पंचनामा

सारखे पक्ष बदलणाऱ्यांचे वर्तन हे पलटूराम वृत्तीचे, ‘वारा येईल, तशी पाठ फिरविणे' किंवा मौसम पाहून रंग बदलणे पध्दतीचे असते. सापसुध्दा डसला की, पलटी मारून आपले विष सोडतो. तसाच पलटी मारणारा नेता घरात घुसतो; पण पक्षाच्या प्रववत्यांना व पक्षाच्या कार्यकर्त्यांना जनतेचे बोलणे ऐकावे लागते. जनतेकडून अपमान सहन करावा लागतो. पलटीराम नेते आपल्या जून्या ववतव्याला पुसून टाकून देण्याचे काम काही दिवस करतात. आपल्या जुन्या सर्व पोस्ट डिलीट करण्याचे काम करतात. सध्याच्या राजकारणात चार आणे, आठ आणेवाल्यांची भरमार आहे.

देशात लोकसभा निवडणूका येऊ घातल्या आहेत. निवडणूका जिंकण्यासाठी सर्वच पक्ष आपापल्यापरीने कामाला लागले आहेत. त्यात आघाडीवर आहे ती भा.ज.प. (पार्टी), मोदींनी संकल्प केला आहे की, ‘अबकी बार, चारसों पार.' आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी मोदी, शहांसह संपूर्ण भाजप वाले ‘साम, दाम, दंड, भेद' याचा सर्रास वापर करू लागले आहेत. भाजपकडे, सी.बी.आय, आय.टी. सह ई. डी. ची संपूर्ण टीम आहे. साथीला निवडणूक आयोग, व काही प्रमाणात न्यायालयेही आहेत. या मोठ्या जाळ्यात विरोधी पक्षातले घोटाळेबाज मोेठे मासे अडकले आहेत व काही अडकण्याच्या मार्गावर आहेत.

गेल्या काही वर्षापासून मोदी सरकारने, तोड-मोडीचे राजकारण करून अनेक विरोधी पक्षांची सरकारे पाडली व तेथे आपल्या पक्षाचे सरकार स्थापन करत, देशातील संपूर्ण सत्ता आपल्या एकाधिकारात आणण्याचा प्रयत्न चालवला आहे आणि त्यात त्यांना चांगले यशही मिळत आहे. भ्रष्ट व सत्तापिपासू लोक प्रलोभनाला बळी पडत आहेत तर काही भ्रष्ट मार्गाने मिळवलेली संपत्ती टिकवण्यासाठी भाजपात प्रवेश करत आहेत.

