रेडिओवरील आवाजाचा जादूगार हरपला

अमीन सायानी यांनी केवळ निवेदन केले नाही; तर अनेक गायक, गीतकार संगीतकार यांना मुलाखतीच्या निमित्ताने बोलते करून त्यांच्या गाण्यांचा सृजनशील प्रवास ध्वनिमुद्रित केला. रेडिओवर १९५२ साली सुरु झालेल्या ‘गीतमाला' या कार्यक्रमाने अमीन सायानी यांना प्रसिद्धीची शिखरावर नेऊन ठेवले. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी होती की, रेडिओच्या ऑफिसमध्ये अमीन सायानी यांच्यासाठी दर आठवड्याला जवळपास ६५ हजार पत्रे यायची. अमीन सायानी यांनी जवळपास १९ हजार जिंगल्सना आवाज दिला होता. त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस'मध्ये झाली होती.

मागील पिढीतील सुप्रसिद्ध रेडियो निवेदक, जादुई आवाजाचा शहेनशहा आणि ‘बिनाका गीतमाला', बोर्नव्हिटा क्विज कॉन्टेस्ट'चे सूत्रसंचालक तसेच  शैलीदार आणि रसाळ निवेदनाने संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेले ज्येष्ठ निवेदक अमीन सायानी यांचे मंगळवारी (२० फेब्रुवारी) रात्री रुग्णालयात निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. सायानी यांना मंगळवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने एच. एन. रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 मुंबईत १९३२ साली जन्मलेल्या अमीन सायानी यांनी इंग्रजी भाषेत निवेदक म्हणून आकाशवाणीवर कारकिर्दीला सुरुवात केली होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी हिंदी भाषेत निवेदन करण्यास सुरुवात केली आणि आपल्या गोड आवाजात अस्खलित हिंदी भाषेत निवेदन आणि गाण्यांचे किस्से ऐकवत बिनाका गीतमाला हा कार्यक्रम लोकप्रिय केला.
  १९५२ ते १९८८ या ३६ वर्षांच्या कालावधीत अमीन सायानी यांनी आकाशवाणी ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य केले. सुमारे पन्नासहजारपेक्षा जास्त रेडियोचे कार्यक्रम करणारे अमीन सायानी यांचा आवाज अजूनही श्रोत्यांच्या मनात गुंजत आहे. त्यांना विसरणे शक्य नाही.

अमीन सायनी यांनी ‘बहनों और भाईयो, अगली पायदानपें है ये गाना असे म्हणत अनेक वर्षे रेडिओवर बिनाका गीतमाला सादर केली. शैलीदार आणि रसाळ निवेदनाने ते संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनले. त्यांच्याकडूनच ऐकलेले एक से एक किस्से हा रसिकांच्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहे. ‘बिनाका गीतमाला' या त्यांच्या कार्यक्रमाने तेव्हाचे लोकप्रियतेचे सर्व मापदंड मोडीत काढले होते. प्रत्येक आठवड्याला रेडिओप्रेमी त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आसुसलेले असत.

 रेडिओवर १९५२ साली सुरु झालेल्या ‘गीतमाला' या कार्यक्रमाने अमीन सायानी यांना प्रसिद्धीची शिखरावर नेऊन ठेवले. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी होती की, रेडिओच्या ऑफिसमध्ये अमीन सायानी यांच्यासाठी दर आठवड्याला जवळपास ६५ हजार पत्रे यायची. या गाण्याच्या कार्यक्रमात सुरुवातीला फक्त ७ गाणी होती. ही संख्या नंतर १६ पर्यंत वाढवण्यात आली. त्यावेळी अमीन सायानी दिवसाला १३ तास काम करायचे. त्या दिवसांची आठवण सांगताना अमीन सायानी यांच्या मुलाने सांगितले की, रविवार सोडून मला वडील कधीच भेटायचे नाहीत. ते त्यांच्या स्टुडिओमध्ये कामात असायचे.

अमीन सायानी यांनी केवळ निवेदन केले नाही; तर अनेक गायक, गीतकार संगीतकार यांना मुलाखतीच्या निमित्ताने बोलते करून त्यांच्या गाण्यांचा सृजनशील प्रवास ध्वनिमुद्रित केला. अमीन सायानी यांनी जवळपास १९ हजार जिंगल्सना आवाज दिला होता. त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस'मध्ये झाली होती.
 ‘मैं समय हूँ' हा महाभारत मालिकेतील त्यांचा आवाज आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. अमीन सायानी यांच्या नावावर तब्बल ५४ हजारांपेक्षा जास्त रेडिओ कार्यक्रमांची निर्मिती/कम्पेअर/व्हॉईसओव्हर करण्याचा विक्रम आहे. जवळपास १९ हजार जिंगल्सना त्यांनी आवाज दिला आहे. यासाठी त्यांच्या नावाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌समध्ये करण्यात आली आहे. त्यांनी भूत बंगला, तीन देवियाँ, कत्ल यांसारख्या चित्रपटांमध्ये निवेदक (अनाऊंसर)  म्हणून काम केलं होतं. रेडिओवर सेलिब्रिटींवर आधारित त्यांचा शो ‘एस कुमार्स का फिल्मी मुकादमा'  खूपच लोकप्रिय झाला होता.

१९५२ ते १९९४ इतका दीर्घकाळ चाललेला हा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून गीतमालाची नोंद झाली आहे. मला गायनाचं अंग नव्हतं, ती कसर मी भरपूर गाणी ऐकून भरून काढली, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. अमीन सायानींनी सांगितलं होतं, ‘माझ्या भाषेवर अनेक भाषांचे संस्कार आहेत. मी अशा घरात जन्माला आलो जिथे विविध भाषा बोलल्या जात होत्या. माझे वडील फारसी भाषा शिकले होते. तर आई गुजराती, हिंदी आणि इंग्रजीत संवाद साधायची. मी लहानपणी गुजरातीत बोलत असे. कारण माझी आई महात्मा गांधींची शिष्य होती. हिंदी आणि उर्दू भाषा बोलायची आहे हे जेव्हा समजलं तेव्हा मी काहीसा घाबरलो होतो. खूप विचार करुन मी स्वतःला या सगळ्यासाठी तयार केलं. हळूहळू प्रेक्षकांशी संवाद साधताना मी भाषा सुधारू शकलो.' असे हे अमीन सायानी नंतर रेडिओवरील आवाजाचे शहेनशाह झाले होते. त्यांचे प्रत्यक्ष आडनाव ‘सायानी' असे होते. सर्वजण चुकून ‘सयानी' असा उल्लेख करीत असत. त्यांची मुलाखत घेताना प्रथमच त्यांनी हे स्पष्ट केले की लोग अक्सर मेरे नाम मे गलती करते हैं. मेरा नाम सयानी नहीं, सायानी है. उसे आप सही लिखिये.

आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. मात्र आयुष्य समृद्ध करणारी भेट हा अवलिया आपल्याला न मागता देऊन गेलाय यात शंकाच नाही. रेडिओवरील आवाजाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखल्या गेलेल्या अमीन सायानी यांच्यासारखा निवेदक पुन्हा झाला नाही. ‘या सम हाच' अशी प्रतिभा असलेला एक अस्सल कलावंत आवाजाचे गारुड आपल्या मनावर  ठेवून आपल्यातून निघून गेला.   - शिवाजी गावडे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पंचनामा