खलनायक.. एक प्रवृत्ती

क्रूरता म्हणजे पाप वगैरे काही नाही हा गोड समज पसरवण्यात हिंदी सिनेमाचे योगदान नाकारता येत नाही. आतां तर त्याची पूर्ण वाट चुकलेलीच आहे, म्हणून तर आजचा सिनेमा तीनशे पाचशे कोटीचा व्यवसाय करत असावा. मागणी तसा पुरवठा! आजच्या सिनेमातील वाईट प्रवृत्ती ही वाईट म्हणून दाखवली जात नसून, चलता है...अशी समजूत किंवा तरतूद केली जाते. यांस शोकांतिका म्हणावे का? ही मनोरंजनाच्या नावे केली गेलेली प्रेक्षकांची लूट होय, असं नाही वाटत कुणाला?

‘हीर-रांँझा' नामक उर्दू पोएटिक सिनेमा मुंबई येथील लिबर्टीत पाहिल्याचं आठवतंय. यांतील प्रेमाच्या पावित्र्याचा एकुणच जबरदस्त कथानक लाभलेला हा सिनेमा त्याकाळी ज्युबिली वगैरे झाला नसला तरीही त्यांतील सिनेमॅटिक वेगळेपणामुळे उर्दू शायरीवर अपार प्रेम करणाऱ्यंाना तो म्युझिकल सिनेमा खूपच आवडला होता. या सिनेमाचे दिगदर्शक होते चेतन आनंद. हे त्यावेळचे सुविद्य दिगदर्शक. कायम प्रायोगिक कलात्मकता हा त्यांच्या सिनेमाचा गुण समजला गेला. एकेकाळचे नाट्यमयतेत प्रविण असलेले सोहराब मोदी यांनी सुद्धा काही अंशी अशाच पद्धतीने सिनेमात उर्दू शायरीचा ठासून वापर करायचे. पण संपूर्ण सिनेमाच पोएटिक अंदाज मध्ये शूट करण्याचे धाडस हे केवळ चेतन आनंद यांनीच दाखविले. हे सांगण्याचा मूळ उद्देश असा की त्या रोमँटिक पोएटिक सिनेमातील   खलनायक प्राण यांना देखील खडूस संवाद शायरीतच देण्यांत आलेत! विशेष म्हणजे असे संवाद ज्यांनी  लिहिले ते त्यावेळचे महान  शायर कैफी आझमी यांनी ! गाण्याव्यतिरिक्त संपूर्ण फिल्मचे संवाद एका शायरने काव्यमय रुपात लिहिण्याची ती कदाचित हिंदी सिनेमातली पहिलीच वेळ असावी. संपूर्ण स्क्रिप्ट ही पद्य रूपात लिहून त्यावर राजकुमार, प्रिया राजवंश यांना नायक-नायिका घेऊन तीन तासाचा सिनेमा तयार करणे किती कठीण गेलं असेल...!

मूळ विषय आहे  हिंदी सिनेमातील ‘खलनायक'!  प्राण यांनी स्वतः सांगितलेला एक अनोखा  किस्सा असा की ..खलनायक म्हणून त्यांना पाहताक्षणी शिव्या देणारे प्रेक्षक, हिच खरी त्यांच्या कामास मिळालेली पोचपावती होय. पुरस्कार होय! पडद्यावर तसेंच ऑफ स्क्रीनवर प्राण यांच्या खलनायकी प्रवृत्तीचा खूपच बोलबाला असायचा. सिने रसिक घाबरायचे, त्यांचा दरारा इतका जबरदस्त होता की, किसी माँ ने अपने लाल का नाम आजतक प्राण नही रखा..! हे वाक्य स्वतःच्या कर्तबगारी विषयी प्राण आवर्जून सांगायचे. याला म्हणतात साहस! हिंदी सिनेमात अनेकांनी खलनायकी पात्र करण्याचे खरे-खोटे प्रयत्न यापूर्वी केलेत. त्यात काहींना यश मिळालं तर काहींनी रूळ बदलून गाडी पुढे नेली. विनोद खन्ना, शत्रूघ्न सिन्हाही उदाहरणं सहज देता येतील.