मोदी सरकारने नारा दिला होता की, देशातील भ्रष्टाचार संपुष्ठात आणला जाईल. बेरोजगारांना रोजगार दिला जाईल. बेघरांना घरे दिली जातील. महिलांना सशवत केले जाईल. काळा पैसा बाहेर काढला जाईल व त्यातून प्रत्येक नागरिकाला किमान १५ लाखाचा लाभ होईल. त्यातूनच त्यांनी मोदींनी ‘नोट बंदी' कायदा करून, गोर गरिबांच्या बचतीवरच घणाघात केला. त्यामुळे सर्वच जण अडचणीत आले. छोटे-मोठे धंदे बंद पडले. मध्यम कारखाने बंद पडले, किरकोळ दुकाने बंद पडण्याच्या मार्गावर गेले व काही बंदही पडले. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट रसातळाला गेले. देशात महागाईने उच्चांक गाठत, सर्वसामान्यांना जगणे दुश्वार झाले. तरीही मोदी सरकार म्हणते देशाची अर्थव्यवस्था फार सुधारली आहे. देशाने फार मोठी प्रगती केली आहे. जगात देशाचा बोलबाला होत आहे. वगैरे-वगैरे, पण ह्या सर्व गोष्टी कागदावरच आहेत. प्रत्यक्षात व्यवहारात त्याचा प्रत्यय कुठेही येत नाही. उलट शेतकऱ्यांना आपल्या मागण्यांसाठी पुन्हा पुन्हा आंदोलन करावे लागत आहे. आंदोलनकारी शेतकऱ्यांवर पोलिसी लाठी चार्ज, अश्रूधूरांच्या नळकांड्यासह पाण्याच्या फवाऱ्याचा मारा करण्यात येत आहे. बाया-बापड्यावरील अत्याचार सतत वाढत आहेत. अबोल भ्रष्टाचार वाढला आहे. काळ्या पैशाच्या वाटा निर्माण केल्या जात आहेत. त्यात प्रामुख्याने ‘निवडणूक बाँड'चे नाव घेता येईल. या माध्यमातून मिळणाऱ्या पैशाचा हिशोब ना घ्यायचा ना द्यायचा. दुसरे म्हणजे त्यात पैसे देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाते. त्यात पैसे कोणी कोणाला दिले हे ही गुप्तच राहते. त्यामुळे असे पैसे देणारी मंडळी गुमनाम राहतात. त्यांना त्यावर कसलाही कर भरावा लागत नाही. त्यामुळे मोठे धनदांडगे देशाचा कर बुडवून त्यातून बाँड खरेदी करतात व आपला अधिक फायदा करणाऱ्याला त्यात बॉडच्या माध्यमातून पैसा पुरवतात. त्या बदल्यात सरकारकडून अधिक लाभ देणारी कामे करवून घेतात. गत पाच सहा वर्षात या बाँडच्या माध्यमातून भाजपला चांगलाच लाभ झाला आहे. तर काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र या दोहोतील तफावर चार-साडेचार हजार कोटीची आहे. या अगणित पैशाच्या जोरावर आमदार-खासदारांचा घोडेबाजार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यातूनच सत्ता-पालटाचे प्रकार होत आहेत; याची दखल घेऊन देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने या बॉडस्‌वर बंदी घातली आहे. ही बंदी भाजपाच्या जिव्हारी लागली आहे. कारण न्यायालयाने वर्मावरच घाव घातला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून विविध पक्षांतील बरीच मंडळी भाजपवासी झाली आहे. काहींच्या हालचाली चालू आहेत. मात्र आपली पक्ष सोडण्याची कारण मिमांसा करताना ते आपल्या कार्यकर्त्यांसह मतदारांनाही मुर्खात काढण्याची भाषा वापरत आहेत. आपल्या इमानदारीचा ढोल बडवीत आहेत. आपण पक्ष सोडणार नसल्याचे सांगून काही काळ गप्प बसतात आणि मग अचानक पक्ष बदलून मोकळे होतात. पण जनता आता भोळी भाबडी राहिलेली नाही. त्यांना माहित आहे की, या महाशयांनी घोटाळे करून आपली वखार भरून घेतलेली आहे व ती जपण्यासाठी पलटी मारली आहे. ही मंडळी आपला सभ्यपणा लोकांपर्यंत पोचवण्यासाठी काही बगल बच्च्यांना पैसे पुरवून प्रचाराला लावतात व आपल्या नेत्यांचे गुणगाण करतात. जेणेकरून आपल्या पलटूराम नेत्याला पाठीशी घालतात. याला म्हणतात ‘वारा येईल, तशी पाठ फिरविणे' किंवा मौसम पाहून रंग बदलणे. खरं तर पलटू रामांची मजा औरच असते. सापसुध्दा डसला की, पलटी मारून आपले विष सोडतो. तसाच पलटी मारणारा नेता घरात घुसतो; पण पक्षाच्या प्रववत्यांना व पक्षाच्या कार्यकर्त्यांना जनतेचे बोलणे ऐकावे लागते. जनतेकडून अपमान सहन करावा लागतो. पलटीराम नेते आपल्या जून्या ववतव्याला पुसून टाकून देण्याचे काम काही दिवस करतात. आपल्या जुन्या सर्व पोस्ट डिलीट करण्याचे काम करतात. टि्‌वटरवरील व सोशल मिडियावरील, फेसबुकवरील सर्व पोस्ट डिलिट करण्याचे काम करतात. त्यासाठी खरं तर सोशल मिडियाने एक नियम करायला हवा की, पलटी मारणेवाल्याच्या गिरगिटी नेत्यांच्या जून्या पोस्ट डिलिट होऊ देऊ नयेत.

