त्रुटी आणि दोष टाळून मराठी साहित्य संमेलन ग्रंथोत्सव झालाच पाहिजे..!

साहित्य जगतात वेगवेगळ्या साथीची लागण झाल्याचे अनेकांकडून सांगण्यात येत आहे. कळतंय पण वळत नाही, यास जबाबदार कोण? तरीही साहित्य संमेलन तीनऐवजी दोन दिवसांचे करून आर्थिक बाबीं नियंत्रित करता येतील. शासकीय लोक मंचावर नसावेत हा विचार ठीक वाटत नाही. लक्ष दिले गेले पाहिजे ते पुस्तक विक्री केंद्र कसे चालू शकेल? माझ्याप्रमाणेच इतर अनेक लोक घर बसल्या संमेलन पाहू शकतात; पण पुस्तक खरेदी करण्याचा आनंद फार वेगळा आहे.

सरकारी खजिन्यातून चिमूटभर पैका जर का मराठी भाषेच्या उत्सवासाठी खर्च केला जात असेल तर तो नक्कीच सर्वांना स्वीकार्य असेल. मिळालेला निधी खर्च कसा करायचा किंवा त्याची एकूण दिशा कशी असावी हा अभ्यासाचा विषय असू शकेल.

कोरोना काळापूर्वीच्या एका साहित्य संमेलनात तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख होते. साहित्य संमेलनास कुणी यावे व व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे हा वादाचा विषय असावा म्हणूनच कदाचित सन्माननीय मंत्री महोदयांनी तिन्ही दिवस संमेलनास हजेरी लावली; मात्र त्यांनी व्यासपीठावर खुर्चीत जाऊन बसण्याचे टाळले. पत्रकारांनी या बदलाची नोंद घेत पेपराचे रकाने रंगवले. प्रश्न असा येतो की साहित्यिक संमेलनासाठी लागणारा पैसा हा सरकारच्या तिजोरीतून येतो, अर्थातच अर्थ आणि मुख्यमंत्र्यांच्या लिखित परवानगीशिवाय ते शक्य होत नाही. सांस्कृतिक मंत्री हे पूर्ण जबाबदारीने हा सोहोळा उत्स्फूर्तपणे पार पडावा ह्याची खात्री करूनच त्यांस अनुमती दिली जाते. सध्या विषय कुठलाही असो, समस्या कोणतीही असू दे, त्याचे गणिती प्रमाण जे मिळेल ते पैश्यातच मिळणार.

सुमारे वीस वर्षांपूर्वीची एक लाईव्ह मुलाखत आठवते. दूरदर्शनवर माझी मुलाखत घेण्यात आली होती. अस्मिता वाहिनीवर ‘आजचे पाहुणे' या सदरात मी बोलत होतो. मराठी साहित्य संमेलने व्हावीत का? अर्थातच त्यांस ‘हो' असेंच उत्तर होते. पुढे उत्तरात थोडे विस्तारित भाष्य करणे आवश्यक वाटले म्हणून एक जाहीर विचार देण्याचा प्रयत्न केला होता. अर्थातच तो विचार अर्थ याच्याशी सलग्न होता. म्हणूनच नामवंतांनी त्यावर भाष्य करण्याचे टाळले. त्यावर चर्चा व्हावी, उत्तर सापडेल असेच म्हणालो...‘साहित्य संमेलनाकरिता शासनाकडून आर्थिक मदत घ्यायची टाळावी. आणि मगच संमेलनाच्या व्यसपीठावर कुणी बसू नये ते जाहीर करावे.'

राज्याच्या सांस्कृतिक खात्यातून आर्थिक सहकार्य घ्यायचे आणि संमेलनात राजकीय हस्तक्षेप होत आहे अशी हलक्या स्वरांत टीकाही करायची, हे कुठेतरी न पटण्यासारखे वाट्‌ते.  याला अपवाद असू शकतात. पण सत्ता, राजकारण, पैसा यामुळे मिळवलेले वैभव सहज दुर्लाक्षित करण्यासारखे नसते. शासकीय यंत्रणेला दोष देऊन आपले घोडे रेटण्याची सवय साहित्य क्षेत्रात दिसते. असे याआधी अनेकांच्या बोलण्यातून आले आहे. एका संमेलनात तर चक्क गोल्फ कारने मान्यवरांना व्यासपीठापर्यंत नेण्यात आले होते. हा खर्च टाळता आला असता.

अलिकडे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घरबसल्या संमेलन पाहता किंवा अनुभवता येऊ शकते. स्थानिकांना डावलून परगावातून आलेल्या साहित्यिकानां जास्त संधी दिली जाते, हा प्रकार देखील ठीक नव्हे.