नंतर आला शोले नामक सिनेमा. शोलेचा खलनायक हा पाच वर्ष खूप म्हणजे खूपच गाजला. त्यातली क्रूरता ही समाजातील नवपिढीस अचानक का व कशी काय आपलीशी वाटली? देव जाणो. दुधात, औषधात खाद्यपदार्थात भेसळ पूर्वी व्हायची; पण त्याचं प्रमाण आजच्यापेक्षा खूपच कमी असेल. आज तशी भेसळ केल्यास, करणाऱ्या दानवास आपण शोलेतला महाखलनायक झालो  असल्याची जाणीव त्याची त्यालाच होत असावी व समाजात तशी  दाद मिळत असावी असा भ्रम त्यांस व्हावा! आज समाज इथवर खालावला आहे, हे सारेच मान्य  करतील. अर्थातच अशा घटनांना केवळ सिनेमा जबाबदार आहे असं नाही. त्याची कारणं  अनेक असतील. पण क्रूरता म्हणजे पाप वगैरे काही नाही हा गोड समज पसरवण्यात हिंदी सिनेमाचे योगदान नाकारता येत नाही. आतां तर त्याची पूर्ण वाट चुकलेलीच आहे, म्हणून तर आजचा सिनेमा तीनशे पाचशे कोटीचा व्यवसाय करत असावा. मागणी तसा पुरवठा

प्राण यांचा खलनायक मनोरंजक असायचा. त्यांचे अनेक सिनेमे आहेत, प्रत्येक सिनेमात त्यांची बोलण्याची लकब, कपडे, चाल, वागण्याची स्टाईल इतरांपेक्षां फार वेगळी असायची! दिलिप कुमार, शम्मी कपूर यांच्या हातीं मार खाऊन (अर्थातच पडद्यावर) शेवटी पोलिसांसमोर गुडघे टेकणारा प्राण वेगळा आणि....जॉय मुखर्जी तसेच विश्वजीत या त्या काळातल्या चॉकलेट  नायकांच्या हातून प्राण सारख्या रद्दड आणि तगड्या गड्याने मार खायचा, प्रेक्षकांनाच काय, तर खुद्द प्राण यांसही ते पटत नसेल पण काय करणार? कारण ती स्क्रिप्टची गरज होती, म्हणूनच! दुष्टपणाची अदाकारी स्वीकारतांना मनोरंजन महत्वाचे, क्रूरता नव्हे! प्राण यांनी काम केलेला अदालत या सिनेमातला खलनायक आजवरचा अतिशय ओरिजिनल व्हिलन असावा. असे बहुतांश सिनेशौकिनांचे मत आहे. नर्गिस या गुणी नायिकेचा तो सिनेमा! स्त्रीप्रधान असला तरी प्राणचा त्यांतील खलनायक सहज विसरता येणे शक्य  नाही. आतल्या आत का कुणास ठाऊक प्राण या कलावंताला  त्या भूमिकेसाठी अनेक शिव्या सहन कराव्या लागल्या असतील. ती भूमिका प्राण साहेबांची खलनायक म्हणून गाठलेली अंतिम उंची असावी!! ही अतिशयोक्ती नसावी. ज्यांना प्राण एक कलाकार म्हणून आवडत असतील त्यांनी अदालत सिनेमा पुन्हा एकदां जरूर पहावा.

प्रेम चोप्रा हा प्राण असतानाच चमकलेला एक आधुनिक.. पण मखमली देखणा खलनायक. खूप गाजला, पण प्राण असेपर्यंत इतर सारेच खलनायक ती उंची नाही गाठू शकले! मदन पुरी, अमरिश पुरी हे त्यांच्या देहबोलीनेच कमालीचे    खलनायक म्हणून शोभले आणि तितकेच गाजलेही. मात्र त्यांनी  केवळ एकाच वलयात स्वतःला गुरफटून न घ्ोता इतर काही हलके-फुलके रोलसुध्दा अधूनमधून स्वीकारले. एक कलावंत म्हणून हा त्यांच्या मनाचा मोठेपणा म्हणावा. पण प्राण नामक खलनायकासमोर आजही दुसरा कलाकार साधा स्पर्शही करून जात नाही. कारण त्यांच्यातली खलनायकाची छबी समाजमनावर कायमची पडली ती शेवटपर्यंत अबाधित राहिली. जशा शशिकला आणि ललिता पवार या दोन स्त्री कलाकार प्रेक्षकांतील आयाबहिणीच्या शिव्या त्या कायम सोसत राहील्या. कौटूंबिक घरफोडीच्या त्या दोघीही त्याकाळी जेसीबी होत्या. एखाद्या घरावर नांगर फिरवायचा म्हटल्यावर तो ह्या दोघींनी फिरवलाच म्हणून समजा. त्याजागी आता रोलर आलेत; पण ज्यास्त वजनी ललिता पवार-शशिकला ह्याच सिद्ध झाल्या.
त्यानंतर सिनेमा पुन्हा स्त्रीप्रधान झालाच नाही. काही अपवाद सोडल्यास! नायक तोच खलनायक आणि बाकी सर्व पानीकमवाले किंवा कडीपत्तावाले! आतां मनोरंजनाचा दृष्टिकोन पार बदलून गेला. ँी्‌स्ीह फेम गुलशन ग्रोव्हर हा तसा सुशिक्षित कलाकार पण त्यांनी सादर केलेला खलनायक हा काहीसा तिरकस, चक्रम पण मनोरंजक वाटत असे. सदमा, राम लखन मधील त्याची खलनायकी अदाकारी ख्यात पावली. मात्र अलीकडेच एका पत्रकार परिषदेत स्वतःचंच काय इंडस्ट्रीतील बहुतांश खलनायकांचे करियर संपुष्टात आलंय, असं तो सांगून गेला. हल्ली नायक आणि खलनायक यातील फरकच धूसर झाला आहे. कारण समाजातील खलनायकी प्रवृत्तीकडे अभ्यासपूर्ण कुणी सिनेमा लेखक पहातच नाहीत. शोलेतला गब्बर हा  हा क्रूर खलनायक म्हणून जबर गाजला असला तरी त्याच्या क्रूरतेचं एकूणात समर्थन केल्यागत त्या प्रवृत्तीला प्रसिद्धी लाभली हे खरं असेल का? त्या सिनेमाच्या संगीतापेक्षा त्यांतील केवळ आणि केवळ गब्बरचे संवाद गाजलेत. त्याच्या ऑडिओ कैसेट्‌सच्या विक्रीने कमालीचा उच्चांक गाठला असेल. वाईट प्रवृतीचा इतिहास व्हावा व समाजात त्यांस कायम लोकप्रियता मिळत रहावी हा वरवर पाहता मनोरंजक विचार असला तरी समाज किती झपाट्याने क्रूरतेकडे वळतोय, हे ध्यानी येईल. जे घातक आहे.

