरपूर टणक असतात .व्यवहारी असतात. तुम्ही त्यांना वेळ दिला तरी तीतुम्हाला देतीलच असं नाही. पण शक्यतो तुमच्या परीने तुम्ही चांगलं राहायचा प्रयत्न करा. प्रामाणिकराहा .लोकांना वेळ द्या. समोरच्या व्यक्तीत बदल घडणे शक्य नसते. तुम्ही स्वतःच्या अपेक्षा बदला.

१३ स्वतःच्या मर्यादा
स्वतःच्या मर्यादा जाणून घ्या आणि त्या मर्यादेतल्याच अपेक्षा ठेवा. एक घरगुती गृहिणी पंतप्रधान होण्याची स्वप्न आणि आकांक्षा बाळगु शकत नाही. ताप देणारे, अपमान करणारे अचानक मिरॅकल होऊन जादू फिरवून तुमच्या बाजूने बोलायला लागतील. हे पण शक्य नसते.

१४ ओझं
मानसिक आरोग्यासाठी अपेक्षांचं ओझं कमी करा।

१५ नकारात्मक माणसं
नकारात्मक माणसांपासून दूर रहा. असं नाही की त्यांच्या टीकेमध्ये काही मुद्दे योग्य आहेत ते टाळावे. योग्य वाटला तो मुद्दा, तर सुधारणा करावी. पण सतत सतत गिरमिटसारखं तुमच्या पाठीवर, तुमचं हे चुकलं ते चुकलं सांगणारे लोक टाळा.

१६ भूतकाळ
भूतकाळ संपला आहे. आता तो बदलू शकत नाही. त्या चुकांसाठी रडून उपयोग नाही. हे करु शकता की त्या चुकांपासून धडा शिकावा. पण त्या गेल्यासाठी रडत बसू नका; स्वतःची काळजी घ्या! ओझे कमी करा. मी हे तुम्हाला सांगता सांगता स्वतःला पण समजवते आहे. - शुभांगी पासेबंद, ठाणे. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

राष्ट्रीय राजकारणातले द्रष्टे नेते यशवंतराव चव्हाण