वंगण...

एक वाचनात आलेली गोष्ट...आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीने, आपलं नातं जपण्याकरीता नात्याला वंगणाची जोड द्यायला हवी.

सकाळच्या गडबडीत नेमकी ट्राँली बाहेर ओढताना अडकली...धड ना आत धड ना बाहेर...वैतागच...

नेमके चहा-साखरेचे डबे आत अडकले...! आतल्याआत चडफड नुसती...आता सुतार बोलवावा लागणार...एवढ्याशा कामाकरता तो आढेवेढे घेणार...नाहीतर बजेट वाढवून या कशा मोडीत काढायला झाल्यात याची गाथा वाचणार...आजकाल माँड्यूलर किचन कसं जोरात चाललंय...माझी इकडे कामं आणि तिकडं कामं... सगळं क्षणात मनात आणि डोळ्यासमोरुन तरळूनच गेलं. जोर देऊन जरा ओढून बघितलं तर कड्‌कट्‌ आवाज काढलाच तिने. लादी पुसायला आलेल्या मावशी म्हणाल्या, ‘खोबरेल तेलाचं बोट फिरवा ताई.. कडेच्या पट्टीवर... सरकेल... तात्पुरते तरी निभावेल...!'

चांगली आयडिया... मी पट्‌कन तेलाचं बोट फिरवलं...दोन मिनिटांनी ट्राँली मऊसरपणे आतबाहेर डोकावली...कसलं भारी काम झालं एकदम! मी एकदम आनंदाने तिला धन्यवाद देत म्हणलं.. ‘बरं झालं बाई वेळेत आलीस....नाहीतर... चहा पावडर विकत आणावी लागली असती...'

ती हसली...‘वंगण लागतय ताई...थेंबभर पुरतं...पण लागतं कधीमधी...ते मिळालं की सगळं सुरळीत होऊन जातं बघा क्षणात!'

खरंच...वंगण लागतं...! फक्त मशीन, वस्तुनाच नाही तर माणसालाही... अगदी त्याच्या देहाइतकंच मनालाही, अगदी नात्यांनाही वंगण अवश्यक आहे. चार चांगल्या शब्दांचं, आश्वासक स्पर्शाचं, सदिच्छांचं, विचार वाचनाचं, सूर मैफिलींच, श्रद्धा भक्तिचं, नजरेतल्या भावाचं, योगनिद्रेचं, कलाकल्पनेचं...! की जे मनाला मोडकळीस येण्यापासून वाचवतं. मरगळ येउन कोरड्या ठक्क पडलेल्या वृत्तीवर हे वंगण पुर्ववत जगण्याकडे अलगद घेऊन जातं. लहानपणी आजी सगळ्या नातवंडांना ओळीत बसवून चहाबरोबर एरंडेल पाजायची...प्यायचं म्हणजे प्यायचे..

कितीही आदळापट केली तरी ती तिचा हेका सोडायची नाही. पोट आतड्याचं ते वंगणच आहे... महिना दोन महिन्याने एकदा घेतलं की पोटाचं काम निर्धोक चालू राहतं...आणि तुम्ही मग आबरचबर हादडायला मोकळे... कानात तेल, नाकात दोन थेंब तुप, डोक्यावर बुदलीभर कोमट तेल शनिवारी रात्रीचा हमखास वंगणाचा कार्यक्रम कित्येक वर्षे आमच्या पिढीने खरं तर अनुभवला. रात्री झोपल्यावर कधीतरी काशाच्या वाटीने तळपाय घासून द्यायची... शरीरातल्या उष्णतेवरचं तिचं ते वंगण होतं. खरं तर जन्मापासून हे वंगण वेगवेगळ्या रुपात आपली सोबत करत राहतं...

आपले शारीरिक, आर्थिक, मानसिक मार्ग निर्धोक करत राहतं, कारण स्निग्धता हा भाव ओतप्रोत या वंगणात भरलेला आहे. जाईल तेथे मऊपण पेरणं, कोरडेपण गंज मिटवणं आणि पुर्वस्थितीत आणुन सोडणं..हा (स्व) भावच आहे वंगणाचा! क्षमा, सोडून देणं, माघार घेणं, प्रसंगानुरूप मदतीला जाणं, हळूवार फुंकर घालणं, स्वच्छ शुद्ध अंतःकरणाने समोरच्याशी शांतपणे बोलणं...हेही नाती जपण्यासाठी लागणारं एक प्रकारचे वंगणच आहे. वंगण नसतं तर जगात फक्त खडखडाटच ऐकू आला असता, असं मला नेहमी वाटतं...

जीवनातले स्निग्धांश संपले तर फक्त कोरडेपण उरेल...आणि कोरडेपण क्षणात भस्मसात होउन जातं! त्यामुळे जगण्यात येणारे हरएक प्रकारचे वंगण जपणे, प्रसंगी ते वापरणे फार आवश्यक आहे. निर्जीव मशीन सामुग्रीला जिथं त्याचं महत्व समजतं तिथं तुमच्याआमच्यासारख्या जीवांनी ते जाणलंच पाहीजे..त्याचं जतन केलंच पाहीजे...तरच जगणं लयीत.. सुसह्य.. होत राहील!  

हो ना...? आणि आपणं चालतं, बोलत मशिन नाही.. तर भावना जपणारी माणसं आहोत..ही ओळख नव्याने माणसांना होईल. संकलन : -सौ.आरती राजेश धर्माधिकारी

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पंचनामा