मुशाफिरी

..आधी ऐकून होतो की केंद्रशासित प्रदेश नानी दमण व मोटी दमण येथे बघण्यासारखे फारसे काही नाही, तेथील समुद्रकिनारे आपल्या कोकणातील गणपतीपुळे, हरिहरेश्वर, अलिबाग, रेवदंडा, काशिद, पिरवाडी या किनाऱ्यांसारखे स्वच्छ नाहीत वगैरे वगैरे. पण ते खरे नव्हे. दमणमधील देवका व जामपोर हे दोन्ही बीच सुंदररित्या सुशोभिकरण करुन आकर्षक बनवण्यात आले आहेत ते पाहण्याचा व तेथील छायाचित्रण करण्याचा आनंद काही वेगळाच. कोणत्याही जातिवंत भटक्याला आणि छायाचित्रकाराला मोहात पाडील असाच तो सारा परिसर आहे.

   आपण दूरदूरची ठिकाणे पाहतो. जम्मू-काश्मिर, केरळ, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरयाणा, गोवा, लेह-लडाख वगैरे...आणि मुंबई-नवी मुंबईपासून १८० किमी एवढेच अंतर असलेल्या दमण, सिल्वासा, दादरा आणि नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशाकडे जायचे अनेकांना सुचतही नसते. तेथील वातावरण, हवामान, हॅाटेले, पर्यटनस्थळे सारे चांगले आहे. अजूनही पाणथळ, समुद्राजवळचा, फारसे शहरीकरण न झालेला हा सारा परिसर आहे. दमणला जाण्याची तीव्र इच्छा आधीपासून होतीच. ती यंदा मार्च महिन्याच्या प्रारंभीच पूर्ण करुन घेतली. मार्च यासाठी की या महिन्यात साधारणपणे दहावी-बारावीच्या परिक्षांना सुरुवात झालेली असते. आर्थिक वर्षाचा शेवट आलेला असतो. त्यामुळे रहदारी व पर्यटनस्थळांवरील गर्दी तुलनेने कमी अपेक्षित असते. भारतात अंदमान निकोबार, चंदिगढ, दादरा आणि नगर हवेली-दमण-दीव, दिल्ली (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) लक्षद्वीप, पुदुच्चेरी, लडाख आणि जम्मू व काश्मिर हे केंद्रशासित प्रदेश आहेत. दमण-दादरा व नगरहवेली-दीव या साऱ्या भागाला एक खासदारही आहे. सध्या हे खासदारपद भाजपच्या लालुभाई पटेल यांच्याकडे आहे. खूप अधिक अंतर असलेला हा मतदार संघ आहे. नवी मुंबईहुन रस्त्याने घोडबंदर व पुढे अहमदाबाद रस्तामार्गे दमण येथे पोहचण्यासाठी साडेतीन ते चार तास पुरेसे आहेत. जाताना मध्ये हमरस्त्याजवळच असलेले पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुज्याच्या विवळवेढे येथे असलेले श्री महालक्ष्मी मंदिरही आम्ही पाहुन घेतले. पालघर जिल्हा म्हणजे चिकू, ताडी, ताडगोळे, केळी, काजू यांचे आगार. ताडी, निरा ही नैसर्गिक पेये आणि ताडगोळे, आंबे, काजू (..आणि काजूगरही) चिकू, फणस, उन्हाळ्यात येणाऱ्या रानमेव्यातील पिवळी रांजने, पांढुरकी हाटुरणे म्हणजे माझा वीक पॉईण्ट! आम्हाला या महालक्ष्मी मंदिराजवळ आदिवासी बंधूृ-भगिनींनी विकायला आणलेल्या यातील बऱ्याच बाबींचा आस्वाद घेता आला, सोबत नेण्यासाठी खरीदता आले. अहमदाबाद रस्त्यावर पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या भागात जागोजागी ताडी विक्री करणारे आदिवासी बांधव दिसले खरे; पण त्यांच्याकडून घेतलेल्या ताडीला फेस आला होता व ती दुपारच्या वेळी आंबल्याने आंबटही लागत होती. आपल्या पनवेलमधील आकुर्लीमध्ये किंवा उरणमध्ये, मनोरीमध्ये मिळणारी ताडी मी अनेकदा आस्वादल्यामुळे ही ताडी मला अजिबात आवडली नाही. जामपोरा बीचजवळ बीतवाडी येथे असणारी ‘मुक्तीधाम' ही स्मशानभूमीही एखाद्या प्रार्थनास्थळासारखी अत्यंत सुंदररित्या बनवली असल्याचे मी पाहिले. तोवर मला नवी मुंबईतील तुर्भे येथील स्मशानभूमी ‘लय भारी' असल्याचे वाटत असे. कैलाशपति शंकराची सुमारे तीन मजली उंची भरेल इतकी भव्य मूर्ती व परिसरातील स्वच्छता, नेटकेपणा व अत्यंत विस्तीर्ण आवार या बीतवाडीच्या ‘मुक्तीधाम' ला लाभले आहे.

