राष्ट्रीय राजकारणातले द्रष्टे नेते यशवंतराव चव्हाण

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, राष्ट्रीय राजकारणातील  द्रष्टे नेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती. आजच्याच दिवशी म्हणजे १२  मार्च १९१३ रोजी सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या छोट्याशा गावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा झाला. यशवंतराव चव्हाण हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते. भारतीय राजकारणातील त्यांचे योगदान अद्वितीय असेच आहे.

यशवंतरावांचे प्राथमिक शिक्षण कराड येथे झाले, तर उच्च शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे झाले. पुण्यात त्यांनी बीए-एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. महात्मा गांधीजींच्या स्वातंत्र्य आंदोलनाने प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला. १९३० साली त्यांनी महात्मा गांधीजींच्या सविनय आंदोलनात भाग घेतला. १९३२ साली त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. १९४२ च्या चले जाव आंदोलनातही त्यांनी भाग घेतला. सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. १९४६ साली मुंबई प्रांताच्या विधिमंडळ निवडणुकीत दक्षिण सातारा मतदारसंघातून ते निवडले गेले आणि संसदीय मंडळाचे चिटणीस बनले. १९४८ साली त्यांची काँग्रेसच्या चिटणीस पदावर निवड झाली. १९५२ च्या निवडणुकीनंतर ते स्थानिक स्वराज्य संस्था व पुरवठा खात्याचे मंत्री बनले. द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी १ नोव्हेंबर १९५६ रोजी सूत्रे हाती घेतली. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. १ मे १९६० रोजी त्यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील अनेक उपक्रमांना चालना दिली. महाराष्ट्राच्या विकासाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली म्हणूनच त्यांना महाराष्ट्राचे भाग्यविधाते  म्हणतात.

१९६२ मध्ये चीन युद्धाच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतराव चव्हाणांची नेमणूक देशाच्या संरक्षण मंत्री पदावर केली. परकीय आक्रमणाच्या वेळी देश संकटात असताना हा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला. चिनी आक्रमणानंतर संरक्षण दलात चैतन्य आणण्याची जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पेलली. १९६७ सालच्या निवडणुकीत अनेक राज्यात कांँग्रेसचा पराभव झाला. त्या काळात देशात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीत त्यांनी गृहखाते यशस्वीरीत्या सांभाळले. अर्थमंत्री म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजली. बांगलादेशचे युद्ध, दुष्काळ यामुळे खालावलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला त्यांनी चालना दिली. संस्थानिकांचे तनखे रद्द करणे, बँकांचे राष्ट्रीयीकरण करणे यासारखे महत्वाचे निर्णय ते अर्थमंत्री असतानाच घ्ोतले गेले. चलनवाढीला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे धोरण देखील त्यांच्याच काळात आखण्यात आले. देशाचे परराष्ट्र मंत्री म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले.  पुढील काळात देशाचे उपपंतप्रधानपदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली.
देशात जनता पक्षाचे सरकार असताना ते विरोधी पक्षनेते होते. आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. महाराष्ट्राचे भाग्यविधाते, कार्यक्षम मंत्री, उत्तम संसदपटू, उदारमतवादी नेते अशी जनमानसात त्यांची प्रतिमा निर्माण झाली. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात त्यांनी मानाचा तुरा रोवला. महाराष्ट्राच्या या सुपुत्राने देशातच नव्हे तर जगात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले. यशवंतराव जितके महान नेते होते तितकेच ते अभिजात साहित्यिकही होते. ललित, आत्मचरित्र, चरित्रात्मक लेखन, व्यक्तिचित्रणपर आठवणी, प्रवासवर्णन, स्फुटलेखन, वैचारिक लेख, समीक्षणात्मक लेख, पत्रलेखन, भाषणे इत्यादी स्वरूपात त्यांनी लेखन केले आहे. त्यांच्या कृष्णाकाठ, ऋणानुबंध, युगांतर, भूमिका, शिवनेरीच्या नौबती, विदेश दर्शन, सह्याद्रीचे वारे या ग्रंथातून त्यांच्या लेखन प्रतिभेचा परिचय होतो. ते जरी राजकारणी असले तरी त्यांच्यामधील चिंतनशील रसिक, सामाजिक विचारवंत हा मात्र साहित्याबरोबरच राहिला होता. त्यांच्या सर्व कलाकृती लक्षवेधक आहेत. यशवंतराव चव्हाण हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते. भारतीय राजकारणातील त्यांचे योगदान अद्वितीय असेच आहे. महाराष्ट्रासाठी तर त्यांचे योगदान अनमोल असेच आहे. महाराष्ट्र त्यांचे योगदान कधीही विसरू शकत नाही. २५ नोव्हेंबर १९८४ रोजी त्यांचे निधन झाले. आज त्यांच्या जयंतीदिनी त्यांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्यच आहे. यशवंतराव चव्हाण यांना जयंतीदिनी भावपूर्ण आदरांजली.
-श्याम बसप्पा ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

शहा, आधी देशावरचं ओझं खाली करा..