मंत्रिमंडळ सदस्य किंवा इतर विधायक जर का सभामंडपामध्ये येत असतील तर त्यांचे स्वागत करावेच लागेल. त्यांचे मराठीतील काही आवडते लेखक कवी असू शकतात. त्यांना सोहोळ्यात भेट घेता येऊ शकते. काही पुस्तके विकत घेऊ शकतात. क्षणिक का होईना व्यासपीठावर बोलावून शाल श्रीफळ दिल्यास काय वाईट होणार?
योगायोग असा की याच महिन्याच्या प्रारंभी ९७ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा. डॉ. शोभणे साहेबांची एका साहित्यिक कार्यक्रमात भेट झाली. फोटो त्यांच्या परवानगीने काढला. आधुनिक डिजिटल माध्यमांवर शेअर केले. साहेबांनी आपल्या भाषणात अनुभव कथन केले. सध्या इंटरनेटवर बरेच ग्रुप्स ॲटिव्ह असतात; पण त्याहीपेक्षा वेगळ्या अर्थांने लोक प्रचंड प्रमाणात ग्रुप्समध्ये व्यस्त दिसतात. त्यांनी याविषयीं चिंता व्यक्त केली. राज्यात राजकीय क्षेत्रात बऱ्याच प्रमाणात घडामोडी होतांना दिसतात. ते त्यांचे क्षेत्र आहे; पण साहित्य क्षेत्रात एव्हढ्या प्रमाणात काही लोक कात्री घेऊन असतात की आपल्याला नको असलेल्यांची नावे कटाप कशी करता येतील ह्याचीच काळजी लागलेली दिसते. हा प्रकार स्वतः सन्माननीय संमेलनाध्यक्ष बोलून गेलेत. मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांची आहे. सध्याच्या सरकारने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये १ली ते १०वी पर्यंत मराठी विषय अनिवार्य केला आहे, ते स्वागतार्हच आहे.

अलिकडेच ‘सावाक' म्हणजेच सार्वजनिक वाचनालय, कल्याण या वास्तूत श्री. भिकू बारस्कर यांनी माहिती दिली की वाचनालय केवळ एकाच ठिकाणी नसून त्याच्या पांच शाखा सुरू कराव्या लागल्या आहेत! ही एक आनंदाची बातमी आहे. वाचक  इंटरनेट आणि आपापले गॅजेट्‌स दूर करून पुस्तक वाचण्यांकडे लक्ष देऊ लागले आहेत. अशीच एक बातमी कोविड पूर्वीच्या एका साहित्य संमेलनाच्या नंतर पेपरात छापून आल्याचे आठवते. सुमारे पावणे दोन कोटी रुपयांची पुस्तक विक्री तीन दिवसांत झाल्याची त्यांत नोंद होती. मोबाईल, लॅपटॉप, काँप्युटर इत्यादी मुळे दैनिक पेपर, साप्ताहिक, मासिक तसेच वार्षिक अंकांचे वाचक कमी कमी होत गेले आणि यामुळे अनेक अंक आज बंद पडले आहेत...वाचक नसल्याने! हळूहळू परिस्थितीत बदल जाणवत आहे. लोक वाचन करु लागले आहेत. सिनेमा जगत काहिसे भरकटले गेल्यागत वाटल्याने मराठी नाटक जगतास फुलोरा जास्त जाणवत आहे.

साहित्य जगतात वेगवेगळ्या साथीची लागण झाल्याचे अनेकांकडून सांगण्यात येत आहे. कळतंय पण वळत नाही, यास जबाबदार कोण? तरीही साहित्य संमेलन तीनऐवजी दोन दिवसांचे करून आर्थिक बाबीं नियंत्रित करता येतील. शासकीय लोक मंचावर नसावेत हा विचार ठीक वाटत नाही. लक्ष दिले गेले पाहिजे ते पुस्तक विक्री केंद्र कसे चालू शकेल? माझ्याप्रमाणेच इतर अनेक लोक घर बसल्या संमेलन पाहू शकतात; पण पुस्तक खरेदी करण्याचा आनंद फार वेगळा आहे. एकदा तर माझी भेट  संगीतकार कौशल इनामदार यांच्याशी झाली. त्यांनी लिहिलेले पुस्तक मी खरेदी तर केलेच; शिवाय त्यांची त्या पुस्तकावर स्वाक्षरीसुद्धा घेतली. हा आनंद शब्दात नाही व्यक्त करता येणार. पुण्यात एका संमेलनात ईलाही जमादार भेटले, गुलजार यांना जवळून पाहता आले, त्यांना ऐकू शकतो. राजन खान यांची भेट झाली. कवयित्री सीमा गांधी यांची भेट झाली. काहींची नावे आता आठवत नाही. पण असा ग्रंथोत्सव झाला पाहिजे. ज्यामुळे अनेकांच्या गाठी भेटी होऊ शकतात. ओळखी झाल्या, की माय मराठी किती दूरवर पोहोचली आहे, त्याची जाणीव होते. खानपानाचे विश्व कळते.

अर्थ ही समस्या नाही, समजून घेण्याची आवश्यकता आहे. हा एक विषय नक्कीच आहे त्यावर मान्यवरांनी लक्ष द्यावे, हिच अपेक्षा. -इक्बाल मुकादम 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

ज्ञानाच्या पीठाची दिव्यदृष्टी...!