   दमणमध्ये आम्ही देवका बीचपासून जवळच असलेले टू रुम किचनचे फ्रिज, गॅस, भांडी, पाण्यासाठी फिल्टर अशी सुविधा असलेले एक वातानुकुलित घर बुक केले होते. विस्तीर्ण आवार, शांतता, गोव्यासारखे सुशेगाद वातावरण, कसलीही घाई नाही, मस्टर गाठायची तडफड नाही, वाहनांचे प्रदूषण नाही, रात्री साडेआठ नऊ वाजले की मध्यरात्र झाली असे वाटावे असा सारा तो माहौल. दमणमध्ये म्हणे दारु स्वस्त मिळते. आमचा तो प्रान्तच नसल्याने ते तपासायची वेळ आली नाही. बाकी क्रॉफर्ड मार्केट सारखी काही मार्केट्‌स आहेत. त्यांच्या बाहेरही मुंबईत बसतात तसे गाड्या, टेबले लावून कपडे विकणारे खूप जण दिसले. त्यांच्यातील एकाला मी विचारले की ‘हा सारा माल येतो कुठून ?' तर तो म्हणाला ‘मुंबईवरुन!' मी मनात म्हणालो,  मग आमच्यासारख्या जन्मजात मुंबईकराने इथून कशाला काय न्यायचे? तेथील एका दुकानात कपड्यांचा सेल लागला होता. मी सहज म्हणून दुकानात शिरलो व दुकानदाराशी मराठीत बोलू लागलो आणि त्याला विचारले, ‘तुम्हाला मराठी कसे येते?' तर त्याने मला चकित केले. तो म्हणाला, ‘मी उस्मान, महाराष्ट्रातलाच मालेगावचा आहे.'  महाराष्ट्र, गुजरात, गोवा, हिमाचल प्रदेश, पंजाब, दिल्ली अशा विविध राज्यांत रस्त्यावरील, चारचाकी गाडीवरील स्ट्रीट फूड आणि त्याचा गर्दी करुन आस्वाद घेणारे ठायी ठायी मी पाहिले असून मीही त्या गर्दीचा भाग बनून ते सारे चाखले आहे. दमण, सिल्वासा, दादरा आणि नगरहवेली परिसरात मला मात्र वडा पाव, समोसे, अंडा बुर्जी, भजी, पाणीपुरी, शेवपुरी, भेलपुरी देणाऱ्या गाड्या, विक्रेते फारसे दिसले नाहीत. दमणमध्ये रात्री एक चारचाकी गाडीवाला दिसला. तर तो आईस्क्रीम विकणारा निघाला आणि गाडीवर लिहिले होते ‘बोम्बे चौपाटी आईस्क्रीम' आता बोला!