तसेंच शाकाल हे एक खलनायकी  पात्रसुद्धा त्याकाळी शान सिने थिएटरमध्ये खूपच गाजलं. आजही एखाद्या मेहफिल मध्ये पूर्ण गंजा माणूस दिसल्यास त्यास शाकाल असे चेष्टेने संबोधले जाते. जसा इंग्लिश सिनेमातला कोजॅक असायचा. पूर्वीचा खलनायक आणि आजचा खलनायक, म्हणजेच गब्बरपासून पुढे...यांत मूलतः फरक काय? तर, राम और श्याम या सिनेमातील इतर सर्व घटना आणि पात्रं जरी काल्पनिक वाटत असली तरी तो सिनेमा खूपच मनोरंजक होता. मात्र त्यातील प्राणचे खलनायकी पात्र एकदम शंभर नंबरी होते व तशा प्रवृत्तीचे लोक आजही आपल्या समाजात आढळतात. हे नाकारता येत नाही. हपापाचा माल गपापा...राम नाम जपना पराया माल अपना....तुझं ते माझं...माझं तेही माझंच...!

त्या सिनेमात अशा प्रवृत्तीच्या पात्रास सरतेशेवटी पश्चाताप होतो हेच महत्वाचे! म्हणजेच प्राण दोन-दोन दिलिप कुमारच्या हस्ते पिटला जातो आणि शेवटी पश्चात्त्ताप त्यांस होतो, म्हणजे वाईटपणा जास्त काळ टिकत नाही, हा संदेश त्या खलनायकी पात्रातून दिला जातो.

आजच्या सिनेमातील वाईट प्रवृत्ती ही वाईट म्हणून दाखवली जात नसून, चलता है... अशी समजूत किंवा तरतूद केली जाते. यांस शोकांतिका म्हणावे का? ही मनोरंजनाच्या नावे केली गेलेली प्रेक्षकांची लूट होय, असं नाही वाटत  कुणाला? आजचा नायक आकाशी घिरट्या घालणाऱ्या शत्रूपक्षाच्या तीन-तीन हेलिकॉप्टरना जमीनदोस्त करतो आणि प्रेक्षकांच्या सहनशीलतेची कुचेष्टा म्हणा त्या तिसऱ्या हेलिकॉप्टरच्या टपावर जाऊन कशी जिरवली म्हणत पोज देतो. (लोक हसतात, काहीजण तर बोंबलतात...पैसा, वेळ वाया गेले म्हणून). मात्र सिनेगृहाबाहेर येतांच सगळं कसं विसरून जातात.

या पुढचा सिनेमा कसा असेल? मनोरंजक असेल का फक्त धाडसी सिक्वेन्सची रेलचेल असेल ? ते येणारा काळच सांगू शकेल. नायक नायिका असतीलच; पण प्राण नामक क्रूर खलनायक हा मनोरंजनापर्यत असावा तो गब्बर किंवा शाकाल होऊ देऊ नये. एव्हढीच माफक अपेक्षा. - इक्बाल शर्फ मुकादम, तळोजे. 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

हळदी कुंकू समारंभ - स्त्री प्रबोधनाचे व्यासपीठ व्हावे !