पलटीराम नेत्यांना लॉलीपॉप देण्याची जुनीच रित आहे, पण आता रत्नांचा पुरस्कार देण्याची प्रथा सुरू झाली आहे. कोणाला भारत रत्न, कोणाला कोणते रत्न तर कोणाला काही खास पदवी देऊन सन्मानित करण्याचा प्रघात सुरू झाला आहे आणि मग साहजिकच आहे की, उपकाराची फेड उपकारानेच करावी लागणार, हे प्रत्येकालाच वाटते. पण सध्या त्यातही बदल झालेला आहे. सध्या उपकाराची परतफेड, अपकाराने केली जात आहे. ज्याच्या जिवावर मोठे झाले, त्यालाच पालथे पाडू लागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एक म्हण होती ‘ज्याचे खावे मीठ, त्याचे करावे नीट' पण सध्या त्या जागी दुसराच वाकप्रचार प्रचलित होऊ घातला आहे. ‘ज्याची खावी पोळी, त्याच्या हाती द्यावी झोळी.' अशी नेते मंडळी आज दुसऱ्याला धोका देऊन तुमच्याकडे येतात ती उद्या तिसऱ्याकडे जाऊन तुम्हाला धोका देणार नाहीत का? देशात सध्या पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत, उपकारच उपकार आहेत, आणि उपकाराची परतफेड अपकाराने करणारेही खूप आहेत. ‘आज इथे तर उद्या तिथे'. ही परंपरा सुरू झाली आहे. हिंदीत म्हटलेच आहे की, दिल हारनेवाला व्यवित बेइज्जती भूल जाता है और बेशर्म हो जाता है. पलटी मारणाऱ्याला एकच अट असते ती ‘बेशर्मी'.  पलटी मारण्यामुळे फायदा खूप होतो तो धनसंपत्तीने लोटपोट होतो, मात्र इज्जतीच्या बाबतीत तो भिकारी होतो. त्याला जनमानसात कवडीचेही मोल रहात नाही.

म्हणतात ना सध्या आमदनीअठन्नीऔर खर्चा रूपय्या किंवा ‘बाप बडा ना भैया, सबसे बडा रूपय्या'. २०११ पासून चार आणे, आठ आणेची नाणी बंद झाली. पण सध्याच्या राजकारणात चार आणे, आठ आणेवाल्यांची भरमार आहे. काही नेते दावा करतात की आम्ही काही चवली पावली नेते नाहीत की आम्ही आमिषाला बळी पडू आणि पक्ष बदलू अशीच मंडळी पलटी मारतात तेव्हा लोकांना कळते की, ही मंडळी चवली-पावलीचीच आहेत, मात्र मुखवटा रूपयाचा लावतात. आता तर १००० दोन हजाराच्या नोटासुध्दा बंद झाल्यात; अशात या चवली-पावलीवाल्यांचे काय घेऊन बसलात.

पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयीनी एकदा म्हटले होते की, आपल्या देशात कोणताही खासदार, आमदार आपल्या राजनितीची किंवा राजकीय कारकिर्दीची सुरूवात खोट्यापासूनच करतो. त्याची रूवात तो लोकांना खोटी आश्वासने देतो, निवडणूक आयोगाकडे खर्चाचे खोटे पूरावे दाखल करतो, खर्चाचे बिले कमी दाखवून प्रत्यक्षात भरमसाठ खर्च करतो. खऱ्या खर्चात तो निवडणूक लढवूच शकत नाही. ही त्याची मजबूरी असते. जिथे तो पहिल्याच टप्प्यात खोटे बोलतो, वागतो तो दुसऱ्या वा तिसऱ्या टप्प्यात खरे कसे वागणार? मग ते कोणत्याही पक्षाचे का असेनात. पण सध्या एकाच पक्षाकडे पैशाची रेलचेल आहे आणि तो म्हणजे ‘भाजप' बाकी सगळे चवन्नी अठन्नीवाले आहेत. तेव्हा कोणीही जिकडे माल तिकडे चाल करताना दिसत आहे. त्यामुळे निवडणूक आयुवतसुध्दा  दावणीला बांधले गेल्याची भावना जनमानसात उमटत आहे. जनमानसाला अपेक्षित असते की, आचार संहिता लागल्यावर परिस्थितीत बदल होईल; पण तसे होतांना दिसत नाही. निवडणूक आयोगाची स्थिती ‘बिगरदातवाल्या वाघा'सारखी झाली आहे. तो लचकाही तोडू शकत नाही आणि डरकाळीही मारू शकत नाही. अशी केविलवाणी अवस्था स्वतः निवडणूक आयोगाने करून घेतली आहे. ही सर्व यंत्रणा जनतेच्या घामाच्या पैशावर जगते आणि नाच मदाऱ्या बरोबर करते. त्याला चवन्नी-अठन्नीवाले पलटूराम टाळ्या वाजवून साथ देताना दिसतात.
जनतेने सावध होण्याची गरज आहे. चवन्नी-अठन्नीवाल्यांना बाद करण्याची वेळ आलेली आहे. - भिमराव गांधले 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

नड्डाजी, उत्तरं तर द्यावीच लागतील...