दमणमध्ये आम्ही पाहिले की स्थानिक समाज हा कष्टकरी, शेती करणारा, मेहनती आहे. पैसेवाल्या लोकांनी तेथे जमिनी, हॉटेले, दुकाने, गोदामे, गेस्ट हाऊसेस घेंऊन मालमत्ता केली आहे. केंद्रशासित प्रदेश म्हणून २०१७ पर्यंत तेथे विविध वस्तूंवर वेगवेगळे कर कमी दराने आकारले जायचे किंवा करमाफीच असायची; त्यामुळे काही गोष्टी स्वस्त मिळत. पण आता ती सवलत काढून घेतली असल्याने दर जवळपास मुंबई सारखेच आहेत असे मी काहीजणांकडून ऐकले. दमण येथील समुद्रनारायण घाट-जेट्टी व तेथील समुद्रनारायण मंदिर छान आहे. तेथे बोटीमधून फेरफटका मारता येतो. दमण नंतर आम्ही सिल्वासा, दादरा नगर हवेलीच्या दिशेने दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो. सारा प्रवास कारने असल्याने रेल्वे, बस यांच्या वेळा पाळण्याची, हाता-खांद्यावरील बॅगा सांभाळण्याची कटकट नव्हती. दमणगंगा नरोली येथील ‘अतिथी भवन' या हवेलीचे दोन रुम्स आम्ही बुक केले होते. ‘रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील अण्णांच्या बंगल्याची आठवण करुन देणारी ती वास्तू वाटली. दादरा व नगरहवेली मध्ये असणारे ‘वनगंगा लेक गार्डन' हे अतिशय सुंदर आवार आहे. विविध जातींची फुले, छोटे जलाशय, त्यातील कासवे, बोटींग, आकर्षक डिझाईनचे पूल, सुरेख वृक्षराजी असलेल्या त्या भागात कितीही तास भटकलो तरी कंटाळा येणार नाही असे वातावरण आहे. ..आणि प्रवेश शुल्क केवळ २५/-रु. प्रति माणशी.  नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर, मिरा-भाईंदर, वसई-विरार परिसरातही असे बगीचे, जलाशय आहेत. थोडी आणखी कल्पकता दाखवून तेथेही पर्यटकांना चार घटका मन रमवता येईल असे केंद्र निर्माण करता येण्यासारखे आहे. वनगंगा येथून पुढे दादरा आणि नगरहवेलीच्या वासोना-सिल्वासा मध्ये वनखात्याच्या वाईल्डलाईफ विभागाच्या वतीने जाळीदार बसमधून ‘लायन सफारी'चा आनंद घेण्याची व्यवस्था आहे. याचेही शुल्क माणसी केवळ २५/-रु. सिंह आणि सिंहीणीची जोडपी, छावे तेथे आराम करताना पाहता येतात. आणखी पुढे सतमालिया येथे गेल्यावर ‘डिअर पार्क' हे हरणांचे अभयारण्य पाहायला मिळते. तेथेही जाळीदार बसमधून पर्यटकांना भटकंती करवून आणले जाते. हरणांचे बछडे, हरिणी, सांबार यांचा सुखेनैव मुक्त संचार तेथे पाहताना आपल्याला धकाधकीच्या शहरी जीवनाचा विसर पडतो.  

पुन्हा तेथून माघारी येताना अथल येथील भव्य दिव्य स्वामीनारायण मंदिर लागते. सुंदर, स्वच्छ, विस्तीर्ण आवाराचे स्वामीनारायण मंदिर देशाच्या/परदेशाच्या कोणत्याही शहरातले असू द्या; ते तितकेच देखणे, नेटके, स्वच्छ, सुंदर वाटत असते. प्रमुख स्वामींची प्रसन्न मूर्ती तेथे विराजित आहे. मात्र मू्‌र्तिपासून विशिष्ट अंतरावरुन महिलांना ‘प्रवेश निषिध्द' असल्याची पाटी डोळ्यांवर आघात करते. अर्थात त्यावर सरकारी मालकी, प्रशासन नसल्याने ज्याला जावेसे वाटते, दर्शन घ्यावेसे वाटते त्यांनीच जावे हेही खरेच! दमण, सिल्वासा, दादरा आणि नगरहवेलीसह दीवही केंद्रशासित प्रदेशच आहे. पण नवी मुंबईहुन दीव हे अंतर रस्तामार्गे जवळपास पंधरा तासांचे आहे. त्यामुळे दीव येथे जाणे आम्ही पुढे ढकलले. पण हा सारा परिसर सहकुटुंब पाहतानाच तीन दिवसांच्या सहलीचा ‘छोटा पॅक' म्हणून अनुभवण्याची मौज आम्हाला घेता आली. येताना परतीच्या प्रवासात  वज्रेश्वरी देवीचे मंदिर आणि गणेशपुरी येथील स्वामी नित्यानंद महाराज समाधी मंदिर, तेथील गरम पाण्याचे कुंड पुन्हा एकवार पाहिले. या सदराच्या सर्व रसिक, पर्यटनप्रेमी वाचकांना आणि महिला वर्गाला जागतिक महिला वर्गाला जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर.

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

वंगण...